मार्च २०२० मध्ये कोविड-१९ पसरायला लागला आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अरुण गायकवाड यांच्या १० एकर रानात चिटपाखरू पण दिसेना. “जवारी काढली होती, हरभरं, कांदा तयार होता,” गायकवाडांच्या पत्नी, ४८ वर्षीय राजश्री सांगतात. उस्मानाबाद तालुक्यातल्या महाळिंगी गावी त्यांच्या घरी आम्ही बोलत होतो.
पण देशव्यापी टाळेबंदीमुळे बाजार बंद होते. “आम्हाला काही आमचा माल बाजार समितीत नेणं जमलं नाही. सगळा माल आमच्या नजरेसमोर नासून गेला,” राजश्री सांगतात.
५२ वर्षीय अरुण आणि राजश्रींनी १० क्विंटल ज्वारी, १० टन कांदा आणि १५ क्विंटल हरभरा काढला होता. ज्वारीला त्या वेळी क्विंटलमागे २,२५० रुपये किमान भाव मिळत होता. हरभऱ्याला ४,८०० आणि कांदा १,३०० प्रति क्विंटल भाव जाहीर झाला होता. निव्वळ मालाची किंमत मोजली तरी या दांपत्याचं २ लाख २७ हजार पाचशे रुपयांचं नुकसान झालं असावं. बी-बियाणं, खतं. औषधं आणि इतर निविष्ठावरचा खर्च तर यात धरलेलाच नाही.
शेतात केलेल्या कष्टांची तर मोजदादच नाही, राजश्री सांगतात. “कोविड पसराया लागला त्याच्या अदुगरच त्यांनी ट्रॅक्टर घेतला होता. महिन्याचा १५ हजारांचा हप्ता भरणं देखील मुश्किल झालतं. बँकेच्या नोटिसा यायला लागल्या होत्या.”
पण खरिपात (जुलै-ऑक्टोबर २०२०) हे नुकसान भरून निघेल अशी अरुण यांना आशा होती. कोविड-१९ ची पहिली लाट जुलैच्या सुमारास ओसरायला लागली होती आणि पेशंटची संख्याही कमी व्हायला लागली होती. संकट ओसरलं असंच त्यांना वाटत होतं. “लवकरच सगळं पहिल्यासारखं येईल असं वाटायलं होतं. पीडा टळली होती. सगळेच व्यवहार हळू हळू पूर्वपदावर यायला लागले होते,” अरुण यांचा जावई, ३० वर्षीय प्रदीप ढवळे सांगतो.
गेल्या वर्षी जून महिन्यात अरुण आणि राजश्री यांनी शेतात सोयाबीन पेरलं. पण ऑक्टोबर महिन्यात जेव्हा पीक काढणीला येतं तेव्हा आलेल्या अवकाळी पावसात उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी सगळी पिकं वाहून गेली. “आमचं अख्खं रान पाण्यात होतं,” राजश्री सांगतात. “काही देखील हाती लागलं नाही. किती नुकसान झालं ते काही तेव्हा यांनी सांगितलं नव्हतं. माझं टेन्शन वाढायला नको म्हणून बोलले नसतील.” आपलं कर्ज १० लाखाला पोचलंय असं एकदा अरुण म्हणाल्याचं त्यांना आठवतं. ४-५ वर्षांच्या काळात कर्जाचा बोजा इतका वाढला होता.
यातलं काही त्यांच्या तीन मुलींच्या लग्नासाठी काढलेलं होतं. “कोविड नव्हता तेव्हाही आमची हालत बेकारच होती. त्यात लॉकडाउन लागला, आणि मग अवकाळी पाऊस आला आन् मग लईच बिघडली,” राजश्री सांगतात. “आमचा मुलगा, मंथन २० वर्षांचा आहे. त्याच्या शिक्षणासाठीही पैशाची गरज आहे.”
अशी सगळी संकटं आल्यानंतरही अरुण यांनी आशा सोडली नव्हती. वाईट काळ सरलाय असं त्यांना वाटलं होतं. नव्या जोमाने त्यांनी रब्बीची तयारी करायला सुरुवात केली. ज्वारी आणि हरभरं पेरलं. “रब्बीची पिकं काढायला आणि दुसरी लाट यायला एकच गाठ,” प्रदीप सांगतो. “पहिल्या लाटेपेक्षा ही जास्तच भयंकर होती. गेल्या साली लोक इतके घाबरले नव्हते. पण आता लोक जाम घाबरले. कुणी पण घराबाहेर निघत नव्हतं.”
या वर्षी २५ क्विंटल ज्वारी आणि २० क्विंटल हरभरा झाला. पण अरुण आणि राजश्रीसाठी पुन्हा एकदा मार्च २०२० सारखीच वेळ आली होती. देशात पुन्हा एकदा लॉकडाउन लागला, बाजार बंद झाले आणि सगळ्या मोठ्या पिकांचे भाव कोसळले.
पुन्हा एकदा आणखी एका संकटाचा सामना करण्याचा विचारच अरुण यांना सहन झाला नसावा. या वर्षी एप्रिल महिन्यात एक दिवस सकाळी त्यांनी आपल्या घराशेजारच्या शेडमध्ये फास लावून घेतला.
अरुण यांना कोविड-१९ ची बाधा झाली नाही पण या आजाराच्या फेऱ्यातून मात्र ते वाचू शकले नाहीत.
मार्च २०२० मध्ये कोविड-१९ चा उद्रेक झाला. त्यानंतरच्या एक वर्षभरात भारतात किमान साडेसात कोटी लोक दारिद्र्यात ढकलले गेल्याचं, म्हणजेच त्यांचं दिवसाचं उत्पन्न २ डॉलरपेक्षा कमी असल्याचं अमेरिका स्थित प्यू रीसर्च सेंटरच्या एका अहवालात म्हटलं आहे. मार्च २०२१ मध्ये हा अहवाल प्रकाशित झाला.
मराठवाड्याच्या उस्मानाबादसारख्या जिल्ह्यात ही मंदी जास्तच लक्षणीय आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ इथला शेतकरी कर्ज आणि शेतीवरील अरिष्टाचा सामना करतोय.
२०१५ ते २०१८ या काळात राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. अनेकानेक वर्षांचा दुष्काळ, महागाई आणि वातावरणातले बदल या सगळ्यांमुळे इथली अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्या अधिक वाढल्या आहेत. कोविड-१९ ची महासाथ आली तेव्हापासून त्यांची जगण्याची लढाई जास्तच खडतर झाली आहे. अनेक शेतकरी गरिबीत लोटले गेले आहेत.
कोविड-१९ ची दुसरी लाट आली तेव्हा होतं नव्हतं ते सगळंच हातचं जाण्याच्या भीतीने ४० वर्षीय रमेश चौरेंना ग्रासून टाकलं. पहिल्या लाटेतच त्यांची सगळी जिद्द पणाला लागली होती.
उस्मानाबादच्या रघुची वाडीचे रहिवासी असलेल्या रमेश यांनी आपल्या पत्नीच्या डायलिसिस उपचारासाठी पैसे उसने घेतले होते. महिन्यातून एकदा उपचारासाठी त्यांना इथून ९० किलोमीटरवर असलेल्या लातूरला जावं लागत होतं. “पत्नीच्या उपचारांवर त्याचा लई खर्च झाला होता,” शेजारीच राहणारे रमेश यांचे चुलते, ६१ वर्षीय रामराव म्हणतात. “२०१९ साली सप्टेंबर महिन्यात ती वारली.”
त्यानंतर रमेश यांनी शेतात ज्वारी आणि सोयाबीन घेतलं. उदरनिर्वाहासाठी ते टेम्पो चालवायचे. आपल्या मुलाचं, १६ वर्षांच्या रोहितचंही सगळं तेच करत होते. “टेम्पो चालवून त्यांना महिन्याला ६,००० रुपये मिळत होते,” रामराव सांगतात. “पण कोविड-१९ आला आणि त्याचं काम सुटलं. शेतीतही तोटा झाला.”
इतर शेतकऱ्यांप्रमाणेच रमेश यांनाही आपली २५ क्विंटल ज्वारी विकणं मुश्किल होऊन बसलं. त्यांचं सुमारे ६४,००० रुपयांचं नुकसान झालं. रामराव म्हणतात की लागवडीचा एकरी १२,००० रुपये खर्च पकडला तर रमेश यांना याच्यावर ३० हजार रुपयांचा फटकाच बसला असं म्हणावं लागेल.
रमेश यांचं कर्ज वाढतच चाललं होतं. शेतीसाठी आणि दवाखान्याच्या खर्चापायी ४ लाखांचं कर्ज झालं होतं. त्यांना आता त्याचा घोर लागला होता. “सोयाबीन जरी चांगलं आलं आणि भाव चांगला मिळाला तरी त्यातनं इतकं सारं कर्ज फिटणार नाही याची त्याला जाणीव झाली होती,” रामराव सांगतात. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रमेश यांनी आत्महत्या केली. “मी सांजच्याला रानात गेलो होतो. परत आलो तर तो पंख्याला लटकलेला,” रामराव सांगतात. “ऑक्टोबर महिन्यात पाऊस आला आणि त्याचं सगळंच्या सगळं सोयाबीन वाहून गेलं. ते तरी त्याला पहावं लागलं नाही म्हणायचं.”
एका वर्षभरात आई-वडील दोघं गेले त्यामुळे रमेश यांचा मुलगा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आता एका रेशन दुकानात कामाला लागला आहे. “आता तर शाळा संपली. मला कॉलेजला जायचंय आणि कला शाखेचं शिक्षण घ्यायचंय,” तो सांगतो. “त्यानंतर काय करायचं ते पुढच्या पुढी बघू.”
अनेक वर्षांचा दुष्काळ, महागाई आणि वातावरणातले बदल या सगळ्यांमुळे इथली अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्या अधिक वाढल्या आहेत. कोविड-१९ ची महासाथ आल्यापासून जगण्याची लढाई जास्तच खडतर झाली असून अनेक शेतकरी गरिबीत लोटले गेले आहेत
शेतकऱ्याची क्रयशक्ती कमी होते तेव्हा त्याचे फार दूरगामी परिणाम होत असतात.
बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातल्या कृषी सेवा केंद्राचा मालक ३१ वर्षीय श्रीकृष्ण बढे याला हे परिणाम लवकरच जाणवायला लागले होते. देव दहिफळ हे त्याचं गाव बीडपासून ६० किलोमीटरवर तर उस्मानाबादहून ११५ किलोमीटरवर आहे. त्याच्या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं आणि कीटकनाशकं विकण्याचं काम तो करत होता. “किती तरी वेळा शेतकरी या सगळ्या गोष्टी विकत घेत नाहीत. उधारीवर घेतात,” श्रीकृष्णचा मावसभाऊ खंडू पोटे सांगतो. “पिकं निघाली, माल विकला की ते दुकानदाराची उधारी चुकवतात.”
पण, महासाथ पसरली आणि बहुतेक शेतकऱ्यांना दुकानाची उधारी चुकवणं मुश्किल होऊन बसलं, खंडू सांगतो. “श्रीकृष्णची स्वतःची पाच एकर शेती आहे. त्यामुळे शेतकरी खोटं बोलत नाहीयेत हे त्याला कळत होतं,” तो म्हणतो. “पण त्याने ज्यांच्याकडून माल घेतला त्यांचे पैसे चुकते करायचे होते. त्यासाठी तो कुठून पैसे उसने मिळतील का याची खटपट करत होता. पण काहीच जमून आलं नाही.”
श्रीकृष्णची चिंता वाढायला लागली. आणि मग २०२१ च्या मे महिन्यात तो एक दिवस आपल्या शेतात गेला आणि झाडाला गळफास लावून घेतला. “शेतीच्या पुढच्या हंगामातही अशीच नुकसानी होणार याची त्याला भीती वाटत होती,” खंडू सांगतो. “कसंय, शेतीत नुकसानी झाली तर ती भरून काढायला पुन्हा शेतीतच नशीब आजमवावं लागतं. दुसरा मार्गच नाही.”
आणि राजश्रीसुद्धा आता अगदी हेच करणार आहेत. “[२०२१ खरिपात] सोयाबीनसाठी आम्ही १ लाख रुपये उसने घेतलेत,” त्या सांगतात. “माल विकला की ते आम्ही फेडून टाकू. कर्ज फेडत रहायचा आमच्यापाशी हा इतकाच मार्ग आहे ना.”
तर, यंदा चांगलं पिकायलाच पाहिजे. सध्या तरी राजश्रीताईंच्या मुली आणि जावई त्यांना लागेल ती मदत करतायत. हळू हळू सगळं पूर्वपदावर येतंय. पण सप्टेंबर सरता सरता गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात तुफान पाऊस झालाय. राजश्रींसाठी अजून तरी इडापीडा टळली नाहीये हेच खरं.
लेखकाला या आणि इतर लेखांच्या लेखमालेसाठी पुलित्झर सेंटरतर्फे स्वतंत्र अर्थसहाय्य मिळाले आहे.