सोसाट्याचं वारं वाहू लागलं, मुसळधार पाऊस सुरू झाला आणि २० मे रोजी अम्फान वादळाने थैमान मांडलं तरी सबिता सरदार घाबरल्या नव्हत्या. “आम्हाला अशा खराब हवामानाची सवय आहे. मला नाही भीती वाटली. खरं सांगायचं, तर त्या काँक्रीटच्या इमारतींमध्ये राहणारेच जास्त घाबरले होते,” त्या सांगतात.
चाळीस वर्षं झाली, सबिता दक्षिण कोलकात्यातल्या बाजारपेठेतल्या गरियाहाटमध्ये रस्त्यावर राहतायत.
हे महाचक्रीवादळ ज्या दिवशी पश्चिम बंगालच्या या राजधानीत धडकलं, तेव्हा सबिता आणि इतर काही बेघर महिला गरियाहाट पुलाखाली त्यांच्या हातरिक्षामध्ये बसून चिकटून बसून राहिल्या. ती रात्र त्यांनी तशीच काढली. “काचांचे तुकडे उडून येत होते, झाडं उन्मलून पडत होती आणि आम्ही तिथेच बसून होतो. पावसाचा ओसारा जोरात येत होता आणि आम्ही भिजून गेलो होतो. धडाड धूम आवाज येत होते,” सबिता तेव्हाच्या घटना आठवून सांगतात.
आदल्याच दिवशी त्या पुलाच्या खाली त्यांच्या ठिकाण्यावर परतल्या होत्या. “मी माझ्या मुलाच्या घरून अम्फानच्या आदल्याच दिवशी गरियाघाटला परत आले होते. माझी भांडी, कपडे विखुरलेले होते, जणू काही कुणी सगळं खणून काढलं असावं,” सुमारे ४७ वर्षांच्या सबिता सांगतात. त्या त्यांच्या मुलाच्या घरून चार किलोमीटर अंतर चालत आल्या होत्या. २७ वर्षीय राजू सरदार आणि त्याची बायको, २५ वर्षीय रुपा आणि तिची धाकटी बहीण टॉलीगंजमधल्या झलदार मठ झोपडपट्टीतल्या भाड्याच्या घरात राहतात.
२५ मार्च रोजी टाळेबंदी लागली तेव्हा कोलकाता पोलिसांनी गरियाहाटमधल्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना एका निवारा केंद्रात पाठवलं होतं, तिथनं त्या झलदार मठला गेल्या होत्या. त्या दिवशी पोलिस आले आणि उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या सबिता आणि इतरांना भेटले, “त्यांनी आम्हाला सांगितलं की या [करोना] विषाणूमुळे आम्ही रस्त्यावर राहू शकत नाही, आणि आम्हाला निवाऱ्यात जावं लागेल म्हणून,” त्या सांगतात. कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ८५ मधल्या एका मोठ्या सभागृहात त्यांना नेण्यात आलं.
२० एप्रिल रोजी, अम्फान येण्याच्या एक महिना आधी मी सबितांना गरियाहाटच्या रिकाम्या पदपथावर एका मोडक्या लाकडी बाकावर बसलेलं पाहिलं. त्या १५ एप्रिलला निवारा केंद्रातून बाहेर पडल्या आणि आपल्या मुलासोबत राहू लागल्या. आपलं सामान सुमान ठीक आहे ना पहायला त्या आल्या होत्या. एरवी रस्त्यात दुकानं थाटणाऱ्यांनी आपल्या टपऱ्या, हातगाड्या टाळेबंदीमुळे बंद करून ठेवल्या होत्या. फूटपाथवर राहणारे अगदी मोजके लोक तिथे होते. “मी माझे कपडे आणि भांडीकुंडी ठीकठाक आहेत ना ते पहायला आले होते. चोरीला जातात की काय याचा मला घोर लागला होता, पण सगळं काही जसंच्या तसं आहे पाहिलं आणि निवांत झाले.”
“त्या निवारा केंद्रात काही आमचं ठीक चाललं नव्हतं,” सबिता सांगतात. त्या सभागृहात १०० लोकांची सोय करण्यात आली होती, त्या सांगतात. “एखाद्याला जास्त खाणं मिळालं तर लगेच भांडणं लागायची. रोजचंच होतं हे. डावभर भातासाठी मारामाऱ्या व्हायला लागल्या होत्या.” हळूहळू खाणं पण चांगलं येईना झालं. “तितकं जळजळीत खाऊन माझ्या घशाची आग व्हायला लागली. रोज रोज पुरी आणि आलू, एवढंच खाणं.” तिथलं वातावरण हिंसक बनलं होतं – खाण्यावरनं भांडणं होतच होती, पण राखणदारही छळ करायचे. तिथे राहणाऱ्यांना साफसफाईसाठी पुरेसं पाणी किंवा साबण पण मिळायचा नाही.
सबिता सात वर्षाच्या होत्या तेव्हापासून गरियाहाटचा फूटपाथ हेच त्यांचं घर आहे. आपली आई, कानन हलदार, तिघी बहिणी आणि तिघा भावांसोबत तेव्हा त्या या शहरात आल्या. “माझे वडील कामासाठी फिरतीवर असायचे. एकदा ते कामासाठी म्हणून गेले ते परत आलेच नाहीत.” मग कानन आणि त्यांची सात मुलं पश्चिम बंगालच्या साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या त्यांच्या गावाहून (सबितांना गावाचं नाव आठवत नाही) रेल्वेने कोलकात्याच्या बॅलीगंज स्थानकात अवतरली. “माझी आई रोजंदारीवर बांधकामांवर कामाला जायची. आता तसली कामं करण्याचं तिचं वय राहिलं नाही. ती कचरा वेचते आणि कमावते,” सबिता सांगतात.
सबितादेखील किशोरवयातच घरच्यांना हातभार म्हणून कचरा वेचायला लागल्या. विशीच्या आतच त्यांचं शिबू सरदारशी लग्न झालं, जो रस्त्यातच रहायचा. त्यांना राजूसकट पाच मुलं झाली. शिबू गरियाहाट बाजारात दुकानांमधला माल उतरवायचं आणि मासे कापायचं काम करायचा. २०१९ साली क्षयाने त्यांचं निधन झालं. आता त्यांच्या दोघी लहान मुली आणि मुलगा कोलकात्यात सामाजिक संस्थांनी चालवलेल्या निवासी शाळांमध्ये राहतायत. त्यांची मोठी मुलगी, मंपी, वय २० आणि तिचा तान्हा मुलगा बहुतेक वेळा मंपीच्या नवऱ्याच्या छळापासून सुरक्षित सबिताकडेच राहतात.
२००२ साली गरियाहाट पुलाचं बांधकाम सुरू होतं तेव्हा सबिता, तिचं कुटुंब – आई कानन, भाऊ, एक बहीण त्यांची मुलं आणि जोडीदार – सगळे जण फूटपाथवरून पुलाखाली रहायला आले. कोविड-१९ च्या महामारीने त्यांची आयुष्यांची उलथापालथ होईपर्यंत ते तिथेच राहत होते.
२५ मार्च रोजी, सबिता, कानन, मंपी आणि तिचा मुलगा, सोबत सबिताचा भाऊ, वहिनी पिंकी हलदार आणि त्यांच्या मुली असं सगळ्यांना निवारा केंद्रात हलवण्यात आलं. काही दिवसांनी, पिंकी आणि तिच्या मुलींना पिंकीच्या मालकिणींच्या विनंतीवरून घरी परत पाठवण्यात आलं. पिंकी गरियाहाटच्या एकदलिया भागात घरकाम करायची. तिच्या कामावरच्या एका वृद्ध स्त्रीला घरकाम होत नव्हतं. “त्यांनी गरियाहाट पोलिस स्टेशनमध्ये अर्ज केला आणि त्यांनी आम्हाला सोडलं, पण त्यांच्याकडून लिहून घेतलं की त्या आमची जबाबदारी घेतायत आणि आमची काळजी घेतील.”
१५ एप्रिल रोजी आपल्या सासूला परत न्यायला पिंकी निवारा केंद्रात परतली. “तसल्या भांडणांमध्ये त्यांना काही धकत नव्हतं,” ती सांगते. पण ती निवारा केंद्रात पोचली तेव्हा तिचा तिथल्या रखवालदाराशी वाद झाला. त्याचं म्हणणं होतं की तिने पोलिस स्टेशनमधून परवानगी आणायला पाहिजे. “मी त्याला इतकंच विचारलं की तो सगळ्यांना अशी सही आणायला सांगतोय का म्हणून. याचा त्याला राग आला आणि त्यानी पोलिस बोलावले. मी माझ्या सासूची वाट बघत थांबले होते, तितक्यात एक पोलिस आला आणि मला त्याच्याकडच्या लाठीने मारहाण करायला लागला,” असा तिचा आरोप आहे.
कानन आणि सबितांना त्या दिवशी निवारा केंद्र सोडलं. सबिता गरियाहाट पुलाखालच्या आपल्या मुक्कामी गेल्या आणि त्यांच्या आईची रवानगी सबिताच्या बहिणीकडे, इथून ४० किलोमीटरवर साउथ २४ परगणातल्या मल्लिकापूरला करण्यात आली.
टाळेबंदीच्या आधी सबिता दर आठवड्याला २५०-३०० रुपयांची कमाई करत होत्या. मात्र निवारा केंद्रातून परत आल्यानंतर देखील त्या भंगार वेचायचं काम काही सुरू करू शकल्या नाहीत कारण भंगारची दुकानंच सुरू झाली नव्हती. त्यात जे निवारा केंद्रांमधून परतले होते त्यांना पोलिस आणि त्यांच्या लाठ्यांपासून लपणं भाग होतं. त्यामुळे सबिता आपल्या मुलाच्या घरी झलदार मठला रहायला गेल्या.
गरियाहाटमध्येच कचरा वेचण्याचं काम करणाऱ्या उषा दोलुई सांगतात, “मी पोलिसांची नजर चुकवून आहे. मला त्यांचा मार खायचा नाहीये आणि विषाणूची बाधा देखील व्हायला नकोय. जर तिथे बरं खाणं मिळायला लागलं तर मी परत तिथे निवारा केंद्रात जायला तयार आहे.” उषांची किशोरवयीन मुलगी आणि मुलगा, दोघंही तिथे निवारा केंद्रातच आहेत, उषा त्यांना तिथे ठेवून सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून वाटलं जाणारं रेशन आणि खाणं मिळावं म्हणून बाहेर पडल्या.
३ जून रोजी निवारा केंद्रातल्या सगळ्यांना परत जायला सांगण्यात आलं तेव्हा गरियाहाटच्या रहिवाशांपैकी फक्त १७ जण तिथे उरले होते. तिथे सफाई करणाऱ्या एकाने मला सांगितलं की शेजारच्या विहिरीवरून पाणी आणण्याचा बहाणा करून अनेकांनी त्या आधीच तिथून पळ काढला होता.
उषा देखील पुलाखालच्या त्यांच्या आधीच्या जागी, गरियाहाट पोलिस स्टेशन समोर परतल्या आहेत. त्या सांगतात दोनदा पोलिस आला आणि त्या अन्न शिजवत असताना भांडी लाथाडून गेला. त्यांना लोकांनी दिलेलं धान्य जप्त करण्यात आलं. एका तीनचाकी हातगाडीवर त्या त्यांचे कपडे आणि अंथरुणं बांधून ठेवायच्या. तीदेखील घेऊन गेलेत. “जिथून आलात, तिथे आपापल्या घरी परत जा, असं सांगितलं आम्हाला. आम्ही इतकंच म्हणालो, आम्हाला घरं असती तर आम्ही असं रस्त्यावर राहिलो नसतो,” उषा सांगतात.
अम्फान धडकण्याआधी सबिता इथे गरियाहाटला परत आल्या कारण त्यांच्या मुलाला, राजूला सहा जणांचं पोट भरणं जड जात होतं. तो गरियाहाटमधल्या एका बुटांच्या दुकानात काम करायचा आणि दिवसाला २०० रुपये कमवायचा. टाळेबंदी सुरू झाल्यापासून तो हरतऱ्हेने काटकसर करण्याचा प्रयत्न करतोय. स्वस्त मिळतात म्हणून तो सात किलोमीटर सायकल चालवत लांबच्या बाजारातून भाज्या विकत आणतो. “माझ्या मुलाच्या शाळेतून आम्हाला [शिक्षकांनी मिळून दिलेलं] थोडं धान्य मिळालं आणि आम्ही सध्या भात आणि बटाट्यावर भागवतोय,” राजू सांगतो. “पण आम्हाला चहा, बिस्किटं, तेल, मसाले लागतात, माझ्या दोन वर्षांच्या लेकरासाठी डायपरदेखील. अचानक जर काही खरेदी करायची वेळ आली तर मी काय करेन याचाच मला घोर लागलाय. माझ्याकडे आता रुपयाचीही रोकड नाही,” तो म्हणतो.
सबितांनी त्यांची तीनचाकी हातगाडी एका फळवाल्याला रोज ७० रुपये भाड्याने दिली होती, पण तो त्यांना ५० रुपयेच देतोय. “आम्हालाही पोट आहे,” त्या म्हणतात. मंपी आणि तिचा आठ महिन्यांचा मुलगा सध्या त्यांच्यापाशीच आहेत. या सगळ्यांचं पोट इतक्या पैशात भरत नाही आणि जवळचं सुलभ शौचालय वापरायचं तरी पैसे भरावे लागतात.
गेल्या काही दिवसांपासून सबितांनी कागद वेचायला सुरुवात केलीये कारण काही दुकानं आता भंगार विकत घ्यायला लागलेत. तीन गोण्या कागदांचे त्यांना १००-१५० रुपये मिळतात.
सगळे धोके पचवून रस्त्यावर राहणाऱ्या सबितांना महामारी असो नाही तर चक्रीवादळ कशाचंच भय उरलेलं नाही. “मरण कधीही येऊ शकतं – नुसतं रस्त्याने चालता चालता गाडीच्या धक्क्याने जीव जाऊ शकतो. या पुलाने आमचा जीव मात्र वाचवलाय,” त्या म्हणतात. “वादळ येऊन गेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी, मी पांता भात [शिळा भात] खाल्ला. वादळ ओसरलं, सगळं काही ठीकठाक झालं.”
अनुवादः मेधा काळे