‘विराट कोहली’. सगळ्यात लाडकं नाव. इथे डुंगरा छोटा गावात क्रिकेटच्या या लोकप्रिय खेळाडूचे अनेक चाहते आहेत.
हिवाळा सुरू आहे. सकाळचे १० वाजून
गेलेत. अनेक छोटे क्रिकेटपटू खेळात मग्न आहेत. मक्याच्या हिरव्या गार शेतांच्या
मधोमध असलेली मोकळी जागा म्हणजे क्रिकेटचं मैदान असेल असं पाहताक्षणी वाटणार पण
नाही. पण बांसवाडाच्या सगळ्या क्रिकेटपटूंना या मैदानाचा अगदी कानाकोपरा माहीत
आहे. मैदानाची सीमा असो किंवा खेळपट्टीच्या कडा.
क्रिकेटच्या चाहत्यांबरोबर गप्पा
मारायच्या असल्या तर त्यांना नुसतं त्यांच्या आवडत्या खेळाडूबद्दल विचारायचं. बास.
सुरुवात विराट कोहलीनेच होते. पण लगेचच इतर नावं यायला लागतात – रोहित शर्मा,
जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज.
आणि अखेर १८ वर्षांचा शिवम लबाना
म्हणतो, “मला स्मृती मंधाना आवडते.” भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार
देशात भरपूर लोकप्रिय आहे. स्मृती सलामीची डावखुरी फलंदाज आहे.
पण इथे फक्त तिच्याबद्दल बोलणं सुरू
नाहीये, बरं का. आम्हाला जराशाने लक्षात येतं.
क्रिकेटच्या क्षितिजावरच्या या उगवत्या भावी गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये एकच
मुलगी अगदी उठून दिसतीये. फक्त नऊ वर्षांची असणारी हिताक्षी राहुल हरकिशी
क्रिकेटचा सगळा जामानिमा म्हणजे पांढरे बूट, बॅटिंग पॅड, मांडी आणि कोपराला
संरक्षक पट्ट्या घातलेली ही चिमुकली खेळाडू खेळायला सज्ज आहे.
“मला बॅटिंग करायचीये. मेरे को सब से अच्छी लगती है बॅटिंग,” ती पारीला सांगते. “मैं इंडिया के लिये खेलना चाहूंगी,” ती सांगून टाकते. हिताक्षीला बोलायला आवडत नाही फारसं. पण खेळपट्टीवर जाऊन आपला खेळ दाखवण्यात तिला जास्त रस आहे. एकदम टणक खेळपट्टीवरून ती काही चेंडू सराईतपणे जाळीपार करते.
हिताक्षीचे वडीलच तिचे प्रशिक्षक
आहेत आणि हिताक्षीने भारतासाठी खेळावं असं त्यांनाही वाटतं. मग ती तिचं दिवसभराचं
वेळापत्रक सांगू लागते, “शाळेतून घरी आले की मी एक तासभर झोपते. त्यानंतर
संध्याकाळी चार ते आठ सराव असतो.” शनिवार-रविवारी आणि आजच्यासारखी सुटी असेल तर ती
सकाळी ७.३० वाजल्यापासून दुपारपर्यंत सराव करत असते.
“आम्ही गेले १४ महिने सराव करतो.
तिच्याबरोबर मला पण खेळावं लागतं,” हिताक्षीचे वडील राहुल हरकिशी सांगतात.
बांसवाडाच्या डुंगरा बडा गावी त्यांचं गाड्या दुरुस्तीचं गॅरेज आहे. आपल्या
मुलीमध्ये क्षमता आहे यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. ते म्हणतात, “शानदार प्लेयिंग
है. वडील म्हणून मला तिच्याशी फार शिस्तीत वागायला आवडत नाही, पण काय करणार?
वागावं वागतं.”
‘शानदार प्लेयिंग है,’ हिताक्षीचे वडील आणि आता प्रशिक्षक आणि स्वतः क्रिकेटपटू असणारे राहुल हरकिशी म्हणतात
तिचा आहार एकदम पौष्टिक असावा याचीही घरचे काळजी घेतात. “आठवड्यातून चार वेळा अंडी आणि कधी कधी मटण,” राहुल सांगतात. “ती दररोज दोन ग्लास दूध पिते. कच्ची काकडी आणि गाजरसुद्धा खाते.”
सगळ्या सरावाचा परिणाम निश्चितच
दिसून येतो. डुंगरा छोटा गावाचे १८ वर्षांचा शिवम लबाना आणि १५ वर्षांचा आशीष
लबाना जिल्हास्तरावर क्रिकेट खेळलेत. हिताक्षी त्यांच्याबरोबर सराव करते. हे दोघं
गोलंदाज आहेत आणि गेल्या चार-पाच वर्षांपासून विविध स्पर्धांमध्ये खेळतायत. लबाना
समुदायाच्या ६० संघांची लबाना प्रिमीयर लीग (एलबीएल) ही स्पर्धा भरते, त्यातही ते
खेळले आहेत.
“आम्ही सगळ्यात आधी एलबीएलमध्ये
खेळलो तेव्हा आम्ही मुलं-मुलंच खेळत होतो. तेव्हा राहुल भैय्या काही आमचे
प्रशिक्षक नव्हते,” शिवम सांगतो. “मी एका सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या.”
आजकाल ते राहुल हरकिशींनी सुरू
केलेल्या हिताक्षी क्लबसाठी देखील खेळतात. “आम्ही तिला प्रशिक्षण देतोय,” शिवम
सांगतो. “तिने खेळाची सुरुवात आमच्या संघातून करावी अशी आमची इच्छा आहे. आमच्या
समाजाच्या मुली [क्रिकेट] खेळत नाहीत. त्यामुळेच ती खेळतीये ही फार चांगली गोष्ट
आहे.”
हिताक्षीच्या आईवडलांचं स्वप्न काही वेगळं आहे आणि त्यामुळे ती नशीबवान असल्याचं तिच्या संघातले खेळाडू म्हणतात. “उनका ड्रीम है उस को आगे बढायेंगे.”
हा खेळ कितीही लोकप्रिय असला तरी
मुलांनी तो खेळावा असं काही सगळ्यांना वाटत नाही. त्याच्या संघातला एक १५ वर्षांचा
खेळाडू अशाच कात्रीत अडकला आहे. “तो राज्यस्तरावर किती तरी वेळा खेळलाय आणि त्याला
पुढे खेळायचंय. पण सध्या तो खेळ सोडण्याच्या विचारात आहे. त्याच्या घरचे कदाचित
त्याला कोटाला पाठवतील,” तो सांगतो. कोचिंग क्लास आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी
प्रसिद्ध असलेलं कोटा आणि क्रिकेटचा दुरान्वयेही संबंध लागत नाही.
हिताक्षीची आई, शीला हरकिशी प्राथमिक
आणि माध्यमिक विद्यार्थ्यांना हिंदी शिकवते. घरच्या इतर सगळ्यांप्रमाणे तिही
क्रिकेटची चाहती आहे. “भारताच्या संघातल्या प्रत्येक खेळाडूचं नाव मला माहीत आहे
आणि मी सगळ्यांना ओळखू शकते. पण रोहित शर्मा मला सगळ्यात जास्त आवडतो,” ती हसत हसत
सांगते.
शिक्षिकेचं काम करत असतानाच फावल्या वेळात शीला गॅरेजचंही काम पाहते. आमची भेट तिथेच झाली. “सध्या राजस्थानात फार कुणी मुलं-मुली क्रिकेट खेळत नाहीयेत. आमच्या मुलीवर आम्ही थोडे फार कष्ट घेतोय आणि आम्ही ते करतच राहू.”
नऊ वर्षांच्या हिताक्षीला अजून मोठा
पल्ला गाठायचा आहे. पण तिच्या आई-वडलांचा निर्धार पक्का आहे. “तिला एक उत्तम
क्रिकेटपटू बनवण्यासाठी जे काही लागेल ते आम्ही करणार.”
“पुढे काय होईल, मी सांगू शकत नाही,”
राहुल म्हणतात. “पण वडील म्हणून आणि एक चांगला खेळाडू म्हणून मी निश्चित सांगू
शकतो की ती एक दिवस भारतीय संघात खेळणार, नक्की.”