न पडणारा म्हणूनच ठाऊक असणारा पाऊस आणि स्‍वाभाविकच त्‍यामुळे न मिळणारं पाणी… खरं तर कच्‍छचं हे वैशिष्ट्य. पण हे लोकगीत मात्र आपल्‍यापुढे आणतं कच्‍छचं ‘गोड पाणी’, अर्थात, तिथली सांस्‍कृतिक विविधता आणि ती जोपासणारी माणसं.

कच्‍छ, सिंध आणि सौराष्ट्र या भागावर हजाराहून अधिक वर्षांपूर्वी लाखो फुलाणी (जन्‍म: इस ९२०) हा राजा राज्‍य करत होता. आपल्‍या प्रजेची काळजी करणारा आणि काळजी घेणारा असा हा राजा. या प्रेमळ, उदार राजाची लोक आजही आठवण काढतात ती या शब्‍दांत… ‘लाखा तो लाखो मळशे, पण फुलाणी ए फेर (लाखो नावाची माणसं लाखो असतील, पण जनतेच्‍या हृदयावर राज्‍य करणारा लाखो फुलाणी मात्र एकच आहे).’

हे गीत लाखो फुलाणीबद्दल सांगतं, त्‍याचबरोबर कच्‍छच्‍या संस्‍कृतीतच असणार्‍या धार्मिक सलोख्याविषयीही बोलतं. कच्‍छमध्ये अशी अनेक प्रार्थनास्‍थळं आहेत, जिथे हिंदू आणि मुस्‍लिम, दोघंही जातात. हाजीपीर वलीचा दर्गा, देशदेवीमध्ये असलेलं आशापुरा देवीचं मंदिर, ही केवळ काही उदाहरणं. या गीतात फुलाणी राजाने बांधलेल्‍या कारा किल्‍ल्‍याचाही उल्‍लेख येतो.

कच्‍छी लोकगीतांच्‍या संग्रहातल्‍या या आणि इतरही गीतांनी प्रेम, तळमळ, कुणाला गमवण्याचं दुःख, लग्‍न, मातृभूमी ते स्‍त्रीपुरुष समानता, लोकशाही अधिकार या आणि अशा अनेक विषयांना स्‍पर्श केला आहे.

पारी कच्‍छमधल्‍या ३४१ लोकगीतांचं ‘मल्‍टिमीडिया अर्काइव्‍ह’ तयार करत असून त्यामध्ये ही गीतं प्रकाशित आणि जतन करणार आहे. सोबत असलेल्‍या ऑडिओ फाइलमध्ये स्‍थानिक कलाकारांनी मूळ भाषेत हे गीत गायलं आहे. गीताला साथ देणारे वादकही स्‍थानिकच आहेत. वाचकांसाठी हे गीत गुजराती लिपीत दिलं आहे, त्‍याचबरोबर त्‍याचा मराठी आणि पारीवर प्रकाशित होणाऱ्या इतर १४ भाषांमध्ये अनुवाद केला आहे.

कच्‍छचा विस्‍तार ४५ हजार ६१२ चौरस किलोमीटर आहे. अत्‍यंत नाजूक परिसंस्‍था असलेल्‍या या प्रदेशाच्‍या दक्षिणेला समुद्र आहे, तर उत्तरेला वाळवंट. भारतातल्‍या सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेला हा जिल्‍हा रखरखीत आहे. पाणीटंचाई आणि कोरडा दुष्काळ त्‍याच्‍या पाचवीलाच पुजलेला आहे.

वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक इथे गुण्‍यागोविंदाने नांदतात. त्‍यापैकी बहुतेक जण हजारभर वर्षापूर्वी कच्‍छमध्ये स्‍थलांतरित झालेल्या लोकांचे वंशज आहेत. त्‍यात हिंदू आहेत, मुस्‍लिम आहेत, जैन आहेत, रबारी, गढवी, जाट, मेघवाल, मुटवा, सोधा राजपूत, कोली, सिंधी, दारबर अशा अनेक उपजातीही आहेत. अस्‍सल मऊ सुती कपडे, त्‍यावरचं भरतकाम, मोकळ्या हवेच्‍या झोताबरोबर दूरवर पोहोचणारं संगीत आणि इतर सांस्‍कृतिक परंपरांमधून कच्‍छचा संपन्‍न सांस्‍कृतिक वारसा प्रतिबिंबित होत असतो. १९८९ मध्ये स्‍थापन झालेली ‘कच्‍छ महिला विकास संघटन’ (केएमव्‍हीएस) ही स्‍वयंसेवी संस्‍था स्‍थानिक लोककलाकार आणि त्‍यांच्‍या कला, परंपरा जपण्‍यासाठी त्‍यांना प्रोत्‍साहन देते, मदत करते.

केएमव्‍हीएसच्‍या सहकार्याने पारी कच्‍छी लोकगीतांची ही समृद्ध परंपरा सादर करत आहे, तिचं जतन करत आहे. केएमव्‍हीएसच्‍या ‘सूरवाणी’ प्रकल्‍पाअंतर्गत या गीतांचं ध्‍वनिमुद्रण करण्‍यात आलं आहे. केएमव्‍हीएसने कामाला सुरुवात केली ती तळागाळातील महिलांसाठी. तिथपासून आज या महिलांना सामाजिक बदलांच्‍या दूत म्हणून त्‍यांनी सक्षम केलं आहे. केएमव्‍हीएसचा स्‍वतंत्र मीडिया विभाग आहे. कच्‍छी संगीताची समृद्ध संस्‍कृती आणि परंपरा जपण्‍यासाठी, वाढवण्‍यासाठी केएमव्‍हीएसने ‘सूरवाणी’ हा कम्‍युनिटी रेडिओ सुरू केला. या अनौपचारिक गटातले ३०५ संगीतकार ३८ वेगवेगळ्या संगीत प्रकारांचं प्रतिनिधित्‍व करतात. कच्‍छी लोककलाकारांची परिस्‍थिती आणि पत सुधारावी यासाठी सूरवाणीने लोकसंगीताची परंपरा जपण्‍याचा, टिकवण्‍याचा, पुनर्जीवित करण्‍याचा, तिला बळ देण्‍याचा, तिचा प्रचार आणि प्रसार करण्‍याचा प्रयत्‍न केला.

अंजारच्‍या नसीम शेख यांनी गायलेलं हे लोकगीत ऐका

કરછી

મિઠો મિઠો પાંજે કચ્છડે જો પાણી રે, મિઠો મિઠો પાંજે કચ્છડે જો પાણી રે
મિઠો આય માડૂએ  જો માન, મિઠો મિઠો પાંજે કચ્છડે જો પાણી.
પાંજે તે કચ્છડે મેં હાજીપીર ઓલિયા, જેજા નીલા ફરકે નિસાન.
મિઠો મિઠો પાંજે કચ્છડે જો પાણી રે. મિઠો મિઠો પાંજે કચ્છડે જો પાણી રે
પાંજે તે કચ્છડે મેં મઢ ગામ વારી, ઉતે વસેતા આશાપુરા માડી.
મિઠો મિઠો પાંજે કચ્છડે જો પાણી. મિઠો મિઠો પાંજે કચ્છડે જો પાણી રે
પાંજે તે કચ્છડે મેં કેરો કોટ પાણી, ઉતે રાજ કરીએ લાખો ફુલાણી.
મિઠો મિઠો પાંજે કચ્છડે જો પાણી રે. મિઠો મિઠો પાંજે કચ્છડે જો પાણી રે


मराठी अनुवाद

माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी गं, माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी
इथे गोडवा मायेचा सार्‍यांच्‍या मनी, माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी
माझ्‍या गं कच्‍छमध्ये हाजीपीर अवलिया, वार्‍यासंगं डोले त्‍यांची हिरवी निशाणी
माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी गं, माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी
माझ्‍या गं कच्‍छमध्ये छोट्या मढ गावामधी, आशापुरा देवीचा वास गं
माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी गं, माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी
माझ्‍या गं कच्‍छमध्ये उभा केराकोट किल्‍ला, तिथे राजा रयतेचा होता लाखो फुलाणी
माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी गं, माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी
इथे गोडवा मायेचा सार्‍यांच्‍या मनी, माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी
माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी गं, माझ्‍या कच्‍छचं गोड गोड पाणी

PHOTO • Antara Raman

गीतप्रकार: लोकगीत

गट: शेतं, गावं आणि लोकांची गाणी

गीत :

गीताचं शीर्षक: मीठो मीठो पंजे कच्‍छडे जो पाणी रे

लेखिका: नसीम शेख

संगीत: देवल मेहता

गायिका: नसीम शेख, अंजार

वापरलेली वाद्यं: हार्मोनियम, बेंजो, ड्रम, खंजिरी

रेकॉर्डिंग: २००८, केएमव्‍हीएस स्‍टुडिओ

गुजराती अनुवाद: अमद समेजा, भारती गोर


विशेष आभार: प्रीती सोनी, अरुणा ढोलकिया, सचिव, केएमव्‍हीएस; अमद समेजा, प्रोजेक्‍ट कोऑर्डिनेटर, केएमव्‍हीएस; गीताचा गुजराती अनुवाद करणार्‍या भारतीबेन गोर

Editor : Pratishtha Pandya

پرتشٹھا پانڈیہ، پاری میں بطور سینئر ایڈیٹر کام کرتی ہیں، اور پاری کے تخلیقی تحریر والے شعبہ کی سربراہ ہیں۔ وہ پاری بھاشا ٹیم کی رکن ہیں اور گجراتی میں اسٹوریز کا ترجمہ اور ایڈیٹنگ کرتی ہیں۔ پرتشٹھا گجراتی اور انگریزی زبان کی شاعرہ بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Pratishtha Pandya
Illustration : Antara Raman

انترا رمن سماجی عمل اور اساطیری خیال آرائی میں دلچسپی رکھنے والی ایک خاکہ نگار اور ویب سائٹ ڈیزائنر ہیں۔ انہوں نے سرشٹی انسٹی ٹیوٹ آف آرٹ، ڈیزائن اینڈ ٹکنالوجی، بنگلورو سے گریجویشن کیا ہے اور ان کا ماننا ہے کہ کہانی اور خاکہ نگاری ایک دوسرے سے مربوط ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Antara Raman