“यह बताना मुश्किल होगा कि कौन हिंदू और कौन मुसलमान.”
मोहम्मद शब्बीर कुरेशी
म्हणतात. अडुसष्ट वर्षीय कुरेशींचा इशारा स्वतः आणि त्यांचे शेजारी अजय सैनी, वय
५२ यांच्याकडे असतो. हे दोघं अयोध्येचे रहिवासी आहेत. रामकोटच्या दुराही कुआँ
परिसरात राहणाऱ्या दोघांनी गेली ४० आपली मैत्री जपून ठेवली आहे.
सैनी आणि कुरेशी कुटुंबातलं
सख्य अगदी रोजच्या गोष्टींमधून कळून येतं. अजय सैनी सांगतात, “मी असंच कधी तरी
कामावर गेलो होतो. मला फोन आला की माझी मुलगी आजारी पडलीये. मी घरी पोचतो तर माझ्या
बायकोने सांगितली की कुरेशींनी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.
तितकंच नाही, औषधं देखील विकत घेतली होती.”
दोघं घराच्या परसात बसले
होते. आजूबाजूला म्हशी, शेरडं आणि अर्धा एक डझन कोंबड्या हिंडत होत्या. दोन्ही
कुटुंबातली बच्चे कंपनी खेळत, गप्पा मारत इथून तिथे हुंदडत होती.
जानेवारी २०२४ सुरू आहे. राम
मंदिराच्या भव्य दिव्य उद्घाटनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. मंदिराचं कुंपण आणि
त्यांच्या घरामध्ये नवे, जाडजूड, दुहेरी बॅरिकेड लावण्यात आले आहेत.
ऐंशीच्या दशकात सैनींचं
कुटुंब कुरेशींच्या शेजारी रहायला आलं. तेव्हा सैनी अगदी तरुण होते. सैनी तेव्हा बाबरी
मशिदीच्या आवारात असलेल्या रामाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला जाणाऱ्या भाविकांना एक
रुपयाचे फुलांचे हार विकायचे.
कुरेशी परंपरेने खाटिक. अयोध्या
शहाराच्या वेशीवर त्यांचं मटणाचं दुकान होतं. १९९२ साली दंगे झाले आणि त्यामध्ये
त्यांचं घर पाडण्यात आलं. त्यानंतर त्यांनी वेल्डिंगचा धंदा सुरू केला.
“या पोरांकडे पहा... ते हिंदू आहेत... आम्ही मुस्लिम. ते भाऊ-बहीण आहेत सगळे,” कुरेशी म्हणतात. अंगणात खेळणाऱ्या विविध वयाच्या मुलांकडे ते निर्देश करतात. “अब आप हमारे रहन सहन से पता कीजिये की यहाँ कौन क्या है. हम एक दूसरे के साथ भेदभाव नही करते,” ते म्हणतात. अजय सैनींच्या पत्नी गुडिया सैनी दुजोरा देतात. “ते वेगळ्या धर्माचे आहेत यानी आम्हाला काहीही फरक पडत नाही.”
दहा एक वर्षांपूर्वी कुरेशींच्या एकुलत्या एक मुलीचं
लग्न होतं, अजय सैनी सांगतात. “सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही घरच्यासारखे सामील
होतो. पाहुण्यांची सरबराई असो, काहीही असो. आम्हाला घरच्यांइतकाच मान आहे
त्यांच्या कुटुंबात. आणि आम्ही एकमेकांसाठी असणार आहोत हे आम्ही जाणतोच.”
काही वेळातच आमच्या गप्पा
राममंदिरापाशी येऊन ठेपतात. बसल्या जागेवरून त्यांना मंदीर दिसतं. अतिभव्य, थेट
आभाळात पोचणारी, अंगावर येणारी वास्तू आहे ही. बांधकाम अजूनही सुरू आहे. चारही
बाजूंनी मोठमोठाल्या क्रेन. सगळंच हिवाळ्याच्या हवेत धूसर, अस्पष्ट.
मंदिराच्या त्या वास्तूकडे
बोट दाखवत कुरेशी बोलू लागतात. विटामातीचं काम केलेल्या त्यांच्या घरापासून अगदी
हाकेच्या अंतरावर आहे मंदीर. “वर मस्जिद थी, वहाँ जब मगरिब के वक्त अज़ान होती थी
तो मेरे घर में चिराग जलता था,” मशीद पाडण्याआधीच्या काळातल्या आठवणी ते सांगू
लागतात.
२०२४ उजाडलंय. अज़ान ऐकू
येईनाशी झालीये. पण कुरेशींच्या मनात इतरही अनेक चिंता आहेत.
“राम मंदिराच्या कुंपणाला लागून असलेली ही सगळी घरं हटवण्यात येणार असल्याचं
आमच्या कानावर आलंय. एप्रिल-मे [२०२३] मध्ये महसूल विभागाचे जिल्हा अधिकारी येऊन इथल्या
जमिनीची मोजणी करून गेले होते. घरांचंही मोजमाप त्यांनी घेतलं होतं,” सैनी
सांगतात. सैनी आणि कुरेशी दोघांचीही घरं कुंपणाला आणि दुहेरी बॅरिकेडला लागूनच
आहेत.
गुडिया म्हणतात, “आमच्या घरापाशी एवढं मोठं मंदीर उभं राहिलंय याचा आम्हाला
आनंदच आहे. इतकी सगळी विकास कामं सुरू आहेत. पण या सगळ्या गोष्टी [विस्थापनाचा] घडल्या
तर आम्हाला त्याचा काय फायदा?” त्या म्हणतात. “अयोध्या का कायापलट हो रहा है, पर
हम ही लोगों को पलट के.”
इथून थोड्याच अंतरावर राहत
असलेल्या ग्यानमती यादव यांचं घर गेलंय. सध्या त्या तुराट्या आणि पेंढ्याच्या घरात
राहतायत. “रामाला त्यांचं मंदिर मिळावं म्हणून आम्हाला आमचं घर द्यावं लागेल,
वाटलं नव्हतं,” नव्या परिसरात आपल्या सगळ्या कुटुंबाचं पालन पोषण करणाऱ्या
ग्यानमती म्हणतात. यादव कुटुंब दूधविक्रीतून गुजराण करतं.
मंदिराच्या समोरच्या प्रवेशद्वारापाशी अहिराना मोहल्ल्यामध्ये त्यांचं सहा खोल्याचं घर होतं. मात्र डिसेंबर २०२३ मध्ये ते पाडण्यात आलं. “त्यांनी बुलडोझर आणला आणि सरळ आमचं घर पाडलं. आम्ही त्यांना आमच्याकडची कागदपत्रं दाखवण्याचा प्रयत्न करतो होतो. वीजबिल, घरपट्टी...तिथले अधिकारी म्हणाले, काहीही उपयोग नाही,” राजन सांगतो. ग्यानमती, त्यांचे वयोवृद्ध सासरे, चार मुलं आणि सहा जनावरं सगळ्यांनी रात्र तशीच उघड्यावर कुडकुडत काढली. “तिथलं काहीसुद्धा आम्हाला नेऊ दिलं नाही,” तो सांगतो. आताचा ताडपत्रीचा निवारा उभा करण्याआधी दोन ठिकाणी त्यांनी मुक्काम केलाय.
“माझ्या पतीचं वडिलोपार्जित घर होतं हे. पन्नास वर्षांपूर्वी याच घरात त्यांचा
आणि त्यांच्या भावंडांचा जन्म झाला होता. पण आम्हाला काडीचा मोबदला देण्यात आला
नाही. अधिकारी लोक म्हटले की ही जागा नझूल जमीन [सरकारी जमीन] आहे. पण आमची मालकी
सिद्ध करणारी सगळी कागदपत्रं आमच्याकडे होती,” ग्यानमती सांगतात.
कुरेशी आणि त्यांची मुलं
म्हणतात की त्यांना योग्य मोबदला दिला तर अयोध्या शहराच्या आत कुठे तरी ते मुक्काम
हलवतील. पण खुशीने नाहीच. “इथे सगळे आम्हाला ओळखतात, आमचे जवळचे संबंध आहेत सगळ्यांशी.
आम्ही इथून उठून फैज़ाबादला गेलो तर आमच्यात आणि इतरांच्यात फरक काय? मग काय आम्ही
अयोध्यावासी नसू,” शब्बीर कुरेशींचे पुत्र जमाल कुरेशी म्हणतात.
अजय सैनींनाही असंच वाटतं.
ते म्हणतात, “आमची श्रद्धा या जमिनीशी बांधलेली आहे. आम्हाला तुम्ही दूर १५
किलोमीटरवर कुठे तरी पाठवून दिलंत तर तुम्ही आमच्यापासून आमची श्रद्धाही हिरावून
घेणार आणि आमचा धंदाही.”
इथलं घर सोडून दूर कुठे
जाण्यास सैनीही राजी नाहीत कारण त्याचा थेट संबंध त्यांच्या कामाशी आहे. “मी रोज
सायकलने वीस मिनिटात नया घाटपाशी नागेश्वरनाथ मंदिरात पोचतो आणि फुलं विकतो.
भाविकांच्या गर्दीप्रमाणे मला दिवसाचे कधी ५० तर कधी ५०० रुपये मिळतात. त्यात माझं
घर चालतं. आता घरच बदललं तर प्रवासात वेळही जाणार आणि जास्तीचा पैसा पण,” ते सांगतात.
जमाल म्हणतात, “आमच्या घरामागे
इतकं भव्य मंदीर उभं आहे याचा आम्हाला अभिमान आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने
श्रद्धेचा आधार घेत ते बांधायला परवानगी दिली आहे. त्याला विरोध करण्याचं काहीही
कारण नाही.”
“पण, आम्हाला काही इथे राहू
देणार नाहीत. आमची हकालपट्टी ठरलेली आहे,” ते म्हणतात.
मंदिराच्या कुंपणाला लागून त्यांच्या घरापाशी टेहळणीसाठी उभारलेला टॉवर, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सशस्त्र जवानांची सततची येजा असल्याने अशा सैन्याच्या पहाऱ्यात जगण्याचा ताण या कुटुंबांना आतापासूनच सहन करावा लागतोय.
मंदिराजवळच्या अहिराना
मोहल्ल्यातून जाण्याची स्थानिकांना आता परवानगी नाही. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या
हनुमान गढीला जायचं असेल तर त्यांना मोठा वळसा घालून जावं लागत आहे.
२२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या
भव्य सोहळ्याच्या दिवशी त्यांच्या घरासमोरचा दुराही कुआँचा रस्ता अतिमहत्त्वाच्या
व्यक्तींना येण्याजाण्यासाठी राखून ठेवलेला होता. राजकीय नेते, मंत्री आणि अनेक
सुप्रसिद्ध तारेतारकांचा यात समावेश होता.
*****
सोमवारी, ५ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्य सरकारने २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प सादर केला आणि तो रामाला अर्पण केला. “या अर्थसंकल्पामागचा प्रत्येक विचार, प्रण आणि शब्दामध्ये प्रभू श्री राम आहेत,” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात. अयोध्येतील पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाने १,५०० कोटींची तरतूद केली असून त्यातले १५० कोटी पर्यटन विकास आणि १० कोटी आंतरराष्ट्रीय रामायण व वेदिक संशोधन संस्थेसाठी ठेवण्यात आले आहेत.
नवीन मंदिराचा विस्तार ७० एकर जागेमध्ये असल्याचं सांगितलं जातं. मुख्य मंदिर २.७ एकरवर आहे. या प्रकल्पासाठी लागणारा पैसा श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून मिळाला आहे. या न्यासावर सरकारी कृपादृष्टी असल्याने त्यांना परकीय निधी स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेली एफसीआरएची नोंदणी मिळाली आहे. परदेशी नागरिक त्यांना आर्थिक देणगी देऊ शकतात आणि भारतीय नागरिकांना देणगीवर आयकर सूट मिळते.
केंद्र सरकारनेही अयोध्येसाठी
आपल्या तिजोऱ्या खुल्या केल्याचं दिसतं. विकास प्रकल्पांसाठी
११,००० कोटी
,
रेल्वे स्थानक सुधारणांसाठी
२४०
कोटी
आणि नव्या विमानतळासाठी १,४५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मंदिराचं उद्घाटन झाल्यावर
आणखी काही उलाढाली होतील. “मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाल्यावर अयोध्येत
दररोज ३ लाख लोक येतील असा अंदाज आहे,” मुकेश मेश्राम म्हणतात. ते उत्तर प्रदेश सरकारचे
मुख्य सचिव (पर्यटन) आहेत.
या अतिरिक्त भाविकांच्या सोयीसाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विस्तार होणं गरजेचं आहे. तो करत असताना जुनी घरं, शेजार आणि मैत्रीवर मात्र संक्रात येणार.
“या गल्लीच्या टोकाला एक मुस्लिम कुटुंब राहतं. ते आमचे नातेवाईक आहेत. त्यांना जागेचा मोबदलासुद्धा देऊ केलाय. त्यांचं घर कुंपणाला टेकून असल्याने थोडा भाग पाडण्यात आला आहे,” कुरेशींचा मुलगा जमाल सांगतो. तो सांगतो की ५० मुस्लिम कुटुंबांसह एकूण २०० कुटुंबं मंदिर न्यासाच्या ७० एकर क्षेत्राला लागून राहतात. रामजन्मभूमी न्यास आता इथल्या सगळ्या मालमत्ता संपादित करत असल्याने त्यांना लवकरच इथून निघून जावं लागणार आहे.
“मंदिर प्रकल्पाच्या जागेत येणारी घरं न्यासाने विकत घेतली आहेत आणि मालकांना
जागेचा योग्य मोबदला देण्यात आला आहे. आणखी भूसंपादनाचं सध्या तरी काही नियोजन
नाही,” विहिंपचे नेते शरद शर्मा सांगतात. मात्र लोकांचं म्हणणं वेगळं आहे.
त्यांच्या मते न्यास जबरदस्तीने मंदिराशेजारच्या मालमत्ता संपादित करत आहे. त्यात
राहती घरं आणि फकीरे राम मंदिर किंवा बद्र मशिदीचाही समावेश आहे.
आधीच विस्थापित झालेल्या
यादव कुटुंबियांनी घराच्या दारातच रामाचं पोस्टर लटकवलं आहे. “आम्ही जर हे लावलं
नाही तर इथेसुद्धा ते आमचं जिणं हराम करतील,” राजन सांगतो. घर हिरावून घेतल्याने
त्यांची इतकी दुरवस्था झाली आहे की राजनने त्याचं कुस्तीचं प्रशिक्षण अर्ध्यावर
सोडलंय. “आता आम्ही जिथे आमची झोपडी उभारलीये, ती जागा रिकामी करा म्हणून धमक्या
देण्यासाठी अधिकारी लोक आणि काही अनोळखी माणसं दर आठवड्याला आमच्या दारात उभे
राहतायत. ही जमीन आमच्या मालकीची असली तरी त्यावर आम्हाला पक्कं बांधकाम करू देत
नाहीयेत,” तो पारीला सांगतो.
*****
“माझं घर जळत होतं. सगळं लुटून नेलं होतं. आणि संतप्त जमावाने आम्हाला घेरलं होतं,” कुरेशी ६ डिसेंबर १९९२ रोजी आणि नंतरच्या घटना सांगतात. हिंदूंनी बाबरी मशीद पाडली आणि त्यानंतर अयोध्येतल्या मुस्लिमांना लक्ष्य केलं होतं.
आज तीस वर्षांनी ते सारं आठवत ते म्हणतात, “त्या तसल्या प्रसंगात माझ्या शेजारीपाजारी
राहणाऱ्या मला लपवून ठेवलं आणि माझा जीव वाचला. खरं सांगतो, मरेपर्यंत मी हे
विसरणार नाही.”
दुराही कुआँ हा तसा
हिंदूबहुल भाग. मोजकी मुस्लिम कुटुंबं इथे राहतात. त्यातले कुरेशी एक. “आम्हाला
इथून कुठे जावंसं वाटलं नाही. हे आमचं वडिलोपार्जित घर आहे. आमच्या किती पिढ्या
इथे राहिल्या आहेत सांगू शकत नाही. इथल्या हिंदूंसारखाच मीही या गावाचा मूळ रहिवासी
आहे,” अंगणातल्या लोखंडी खाटेवर बसलेले कुरेशी म्हणतात. त्यांचं कुटुंब मोठं आहे.
दोन भाऊ आणि त्यांची बायकापोरं, कुरेशींची आठ मुलं, सुना आणि नातवंडं. आपल्या
कुटुंबातल्या १८ लोकांना दंगलीच्या वेळी शेजाऱ्यांनी दडवून ठेवल्याचं ते सांगतात.
गुडिया सैनी म्हणतात, “आमच्या घरच्यांसारखे आहेत ते. सुखदुःखात आमच्या पाठीशी
असतात. जर हिंदू असून संकटात तुम्ही आमच्या मदतीला येणार नसाल तर अशा हिंदू
असण्याचा फायदा तरी काय?”
यालाच जोडून कुरेशी पुढे म्हणतात, “ही अयोध्या आहे. इथला हिंदू तुम्हाला
समजायचा नाही ना इथला मुसलमान. इथले लोक एकमेकांत किती मिळून मिसळून गेले आहेत ते
तुम्हाला कधीही कळायचं नाही.”
त्यांचं घर जाळल्यानंतर या कुटुंबाने आपल्या मालकीच्या जमिनीच्या एका चिंचोळ्या पट्टीत पुन्हा घर बांधलं. मध्ये खुलं अंगण आहे आणि बाजूने तीन घरं.
कुरेशींची दोघं मुलं – अब्दुल
वाहिद, वय ४५ आणि जमाल, वय ३५ वेल्डिंगचा व्यवसाय पाहतात. मंदिराचं बांधकाम
त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे. “आम्ही आतमध्ये १५ वर्षं काम केलंय १३ सुरक्षा मनोरे
आणि या परिसराभोवतीची २३ बॅरिकेड उभारण्यासाठी वेल्डिंगची किती तरी कामं आम्ही
केली आहेत,” जमाल सांगतो. त्यांनी आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू
परिषदेसोबत आणि जवळपास इथल्या सगळ्याच हिंदू मंदिरांमध्ये कामं केली आहेत. संघाच्या
एका इमारतीतला मनोराही त्यांनी उभारलाय. “यही तो अयोध्या है! हिंदू मुस्लिम इथे
एकमेकांसोबत शांततेत राहतात आणि काम करतात,” जमाल म्हणतो.
त्यांचं दुकान घराच्या
पुढच्या भागात आहे. ज्यांच्यासोबत काम करतो त्यांच्याच अनुयायांनी
त्यांच्यासारख्या मुसलमानांना लक्ष्य़ केलं आहे हा विरोधाभास ते जाणून आहेत. “बाहेरचे
लोक येऊन बखेडा उभा करतात तेव्हाच खरं तर आणि गोष्टी बिघडतात,” जमाल म्हणतो.
धार्मिक दंग्यांचा धोका काय
हे या दोन्ही कुटुंबांना नीट माहित आहे. खास करून निवडणुकीचं वर्ष म्हटल्यावर तर
नक्कीच. “आम्ही अशा संकटांचा अनेकदा सांना केला आहे. सगळं काही राजकीय लाभासाठी
आहे हे आम्हाला माहित आहे. सगळा दिल्ली आणि लखनौतला कुर्सी का खेल आहे. आमचं नातं
त्यामुळे नाही बदलणार,” कुरेशी अगदी ठामपणे सांगतात.
सैनींना पुरेपूर कल्पना आहे जर
एखादा हिंसक जमाव समोर आला तर त्यांचं हिंदू असणं त्या क्षणी त्यांना वाचवू शकतं.
१९९२ च्या डिसेंबरमध्ये घडलं तसंच. त्यांचं घर सुखरूप राहिलं आणि कुरेशींच्या
घरावर हल्ला झाला. “त्यांच्या घरात आग लागली तर त्याच्या झळा आमच्या घरापर्यंत पोचणारच
ना,” सैनी म्हणतात. त्यामुळे “आग विझवायला चार बादल्या पाणी आधीच भरून ठेवू आम्ही.
एकमेकांसाठी आम्ही उभे असू हे आम्हाला माहितीये.” कुरेशी कुटुंबियांसोबत असलेलं
पक्कं नातं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं.
“आम्ही एकमेकांसोबत फार प्रेमाने आणि मायेने राहतो,” गुडिया म्हणतात.