“वीटभट्टीच्या आत लॉकडाऊन नाही. आम्ही रोज नेहमीसारखंच काम करतोय तिथे,” हृदय पाराभूंनी मला सांगितलं होतं. ५ एप्रिलला आम्ही त्यांना भेटलो होतो. “एकच बदल झालाय, आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे मालकाकडून आठवड्याचा भत्ता मिळूनही आम्हाला धान्य आणि इतर गरजेच्या वस्तू घेता येत नाहीयेत.”

हृदय तेलंगणमधल्या वीटभट्टीवर गेली तीन वर्षं काम करतायत. डोक्यावरच्या कर्जाने त्यांना या कामात ढकललंय. ओरिसाच्या बलांगीर जिल्ह्यातल्या तुरेकेला तालुक्यामधलं खुटुलुमुंडा हे त्यांचं गाव. दर वर्षी ते आपल्या बायकोला गावातच ठेवून कामासाठी इथे येतात. “लोहार म्हणून गावात माझी चांगली कमाई होत होती. पण घर बांधायला कर्ज घेतलं. लगेचच नोटबंदी झाली,” मोडक्यातोडक्या हिंदीत ते सांगतात. “गावात आता अगदीच थोडी कामं मिळतात. कर्जही दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे विटा बनवायला मला यावंच लागलं इथे. या वीटभट्टीवरचा प्रत्येक जण कर्जात बुडालेला आहे.”

संगारेड्डी जिल्ह्यातल्या जिन्नराम मंडलात गड्डीपोथरम नावाचं गाव आहे, तिथल्या वीटभट्टीवर हृदय काम करतात. २५ मार्चपासून अनपेक्षितपणे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे इथे काम करणारे मजूर गोंधळून गेले. “दर शुक्रवारी आम्ही इथून तीन किलोमीटरवर असलेल्या आठवडी बाजारात जायचो. आम्हाला मिळणाऱ्या आठवड्याच्या भत्त्यातून भाज्या, किराणा घेऊन यायचो,” जयंती पाराभू सांगते. ती हृदयची दूरची नातलग आहे. त्याच वीटभट्टीवर त्याही काम करतात. “काही पुरुष दारूही आणायचे तिथून. आता लॉकडाऊनमुळे बाजारच बंद आहे, त्यामुळे सगळंच थांबलंय.”

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दोनच दिवसांनी शुक्रवार होता. त्या दिवशी या वीटभट्टीवरच्या मजुरांनी बाजारात जाऊन थोडं धान्य आणलं. त्यानंतरच्या शुक्रवारी मात्र ते गेले आणि अडकले. कारण तोपर्यंत बाजार बंदच झाला होता. “त्यानंतर आम्हाला अन्नधान्य मिळवणं खूपच कठीण गेलं,” हृदय सांगतात. “बाजार बंद होता म्हणून आम्ही एखादं तरी दुकान उघडं आहे का ते बघायला थोडं आत, गावात गेलो, तर पोलिसांनी आम्हाला हाकलून लावलं. त्यांची भाषा [तेलगू] येत नाही ना आम्हाला!”

PHOTO • Varsha Bhargavi

गड्डीपोथरममधल्या वीटभट्टीत हृदय पाराभू (वरती डावीकडे, पांढरा सदरा घातलेले) आणि इतर मजूर. लॉकडाऊन असला तरीही तेलंगणातल्या बऱ्याच वीटभट्ट्यांमध्ये काम सुरू आहे.

तेलंगणातल्या वेगवेगळ्या भागांत असलेल्या ८८ वीटभट्ट्यांमध्ये २५ मार्चनंतर, लॉकडाऊन असला तरीही काम सुरू आहे. गेल्या वर्षी, २०१९ संपता संपता शेवटाला मजूर भट्टीवर आले, त्यापूर्वीच त्यांना उचल मिळाली होती. “वीटभट्टीवर कामाला येण्यापूर्वीच आम्हाला प्रत्येकाला उचल म्हणून ३५ हजार रुपये मिळाले होते,” जयंती सांगते. भट्टीवर एका कुटुंबाला ४०० रुपये आठवड्याचा भत्ता मिळतो. (मजूर सांगत होते, हा भत्ता प्रत्येकी 400 रुपये असतो. आम्ही त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा वीटभट्टीचा मालक आणि तालुका महसूल अधिकारी तिथे हजर होते, म्हणून बहुधा ते तसं सांगत असावेत. सर्वाधिक शोषण होणारा उद्योग म्हणून खरं तर वीटभट्ट्या प्रसिद्ध. पण मालकाच्या उपस्थितीत हे वीटभट्टीवरचे मजूर ‘आमचे मालक आम्हाला नेहमीच चांगलं वागवतात,’ असंही सांगत होते!)

वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबाचा एक गट असतो. या गटाला त्यांच्या सात महिन्यांच्या काळात रोज ३००० ते ४००० विटांचं काम ठरवून दिलेलं असतं. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला ओडिशातून मजूर येतात आणि काम सुरू होतं. ते मे महिन्याचा शेवट किंवा जूनच्या सुरुवातीपर्यंत चालतं.

गड्डीपोथरमच्या वीटभट्टीवरचे सर्व मजूर ओडिशाहून आलेले आहेत. हृदय आणि जयंतीसारखे बरेच जण लुहुरा समाजाचे आहेत. या समाजाचा ओरिसात इतर मागासवर्गीयांत समावेश होतो. सरदार, किंवा मुकादम, दरवर्षी हंगाम सुरू होताना तेलंगणातल्या वेगवेगळ्या वीटभट्ट्यांसाठी साधारण १००० मजूर घेऊन येतो. “ओरिसामधल्या गावागावांमध्ये फिरून आमच्यासारखे मजूर गोळा करणारे खूप मुकादम आहेत,” हृदय सांगतात. “मी एका छोट्या मुकादमाबरोबर आलोय. मोठे मुकादम अनेकदा २००० मजूरही घेऊन येतात.”

या वेळी हृदयने त्याच्या किशोरवयीन मुलीलाही आपल्यासोबत कामावर आणलंय. “किरमानी १६ किंवा १७ वर्षांची असेल. तिने शाळा सोडली, म्हणून ती माझ्याबरोबर आलीय इथे काम करायला. विटा करायला दोन राबते हात जास्तीचे असले तर बरंच आहे... तिच्या लग्नासाठीही आम्हाला पैसे लागतीलच,” पंचावन्न वर्षांचा किरमानीचा बाप सांगतो. आता मात्र करोनाची भीती, वाढतच जाणारा लॉकडाऊन यामुळे या सगळ्यांनाच कधी एकदा आपल्या गावी जातोय, असं झालंय.

The kiln workers' makeshift huts – around 75 families from Balangir district are staying at the kiln where Hruday works
PHOTO • Varsha Bhargavi
The kiln workers' makeshift huts – around 75 families from Balangir district are staying at the kiln where Hruday works
PHOTO • Varsha Bhargavi

वीटभट्टी मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या. हृदय काम करतायत त्या भट्टीवर ओरिसामधल्या बलांगीर जिल्ह्यातली ७५ कुटुंबं इथे मुक्कामाला आहेत

तेलंगण सरकारच्या शिक्षण विभागातल्या स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या संगारेड्डी जिल्ह्यातल्या जिन्नाराम आणि गुम्मदीदाला मंडलात असलेल्या ४६ वीटभट्ट्यांमध्ये ओडिशातून आलेले ४८०० स्थलांतरित मजूर काम करत आहेत. शिक्षण विभाग या मजुरांच्या मुलांसाठी त्यांच्या पालकांच्या कामाच्या ठिकाणीच शाळा चालवतो. ७ ते १४ वयोगटातली ३१६ मुलं या शाळेत येतायत, तीही भट्टीच्या आवारातच आपल्या पालकांबरोबर राहातायत. (सहा वर्षांच्या आतली किती मुलं आहेत, ते मात्र माहीत नाही.) हृदय आणि किरमानी ज्या भट्टीत काम करतात, तिथे बलांगीर जिल्ह्यातली ७५ कुटुंबं आहेत. १३० प्रौढ, ७ ते १४ वयोगटातली २४ मुलं आणि काही कच्ची बच्ची.

“आम्ही पहाटे ३ वाजता विटा बनवायच्या कामाला सुरुवात करतो. १०-११ वाजेपर्यंत काम करतो आणि थांबतो. मग बायका सरपण गोळा करतात, स्वयंपाक करतात, मुलांना आंघोळी घालतात आणि दुपारी एकच्या सुमाराला सगळे जेवतो. त्यानंतर दोनेक तास विश्रांती घेतो,” तीन मुलांची आई असलेली ३१ वर्षांची जयंती सांगते. तिचा नवरा भट्टीमध्ये जितके तास काम करतो, तेवढेच तास तीसुद्धा करते. “चार जणांचा एक गट असतो. आम्ही मग पुन्हा चार वाजता कामाला सुरुवात करतो. ते काम रात्री १० वाजेपर्यंत चालतं. काम उरकून आम्ही जेवतो, तेव्हा मध्यरात्र झालेली असते. अनेकदा एक वाजतो जेवायला.”

चौदा-पंधरा वर्षांची होती, तेव्हा जयंतीचं लग्न झालं. तिला स्वत:लाही लग्नातलं वय आठवत नाहीये. ५ एप्रिलला आम्ही तिला भेटलो, तेव्हा तिच्या कडेवर तिचा दोन वर्षांचा मुलगा होता, वसंत. फोटो काढायचा म्हणून तयार होण्यासाठी तिची सहा वर्षांची मुलगी अंजली आपल्या एवढ्याशा तळव्यावर टाल्कम पावडरचा आख्खी डबी रिकामी करत होती आणि आपल्या चेहऱ्याला फासत होती. जयंती तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. जयंतीचा ११ वर्षांचा मोठा मुलगा जवळच्याच भट्टीवर असलेल्या शाळेत शिकतो, पण सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शाळा बंद आहे. जयंती स्वत: कधीच शाळेत गेलेली नाही. वय काय, असं विचारलं तर तिने आपलं आधार कार्ड दाखवलं.

जयंतीच्या नवऱ्याच्या कुटंबाची बलांगीर जिल्ह्यातल्या खुटुलुमुंडा गावात दोन एकर जमीन आहे. “त्यातली एक एकर कसण्यायोग्य आहे,” जयंती म्हणाली. “आम्ही कापूस करतो. कारण त्याच्या बियाण्यापासून कीटकनाशकापर्यंत सगळं बियाणे कंपनीचे दलाल आम्हाला घरपोच देतात. पिकलेला कापूस विकत घ्यायलाही तेच येतात. जूनमध्ये पाऊस आला की आम्ही पेरण्यांना सुरुवात करतो. नोव्हेंबर महिन्याचा शेवट किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला कापूस तयार होतो. दलाल आम्हाला दर वर्षी तयार कापसाचे १० हजार रुपये देतात.”

Left: Joyanti Parabhue (standing) with other workers. Right: Kirmani (in blue), Joyanti, Anjoli and Bosanth (in background), in the cooking area of Joyanti's hut
PHOTO • Varsha Bhargavi
Left: Joyanti Parabhue (standing) with other workers. Right: Kirmani (in blue), Joyanti, Anjoli and Bosanth (in background), in the cooking area of Joyanti's hut
PHOTO • Varsha Bhargavi

डावीकडे : जयंती पाराभू (उभी) इतर मजुरांसह. उजवीकडे : किरमानी (निळ्या कपड्यात), जयंती, अंजली आणि वसंत, जयंतीच्या झोपडीतल्या ‘स्वयंपाकघरा’त

तयार कापूस कंपनीला विकताना ना खरेदीदार त्याचं वजन करत, ना तो विकणारं गावातलं कुणी. “आम्ही खूश असतो कारण ते आम्हाला बियाणं देतात, कीटकनाशक देतात आणि आमचा कापूसही विकत घेतात,” जयंती सांगते. “आमच्यासारख्या मोठ्या कुटुंबाला १० हजार रुपये नाही पुरत, पण म्हणूनच कापसाचा हंगाम संपला की लगेचच आम्ही दरवर्षी वीटभट्टीवर कामाला येतो.”

वीटभट्टीवर हे सगळे मजूर कामचलाऊ झोपड्यांमध्ये राहातात. तुटलेल्या, वाया गेलेल्या विटांपासून या झोपड्या बांधतात. फारच थोड्या झोपड्यांना मातीचा गिलावा असतो. वीटभट्टीच्या मालकाने वॉटर फिल्टर लावलाय. त्यातून पिण्याचं स्वच्छ पाणी मिळतं. कामाच्या ठिकाणी उपलब्ध असलेली ही एकमेव सुविधा.

आपलं तान्हं बाळ कडेवर घेतलेल्या २७ वर्षांच्या गीता सेनने वीटभट्टीच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेकडे बोट दाखवलं. “आम्ही तिथे त्या मैदानात परसाकडंला जातो. अंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी इथपर्यंत पाणी भरून आणावं लागतं. पुरुष कुठेही अंघोळ करू शकतात, आम्ही बायका मात्र इथेच अंघोळ करतो.” तिने एका छोट्याशा आडोशाकडे बोट दाखवलं. आडोसा कसला, चार-पाच मोडक्या तोडक्या लाद्या जमिनीवर टाकलेल्या, त्यावर गढूळ पाण्याने अर्धवट भरलेली प्लास्टिकची डबडी आणि काठ्यांच्या आधाराने कशीबशी तगून असलेली प्लास्टिकचा कागद. “एकजण अंघोळ करते, तेव्हा दुसरी राखण करत उभी राहाते. भट्टीच्या जवळ पाण्याची टाकी आहे ना, तिथनं पाणी आणतो आम्ही.”

सकाळी सगळ्यांच्या अंघोळी झाल्या होत्या, त्याचं पाणी साचून तिथे डबकं झालं होतं. आम्ही उभ्या होतो तर आणखी काही बायका आणि मुलं आली. त्यांना सगळ्यांना घरी जायचं होतं. “लॉकडाऊननंतर आम्हाला घरी जायला मिळेल ना?” संकोचत गीताने विचारलं.

PHOTO • Varsha Bhargavi

आम्ही उभे होतो तिथे काही बायका आणि मुलं जमली. त्यांना सगळ्यांना घरी जायचं होतं. उजवीकडे : वीटभट्टीतलं ‘न्हाणीघर’. इथे राहाणाऱ्या मजुरांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत

१४ एप्रिलला संपणाऱ्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये, तेलंगण सरकारने ३० मार्चला स्थलांतरित मजुरांना प्रत्येकी १२ किलो तांदूळ आणि ५०० रुपये मदत जाहीर केली. पण ५ एप्रिलपर्यंत ही मदत गड्डीपोथरममधल्या स्थलांतरित मजुरांपर्यंत पोहोचलीच नव्हती. ही कुटुंबं बाजारातूनही काही खरेदी करू शकली नाहीत. एका खाजगी कंपनीने काही स्वयंसेवकांकरवी ७५ रेशन संच दिले. त्यात एका कुटुंबाला दोन आठवडे पुरेल एवढं धान्य आणि इतर अत्यावश्यक सामान होतं. ज्या दिवशी ही मदत आली, त्याच्या आदल्या दिवसापासून ही कुटुंबं उपाशी होती.

संगारेड्डी जिल्हा प्रशासनाला या मजुरांची परिस्थिती सांगितली, तेव्हा, ५ एप्रिलला त्यांनी तांदूळ आणि पैसे अशी मदत पाठवली. पण ती प्रत्येकी नाही, प्रत्येक कुटुंबासाठी! आम्ही ज्या मजुरांशी बोललो, त्यांनी सांगितलं की ज्यांना कुणाला मदत वाटतायत ना, त्यांच्या यादीत ते अगदी तळाशी आहेत. राज्यातल्या रेशनकार्डधारकांच्याही खाली. या मजुरांना आठवड्याचा भत्ता मिळतो, त्यातून त्यांना गावातल्या दुकानांमधून काही सामान खरेदी करणं आता शक्य होतंय. गावातली ही दुकानं सकाळी ११ वाजेपर्यंत उघडी असतात.

या सगळ्यांना आता लवकरात लवकर गावी परतायचंय. “करोना व्हायची वाट बघत आम्ही इथे थांबावं अशी तुमची इच्छा आहे का?” हृदय संतापून विचारतात. “मरण यायचंच असेल ना, तर निदान आमच्या गावात, आमच्या माणसांत येऊ दे.”

अनुवादः वैशाली रोडे

Varsha Bhargavi

Varsha Bhargavi is a labour and child rights activist, and a gender sensitisation trainer based in Telangana.

کے ذریعہ دیگر اسٹوریز Varsha Bhargavi
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

کے ذریعہ دیگر اسٹوریز Vaishali Rode