तो आपली गाणी समाजमाध्यमांद्वारे सगळ्यांपर्यंत पोचवत असतो. कधी तरी लोकांना आपल्या कलेचं मोल समजेल इतकीच त्याला आशा आहे.
“कधी तरी मला स्वतःचा अल्बम काढायचाय,” २४ वर्षांचा सांतो तांती म्हणतो. आसामच्या जोरहाटमधल्या सायकोट्टा चहामळ्याच्या धेकियाजुली परिसरात तो राहतो.
लहानपणापासून सांतोचं एकच स्वप्न होतं – गायक व्हायचं. पण प्रत्यक्षातलं जग मात्र फार निराळं होतं. घर चालवण्यासाठी तो आपल्या वडलांच्या मालकीचं सायकल दुरुस्तीचं छोटंसं दुकान चालवतो.
सांतो तांती आदिवासी आहे – पण एका विशिष्ट जमातीचा असं म्हणता येत नाही. गेली जवळपास दीडशे वर्षं आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, तेलंगण, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातून आदिवासी कामगार स्थलांतर करून येत आहेत. त्यांच्यातल्या अनेकांचे स्थानिक आदिवासींशी आणि इतर समुदायांशी संबंध आले आहेत. त्यातून तयार झालेल्या समुदायांचा उल्लेख अनेकदा ‘टी ट्राइब्ज - चहाच्या मळ्यातले आदिवासी’ असाही केला जातो.
आसाममध्ये असे साठ लाखांहून अधिक लोक राहतात. आपापल्या राज्यात त्यांची गणना आदिवासी म्हणून होत असली तरी इथे त्यांना तो दर्जा दिला जात नाही. आसाममध्ये १००० च्या आसपास चहाचे मळे आहेत त्यामध्ये १२ लाख कामगार काम करतायत.
रोजची हलाखी आणि अंगमेहनतीमुळे अनेकांच्या सगळ्या आशा आकांक्षाच विझून जातात. पण सांतोचं तसं नाही. तो आपल्या झुमुर गाण्यांमधून भोवतालीचं दुःख मांडतो. ऊन-पावसात, थंडा-वाऱ्यात चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्यांची गाणी तो गातो. चहाच्या प्रत्येक घोटामागे किती जणांची मेहनत आहे ते तो आपल्या गाण्यांमधून सांगतो.
या भागातली झुमुर गीतं सादरी भाषेतली असतात. परंपरेने ती पुढच्या पिढीकडे येतात. सांतो जी गीतं गातो ती त्याच्या वडलांनी किंवा चुलत्यांनी लिहिली, स्वरबद्ध केली आहेत. किंवा काही गीतं पिढी दर पिढी गायली गेली आहेत. या गाण्यांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये लोक कसे कामाला येत गेले त्याच्या कहाण्या आपल्याला ऐकायला मिळतात - आपलं घर मागे टाकून, नवीन घर वसवण्याच्या कथा. घनदाट जंगलं साफ करून, जमिनी सपाट करून तिथे चहाचे मळे फुलवण्याच्या त्यांच्या गोष्टी या गाण्यांमधून आपल्यापर्यंत पोचतात.
सांतोला संगीताचं इतकं वेड आहे की गावातले लोक त्यावरून त्याची खिल्ली उडवतात. त्यांचं म्हणणं असतं की कितीही उड्या मारा, शेवटी मळ्यात चहाची पानंच खुडावी लागणार आहेत. असं लागट बोलणं ऐकलं की कधी कधी तो एकदम हिरमुसला होतो. पण फार काळ नाही. आणि त्यांच्या या टोमण्यांचा त्याच्या आकांक्षांवर, मोठं काही करण्याच्या स्वप्नावर अजिबात परिणाम होत नाही. तो आपली गाणी समाजमाध्यमांवर प्रसारित करत राहतो, अविरत, मनात उमेद ठेवून.