थूथुकोडीच्या रस्त्यांवर जमाव गोळा झाला होता. तसा तर तो तमिळ नाडूत अनेक ठिकाणी झाला होता. त्यात एक अगदी लहानसा मुलगाही होता. क्षणात तो क्रांतीकारी घोषणा देत त्या निदर्शनांचाच भाग झाला. “आज तुम्हाला हे माहितही नाही आणि कळणारही नाही,” ते आम्हाला सांगतात, “पण भगत सिंगचं फाशी जाणं फाशी जाणं हे तमिळनाडूतल्या स्वातंत्र्य चळवळीमधलं एक भावनिक वळण होतं. लोक हबकून गेले होते, किती तरी जण रडत होते.”
“मी ९ वर्षांचा होतो फक्त,” ते हसतात.
आज, ते ९९ वर्षांचे आहेत (१५ जुलै २०२०), एक स्वातंत्र्यसैनिक, भूमीगत क्रांतीकारी, लेखक, वक्ता आणि जहाल बुद्धीवंत होण्यामागे जी धग होती ती मात्र आजही कायम आहे. हा असा माणूस आहे जो १४ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या कैदेतून बाहेर पडला. “त्या दिवशी न्यायाधीश आमच्या तुरुंगात आले आणि त्यांनी आम्हाला मुक्त केलं. आम्हाला मदुराई कट खटल्यातून मुक्त करण्यात आलं होतं. मी मदुराईच्या तुरुंगातून बाहेर पडलो आणि स्वातंत्र्याच्या जल्लोष यात्रेत सामील झालो.”
आज शंभरीची खेळी खेळत असणारे एन. संकरय्या सक्रीय अजूनही सक्रीय आहेत. ते व्याख्यानं देतात, चर्चांमध्ये भाग घेतात. अगदी २०१८ मध्येही ते चेन्नईचं उपनगर असलेल्या क्रोम्पेटमधल्या आपल्या घरून तमिळ नाडू पुरोगामी लेखक व कलावंत संमेलनाला आले होते. आम्ही तेव्हाच त्यांची मुलाखत घेतली होती. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्यामुळे त्यांना त्यांचं पदवीचं शिक्षण काही पूर्ण करता आलं नाही मात्र याच माणसाने पुढे अनेक राजकीय पत्रिका, पुस्तिका, पत्रकं आणि वर्तमानपत्रात लेखन केलं.
पण नरसिंहलु संकरय्यांची द अमेरिकन कॉलेजमधली इतिहास विषयातली पदवी मिळता मिळता राहिली. मदुराईतल्या १९४१ मध्ये अंतिम परीक्षेला केवळ दोन आठवडे होते, पण त्यांना ती देता आली नाही. “मी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचा सहसचिव होतो.” याच हुशार विद्यार्थ्याने महाविद्यालयात काव्य मंच सुरू केला होता आणि फूटबॉलमध्ये प्रतिनिधीत्वही केलं होतं. त्या काळातल्या इंग्रज विरोधी कारवायांमध्येही ते सक्रीय होते. “माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये डाव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या अनेकांशी माझी मैत्री झाली होती. सामाजिक सुधाराशिवाय स्वातंत्र्य परिपूर्ण नाही हे मला समजलं होतं.” वयाच्या १७ व्या वर्षीच ते (तेव्हा बंदी घातलेल्या आणि भूमीगत) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते.
अमेरिकन कॉलेजची विचारसरणी सकारात्मक होती, त्यांना स्मरतं. “संचालक आणि काही प्राध्यापक अमेरिकन होते, बाकी सारे तमिळ. त्यांनी खरं तर तटस्थ राहणं अपेक्षित होतं, पण ते काही इंग्रजांची कड घेणारे नव्हते. विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना मोकळीक होती...” १९४१ साली, इंग्रज विरोधी निदर्शनांमध्ये भाग घेतला म्हणून अण्णामलई विद्यापीठाच्या मीनाक्षी या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली होती, त्या विरोधात मदुराईमध्ये एक बैठक बोलावण्यात आली होती. “आणि, आम्ही एक पत्रक काढलं. वसतिगृहातल्या आमच्या खोल्यांवर धाडी पडल्या, आणि माझ्या मित्राकडे, नारायणस्वामीकडे पत्रक सापडलं म्हणून अटक करण्यात आली. त्यानंतर आम्ही त्याच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शनं केली...
“त्यानंतर २८ फेब्रुवारी १९४१ रोजी इंग्रजांनी मला अटक केली. अंतिम परीक्षांना फक्त १५ दिवस राहिले होते. त्यानंतर काही मी माघारी येऊन बीए पूर्ण केलं नाही.” त्यांना कशी अटक झाली त्याच्या आठवणी ते सांगतात, “भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेलो, स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालो, त्याचा मला अभिमान होता. माझ्या डोक्यात तेवढा एकच विचार होता.” आपलं पुढचं भविष्य मातीमोल झालं याबद्दल काहीही नाही. त्यांच्या तरुणपणीची त्यांची एक आवडती घोषणा होती, “आम्ही नोकऱ्यांच्या शोधात नाही, आम्ही स्वातंत्र्याच्या शोधात आहोत.”
“मदुराईच्या तुरुंगात १५ दिवस राहिल्यानंतर, माझी वेल्लोरच्या तुरुंगात पाठवणी झाली. त्या काळी तमिळ नाडू, आंध्र प्रदेश आणि केरळातलेही अनेक जण तिथे स्थानबद्ध होते.”
“कॉम्रेड ए. के. गोपालन [केरळातले कम्युनिस्ट पक्षाचे विख्यात नेते] यांना एक कार्यक्रम घेतल्याबद्दल त्रिचीला अटक करण्यात आली होती. केरळातलेच कॉम्रेड इंबिची बावा, व्ही. सुबय्या, जीवनानंदम यांनादेखील याच कार्यक्रमात अटक करण्यात आली होती. ते सगळे वेल्लोरच्या तुरुंगात होते. मद्रास सरकारला आमचे दोन गट करायचे होते. एका गटाला, ‘सी’ प्रकारचं रेशन मिळणार होतं, जे फक्त गुन्हेगारांना देण्यात यायचं. मग आम्ही यंत्रणेच्या विरोधात १९ दिवसांचं उपोषण केलं. दहाव्या दिवशी त्यांनी आमचे दोन गट केले. मी तेव्हा फक्त एक विद्यार्थी होतो.”
संकरय्यांच्या कोठडीत गेलेल्या तुरुंग मुख्य अधिकाऱ्यावर चकित व्हायची वेळ आली होती कारण हा कैदी मॅक्झिम गॉर्कीचं ‘आई’ हे पुस्तक वाचत होता. “उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि तू गॉर्कीचं आई वाचतोयस?” त्याने विचारलं. ही आठवण सांगताना आजही संकरय्यांचे डोळे चमकतात.
त्यावेळी इतरही अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वं दुसऱ्या एका तुरुंगात अटकेत होती. त्यामध्ये होते, “[१९५४-६३ या काळात तत्कालीन मद्रास राज्याचे – आता तमिळ नाडू – मुख्यमंत्री के. कामराज] कामराजार, [स्वांतंत्र्य मिळाल्यानंतर लगेच काँग्रेसचे अध्यक्ष झालेले] पट्टभी सीतारामय्या, आणि इतरही अनेक. मात्र ते वेगळ्या यार्डात, वेगळ्या तुरुंगात होते. काँग्रेसचे लोक उपोषणात सहभागी झाले नव्हते. त्यांचं म्हणणं होतः ‘आम्ही महात्मा गांधींच्या शब्दाबाहेर नाही.’ आणि तो सल्ला होताः ‘तुरुंगात कसलाही बखेडा करू नका’. पण सरकारने थोडी सूटही दिली. १९ व्या दिवशी आम्ही आमचं उपोषण मागे घेतलं.”
त्यांच्यामध्ये कितीही टोकाचे मतभेद असले तरी संकरय्या म्हणतात, “कामराजार कम्युनिस्टांचे चांगले मित्र होते. तुरुंगातल्या एका कोठडीत राहिलेले मदुराई आणि तिरुनेलवेलीतले त्यांचे सहकारी देखील कम्युनिस्ट होते. माझा आणि कामराजारांचा चांगला स्नेह होता. आमचा जो छळ केला जात होता तो थांबवण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला. अर्थात तुरुंगात मात्र [काँग्रेसवाले आणि कम्यिनुस्टांमध्ये] चांगली खडाजंगी व्हायची, खास करून जर्मन-सोव्हिएट युद्ध सुरू झालं तेव्हा जास्तच.
“कालांतराने आमच्यातल्या आठ जणांना [आता आंध्र प्रदेशात असलेल्या] राजमुंड्रीच्या तुरुंगात हलवण्यात आलं आणि तिथे वेगळ्या यार्डात ठेवण्यात आलं.”
“१९४२ च्या एप्रिलपर्यंत सरकारने सगळ्या विद्यार्थ्यांची सुटका केली – माझी सोडून. मुख्य वॉर्डन आले आणि त्यांनी मला विचारलं: ‘संकरय्या कोण आहे?’ आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की सगळ्यांची सुटका झाली आहे – माझी सोडून. एक महिनाभर मला एकांतवासात ठेवलं गेलं. अख्खा यार्ड फक्त माझ्या एकट्यासाठी!”
त्यांच्यावर आणि इतरांवर आरोप तरी काय होते? “कुठलाही आरोप नाही, फक्त ताब्यात घेतलं होतं. दर सहा महिन्यांनी एक लेखी नोटिस यायची, ज्यात तुम्हाला का स्थानबद्ध करण्यात येतंय ते त्याची कारणं दिली जायची. आणि काय कारणं असायची: देशद्रोह, कम्युनिस्ट पक्षाच्या कारवाया, इत्यादी. मग आम्ही एका समितीला आमचा जबाब पाठवायचो – आणि मग ती समिती तो नाकारायची.”
पण गंमत म्हणजे, “राजमुंड्री तुरुंगातून माझ्या मित्रांची सुटका झाली आणि राजमुंड्री स्थानकात ते कामराजारांना भेटले – ते कलकत्त्याहून परत येत होते. त्यांना जेव्हा कळालं की माझी सुटका केलेली नाही, त्यांनी मद्रासच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं की मला वेल्लोरच्या तुरुंगात परत पाठवलं जावं. त्यांनी मलाही एक पत्र लिहिलं. त्यानंतर महिनाभराने माझी परत वेल्लोरच्या तुरुंगात पाठवणी झाली – तिथे माझ्यासोबत इतर २०० सहकारी होते.”
त्यांच्या अनेक तुरुंगवाऱ्यांदरम्यान त्यांची भेट भारताचे भावी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्याशीही झाली होती. “ते तुरुंगात भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत होते, १९४३ मध्ये सदस्यही होते. नंतर, अर्थातच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तरीही, कित्येक वर्षं आम्ही एकत्र काम केलं.”
अमेरिकन कॉलेजातल्या – आणि व्यापक विद्यार्थी चळवळीतल्या - संकरय्यांच्या अनेक सहाध्यायींनी पदवी पूर्ण केल्यानंतर ख्याती कमावली. एक जण तमिळ नाडूचा मुख्य सचिव झाला, एक न्यायाधीश, आणखी एक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी जो काही दशकांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा सचिवही होता. संकरय्यांनी मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक तुरुंग आणि कोठड्यांच्या वाऱ्या केल्या. १९४७ च्या आधी त्यांनी ज्या तुरुंगांमध्ये मुक्काम केला ते होते – मदुराई, वेल्लोर, राजमुंड्री, कन्नूर, सेलम, तंजावूर...
१९४८ साली कम्युनिस्ट पक्षावर बंदी आली, आणि ते परत एकदा भूमीगत झाले. १९५० साली त्यांना अटक झाली आणि एक वर्षानंतर सुटका. १९६२ साली, भारत-चीन युद्धादरम्यान अनेक कम्युनिस्टांना तुरुंगात टाकलं गेलं त्यात तेही होते – सात महिने कैद. १९६५ साली देखील कम्युनिस्टांवर कारवाया करण्यात आल्या, तेव्हाही त्यांनी आणखी १७ महिने तुरुंगवासात काढले होते.
लक्षणीय बाब म्हणजे स्वातंत्र्यानंतर त्यांना लक्ष्य करणाऱ्यांच्या प्रती त्यांच्या मनात कसलीही कटुता नाही. त्यांच्यासाठी या सगळ्या राजकीय लढाया होत्या, व्यक्तिगत नाहीत. आणि त्यांची लढाई ही कायमच या पृथ्वीतलावरच्या शोषितांसाठीची होती आणि आहे. त्यात वैयक्तिक लाभाचा प्रश्नच येत नाही.
त्यांच्यासाठी स्वातंत्र्य संग्रामातले असे कोणते क्षण प्रेरक ठरले, कोणती वळणं महत्त्वाची होती?
“अर्थात इंग्रजांनी भगत सिंगला दिलेली फाशी [२३ मार्च १९३१]. १९४५ साली भारतीय आझाद हिंद सेनेची पायाभरणी आणि १९४६ सालचं भारतीय नौदलाचं बंड. इंग्रज वसाहतवादाविरुद्धच्या लढ्याला बळ देणाऱ्या या काही महत्त्वाच्या घटना होत्या.”
अनेक वर्षं लोटली आणि डाव्या चळवळीप्रती त्यांची बांधिलकी अधिक दृढ होत गेली. आणि मग ते पक्षाचे कायमस्वरुपी ‘फुलटायमर’ बनले.
“१९४४ साली, तंजावूर तुरुंगातून माझी सुटका झाली आणि माझी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मदुराई जिल्हा समिती सचिव म्हणून निवड करण्यात आली. आणि मग २२ वर्षांनंतर मी पक्षाचा राज्य समिती सचिव म्हणून निवडला गेलो.”
लोकांना संघटित करण्यात संकरय्या यांचा मोठा वाटा होता. १९४० च्या मध्यापर्यंत मदुराई म्हणजे डाव्या चळवळीचा बालेकिल्ला होता. “१९४६ मध्ये पी. सी. जोशी [भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव] मदुराईला आले तेव्हा सभेला १ लाख लोक आले होते. आमच्या अनेक सभांना प्रचंड गर्दी व्हायची.”
त्यांची वाढती लोकप्रियता पाहून अखेर इंग्रजांनी प्रसिद्ध मदुराई कट खटला, ज्यात पी. राममूर्ती [तमिळ नाडूतील विख्यात कम्युनिस्ट नेते] हे पहिले आरोपी, संकरय्या हे दुसरे आणि इतर अनेक भाकप नेते आणि कार्यकर्त्यांविरद्ध आरोप होते, तो मागे घेतला. पक्षाच्या कार्यालयात बसून इतर कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांचा खून करण्याचा कट आखल्याचा त्यांच्यावर आरोप होता. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे यातला मुख्य साक्षीदार होता एक हातगाडीवाला, ज्याने रस्त्यातून जाता जाता त्यांचं संभाषण ऐकलं आणि निमूट पोलिसांना खबर दिली होती.
एन. राम कृष्णन (संकरय्यांचे लहान बंधू) २००८ साली लिहिलेल्या ‘पी. राममूर्ती – ए सेन्टेनरी ट्रिब्यूट’ या चरित्रात म्हणतातः “चौकशीदरम्यान, राममूर्ती [ज्यांनी स्वतःच स्वतःची बाजू मांडली] यांनी सिद्ध केलं की मुख्य साक्षीदार हा फसवणूक करणारा, साधा चोर होता आणि त्यालाच अनेक प्रकरणात तुरुंगवास झाला होता.” ज्यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली ते विशेष न्यायाधीश “१४ ऑगस्ट १९४७ रोजी तुरुंगात आले... या खटल्यात गोवलेल्या सगळ्यांची त्यांनी सुटका केली आणि कामगारांच्या आदरणीय नेत्यांविरोधात खटला दाखल केल्याबद्दल सरकारची कानउघाडणी केली.”
गेल्या काही वर्षात याच सगळ्या भूतकाळाचे पडसाद पुन्हा ऐकू यायला लागले आहेत. अर्थात सध्याच्या काळात एखादा विशेष न्यायाधीश स्वतः तुरुंगात जाऊन निर्दोष कैद्यांची सुटका करेल आणि सरकारला खडे बोल सुनावेल अशी शक्यता कमीच.
१९४८ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली गेली, आणि राममूर्ती आणि इतरांना परत तुरुंगात टाकलं गेलं. हे सगळं आता स्वतंत्र भारतात घडत होतं. निवडणुका येऊ घातल्या होत्या आणि डाव्या नेत्यांची लोकप्रियता मद्रास राज्यातल्या सत्ताधारी काँग्रेसपुढे मोठं आव्हान ठरणारी होती.
“मग, राममूर्तींनी कोठडीत असतानाच तुरुंग अधीक्षकांकडे आपली कागदपत्रं दाखल केली. १९५२ साली मद्रास उत्तर मतदारसंघातून त्यांनी मद्रास विधान सभेची निवडणूक लढवली. त्यांच्या प्रचाराची धुरा माझ्याकडेच होती. इतर दोघं उमेदवार म्हणजे ज्येष्ठ काँग्रेस नेते चिदंबरम भारती आणि जस्टिस पार्टीचे पी. टी. राजन. राममूर्ती मोठ्या फरकाने जिंकून आले. ते तुरुंगात असतानाच निकाल जाहीर झाले. भारती दुसरे आले आणि रंजन यांचं तर डिपॉझिट जप्त झालं. त्यांचा विजय साजरा करणाऱ्या सभेला ३ लाख लोक जमले होते.” स्वातंत्र्यानंतर तमिळ नाडूच्या विधानसभेचे पहिले विरोधी पक्ष नेते म्हणून राममूर्तींची निवड झाली.
१९६४ साली कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. त्यानंतर संकरय्या नवनिर्मित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेले. “१९६४ साली भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेतून बाहेर पडलेल्या ३२ जणांपैकी मी आणि व्ही. एस. अचुतानंदन असे दोघंच आता हयात आहोत.” पुढे जाऊन संकरय्या अखिल भारतीय किसान सभेचे जनरल सेक्रेटरी आणि नंतर अध्यक्षही झाले. १.५ कोटी सभासद असणारी ही संघटना आजही भारतातली सर्वात मोठी शेतकरी संघटना आहे. ते सात वर्षं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव होते आणि वीस वर्षं पक्षाच्या केंद्रीय समितीतही होते.
“तमिळ नाडू विधान सभेमध्ये पहिल्यांदाच तमिळ भाषेचा वापर आम्ही सुरु केला,” याचा त्यांना अभिमान आहे. “१९५२ मध्ये विधानसभेत तमिल बोलण्याची कोणतीच तरतूद नव्हती. फक्त इंग्रजीचाच वापर होत होता, पण जीवानंदम आणि राममूर्ती [आमचे आमदार] तमिळमधून बोलले. ही तरतूद मात्र ६-७ वर्षांनंतर आली.”
कामगार वर्ग आणि शेतकऱ्यांप्रती असणारी संकरय्यांची बांधिलकी आजही कमी झालेली नाही. त्यांना विश्वास आहे की कम्युनिस्टांना “निवडणुकीच्या राजकारणाची योग्य उत्तरं सापडतील” आणि आणखी मोठ्या पातळीवर ते जन आंदोलनं उभी करू शकतील. दीड तास उलटला तरी त्याच उत्साहाने आणि कळकळीने ते बोलत होते. आजही त्यांच्या आत भगत सिंगच्या त्यागातून प्रेरणा घेऊन रस्त्यावर उतरलेला ९ वर्षांचा मुलगा दडलेला आहे.
टीपः या लेखासाठी बहुमोल मदत केल्याबद्दल कविता मुरलीधरन हिचे खूप आभार
अनुवादः मेधा काळे