दिल्लीच्या लाल कुआँ भागातल्या पुल पेलाद मोहल्ल्यात सगळ्यांनाच तो ‘गाडी लावणारा’ किंवा ‘मिर्ची-आलू’ पोरगा माहितीये. या भागातला तो सगळ्यात लहान हातगाडीवाला आहे.
तो वस्तीतल्या अरुंद बोळातून नाल्यांच्या कडेने एका खुल्या जागेकडे पळत जाताना मी त्याला पाहिलं, तिथे तो त्याची हातगाडी लावतो. गल्लीच्या तोंडाशी त्याने त्याची हातगाडी आणली, ती एका जागी पक्की रहावी म्हणून चाकाला टेकू म्हणून दगड लावले आणि तो एका खोलीत गायब झाला. १४ वर्षांच्या अर्जुन सिंगसाठी हे रोजचंच आहे. तो आता आपल्या गाडीवर बटाट्याचे वेफर्स आणि मोमो विकायला ठेवेल.
हा लाजरा पण हसरा मुलगा त्याच्या विधवा आईबरोबर, लक्ष्मी सिंगबरोबर एका लहान खोलीत राहतो. त्यांच्या या लहानशा घरात कसलंही फर्निचर नाही. भिंतीवर एक आरसा आहे आणि त्यावर कोपऱ्यात चिकटपट्टीचं एक छानसं हृदय चिकटवलंय. आणि त्यावर लिहिलंय, ‘लक्ष्मी+अर्जुन’. “मी लिहिलंय ते,” अर्जुन सांगतो, “म्हणजे मग जो कुणी आम्हाला भेटायला येईल त्यांना त्याच्यात आमची दुनिया पहायला मिळेल.”
त्याची ही दुनिया एकाकी आणि अवघड आहे.
१४ जुलै २०१३ रोजी अर्जुनचे वडील राजेश्वर सिंग इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातलं गटार साफ करताना मरण पावले. ते तिथे २०११ पासून कामावर होते. त्याच्यासोबत अजून दोघे होते, त्यांच्या नाकात विषारी वायू गेला आणि त्यातच ते इमारतीच्या तळघरात मरण पावले. तो आणि इतर दोघं, अशोक कुमार आणि सतीश सिंग, या शासन संचलित कला केंद्रातले कंत्राटी कामगार. तिघंही जण वाल्मिकी या दलित समुदायातले, तिघांची घरं त्रिलोकपुरीतल्या वाल्मिकी वस्तीत. (लक्ष्मी त्यानंतर अर्जुनसोबत तिची विवाहित मुलगी राहते तिथे लाल कुआँमध्ये रहायला गेली.)
भिंतीवर एक आरसा आहे आणि त्यावर कोपऱ्यात चिकटपट्टीचं एक छानसं हृदय चिकटवलंय. त्यावर लिहिलंय, ‘लक्ष्मी+अर्जुन’. “मी लिहिलंय ते,” अर्जुन सांगतो, “म्हणजे मग जो कुणी आम्हाला भेटायला येईल त्यांना त्याच्यात आमची दुनिया पहायला मिळेल.”
राजोश्वर गेला तेव्हा त्याचा मुलगा अर्जुन जेमतेम १० वर्षांचा होता. “माझे बाबा दिसायला भारी होते,” अर्जुन सांगतो. “मी इतका त्यांच्यासारखा होतो, माझ्या भुवया अगदी त्यांच्यासारख्या आहेत. मी त्यांच्यासारखाच बुटका आहे. त्यांना भेंडी आवडायची आणि मलादेखील आवडते. स्वयंपाक करायला जाम आवडायचं त्यांना आणि आता मीही तेच करतोय, अर्थात गरज म्हणून. ते फार प्रेमळ होते आणि मला चिंटू म्हणायचे.”
अर्जुनला त्याच्या वडलांची सगळ्यात जास्त कोणती आठवण येत असेल तर ते नेहमी गायचे ते त्यांचं गाणं – ‘तुम मुझे यूं, भुला न पाओगे’. “माझा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे माहितीये,” अर्जुन विचारतो, “मी आता कुणाला पापा म्हणून शकत नाही. मी १० वर्षांचा पण नव्हतो जेव्हा पापा गेले. माझी आई इतकी दुःखात होती, ती इतकी म्हणजे इतकी रडायची. कुणीच आमच्या मदतीला आलं नाही; सगळ्या नातेवाइकांनी आमची साथ सोडली. मला तर वाटतं मला जमेल तितकं मी पटापट मोठं व्हावं म्हणजे मग मी माझ्या आईचं दुःख थोडं तरी हलकं करू शकेन.”
आम्ही बोलत होतो आणि घड्याळात तीन वाजले होते. अर्जुनची सगळी तयारी करण्याची वेळ. त्याने जवळच्या पोत्यातून काही बटाटे काढले आणि त्याचे काप करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने त्यात अगदी सहज काही मसाले घातले आणि हे सगळं करताना टीव्हीवरच्या मास्टरशेफसारखी त्याचं माहिती देणं चालू होतं. त्यानंतर त्याने मोमो बनवायला सुरुवात केली. अखेर, सगळं साहित्य त्याच्या हातगाडीवर लादलं – गॅसची टाकी, शेगडी, रोवळी, डाव, ताटल्या आणि चटणी. त्याची आई मक्याची कणसं नीट रचून ठेवायला त्याला मदत करत होती.
अर्जुन रोज आपल्या मोहल्ल्यात दुपारी शाळेनंतर त्याची गाडी लावतो. धंदा चांगला झाला तर दिवसाला १००-१५० रुपयाचा नफा होतो आणि कधी कधी मात्र अगदी ५० रुपयेच सुटतात. अनेकदा लोक अगदी १०-१५ रुपयाची देखील उधारी करतात. शनिवार – रविवार आणि सणांमध्ये धंदा चांगला होतो.
पोटापाण्यासाठीचं हे काम फारसं स्थिर नसलं तरी रोजचं भागवण्यासाठी गरजेचं आहे. कारण ते सोडून त्यांची इतर कमाई म्हणजे लक्ष्मीला सरकारकडून दर महिन्याला मिळणारं २००० रुपये विधवा पेन्शन. ती सांगते, आजूबाजूच्या लोकांना त्यांचं चांगलं बघवत नाही आणि खाण्याच्या गाडीमुळे परिसर घाण होतो अशी ते सतत तक्रार करत राहतात. शेजारच्या मेहरुन्निसा खातून म्हणतात, “एखादी एकटी बाई काही तरी काम करून पुढे जातीये, हे या पुरुषांना पाहवत नाही. आणि त्यातून ती जर वाल्मिकी जातीची असेल तर विचारूच नका. त्यांना तर ती हातगाडी बंद करण्याचा काही ना काही बहाणाच हवाय.”
लक्ष्मी आणि अर्जुनची नजीकच्या भविष्यात काय काय करायचंय याची छोटी छोटी स्वप्नं आहेत. उकडलेली अंडी विकायची, रोजच्या गरजेच्या वस्तूंचं एक छोटं दुकान टाकायचं जेणेकरून त्यांच्या कमाईत भर पडेल. पण या छोट्या स्वप्नांसाठीही हातात पैसा पाहिजे. दहा लाखाच्या भरपाईतून ते सगळं करता आलं असतं. हाताने मैला सफाईच्या प्रथेचं निर्मूलन करण्यासाठी काम करणारं सफाई कर्मचारी आंदोलन लक्ष्मीला तिच्या भरपाईच्या लढ्यात मदत करत आहे. पण राजेश्वर सिंग कंत्राटी कामगार होता, नियमित कामगार नाही. ही एक पळवाट वापर करून त्याची नियुक्ती करणारे त्याची पूर्ण भरपाई देण्यास नकार देऊ शकतात.
आंदोलनाने अर्जुनला तुघलकाबादच्या सर्वोदय बाल विद्यालय या सरकारी शाळेत सहावीत प्रवेश मिळवून देण्यातही मदत केली. या कुटुंबाकडे शाळाप्रवेशासाठी लागणारा राहण्याच्या पत्त्याचा पुरावा नव्हता आणि अर्जुनच्या त्रिलोकपुरीतल्या शाळेने बदली दाखला द्यायला उशीर केला. पण आता अर्जुन परत शाळेत जाऊ लागला आहे आणि त्यामुळे आता तो नक्कीच मोठी स्वप्नं पाहू शकतो. बँक मॅनेजर आणि शेफ व्हायचं त्याचं स्वप्न आहे.
लक्ष्मी म्हणते पूर्ण भरपाई मिळाली तरी ती शांत बसणार नाही. हाताने मैला उचलण्याच्या या प्रथेविरुद्ध लढण्याचा तिने निर्धार केला आहे. “कोणत्याच बाईला अशा रितीने नवऱ्याचा मृत्यू पहावा लागू नये, जसा मी पाहिला. अगदी सगळीकडे जाऊन हे बोलायची माझी तयारी आहे. मी भीम यात्रेतही सामील झाले होते [२०१५-१६ मध्ये इतर मुद्द्यांसोबतच गटारांत होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी देशभरात निघालेली बस यात्रा]. पण सरकारला काही ऐकायचंच नाहीये. आमची माणसं मेली तर या जगात कुणालाही काहीही फरक पडत नाही. कारण आमच्या माथी आमच्या जातीचा शिक्का मारलेला आहे ना. जोपर्यंत हाताने मैला उचलायची प्रथा आणि आमची जात एकमेकांशी जोडले आहेत तोपर्यंत तरी आमची या नरकातून सुटका नाही.”
“जेव्हा मी विचार करते की इतकी सारी माणसं अशा रितीने मरतायत पण सरकार त्याबाबत काहीही करत नाहीये, तेव्हा मला इतका संताप येतो,” लक्ष्मी पुढे सांगते, “गटारं साफ करण्याचं कोणतंही तंत्रज्ञान नाही आपल्या देशात? सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा एवढा गाजावाजा चालू आहे, पण जर आजही माणसांना आत उतरून गटारं साफ करावी लागत असतील तर हा देश ‘स्वच्छ’ कसा म्हणायचा, तुम्ही सांगा.”
अनुवादः मेधा काळे