हरयाणा-दिल्लीच्या सीमेवर सिंघुपाशी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाल्या तेव्हा पोलिसांनी फोडलेल्या अश्रुधुराच्या नळकांडीचा एक तुकडा सरदार संतोख सिंग यांना लागला. या घटनेला महिना उलटून गेला.
पण तरीही सत्तरीचे सिंग आजही सिंघुसीमेवर तळ ठोकून बसलेले आहेत. “आम्ही शांतपणे बसलो होतो आणि अचानक गोळीबाराचा आवाज आला,” २७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटना ते सांगतात. डाव्या डोळ्याच्या अगदी खाली त्यांना जखम झाली.
त्याच्या आदल्याच दिवशी, १७ लोक पंजाबातल्या तरण तारण जिल्ह्यातल्या घरका या त्यांच्या गावाहून निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली सीमेवरती पोचले. “आम्ही पोचलो तेव्हा तिथे ५० ते ६० हजार लोक जमा झालेले होते. मी आंदोलकांमध्ये जाऊन बसलो आणि भाषणं ऐकत होतो,” संतोख सिंग सांगतात.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक झटापट झाली आणि गोंधळ उडाला. आणि काही क्षणातच पाण्याचे जोरदार फवारे सुरू झाले आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायला सुरुवात झाली. “आमच्या समोरचे तरुण झटक्यात उठले. माझ्यावरून एक उडी मारून दुसऱ्या बाजूला गेले. मग मी उठलो आणि स्वतःला सावरलं,” सिंग सांगतात. “मी सुरक्षारक्षकांना ओरडलो सुद्धाः ‘आम्हाला डिवचण्याचं काय कारण? आम्ही शांतपणे बसलो होतो’. पण त्यांनी संतापून उत्तर दिलं: ‘जमावाला पांगवण्यासाठी आम्हाला हे करावं लागतंय.’ आणि तेवढ्यात समोरून एक नळकांडी येतीये पाहून माझ्या समोरचा मुलगा झटक्यात खाली वाकला. आणि गोळी थेट मला लागली. पण मी हललो नाही.”
पंजाबच्या चोला साहिब तहसिलातल्या आपल्या रानात संतोख सिंग गहू आणि तांदूळ घेतात. ते म्हणतात, “मला इजा झालीये हे माझ्या लक्षातही आलं नाही. पण नंतर अचानक लोक गोळा झाले आणि लोकांनी सांगितलं की जखमेतून रक्त भळभळतंय. दवाखान्यात नेण्याची त्यांनी तयारी दाखवली. पण मी नकार दिला आणि जे तरुण आंदोलक पळाले होते ना त्यांना परत बोलावलं. पळू नका, मी म्हणालो. माघारी जाण्यासाठी आपण इथवर आलोय काय? मी म्हणालो. सरकारला मला विचारायचं होतं की आमच्यावर हल्ला का करण्यात आला. इथे समोरासमोर या आणि आमच्याशी लढा असं आव्हान द्यायचं होतं. त्यांच्या गोळ्यांनी आम्ही घाबरून जाऊ असं वाटलं की काय त्यांना?”
नळकांडी लागल्यामुळे सिंग यांना आठ टाके पडले आणि डाव्या डोळ्यात रक्ताची गुठळी झाली. “माझ्या गावच्या तरुण मुलांनी मला आंदोलनस्थळाच्या जवळच्या दवाखान्यात नेलं. पण त्या दवाखान्याने आम्हाला प्रवेश नाकारला आणि दरवाजा बंद करून घेतला. सगळा नुसता गोंधळ होता. पण नशिबाने तिथेच एक रुग्णवाहिका उभी होती, पंजाबहून आलेली. तिथली लोकं धावत मदतीला आली. टाके, औषधं सगळ्यासाठी त्यांनी मदत केली. अश्रुधुराच्या नळकांड्यांनी जखमी झालेल्या इतर अनेक जणांवर ते उपचार करत होते.”
संतोख सिंग आपल्यावर काय गुदरलं हे अगदी हसत आणि गर्वाने सांगतात. “रानात आम्ही काय कष्ट झेलतो त्याच्या तुलनेत ही जखम काहीच नाहीये. पिकं काढताना खोल जखमा नेहमीच्याच असतात. मी एक शेतकरी आहे. रक्त काही मला नवीन नाही. त्यांना काय वाटलं, त्यांच्या गोळ्यांना घाबरून आम्ही माघारी जाऊ?”
ही घटना होऊन महिना उलटला आहे. सिंग आणि इतरही आंदोलक सीमेवरती तळ ठोकून आहेत. आणि सरकारसोबतच्या वाटाघाटींच्या फेऱ्यांमधून अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही.
५ जून २०२० रोजी वटहुकुम म्हणून आणलेले तीन कृषी कायदे संसदेत १४ सप्टेंबर रोजी कायदे म्हणून मांडण्यात आले आणि २० सप्टेंबर २०२० रोजी रेटून पारित करण्यात आले. हे कायदे आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. त्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी गेल्या वर्षीपासून इथे ठाण मांडून बसले आहेत.
हे कायदे आल्यास आपल्या उपजीविका उद्ध्वस्त होतील अशी शेतकऱ्यांना भीती आहे. शेती आणि शेतकऱ्यांवर बड्या कंपन्यांचं नियंत्रण आणखी वाढेल आणि शेतकऱ्यांसाठी उपकारक असलेल्या किमान हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या यंत्रणा, शासनाकडून खरेदी इत्यादी व्यवस्था मोडीत काढल्या जातील अशी शक्यता असल्याचा आक्षेप ते घेतात.
“आम्हाला जास्तीत जास्त दिवस इथे बसवून ठेवायचं, ही सरकारची खेळी आहे. त्यांना वाटतंय आम्ही दमून, कंटाळून माघारी जाऊ. तिथेच त्यांचं चुकतंय. माघारी जाण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही. मी आधीही हे सांगितलंय, आणि आताही सांगतोय: आमची काहीही हरकत नाहीये. आम्ही आरामात इथे बसून राहू. ट्रॅक्टर आणि ट्रॉल्या भरून शिधा सोबत आहे. आमचे शीख बांधव आम्हाला काहीही कमी पडू देत नाहीयेत. आमचे हक्क आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही इथून परत जाणार नाही. हे कायदे रद्द करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. आणि तसं झालं नाही तर आम्ही आणि आमच्या येणाऱ्या पिढ्या बरबाद होणार आहेत. त्यांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आम्हाला हे करावंच लागणार आहे. आमचे हक्क मिळाल्यानंतरच आम्ही इथून जाऊ, त्या आधी नाहीच.”
अनुवादः मेधा काळे