यंदाच्या दिवाळीसाठी १०,०००-१२,००० पणत्या बनवल्या असल्याचं श्रीकाकुलम पारदेसम सांगतात. तब्बल ९२ वर्षांचे पारदेसम यांनी महिनाभर आधीच कामाला सुरुवात केलीये. रोज सकाळी उठून, कपभर चहा घेऊन ७ वाजता ते कामाला लागतात. दिवसभरात एक-दोनदा थोडी विश्रांती सोडली तर अंधारून येईपर्यंत त्यांचे हात सुरू असतात.
काही आठवड्यांपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी स्टँडचा वापर करून पणत्या तयार करून पाहिल्या. “या पणत्या बनवायला थोड्या अवघड आहेत. त्या स्टँडची जाडी एकसारखी यावी लागते,” ते सांगतात. स्टँडमुळे पणती कलंडून तेल सांडत नाही तसंच पेटलेली वात बाहेर पडण्याचा धोकाही नसतो. पण अशी पणती करायला पाच मिनिटं लागतात. साध्या पणत्या पारदेसम अगदी दोन मिनिटात तयार करतात. साधी पणती ३ रुपयाला जाते. गिऱ्हाईक जाऊ नये म्हणून ते स्टँडच्या पणतीसाठी त्यापेक्षा एकच रुपया जास्त घेतात.
आपल्या कलेविषयी असणारं प्रेम आणि उत्साह या जोरावरच कुम्मारी वीधी (कुंभार आळी)मधल्या त्यांच्या घरातलं त्यांचं चाक गेली ८० वर्षं अखंड फिरतंय. आजवर त्यांनी दिवाळीसाठी लाखो पणत्या आणि दिवे तयार केले आहेत ज्यांनी दिवाळीत अनेकांची घरं उजळून टाकली आहेत. “मातीच्या साध्या गोळ्याला आमचे हात लागतात. आमचे हात, हे चाक आणि ऊर्जेमुळे त्यातून पणती तयार होते. कलाच आहे झालं,” पारदेसम सांगतात. नव्वदी पार केलेले हे आजोबा आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि आजकाल ऐकायला कमी येत असल्यामुळे फार बाहेर पडत नाहीत.
विशाखापटणम शहराचल्या अक्कय्यपालेमच्या गर्दीने गजबजलेल्या बाजारपेठेजवळच कुम्मारी वीधी आहे. या आळीत राहणारे बहुतेक सगळे कुम्मारी म्हणजेच कुंभार आहेत. मातीपासून मूर्ती आणि इतर वस्तू बनवणं हाच त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. पारदेसम यांचे आजोबा विशाखापटणम जिल्ह्याच्या पद्मनाभन मंडलातल्या पोन्टुरु गावाहून कामाच्या शोधात इथे आले. ते तरुण असताना कुंभाराची ३० कुटुंबं या गल्लीमध्ये पणत्या, कुंड्या, मातीच्या पिगी बँक, भांडी, पेले आणि मूर्तींसारख्या इतरही काही वस्तू बनवत होती. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत.
पण आज विशाखापटणममध्ये पणत्या बनवणारं त्यांचं एकमेव कुटुंब उरलंय. आणि त्यातले ते अखेरचे कारागीर आहेत. कुंभाराची इतर कुटुंबं मूर्तीकाम किंवा इतर वस्तू घडवतायत. काहींनी ही कला सोडून दिली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत तेही सणाच्या काळात मूर्ती बनवत होते पण नंतर त्यांनी ते थांबवलं. मूर्तीकाम जास्त कष्टाचं असतं आणि तासंतास जमिनीवर एकाच ठिकाणी बसून राहणं त्यांना जमेनासं झालं.
पारदेसम आता गणेशोत्सव कधी संपतोय याचीच वाट पाहत असतात. कारण त्यानंतर दिवाळीसाठी पणत्यांचं काम सुरू करता येतं. “पणत्या करण्यात मला वेगळीच खुशी मिळते. काय ते काही मी सांगू शकत नाही. पण मी खूश असतो. ओल्या मातीचा वासच बहुधा मला सगळ्यात जास्त आवडतो,” ते म्हणतात. कुंभार आळीत आपल्या घराशेजारी त्यांची कामाची छोटीशी खोली आहे. तिथे त्यांचं काम सुरू आहे. आजूबाजूला मातीचे गोळे, फुटकी मडकी आणि पाण्याची पिंपं दिसतात.
पारदेसम लहानपणीच आपल्या वडलांकडून पणत्या कशा बनवायच्या ते शिकले. साध्या आणि नक्षीकाम असलेल्या पणत्या, कुंड्या, पैसे साठवण्यासाठी पिगी बँक बनवत असतानाच ते गणेश चतुर्थीसाठी गणपतीच्या मूर्ती घडवू लागले. शिवाय फ्लॉवरपॉट नावाने ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यासाठी लागणारी मातीची सुगड्यासारखी भांडीदेखील. या वर्षी त्यांना ३ रुपये नग दराने १,००० फ्लॉवरपॉटची मागणी आली आहे.
पारदेसम अतिशय कुशल कारागीर आहेत आणि आजही एका दिवसात ५०० पणत्या किंवा फ्लॉवरपॉट बनवू शकतात. त्यांच्या अंदाजानुसार घडवलेल्या वस्तूंपैकी तीनात एक तरी फुटते, भट्टीत भाजताना किंवा नंतर साफ करताना तिला तडे तरी जातात. आजकाल चांगली मातीच मिळत नाही त्यामुळे असं घडत असल्याचं कुंभारांचं म्हणणं आहे.
पारदेसम यांचा मुलगा श्रीनिवास राम आणि सून सत्यवती कामाचा ताण असला की त्यांना मदत करतात. जुलै-ऑक्टोबर या सणासुदीच्या काळात हे सगळे मिळून अंदाजे ७५,००० रुपये कमावतात. वर्षभरात एरवी कुंभार आळी तशी ओसच असते. गिऱ्हाईकही नाही आणि धंदाही. श्रीनिवास शाळेत काम करतात आणि त्यांना महिन्याला १०,००० रुपये पगार मिळतो. घरखर्चासाठी सगळे यावरच अवलंबून असतात.
गेल्या वर्षी कोविडमुळे दिवाळी फार काही जोरात नव्हती. फक्त ३,००० ते ४,००० पणत्या विकल्या गेल्या. फ्लॉवरपॉटची मागणीच नव्हती. “आजकाल कुणाला साध्या खापराच्या पणत्याच नको असतात,” दिवाळीच्या आधी एक आठवडा ते पारीशी बोलत होते. पणत्यांची मागणी अजून वाढेल अशी त्यांना आशा होती. “त्यांना नक्षी असलेल्या मशीनवर तयार केलेल्या पणत्या पाहिजेत,” ते म्हणतात. छोट्या कारखान्यांमध्ये साच्यात केलेल्या नक्षी असलेल्या पणत्यांविषयी ते सांगत होते. कुंभार आळीतली अनेक कुटुंबं या अशा पणत्या ३-४ रुपये नग दराने विकत घेतात आणि कलाकुसरीप्रमाणे ५-१० रुपये किंमतीला विकतात.
ही अशी स्पर्धा असली तरी पणत्यांचा विषय निघाला की पारदेसम यांचा चेहरा उजळतो. “साध्या मातीच्या पणत्या बनवायला मला सगळ्यात जास्त आवडतं कारण माझ्या नातीला त्या आवडतात,” ते सांगतात.
या व्यवसायात आता मोजकीच कुंभाराची कुटुंबं उरली आहेत. दर वर्षी विनायक चतुर्थीच्या अलिकडे काही महिने ते माती विकत घेऊन ठेवतात. सगळ्यांमध्ये मिळून ते एक ट्रकभर म्हणजे सुमारे ५ टन माती घेतात. १५,००० रुपये मातीला आणि आंध्र प्रदेशच्या विजयानगरममधल्या विशिष्ट ठिकाणांहून ती माती आणण्याचे १०,००० रुपये असा खर्च येतो. एकदम योग्य अशी ‘जिनका माती’ म्हणजे चिकणमाती मातीच्या वस्तू आणि मूर्ती तयार करण्यासाठी गरजेची असते.
पारदेसम यांचं कुटुंब अंदाजे १,००० किलो माती विकत घेतं. दिवाळीच्या आधी एक आठवडाभर पाहिलं तर त्यांच्या घराबाहेर मातीची किती तरी पोती तुम्हाला दिसतील. लालबुंद माती कोरडी असते आणि तिच्यात ढेकळं असतात. हळू हळू पाणी ओतत ओतत ती हवी तशी कालवून घ्यावी लागते. त्यानंतर पायाने तुडवून तिचा गारा केला जातो. पारदेसम सांगतात की माती पायाला कडक लागते आणि त्यातले खडे पायाला चांगलेच बोचतात.
माती चांगली तुडवून झाली की पारदेसम घराच्या एका कोपऱ्यात उभं असलेलं कुंभाराचं चाक बाहेर आणतात. चाकावर इथे तिथे वाळलेल्या मातीचे सपकारे पहायला मिळतात. त्यानंतर रंगाच्या रिकाम्या डब्यावर ते एक कापड टाकतात. चाकाच्या समोर बसण्याची त्यांची सोय होते.
पारदेसम यांचं चाकही हाताने फिरवायचं चाक आहे. त्यांनी विजेवरच्या चाकाबद्दल ऐकलंय पण ते नक्की कसं काम करतं याबद्दल त्यांना खात्री नाही. “कुंडा (कुंडी) आणि दीपम (पणती) दोन्हीसाठी त्याची गती बदलण्यासारखी पाहिजे,” ते सांगतात.
चाकाच्या मध्यावरती मातीचा छोटासा गोळा ठेवतात, चाक फिरत असतं. त्यांच्या हाताची हालचाल सावकाश पण पक्की असते. गोळ्याच्या मध्यभागी अंगठ्याने खळगा करत हळू हळू पणती आकार घ्यायला लागते. एक वावभर आकाराचं चाक फिरायला लागतं आणि ओल्या मातीचा सुगंध हवेत भरून राहतो. चाक अखंड फिरत राहत रहावं यासाठी ते एका लाकडी काठीने अधून मधून त्याला गती देत राहतात. “माझं वय झालंय आता. तितकी ताकद आता राहिली नाही,” पारदेसम म्हणतात. पणतीला आकार आला आणि पक्का झाला की ते दोऱ्याच्या मदतीने फिरत्या चाकावरच्या मातीपासून ती विलग करतात.
तयार पणत्या आणि फ्लॉवरपॉट चाकावरून उतरवून ते रांगेने एका फळकुटावर सुकण्यासाठी ठेवून देतात. सावलीत वाळायला ३-४ दिवस लागतात. त्यानंतर या पणत्या आणि इतर वस्तू भट्टीत दोन दिवस पक्क्या भाजल्या जातात. जुलै ते ऑक्टोबर या काळात दर २-३ आठवड्यांनी भट्टी पेटवली जाते (गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी). एरवी मात्र महिन्यातून एखाद वेळाच भट्टी पेटत असेल.
पूर्वेकडच्या समुद्रकिनाऱ्यावर पाऊस उशीरापर्यंत होत असला तरीही पारदेसम यांचे हात काही थांबत नाहीत. पाऊस असेल त्या दिवशी ते आपला सगळा पसारा उचलतात आणि घरामागच्या एका अगदी छोट्याशा जागेत हलवतात. वरून प्लास्टिक अंथरून पावसापासून आडोसा केलेला असतो. त्यांच्या आसपास तीन-चार मांजराची पिल्लं खेळत असतात. चाक फिरू लागलं की त्यावर झेप घेतात, किंवा आसपास पडलेल्या तुटक्या-फुटक्या मडक्यांवर किंवा इतर सामानावर.
पारदेसम यांच्या पत्नी पैदिथल्ली आजारी आहेत आणि कायम अंथरुणात असतात. या दोघांची चार अपत्यं. दोन मुली आणि दोन मुलं. त्यांचा एक मुलगा तरुणपणीच वारला.
“वाईट वाटतं की पणत्या बनवणारा आता मी एकटाच उरलोय. आयुष्यभर मी फक्त इतकाच विचार करायचो की माझा मुलगा माझ्यानंतर कुंभारकाम सुरू ठेवेल,” पारदेसम म्हणतात. “मी माझ्या मुलाला चाक कसं फिरवायचं ते शिकवलं देखील. पण गणपतीच्या मूर्ती आणि पणत्या करून पोटापुरतेही पैसे मिळत नाहीत त्यामुळे तो एका खाजगी शाळेत शिपायाची नोकरी करतो.” पारदेसम एक डझन पणत्या २० रुपयांना विकतात. पण कुणी फारच घासाघीस केली तर ते अगदी १० रुपयांतही विकतात. अगदी थोडाच असलेला नफाही मग मिळत नाही.
“पणत्या करायला किती कष्ट पडतात ते कुणाला समजतही नाही,” उप्पारा गौरी शंकर म्हणतात. कुम्मारी वीधीमध्येच राहणारे ६५ वर्षांचे गौरी शंकर पारदेसम यांचे जुने शेजारी आहेत. त्यांच्या घरापासून काही घरं सोडून त्यांचं घर आहे. गौरी शंकर मात्र आता चाक फिरवू शकत नाहीत किंवा जमिनीवर बसूही शकत नाहीत. “माझी पाठ दुखते आणि उठून उभं देखील राहता येत नाही,” ते सांगतात.
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत गौरी शंकर यांच्या घरची मंडळी पणत्या तयार करत होती. दिवाळीच्या एक महिना आधी त्यांचं काम सुरू व्हायचं. पण या पणत्यांची किंमत इतकी कमी असते की मातीसाठी केलेला खर्च देखील निघत नाही असं ते सांगतात. त्यामुळे या वर्षी त्यांच्या कुटुंबाने मशीनवर केलेल्या २५,००० पणत्या विकत आणल्या. त्या विकून थोडा फार नफा होईल असं त्यांना वाटतंय.
पण ते माती तुडवून त्याचा गारा करायला पारदेसम यांना मदत करतात. “पणत्या तयार करायची ही पहिली पायरी. कुंभाराचं चाक अखंड चालू रहावं ही त्यांची इच्छा आहे ना, त्यासाठी माझा हा खारीचा वाटा. पारदेसम आता दमलेत. दर वर्षी असं वाटतं की कोण जाणे, या वर्षीच्या पणत्या त्यांच्या अखेरच्या ठरतील कदाचित.”
हे वार्तांकन रंग दे फेलोशिपअंतर्गत करण्यात आलं आहे.