किती तरी शतकांपासून राजस्थानातल्या पाली जिल्ह्यातल्या सादरी गावातला राइका समुदाय उंट पाळतोय. २०१४ साली राजस्थानात उंट हा राज्य प्राणी घोषित करण्यात आला. अनेकांच्या मनात या बहुरंगी राज्याची जी प्रतिमा आहे, वाळवंट, त्याचं जणू हा प्रतिनिधीत्व करतो. पशुपालकांसाठी उंट फार मोलाचे आहेत कारण ते इथल्या उष्णतेचा मुकाबला करू शकतात, कमी पाण्यावर राहू शकतात आणि बदल्यात दूध आणि त्यांची लोकर देतात.
पण आज पशुपालक संकटात सापडलेत. त्यांच्या भटक्या आयुष्याशी संबंधित प्रथांबद्दल त्यांना समाजाकडून तिरस्कार आणि अनेकदा दुस्वास अनुभवायला मिळत असल्यामुळे राइकांचं जगणं मुश्किल झालं आहे.
जोगारामजी राइका या समुदायातले ज्येष्ठ, जाणते पशुपालक आहेत आणि अध्यात्मिक गुरू म्हणजेच भोपाजी आहेत. राइका ज्यांना मानतात अशा देवांबरोबर ते संवाद साधतात – त्यांचा मुख्य देव आहे पाबूजी. भोपाजी अनेकदा आत्म्याशी संवाद साधत असताना तंद्रीतही जातात.
मी सर्वात पहिल्यांदा जोगारामजींना भेटले तेव्हा ते त्यांच्या समुदायाच्या लोकांशी बोलण्यात मग्न होते आणि एकीकडे अफूचं तेल काढणंही सुरू होतं. ते दिवसांतून अनेकदा या तेलाचा धूर घेतात किंवा ते प्राशन करतात. त्यांची पत्नी न्याहरी बनवण्यात गर्क होती.
समुदायाचे लोक भोपाजींचा विविध बाबीत सल्ला घेतात – वैयक्तिक आणि सामुदायिक. जमिनीच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा तसंच सार्वजनिक कार्यक्रमात समुदायाचं प्रतिनिधीत्व करण्याचा हक्कही त्यांना देण्यात आला आहे.
जोगारामजी त्यांच्या समुदायासमोरचे प्रश्न आणि त्यांच्या कुटुंबाविषयी बोलले. आजकाल औपचारिक शिक्षण आवश्यक आहे, ते म्हणतात, किमान लोकांची अशी भावना तरी आहे. त्यांची मुलगी रेखा शाळा शिकेल याची ते हमी घेतात. “शाळेत जाण्याने मान मिळतो असं दिसतंय,” ते स्पष्ट करतात. “आम्ही शाळेत गेलो नाही त्यामुळे लोक आम्हाला मान देत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं की आम्हाला जगाची रीत समजत नाही. त्यात, ती मुलगी आहे. त्यामुळे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तिने जास्त गोष्टी शिकल्या पाहिजेत.”
हे करत असतानाच, जोगारामजी त्यांचं पारंपरिक शहाणपणही रेखालाच सुपूर्द करणार आहेत. पशुपालक समुदायाची सदस्य असल्याने तिला इतर अनेकांना मिळत नाही असं स्वातंत्र्यही अनुभवायला मिळतं – एका उंटाशी ती ज्या रितीने खेळतीये ते नुसतं पाहिलं तरी हे लगेच समजून येतं.
राइका जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या प्राण्यांबरोबर असतात – आणि त्यांचं आयुष्यमान जरी ५० वर्षं असलं तरी कधी कधी प्राणी माणसांपेक्षा जास्त वर्षं जगू शकतात. काही काही राइकांच्या आजूबाजूला माणसांपेक्षा प्राणीच जास्त संख्येने असतात.
उंटांच्या त्वचेवर नक्षीकाम करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी राइका आहेत – आणि प्राणी आणि माणसामध्ये असलेल्या दृढ विश्वासामुळेच हे शक्य होतं. बाहेरच्या समाजाच्या कुणालाही पाहताना असं वाटू शकतं की केस भादरत असताना उंटाला वेदना होतायत. पण राइका केवळ मान वाकवून किंवा हाताच्या इशाऱ्याने उंटाशी बोलू शकतात आणि त्यामुळे उंटाला कापल्याच्या जखमा होत नाहीत. उंटाच्या केसापासून गालिचे विणले जातात आणि केस भादरल्यामुळे उंटालाही जरा थंड वाटतं.
फुयारामजींसोबत, जे एक जाणते पशुपालक आहेत मी 'चडिये' म्हणजेच दिवसभराच्या चारणीसाठी सोबत गेले.
ते सकाळी निघतात, चहा आणि रोट्या आपल्या मुंडाशामध्ये बांधून घेतात आणि थेट सांजेलाच घरी परततात. राजस्थानातला असह्य गरमा आणि २० उंटांवर देखरेख ठेवण्याचं काम असतानाही ते त्यांच्या चहात मलाही वाटेकरी करून घेतात.
आधी, कमाईसाठी राइका केवळ उंटाची पिल्लं विकायचे. पण आता तेवढं पुरेसं नाही. आता ते उंटापासून मिळणारे पदार्थ विकून आपल्या कमाईत भर घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते अवघड आहे, फुयारामजी सांगतात. पोषक द्रव्यांनी युक्त असणारं उंटिणीचं दूध आगामी काळातलं “सुपर फूड” मानलं जातंय. मात्र भारतात सरकारी दुग्ध व्यवसायाने लादलेल्या अनेक निर्बंधांमुळे त्याची विक्री सुरू होऊ शकलेली नाही. आणि अशी विक्री सुरू झाली नाही तर तगून राहण्याची राइकांची उरली सुरली शक्तीच संपून जाईल. त्यामुळेच अनेक जण पर्यायी उपजिविकांच्या शोधात समुदाय सोडून चालले आहेत.
पशुवैद्य, कार्यकर्ता आणि कॅमल कर्मा या २०१४ साली आलेल्या पुस्तकाचे लेखक इल्सं कोह्लर-रॉलफसन यांच्या मते, “पुढच्या पिढीला काही परंपरा पाळण्याची इच्छा आहे मात्र त्यांचे हात बांधलेले आहेत. एखाद्या पशुपालकासाठी नवरी शोधून पहा. अशक्य आहे. अनेक राइका आता मजुरी करतायत.”
फुयारामजींना कदाचित कल्पना असावी की त्यांच्या कुटुंबातलं कुणीच त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार नाहीये. त्यांची मुलं हे काम करणार नाहीत ते त्यांनी बोलून दाखवलं. पशुपालकांसाठी उरलेल्या मोजक्या काही गायरानांमधून पुढे जात असताना त्यांनी मला सांगितलं की कधी काळी राइका लोक सादरीच्या रानावनातून मुक्तपणे संचार करत आणि वाटेत भेटेल त्याच्याशी त्यांचे पक्के ऋणानुबंध जुळत असत.
वीस वर्षांपूर्वी पशुपालक आणि शेतकऱ्यांचे एकमेकांशी आर्थिक आणि सामाजिक संबंध होते. जेव्हा एखादा उंटपाळ आपला कळप घेऊन दूरच्या सफरीला निघायचा तेव्हा त्याला शेतं-शिवारं पार करावीच लागायची. तिथे हे उंटपाळ शेतकऱ्याला ताजं दूध आणि उत्तम प्रतीचं खत पुरवायचे. त्या बदल्यात शेतकरी त्याला अन्न देऊ करायचे. उंटपाळाचा मार्ग क्वचितच बदलायचा त्यामुळे या दोघांमध्ये खूप दृढ संबंध प्रस्थापित व्हायचे, अगदी पिढ्या न् पिढ्या टिकणारे. आताशा, अनेक शेतकरी उंटपाळांना आपल्या शेतात येऊ देत नाहीत, ते पिकाची नासधूक करतील किंवा उंट पिकं खातील अशी भीती त्यांना वाटत असते.
काही पर्यावरणवादी आणि प्राणी हक्क गटांचा पाठिंबा असलेल्या नव्या कायदे आणि धोरणांमुळे राइकांच्या संचारावर आणि राहणीवरच मर्यादा आल्या आहेत. राजसमंद जिल्ह्यातल्या कुंभलगडसारख्या राष्ट्रीय उद्यानात पशुपालकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांचे शतकांपासूनचे भटकंतीचे मार्गच कमी झाले आहेत.
संसाधनं आणि जमिनींच्या वापरावर मर्यादा आणणाऱ्या नव्या कायद्यांमुळे काही राइकांनी पुष्करच्या उत्सवात उंटिणींची विक्री करायला सुरुवात केली आहे. २००० सालापूर्वी त्यांनी हे कधीही केलेलं नाही – त्याआधी केवळ उंटच विकले जायचे. उंटिणीची विक्री ही राइकांनी हार पत्करल्याची अखेरची निशाणी आहेः कारण त्यांच्याशिवाय त्यांचे कळप वाढण्याची कोणतीही शक्यता नाही.
याला प्रतिक्रिया म्हणून राइकांनी सरकारला विनंती केली होती की ही प्रजात टिकवून ठेवायची असेल तर उंटिणींच्या कत्तलीवर बंदी आणली जावी. त्या ऐवजी मार्च २०१५ मध्ये सरकारने सरसकट सर्वच उंटांच्या – नर आणि मादी – कत्तलीवर बंदी घातली. राइकांसाठी नियमित उत्पन्नाचा मार्गच खुंटला.
“बहुतेक वेळा या सरसकट बंदीमध्ये अशा समुदायांच्या जगण्याचं वास्तव, त्यातले बारकावेच हरवून बसतात,” सादरीतल्या लोकहित पशुपालक संस्थान या सामाजिक संस्थेचे मुख्य कार्यवाह, हनवंत सिंग राठोड म्हणतात. “सरकारला साधं राइकांचं म्हणणंही ऐकून घ्यायचं नाहीये. खरं तर त्यांच्या परिसंस्थेतलं नाजूक संतुलन त्यांच्याइतकं दुसऱ्या कुणालाच अवगत नाहीये. त्यांचं ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पुढे जातं आणि जे अतिशय मोलाचं आहे. त्यांना त्यांची जमीन आणि त्यांच्या प्राण्यांची काळजी कशी घ्यायची याची जाण आहे.”
तुम्ही हे वाचत असताना तिथे वन विभाग राइकांना अधिकाधिक कुरणांमधून हाकलून लावतोय. “जास्त दांडगे समुदाय राइकांचे चराईचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करतायत,” राठोड म्हणतात. “त्यांना असं वाटतं की उंटांमुळे त्यांची गायीगुरं बिचकतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुरणांपाशी पहारा द्यायची वन अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. हे असंच चालू राहिलं तर उंट उपाशी मरून जातील.”
“राजस्थानातल्या वरच्या जातीच्या समुदायांनी राइकांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे, ज्यामुळे ते वाळीत टाकले जातील. आम्ही हे थांबवण्यासाठी राजकीय प्रतिनिधींनी यात लक्ष घालावं यासाठी प्रयत्नशील आहोत. हे असंच होत राहिलं तर राइका नामशेष होतील. आणि पुढच्या पाच वर्षांत राजस्थानात बघायलाही उंट राहणार नाहीत.”
राइका समुदायाची त्यांच्या प्राण्यांशी असणारी वीण इतकी घट्ट आहे की प्राण्यांच्या चराईला धक्का बसला तर तो त्यांच्या राहणीला, जगण्याच्या रितीलाच आव्हान उभं करतो. “हे टिकवण्यासाठी आम्ही आमच्याने होईल ते सगळं काही करू,” जोगारामजी म्हणतात, “पण हे हक्क मिळण्यास आम्ही ‘पात्र’ आहोत असंच जर कुणाला वाटत नसेल तर मग आम्ही लढतोय तरी कशासाठी?”
राइका समुदाय, लोकहित पशुपालक संस्थान आणि सहाय्यक छायाचित्रकार हर्ष वर्धन यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि सहयोगाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
अनुवादः मेधा काळे