पाऊस पडत होता. काळ्या छत्रीच्या आडोश्यात चिन्ना बिडी ओढत होता. छत्रीवरती पडणारा पाऊस कारंज्यासारखा उडून जमिनीवर बरसत होता. चिन्नाचा चेहरा एकदम अंधुक दिसत होता.
“चिन्ना, आत ये रे, पावसात का उभा राहिलायस?”
बिडीचे फटाफट तीन झुरके मारून त्याने बिडी टाकून दिली, छत्रीची घडी करून तो आत व्हरांड्यात येऊन बसला. त्याचे डोळे तांबारले होते, धुराने कदाचित. त्याला खोकला आला. त्यानंतर माझ्या नजरेशी नजर भिडवून त्याने विचारलं, “लोकांना आता परत त्यांच्या घरी जाऊ देतायत का?”
“नाही, चिन्ना, परत जाण्यासाठी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष पास घ्यावा लागतो.”
“असं?” त्याने विचारलं आणि परत एकदा त्याला खोकल्याची उबळ आली.
“हो, आणि त्या दिवशी, एका रेल्वे गाडीने १६ स्थलांतरित कामगारांना चिरडून टाकलं.”
चिन्नाच्या डोळ्यांनी माझा ठाव घेतला, जणू काही मी असं काही तरी बोललो जे मी बोलायला नको होतं.
त्याने नजर खाली वळवली आणि तो म्हणाला, “माझी आजी माझ्या वडलांना घेऊन थूथुकोडीहून इथे त्रिवेंद्रमला कामाच्या शोधात कशी पोचली त्याच्या गोष्टी आम्हाला सांगायची. ६५ वर्षांपूर्वीच्या गोष्टी.”
“ती तिच्या गावाबाहेर जायला देखील घाबरायची, पण कसं तरी करून ती इथपर्यंत येऊन पोचली. तिनी आम्हाला फक्त मजेशीर गमती-जमती सांगितल्या होत्या. पण तिला काय काय सहन करावं लागलं असेल ते आता मला समजतंय. तिच्या चेहऱ्यावर हे काही दिसायचं नाही, कधीच.”
पाऊस जास्तच वाढला, पुराच्या पाण्यात रस्त्यात एक अँब्युलन्स वाहत गेली. “सगळे कामगार आपापल्या ठिकाण्याला सुखरुप पोचू दे रे,” चिन्ना म्हणाला.
आत्म्यांचा तांडा
खडकाळ
रेल्वेमार्गावर
निघालाय
भुकेल्या आत्म्यांचा तांडा.
एकामागे एक
लोखंडी रुळांमध्ये बद्ध.
त्यांचा
ठिकाणा आहे दूरवर
तरी ते चालतायत,
एकेक पाऊल
त्यांना घराच्या जवळ घेऊन चाललंय.
हडकुळे गडी
कृश बाया
रेल्वेच्या डब्यांसारखे निघालेत
धडधडत
लोखंडी रुळांवरनं.
साडीच्या
धडप्यात बांधलेल्या भाकरी,
पाण्याची बाटली,
आणि मजबूत, काटक पावलं
चाललीयेत.
शूरात्म्यांचा तांडा.
सूर्य
कलतोय,
आणि काळंकुट्टी रात्र झाकोळून येतीये.
ते आत्मे
थकले भागलेले
त्या रुळांवरच
डोळे मिटून घेतात.
आणि मग आगगाडी येते
धडधडत
लोखंडी चाकं रुततात
लोखंडी रुळांवर आणि मांसावर.
दूरवरच्या
कुठल्या तरी रेल्वेमार्गावर
पडलाय
निष्चेत आत्म्यांचा तांडा
एकमेकाशेजारी
घरापासून काही पावलं दूर.
कवितेचा स्वरः सुधन्वा देशपांडे जन नाट्य मंचातील अभिनेते व दिग्दर्शक आणि लेफ्टवर्ड बुक्सचे संपादक आहेत.
अनुवादः मेधा काळे