कृष्णा गावडेचं लहानपण फार कमी वयात संपलं. गावातली इतर मुलं शाळेत जायची त्या वयात तो शेतमजुरी करून रू. २०० रोजी कमवायचा. त्याचे मित्र गावात क्रिकेट खेळायचे तेव्हा तो बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारी मिळण्याची वाट पाहायचा. पाच वर्षांपूर्वी, वयाच्या १३व्या वर्षी, कृष्णा आणि त्याच्याहून तीन वर्षांनी मोठ्या महेशच्या खांद्यावर सहा जणांच्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली.
त्याचे वडील, प्रभाकर, मनोविकारामुळे काम करू शकत नाहीत, आणि आई सारखी आजारी असते, असं कृष्णाचे आजोबा, ८० वर्षांचे रघुनाथ गावडे सांगतात. ते महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी गावात त्यांच्या घराबाहेरच्या दगडी कट्ट्यावर बसले होते. "माझं अन् माझ्या मंडळीचं हे काही काम करायचं वय आहे का? म्हणून माझ्या नातवांवर लहान वयातच लई जबाबदारी आली. मागल्या ४-५ वर्षांत त्यांच्याच कमाईवर घर चालायलंय," ते म्हणतात.
गावडे धनगर या पारंपरिक पशुपालक समाजाचे असून त्यांचा समावेश महाराष्ट्रात भटक्या जमाती अंतर्गत होतो. नवगण राजुरी येथे त्यांची एकरभराहून कमी जमीन आहे आणि त्यात ते घरी खाण्यापुरती ज्वारी-बाजरी करतात.
कृष्णा आणि महेश दरमहा साधारण रू. ६,०००-८,००० कमवत होते आणि त्यातून घरचा रोजचा खर्च भागत होता. मात्र, कोविड-१९च्या उद्रेकामुळे त्यांचा ताळेबंद फिसकटला. मार्च २०२० मध्ये सुरू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीनंतर दोन्ही भावांच्या हातून काम गेलं आणि पैसाही.
"सामाजिक कार्यकर्ते अन् सरकारकडून मिळालेल्या फुकट राशन किटवर आम्ही जितं हावोत," कृष्णा आणि महेश यांच्या आजी, ६५ वर्षीय सुंदरबाई म्हणतात. "पण घरात पैसा नावाला नव्हता. साधं तेल अन् भाज्याही विकत घेऊ शकत नव्हतो. लॉकडाऊन लागल्यापासनं पहिले तीन महिने लईच बेकार गेले."
जून २०२० मध्ये टाळेबंदी शिथिल करण्यात आली आणि कालांतराने आर्थिक व्यवहारही सुरळीत व्हायला लागले तरी बीडमध्ये रोजंदारी मिळवणं कठीण जात होतं. "म्हणून महेश पुण्याला गेला," रघुनाथ सांगतात. पण घरी पैसा पाठवण्याइतकं कामच त्याला मिळत नव्हतं. "कृष्णा घर सांभाळायला इथंच राहिला अन् बीडमध्ये काम शोधत होता."
मागे वळून पाहताना हा निर्णय घातक ठरला.
कृष्णाला जबाबदारी झेपत नव्हती. त्यामुळे या १७ वर्षीय मुलाच्या मानसिक स्वास्थ्यावर आघात झाला आणि त्याचं नैराश्य घरच्यांना उघडपणे दिसत होतं. "तेंव्हा काहीच काम नव्हतं," रघुनाथ म्हणतात. "त्याची चिडचिड व्हायची. त्याला निस्तं जेवण झालं का म्हणून इचारलं तरी आमच्यावर कावायचा. कोणाशी बोलणं नाही अन् काम नसलं की झोपा काढायचा."
या प्रकरणाचा शेवट अशाप्रकारे होईल असं त्याच्या घरच्यांना वाटलं नव्हतं: मागील वर्षी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात एक दिवस सुंदरबाई कृष्णाच्या खोलीत गेल्या अन् पाहतात तर काय – त्याचा मृतदेह पंख्यावरून लटकला होता.
"महेश इथं होता तेंव्हा त्याला जरा आधार होता," सुंदरबाई म्हणतात. "त्याला वाटायचं की आपल्यावर लक्ष द्यायला कोणीतरी आहे. महेश पुण्याला गेला अन् त्याला वाटलं की घरची सगळीच जबाबदारी त्याच्या एकट्यावर येऊन पडली. कमाई बी हुईना गेलती. आपली जबाबदारी आपण निभवत न्हाव असं वाटायलं होतं त्याला."
कृष्णाच्या मृत्यूनंतर २१ वर्षीय महेश घरी परतला. तो बीडमध्ये रोजंदारी करायला परतलाय – अर्थात, काम मिळेल तेंव्हा. आता कुटुंबाच्या चरितार्थाची जबाबदारी त्याच्या एकट्यावर आहे.
महामारीचा कृष्णासारख्या कित्येक कुटुंबांवर परिणाम झाला असून मार्च २०२० पासून आणखी बरेच जण दारिद्र्यात ढकलले गेले आहेत. अमेरिकास्थित प्यू रिसर्च सेंटर च्या मार्च २०२१ मधील एका अहवालानुसार: "कोविड-१९ नंतरच्या आर्थिक मंदीमुळे भारतात दारिद्र्य रेषेखालील (२ डॉलर व त्याहून कमी रोजची कमाई असलेल्या) लोकांची संख्या ७.५ कोटींनी वाढली असल्याचा अंदाज आहे." या मंदीमुळे आधीच कित्येक वर्षं दुष्काळ आणि कर्जाच्या विळख्यात रुतलेल्या बीडसारख्या कृषिप्रधान जिल्ह्यातील मागासलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील लोकांच्या उपजीविका उद्ध्वस्त झाल्या आहेत.
घरातील वडीलधाऱ्यांवर आलेल्या आर्थिक ताणाचा लहान आणि तरुण मुलांवर विपरीत परिणाम होतोय. बाल अधिकार कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाचे माजी सदस्य संतोष शिंदे म्हणतात की या संकटामुळे मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम झालाय. "विशेषतः वंचित समाजाच्या कुटुंबांमध्ये मुलांना घरच्या अडचणींमुळे कामं करावी लागतायत. एवढ्या लहान वयात अंगावर अशा प्रकारची जबाबदारी येऊन पडली की मुलांना ते झेपत नाही," ते म्हणतात. "आजूबाजूला लोकांची दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून धडपड सुरू आहे म्हटल्यावर मानसिक स्वास्थ्यावर चर्चा करणं तर लांबच राहिलं."
मुलांना जरी काम करावं लागलं नाही, तरी आर्थिक अडचणी आणि तणावामुळे घरच्या मोठ्या लोकांमध्ये भांडणं वाढतात. त्याचा त्यांना त्रास होतो. "त्याचाही मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो," शिंदे म्हणतात. "कोविडच्या आधी मुलं बाहेर जाऊन खेळायची, दुसऱ्या गावात फिरायला जायची. आता शाळाही बंद आहेत, म्हणून त्यांची घरच्या वातावरणातून सुटका होणं शक्य नाही."
पण १४ वर्षीय संजना बिराजदार हिने आपली सुटका करून घेतली. जून २०२१ मध्ये ती बीडच्या परळीतून आपलं घर सोडून २२० किलोमीटर लांब औरंगाबादमध्ये निघून गेली. संजना तिच्यासोबत स्वतःच्या दोन लहान भावंडांना, समर्थ आणि सपना, वय अनुक्रमे ११ व ९ वर्षे, घेऊन निघून गेली. "मला सहनच होत नव्हतं," ती म्हणते. "मला काही बी करून त्या घरातून बाहेर पडायचं होतं."
संजनाची आई, मंगल, पाच ठिकाणी घरकाम करते. महिन्याचे त्यांना २,५०० मिळतात. तिचे वडील, राम, टेंपो चालवायचे. "लॉकडाऊननंतर त्यांचं काम गेलं," मंगल म्हणतात. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन नाही असं त्या सांगतात. "माझा भाऊ आमच्यात राहतो. तो बी बेकार पडलाय. कसं तरी करून दिवस काढायलोय," त्या म्हणतात.
संजनाने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मंगल, वय ३५, आणि राम, वय ४०, यांच्यात पैशावरून सारखी भांडणं होत होती. त्यांच्या भांडणाला बरेचदा हिंसक वळण यायचं. "कधी कधी घरी खायलाच नसतं अन् आम्ही पाणी पिऊन झोपून जातो," मंगल म्हणतात. "डोकं ताळ्यावर नसलं की कधीकधी समदा राग पोरांवर निघतो. मला कबूल आहे की घरची हालत मुलांसाठी चांगली नव्हती."
काम मिळत नसल्यामुळे मंगलच्या भावाला दारूचं व्यसन लागलं, त्याच्या वागण्यामुळे घराचं वातावरण आणखी बिघडलं होतं. "तो खूप पितो, घरी नशा करून येतो अन् मला मारतो," मंगल म्हणतात. "जाडजूड भांडी डोक्यावर फेकून मारतो. त्याच्यापायी मला खूप लागलंय. मला म्हणतो, भरपूर खायला देत नाही. त्याला काय बोलणार? घरी काहीच खायला नाही, जेवण देणार तरी कसं?"
मंगल सांगतात की तो मारहाण करतोय ते मुलं बघतायत याचाही त्यांच्या भावाला फरक पडत नाही. "तो मला त्यांच्यासमोर मारतो. म्हणून तो पिऊन आला अन् तमाशा करायला लागला की ते घराबाहेर निघून जातात," त्या म्हणतात. "पण त्यांना समदं ऐकू जातं, समदं कळतं. माझी पोरगी घर का सोडून गेली ते कळतंय मला."
संजना म्हणते की तिला गुदमरल्यागत व्हायचं अन् या भावनेतून सुटका होण्यासाठी एकच पर्याय होता तो म्हणजे घर सोडून जाणं. पण आपल्या भावंडांना घेऊन ट्रेनचा डबा चढल्यावर पुढे काय करायचं ते तिला माहीत नव्हतं. कुठे जायचंय असा कसलाच विचार न करता आणि विनातिकीट ते प्रवास करत होते. "औरंगाबादला का बरं उतरलो, माहीत नाही," ती म्हणते. "थोड्या वेळ गाडीत बसलो होतो. तिथं रेल्वे पोलिसांनी आम्हाला पाहिलं अन् मुलांच्या हॉस्टेलमध्ये आणून सोडलं," ती म्हणते.
ऑगस्ट २०२१च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तिघं हॉस्टेलमध्ये राहिले. संजनाने अखेर हॉस्टेल अधिकाऱ्यांना सांगितलं की ते परळीचे आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील बालकल्याण समितींनी या मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणली.
पण ते घरी परतले तरी परिस्थिती जैसे थेच राहिली.
संजना आपली शाळा सुरू होण्याची वाट पाहतेय. "मला शाळेत जायला आवडतं. मला मैत्रिणींची आठवण येते," ती म्हणते. मोठं होऊन या मुलीला पोलीस अधिकारी व्हायचंय. "शाळा सुरू झाली असती तर मी पळून गेले नसते," ती सांगते.
अवघ्या महाराष्ट्रात मुलं तणावाचा सामना करतायत आणि महामारीच्या परिणामांचाही. ८ ऑगस्ट, २०२१ रोजी बीडमधील प्रजापत्र नावाच्या एका मराठी दैनिकात आलेल्या बातमीनुसार या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांमध्येच जिल्ह्यातील १८ वर्षांखालील एकूण २५ जणांनी आत्महत्या केलीय.
"जेव्हा मुलांकडे स्वतःचं मनोरंजन करण्याची किंवा मनाला चालना देण्याची साधनं नसतात, तेव्हा एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण होते. त्याचवेळी ते आपलं राहणीमान खालावत चाललेली पाहत असतात, त्याचा ते एक हिस्साच असतात. त्यांच्या नैराश्याच्या मागे ही सगळी कारणं असतात," डॉ. आनंद नाडकर्णी सांगतात. ते ठाणे स्थित इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या सामुदायिक मानसिक स्वास्थ्यावर काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे संस्थापक आहेत.
अवघ्या महाराष्ट्रातील मुलं महामारीच्या परिणामांचा सामना करतायत. ८ ऑगस्ट, २०२१ रोजी बीडमधील प्रजापत्र नावाच्या एका मराठी दैनिकात आलेल्या बातमीनुसार या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांमध्येच जिल्ह्यातील १८ वर्षांखालील एकूण २५ जणांनी आत्महत्या केली आहे
कोविड-१९चा उद्रेक झाल्यापासून लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढलंय, असंही नाडकर्णी म्हणतात. "ह्याला 'छुपं नैराश्य' म्हणतात," ते सांगतात. "वयस्क व्यक्तींमध्ये दिसतं त्याप्रमाणे ते दिसून पडत नाही. बरेचदा, घरच्यांना त्याची कल्पनाही येत नाही. त्यांना भावनिक समस्येची कारणं शोधता येत नाहीत, आणि किशोरवयीन मुलांना ते व्यक्तही करता येत नाही. अशाने नैराश्याचं निरीक्षण, निदान आणि उपचार होत नाहीत."
रामेश्वर ठोमरे यांनाही आपल्या मुलाचं काही तरी बिनसलंय असं जाणवलंच नाही.
रामेश्वर यांचा मुलगा, १५ वर्षांचा आविष्कार २८ फेब्रुवारी, २०२१ रोजी बीडच्या माजलगाव (याला मांजलेगावही म्हणतात) तालुक्यातील दिंडरुड या त्यांच्या गावातून बेपत्ता झाला. आविष्कारचा मृतदेह त्याच्या शाळेत सापडला. "पोलीस म्हणतायत की संशयास्पद काही नाही," रामेश्वर म्हणतात. "शाळा बंद होती. पण त्यानं दाराखालच्या फटीतून आत शिरून स्वतःला गळफास लावून घेतला."
शाळा बंद होती म्हणून पत्ता लागेपर्यंत मृतदेह तसाच होता. "आम्ही सगळीकडे पाहिलं, पण तो काही सापडला नाही," त्याचे वडील म्हणतात. "काही मुलं शाळेजवळ क्रिकेट खेळत होते, अन् चुकून बॉल खिडकीच्या आत गेला. एक मुलगा दाराखालून आत शिरला अन् त्याला पाहिलं."
आपल्या मुलाला आयुष्य संपवावं असं का वाटलं असावं याचाच रामेश्वर विचार करतायत. "तो काही बोलायचा नाही. त्याच्या भावाचा त्याच्यावर फार जीव होता. तोही आमच्यासारखाच कोड्यात पडलाय," ते म्हणतात. "तो ज्या दिवशी गायब झाला त्या दिवशी तो दुकानावर आला आणि दुकानाचं शटर उघडून मला सांगितलं होतं की जेवण झाल्यावर तो परत येईल. तो कधीच परतला नाही."
रामेश्वर स्वतःच्या मालकीचं एक कृषी सेवा केंद्र चालवतात. बी-बियाणं, खतं, कीटकनाशक आणि इतर कृषी उत्पादनं दुकानात विक्रीला असतात. "लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना झाला तसाच आम्हालाही त्रास झाला," ते म्हणतात. "माहीत नाही ते कारण होतं का. खरंच माहीत नाही. माहीत असतं तर बरं झालं असतं."
लेखकाला या आणि इतर लेखांच्या लेखमालेसाठी
पुलित्झर सेंटर
तर्फे स्वतंत्र अर्थसहाय्य मिळाले आहे.