“ए, तिकडे काय करतीयेस?” त्यांनी विचारलं.
नजरेच प्रश्नचिन्ह आणि आवाज एकदम कडक.
आणि क्षणात माझ्या लक्षात आलं की
त्या नदीतीरावर त्यांना फारसं कुणी भेटत नसणार.
अनिरुद्ध सिंग पातार यांनी नदीच्या
दिशेने त्या किनाऱ्यावर उडी घेतली खरी. पण अचानक ते थांबले आणि वळून मला म्हणालेः “तिथे
मढी जाळतात. कालच कुणी तरी गेलंय. तिथे नको थांबायला. ये माझ्या मागे!”
बरोबरच होतं म्हणा. आणि गेलेल्या
माणसाने कष्टाने मिळवलेली शांती आपण कशाला भंग करायची, मीही विचार केला.
दोन मीटर उंचीच्या त्या नदीतीरावरून
नदीच्या दिशेने मी जायला लागले. माझं सगळं लक्ष त्यांच्यावर होतं. पश्चिम
बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात कांग्साबाती नदीत गुडघाभर पाण्यात ते अगदी चपळाईने
चाललेले होते. त्यांच्या गतीने जाता जाता माझी मात्र दमछाक होत होती.
साठीला टेकलेल्या त्यांच्या वयाच्या
मानाने ते अगदी चपळ होते आणि मी थक्क होऊन त्यांच्या हालचाली पाहत होते. मग मात्र
अगदी न राहवून मी त्यांना विचारलं, “काका, नदीत काय करताय?”
कंबरेला ओचा करून बांधलेलं पांढरं कापड सैलावून त्यातली एक कोळंबी हळूच बाहेर
काढत ते अगदी लहान मुलाच्या उत्साहाने मला सांगतात, “
चिंगरी
पाहिलीस? हे
आहे [आमच्या कुटुंबाचं] आजचं जेवण.
शुक्नो लोंका
(सुकी मिरची) आणि
रोसून
(लसूण)
घालून ही कोळंबी परतायची. गरम भाताबरोबर एकदम भारी लागते.” खरंच भारीच लागत असणार.
आता मासे आणि कोळंबी धरणारा तर
दिसतोय, पण माश्याची जाळी? नाहीच. “मी कधीच जाळी वापरलेली नाही,” ते म्हणतात. “मी
हाताने मासे धरतो. कुठे लपलेले असतात मला बरोबर माहित असतं.” नदीच्या दिशेने बोट
दाखवत ते पुढे सांगतात. “त्या दगडांच्या कडा दिसतात ना आणि तळाच्या पाण वनस्पती
आणि शेवाळ? त्यातच चिंगरी राहते.”
नदीच्या तळाकडे नजर टाकली तर
पाणवनस्पती आणि शेवाळाच्या खाली नदीतली कोळंबी दिसत होती. काका त्याबद्दलच बोलत
होते.
परत एकदा जेवणाचा विषय निघाला आणि मग
भात कुठून येतो, त्याचा पण. “आमची थोडी जमीन आहे, त्यात जर घाम गाळला तर कसं तरी
करून वर्षभरासाठी घरची
खोराकी
निघते. (घरी खाण्यापुरता भात होतो).”
पुरुलियाच्या पुंचा तालुक्यातल्या
कैरा गावी राहणारं हे कुटुंब भूमिज या पश्चिम बंगालमधल्या आदिवासी समाजाचं आहे. २,२४९
लोकसंख्या असलेल्या (जनगणना, २०११) या गावातले निम्म्याहून अधिक लोक आदिवासी असून
पोटासाठी ते नदीवर अवलंबून आहेत.
काका मासे धरतात पण विकत मात्र नाहीत,
फक्त घरी खाण्यासाठी म्हणून हा खटाटोप असतो. ते म्हणतात की मासे धरणं हे काही काम
नाहीये. त्यांना मनापासून आवडतं हे. नंतर ते बोलतात तेव्हा मात्र त्यांच्या आवाजात
काळोख दाटून येतो. “पोटापाण्यासाठी मी दूरदेशी जातो.” कामाच्या शोधात ते उत्तर
प्रदेश आणि अगदी महाराष्ट्रातही गेले आहेत. बहुतेक वेळा बांधकाम मजूर म्हणून, नाही
तर मी इतर काही कामांवर मजुरी करायला.
२०२० साली ते कोविड-१९ च्या टाळेबंदी
दरम्यान नागपूरमध्ये अडकून पडले होते. “एका बांधकामावर मजुरी करायला मी एका
ठिकादाराबरोबर (ठेकेदाराबरोबर) तिथे गेलो होतो. त्या काळात फार हाल झाले आमचे,” ते
म्हणतात. “एक वर्षापूर्वी मी परत आलो. आता माझं वय झालंय त्यामुळे परत कामाला
बाहेर जायचं नाही असं मी ठरवून टाकलंय.”
पुरुलियातून गडी माणसं रोजगारासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ आणि इतर
राज्यांमध्ये स्थलांतर करतात. आणि राज्यातल्या राज्यातही भटकंती सुरू असते, कैराचे
रहिवासी, ४० वर्षीय अमल महातो सांगतात. शेतीसाठी कर्जं काढलेली असतात ती
फेडण्यासाठी हे करावं लागतं असं महातोंचं म्हणणं आहे. ते शिक्षक आहेत आणि पूर्वी
एका स्थानिक वर्तमानपत्रासाठी वार्ताहर म्हणून काम करत होते. त्यांच्या
अनुपस्थितीत घरच्या स्त्रियाच शेती बघतात आणि घरच्यापुरतं अन्नधान्य पिकवतात. “थोडीच
जमीन असलेल्या आदिवासींचं हे दुष्टचक्र आहे. महाजन [सावकार] लोकांकडून कर्ज
घेतलेलं असतं,” अमल सांगतात.
शेतीत खतं आणि बी-बियाणं खरेदी करण्यासाठी काकांनी कर्ज काढलं होतं. नागपूरला ते बांधकामावर कामाला गेले. तिथे सिमेंट कालवायचं, डोक्यावरून जड माल घेऊन जायचा अशा कामासाठी त्यांना दिवसाला ३०० रुपये मजुरी मिळायची. कसंय, कैरामध्ये इतकी मजुरी मिळत नाही. “काम नसलं की नुसतं बसून रहावं लागतं,” ते म्हणतात. पेरणीच्या आणि काढणीच्या काळात त्यांना शेतात थोडं फार काम मिळतं, पण मजुरी दिवसाला केवळ २०० रुपये. “कधी कधी मला [कैरामध्ये] काम मिळतं. लोक सरकारकडे नजराणा भरतात आणि ट्रका घेऊन नदीतली वाळू काढायला येतात, तेव्हा. तेव्हा वाळू काढून ट्रकमध्ये भरण्याचे दिवसाला ३०० रुपये मिळतात.”
नजराणा कसला तर कांग्साबाती नदीतीरावरची
वाळू काढण्यासाठी परवाना काढावा लागतो, तो. प्रचंड प्रमाणात वाळू उपसली जातीये आणि
अनेकदा शाश्वत वाळू उपशासंबंधीच्या
मार्गदर्शक सूचनांचं
उल्लंघन होताना दिसतं.
राजकीय वरदहस्त लाभलेल्या लोकांच्या हातमिळवणीमुळे नदीतीरावरती
वाळूचोरी
देखील
प्रचंड वाढली आहे, गावकरी सांगतात. पण या उद्योगामध्ये अनिरुद्ध सिंग पातार
यांच्यासारख्यांना थोडा फार रोजगार मिळतो इतकंच. हे काम वैध आहे का अवैध याची
त्यांना कल्पनाही नसावी.
पण, त्यांना या “रॉयल्टी उद्योगाचा”
पर्यावरणावर काय परिणाम होतोय याची मात्र जाणीव आहे. या सगळ्यामुळे नदीवर फार
परिणाम होतोय “बिशाल खोटी नदीर” ते म्हणतात. “इतक्या वर्षात ही वाळू तयार झाली, तीच
उपसून घेऊन जातायत.”
“पूर्वी नदीत चिक्कार मासे असायचे,”
काका सांगतात. बान (नदीतली वाम), शोल (मरळ) आणि
मांगूर मिळायचा. “तेव्हा जेले (मच्छीमार) मासे धरायला जाळ्यांचा वापर करायचे. आता
ते इथे येतच नाहीत. ते नदीच्या वरच्या आणि खालच्या भागात मासे धरतात.” नदीच्या
किनाऱ्यावर होणाऱ्या “पिकनिक पार्ट्यांचा” त्यांना फार राग येतो. कारण प्लास्टिक,
रिकाम्या बाटल्या आणि थर्मोकोलच्या ताटल्यांमुळे नदीकाठी घाण वाढत चालली आहे.
कोळंबीच्या शोधात ते नदीतून आरामात
फिरत होते. “आम्ही लहान होतो ना, तेव्हा या नदीत भरपूर चिंगरी सापडायची,” काका
म्हणतात. “चिंगरी कशी शोधायची आणि नुसत्या हातांनी कशी पकडायची ते सगळं मला माझ्या
वडलांनी शिकवलंय.
बाबा आमार बिराट माछोवाल छिलो
[माझे बाबा फार भारी मच्छीमार
होते].”
एकेक करत चिंगरी पकडत चाललेले अनिरुद्ध सिंग पातार म्हणतात, “कोळंबी साफ करायला फार वेळ लागतो. पण चव कसली भारी असते.” पण आता तेव्हाची नदीही राहिली नाही आणि तेव्हाची चिंगरीही, ते म्हणतात. “ती तिथली शेतं दिसतात का? तिथे भात आणि मोहरी पिकवतात. कसली कसली खतं आणि औषधं मारतात आणि त्याचे डबे इथे नदीच्या पाण्यात धुतात. तसल्या पाण्यात मासळी मरून जाते. आजकाल चिंगरी फार सहज मिळत नाही...”
कैरापासून ५-६ किलोमीटरवर असलेल्या
पिर्रा गावातले शुभंकर महातो नदीत पोहायला आले होते. अनिरुद्ध काकांच्या म्हणण्याला
ते दुजोरा देतात. “पूर्वी या नदीवर आमचं पोट भागत होतं. नदीतीरावर राहणाऱ्या
भूमीहीन, छोट्या किंवा सीमांत शेती करणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य विकत
घेणं परवडण्यासारखं नव्हतं. तेव्हा या नदीनेच आम्हाला आवश्यक ती प्रथिनं आणि इतर
पोषण पुरवलं आहे.” पुरुलिया हा या राज्यातला सगळ्यात गरीब जिल्हा आहे याचं ते आम्हाला
स्मरण करून देतात.
२०२० साली झालेल्या एका
अभ्यासानुसार
पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया जिल्ह्यात सर्वात जास्त गरिबी असल्याचं निदर्शनास आलं आहे.
गरिबी रेषेखाली राहणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण या जिल्ह्यामध्ये २६ टक्के आहे. “इथल्या
घरात खाणं नेहमीच नदी आणि जंगलातून आलंय. पण आता हे स्रोत आटत चालले आहेत,” शुभंकर
सांगतात. ते शिक्षक आहेत.
काका कोळंबीच्या शोधातच होते. मग मी
त्यांना त्यांच्या घरच्यांबद्दल विचारलं. त्यांच्यासाठीच तर हे कवचधारी मासे
पकडायची धडपड सुरू होती. “माझी बायको घरची सगळी कामं पाहते आणि शेतीतली कामं करते.
माझा मुलगासुद्धा शेतात काम करतो,” ते म्हणतात. आपल्या मुलांबद्दल बोलताना त्यांचा
चेहरा एकदम खुलला. “माझ्या तिघी पोरी लग्न होऊन [आपापल्या घरी] गेल्या आहेत. आता आमच्यासोबत
एकुलता एक मुलगा आहे. आणि मी काही त्याला [कामासाठी] दूरदेशी पाठवणार नाहीये. आणि
मी देखील जायचं नाही असं ठरवलंय.”
अनिरुद्ध सिंग पातार यांचा निरोप घेतला आणि ते आपल्या घरच्यांसोबत छान जेवण
करतायत असं चित्र माझ्या मनात उभं राहिलं. तेव्हाच बायबलमधलं एक वचन मनात आलं, “And wherever the river
goes, every living creature that swarms will live, and there will be very many
fish (जिथपर्यंत नदी वाहील, तिथपर्यंत पोहणारे सगळे जीव
जगतील आणि तिथे पुष्कळ मासे असतील).”
अनुवादः मेधा काळे