“आई गायची त्यातले दोन-तीन शब्द आजही लक्षात आहेत,” हौसाबाई दिघे सांगत होत्या. वर्ष होतं १९९५ आणि त्यांचा संवाद सुरू होता हेमा राईरकर आणि गी प्वातवाँ यांच्याशी. पुण्याचे या दोघा समाज शास्त्रज्ञांनी ८०च्या दशकात जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह करायला सुरुवात केली होती. दोघं पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या भांबर्डे या गावी आले होते. ओव्या गाणाऱ्या बायांशी त्यांना आणि त्यांच्या चमूला बोलायचं होतं.
हौसाबाई पुढे सांगतात, “दिवसभर रानात राबून घरी यायचं आणि भाकरीला पीठ नसायचं. मग जात्यावर दळणं करत गाणी गायची. त्याशिवाय दिवस पुराच व्हायचा नाही. एखादा शब्द जरी आठवला तरी पुढचं गाणं आपसूक येतं. माझ्यासोबतच ही गाणी संपणार. तोपर्यंत माझ्या ध्यानात असतील.”
हौसाबाईंचे शब्द त्यांचे एकटीचे नाहीत. शेती, शेतमजुरी करणाऱ्या, मासेमारी, कुंभारकाम किंवा माळीकाम करणाऱ्या अनेकानेक समुदायांच्या बायांचं अगदी हे असंच म्हणणं आहे. तांबडं फुटण्याआधी उठून, घरची सगळी कामं उरकून दिवसभर रानात राबणाऱ्या या बाया आहेत.
आणि कामाच्या या रगाड्याची सुरुवात बहुतेक वेळा जात्यावरच्या दळणांनी व्हायची. जातं फिरू लागलं की त्या गाऊ लागायच्या. चुलीपाशी एका कोपऱ्यात किंवा घराच्या पडवीवर, ओसरीतला एखादा कोपरा म्हणजे त्यांची हक्काची, स्वतःची अशी जागा होती. आपल्या आयुष्यातले संघर्ष, आनंद आणि दुःखही एकमेकींना सांगून मन मोकळं करता येईल अशी एक खास जागा.
आणि फक्त आपली-तुपली गाऱ्हाणी नाहीत तर जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, गावातलं, घरातलं आणि कुटुंबातलं त्यांचं जगणं, धर्म, जत्रा-यात्रा-पंढरीची वारी, जातीच्या आणि पुरुषप्रधानतेच्या उतरंडी इतकंच नाही बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि अशी अनेक विषयांवर त्यांचं म्हणणं त्या सांगत होत्या. या फिल्ममध्ये मुळशीच्या खडकवाडीच्या ताराबाई उभे याविषयी बोलतात.
पारीने तयार केलेल्या या बोधपटात काही विशेष व्यक्तींच्या मुलाखती आहेत. ते आहेत, संगीताच्या शास्त्राचे जाणकार आणि तंत्रज्ञ, जात्यावरच्या ओव्यांचा डेटाबेस तयार करणारे बर्नार्ड बेल, ओव्या गोळा करणाऱ्या चमूतील संशोधक आणि मराठीत ओव्या उतरवून काढणारे जितेंद्र मैड आणि ओव्यांचा मराठीतून इंग्रजीत अनुवाद करणाऱ्या आशा ओगले.
जात्यावरच्या ओव्यांचा हा संग्रह पारीकडे २०१६ साली सुपूर्द झाला. आणि ६ मार्च २०१७ पासून आम्ही यातल्या ओव्या प्रकाशित करायला सुरुवात केली. वाचाः जात्यावरची ओवी: जतन करूया एक राष्ट्रीय ठेवा
आज सात वर्षांनंतरही आम्ही या ओव्या गाणाऱ्या बायांना त्यांच्या गावी, घरी जाऊन भेटतोय आणि त्यांची गाणी आणि त्यांच्या जगण्याची कहाणीदेखील सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. या सर्व कहाण्या तुम्ही इथे वाचू शकताः जात्यावरची ओवी प्रकल्पः आतापर्यंतचे सर्व लेख
या फिल्ममध्ये अगदी मोजक्या बायांची आपली भेट होते पण प्रत्यक्षात जात्यावरच्या ओव्यांच्या संग्रहामध्ये महाराष्ट्रातल्या ११०७ आणि कर्नाटकातल्या ११ गावांमधल्या ३,३०२ स्त्रियांनी गायलेल्या तब्बल १,१०,००० ओव्या या संग्रहात समाविष्ट आहेत.
इतक्या सगळ्या ओव्या उतरवून घेण्याचं मोठं काम जितेंद्र मैड यांनी निभावून नेलं तर रजनी खळदकर यांनी ओव्या डेटाबेसमध्ये मराठीमध्ये टाइप केल्या. हेमा राईरकर यांनी काही ओव्यांचा अनुवाद केला. आणि तेव्हापासून आजपर्यंत आशा ओगले जितेंद्र मैड यांच्या साथीने ओव्यांचा अनुवाद करत आहेत. आणखी ३०,००० ओव्यांचा अनुवाद व्हायचा आहे.
या लघुपटामध्ये जात्यावरच्या ओव्यांच्या या संग्रहाची ओळख करून देण्यात आली आहे. यामध्ये १९९० मध्ये बर्नार्ड बेल आणि त्यांच्यासोबत असलेल्या संशोधक आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या तत्कालीन चित्रणाचाही समावेश आहे.
या लघुपटामध्ये जात्यावरच्या ओव्यांच्या या संग्रहाची ओळख करून देण्यात आली आहे. यामध्ये १९९० मध्ये बर्नार्ड बेल आणि त्यांच्यासोबत असलेल्या संशोधक आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या तत्कालीन चित्रणाचाही समावेश आहे.
१९९५ ते २००३ या काळात बेल यांनी टेपवरती ४,५०० ओव्या ध्वनीमुद्रित केल्या होत्या. मुळात ओव्या संकलित करण्याचं गावपातळीवरचं काम मात्र त्यापूर्वीच सुरू झालं होतं. १९८० च्या दशकात या प्रकल्पाचं बीज रोवणारे ‘गी बाबा’ आणि हेमाताई पुणे जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये काम करत होते. गावातल्या महिला अगदी पिण्याच्या पाण्यासाठी असेल किंवा हुंडा अथवा घरगुती हिंसेविरोधात झगडत होत्या. त्यांना बळ देत या प्रश्नावर काम उभं करत होते. त्या वेळी आपल्या जगण्याची कहाणी या बाया ओव्यांमधून सांगत असत. महाराष्ट्रातल्या या स्त्रियांचा संघर्ष आणि सुखाची नोंद या ओव्यांनी ठेवली आहे.
जात्यावरच्या ओव्यांचे हे सूर आणि काव्य फार दूरपर्यंत पोचलं आहे. २०२१ साली दक्षिण कोरियातील १३ व्या ग्वांगजू बिनालेमध्ये हा प्रकल्प समाविष्ट होता. २०२२ मध्ये बर्लिनच्या ग्रोपियस बाइ संग्रहालयामध्ये आणि २०२३ साली लंडन बार्बिकन इथे हे काम सादर झालं आहे. इंडियन एक्सप्रेस, स्क्रोल तसंच द हिंदू बिझनेसलाइन या प्रिंट आणि ऑनलाइन वृत्तपत्रांमध्येही जात्यावरच्या ओव्यांच्या संग्रहावरती लेख प्रसिद्ध झाले आहेत.
पीएचडी करणाऱ्या नाशिकच्या एका विद्यार्थ्याने बाबासाहेब आंबेडकरांवरच्या ओव्या आपल्या प्रबंधासाठी संदर्भ म्हणून वापरल्या आहेत. अमेरिकेतील एक शास्त्रज्ञ पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या क्षेत्रात असलेल्या बोर-बाभूळ, खैर आणि इतर काटेरी झुडुपांच्या संदर्भासाठी जात्यावरच्या ओव्यांचा हा संग्रह आणि इतर लोकगीतांचा संदर्भ म्हणून वापर करत आहे. वर्षभरात अनेक विद्यार्थी आणि संशोधक पारीवरच्या या संग्रहानिमित्ताने संपर्क साधत असतात.
अनेकांचे हात लागलेल्या या बहुमोल कामाची आणि प्रकल्पाच्या व्याप्तीची कल्पना आपल्याला या लघुपटातून येते. अनेक संशोधक, वाचक आणि लोकगीत आणि संगीताच्या चाहत्यांसाठी ओव्यांचं दालन या लघुपटाने खुलं केलं आहे.
“अनफेटर्ड व्हॉइसेस” या बर्नार्ड बेल निर्मित पुराभिलेखीय चित्रणातील काही भाग आणि २०१७ पासून आजवर पारीवर प्रकाशित झालेल्या जात्यावरच्या ओव्यांसंबंधीच्या कहाण्यांमधील काही चित्रण तसंच छायाचित्रांचा वापर या लघुपटामध्ये करण्यात आला आहे.