“तुम्ही फार लवकर आलाय. रविवारी ४ वाजायच्या आत ते इथे येत नाहीत. आता यायचं कारण म्हणजे मी पेटी वाजवायला शिकतीये,” ब्यूटी सांगते.
‘इथे’ म्हणजे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातल्या मुसाहरी तालुक्यातल्या चतुर्भुज स्थान या कुंटणखान्यात. ‘आता’ म्हणजे सकाळी १० वाजता जेव्हा तिची आणि माझी भेट झाली. ‘ते’ म्हणजे तिच्याकडे संध्याकाळी येणारे गिऱ्हाईक. ब्यूटी – कामावरचं तिचं नाव – धंदा करते, १९ वर्षांची आहे. गेल्या पाच वर्षांपासून या धंद्यात असलेली ब्यूटी ३ महिन्यांची गरोदर आहे.
धंदा सुरूच आहे. ती सध्या पेटी शिकतीये कारण “अम्मी म्हणते की संगीताचा माझ्या बाळावर चांगला परिणाम होईल.”
बोलता बोलता पेटीच्या बटनांवरून तिची बोटं फिरतायत. ती म्हणते, “हे माझं दुसरं बाळ आहे. माझा थोरला मुलगा दोन वर्षांचा आहे.”
आम्ही ज्या खोलीत बसलोय – ही तिची कामाची खोली आहे – तिथे जमिनीवर एक भली मोठी गादी घातलेली आहे. तिच्या मागे भिंतीवर ६ फूट बाय ४ फूट आकाराचा मोठा आरसा लावलाय. ही खोली अंदाजे १५ फूट बाय १५ फूट आकाराची असेल. गादीवर उश्या आणि तक्के आहेत. मुली मुजरा सादर करतात तेव्हा गिऱ्हाइकांना आरामात रेलून बसता यावं यासाठी ही सगळी सोय केलेली आहे. मुजरा या नृत्यप्रकाराप्रमाणे चतुर्भुज स्थान देखील मुघलांच्या काळापासून इथे आहे असं म्हटलं जातं. इथे काम करणाऱ्या सगळ्या मुली आणि स्त्रियांना मुजरा यायलाच लागतो. ब्यूटीला तर येतोच.
इथे यायचं तर मुझफ्फरपूरच्या मुख्य बाजारातून यायला लागतं. दुकानदार आणि रिक्षावाले कसं यायचं ते सांगतात. कुंटणखाना कुठे आहे ते सगळ्यांनाच माहित असतं. चतुर्भुज स्थान परिसरात रस्त्याच्या दुतर्फा एकसारखी दुमजली-तीन मजली घरं नजरेस पडतात. विविध वयाच्या स्त्रिया घरांच्या बाहेर उभ्या आहेत. काही जणी खुर्च्यांवर बसल्या आहेत – सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती गिऱ्हाइकांची. खूप घट्ट आणि भडक कपडे, तितकाच भडक मेक-अप, चेहऱ्यावर धिटाई असलेल्या प्रत्येकीची येणाऱ्या-जाणाऱ्यांवर बारीक नजर आहे.
पण, ब्यूटी सांगते की इथे दिसतायत त्या कुंटणखान्यातल्या एकूण स्त्रियांच्या ५ टक्के देखील नाहीयेत. “कसंय, बाकी सगळ्यांसारखं आम्ही सुद्धा आठवड्यातून एक दिवस सुटी घेतो. फरक इतकाच की आम्हाला फक्त अर्धा दिवस सुटी मिळते. दुपारी ४-५ नंतर आम्ही कामाला येतो आणि रात्री ९ पर्यंत इथे असतो. इतर दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ असा कामाचा दिवस असतो.”
*****
अधिकृत आकडे उपलब्ध नसले तरी चतुर्भुज स्थान परिसरात सुमारे २,५०० बाया धंदा करत असाव्यात. हा कुंटणखाना सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात पसरलेला आहे. मी ब्यूटीशी आणि इथल्या इतर काही जणींशी बोलले. त्या सांगतात की रस्त्याच्या या भागात धंदा करणाऱ्या किमान २०० जणी राहतात. याच भागात काम करणाऱ्या सुमारे ५० जणी बाहेरून इथे येतात. ब्यूटी त्या ‘बाहेरच्यां’मधली एक आहे. मुझफ्फरपूर शहराच्या वेगवेगळ्या भागात त्या राहतात.
चतुर्भुज स्थानमधली बहुतेक घरं गेल्या तीन पिढ्यांपासून धंदा करणाऱ्या स्त्रियांच्या मालकीची आहेत. अमीराची आई, मावशी आणि आजी याच धंद्यात होती. “इथे हे असंच चालतं. बाकीच्या काही जणी वयस्क स्त्रियांकडून त्यांचं घर भाड्याने घेतात आणि फक्त धंद्यासाठी इथे येतात. आमचं तसं नाही,” ३१ वर्षांची अमीरा सांगते. “आमच्यासाठी हे आमचं घर आहे. बाहेरनं ज्या येतात ना त्या झोपडपट्टीतून येतात, रिक्षा ओढणाऱ्यांच्या किंवा घरकाम करणाऱ्यांच्या कुटुंबातल्या असतात किंवा काहींना तर इथे आणलं गेलंय [धंद्यासाठी विकत किंवा पळवून आणलंय],” ती सांगते.
अपहरण, गरिबी किंवा याच धंद्यात असलेल्या कुटुंबात जन्म ही स्त्रिया वेश्या व्यवसायात येण्याची कारणं असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका निबंधात म्हटलं आहे. पुरुषांकडून स्त्रियांचं होणारं सामाजिक आणि आर्थिक दमन हे यामागचं सर्वात मोठं कारण असल्याचंही यात म्हटलं आहे.
ब्यूटी काय काम करते ते तिच्या पालकांना माहित आहे का?
“म्हणजे काय, सगळ्यांना माहितीये. हे बाळ पोटात वाढतंय ते केवळ माझ्या आईच्या इच्छेखातर,” ती म्हणते. “गर्भ पाडायला मी तिची परवानगी मागितली होती. बापाशिवाय एक मूल वाढवणं पुरेसं आहे. पण ती म्हणाली की आपला धर्मात हे पाप [गर्भपात] करायला परवानगी नाही.”
इथे ब्यूटीहूनही लहान असणाऱ्या अनेक मुलींना दिवस गेलेत किंवा त्यांना मूल झालेलं आहे.
किशोरवयातील गरोदरपणाचं प्रमाण कमी करणे हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येयांमधील लैंगिक व प्रजनन आरोग्याशी संबंधित उद्दिष्टांपैकी एक आहे असं संशोधक सांगतात . विशेषतः ३ आणि ५ , ‘उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य’ व ‘लिंगभाव समानता’ या ध्येयांमध्ये त्याचा समावेश आहे. २०२५ पर्यंत, आतापासून पुढच्या ४० महिन्यांत ही ध्येयं साध्य होतील अशी आशा आहे. पण प्रत्यक्षात मात्र हे साध्य करणं फार खडतर आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाने (यूएनएड्स) प्रकाशित केलेल्या २०१६ सालातील ' की पॉप्युलेशन अटलास 'मध्ये म्हटलं आहे की भारतात सुमारे ६,५७,८०० स्त्रिया वेश्या व्यवसायात आहेत. मात्र, ऑगस्ट २०२० मध्ये नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्सने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला सांगितलं आहे की अगदी ठोकताळा काढला तरी देशामध्ये धंदा करणाऱ्या स्त्रियांची संख्या जवळपास १२ लाख इतकी आहे. यातल्या सुमारे ६ लाख ८० हजार स्त्रिया (यूएनएड्सने वापरलेला आकडा) नोंदणीकृत आहेत आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून त्यांना काही सेवा मिळतात. १९९७ साली स्थापन झालेलं हे नॅशनल नेटवर्क देशभरातल्या धंदा करणाऱ्या व्यक्तींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संघटनांचं जाळं आहे आणि धंदा करणाऱ्या स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेन्डर व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करत आहे.
आम्ही गप्पा मारत होतो तेवढ्यात ब्यूटीच्या वयाचाच एक मुलगा आत आला, आम्ही काय गप्पा मारतोय ते ऐकत बसला आणि मग आमच्याशी बोलायला लागला. “माझं नाव राहुल. मी फार लहानपणापासून इथे काम करतोय. ब्यूटी आणि इतर काही मुलींसाठी मी गिऱ्हाईक आणतो,” तो म्हणतो. मग तो एकदम गप्प होतो. त्याच्याबद्दल फारशी काही माहिती देत नाही आणि मग मी आणि ब्यूटी परत गप्पा मारायला लागतो.
“आमच्या घरी मी, माझा मुलगा, आई-बाबा आणि दोन मोठ्या भाऊ असे सगळे राहतो. मी पाचवीपर्यंत शाळेत गेले, त्यानंतर नाही. मला शाळा कधी आवडलीच नाही. शहरात माझ्या वडलांचा डिब्बा [सिगारेट, काडेपेट्या, चहा, पानाची टपरी] आहे. तितकंच. माझं लग्न झालं नाहीये,” ब्यूटी सांगते.
“माझं पहिलं मूल आहे ना त्याच्या बापावर माझं प्रेम आहे. त्याचं पण माझ्यावर प्रेम आहे. किमान तो तसं म्हणतो तरी,” ब्यूटी हसते. “तो माझ्या ‘पर्मनंट’ गिऱ्हाइकांपैकी एक आहे.” इथल्या अनेक जणी नियमितपणे, कायम त्यांच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाइकांसाठी ‘पर्मनंट’ असा शब्द वापरतात. “माझं पहिलं मूल काही ठरवून झालेलं नाहीये. आणि अर्थातच हे सुद्धा. पण दोन्ही वेळा त्याने गळ घातली म्हणून मी ते ठेवलंय. मुलाचा सगळा खर्च तो करेल असं तो म्हणाला आणि त्याने त्याचा शब्द पाळलाय. आता सुद्धा दवाखान्याचा सगळा खर्च तोच करतोय,” ती सांगते. तिच्या बोलण्यात समाधानाचा सूर ऐकू येतो.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-४ च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये १५-१९ वयोगटातल्या ८ टक्के मुली गरोदर आहेत किंवा त्यांना मूल झालं आहे. यातल्या ५ टक्के मुलींना किमान एक मूल झालं आहे आणि ३ टक्के मुलींना पहिल्यांदा दिवस गेले आहेत.
इथल्या किती तरी जणी पर्मनंट गिऱ्हाइकाबरोबर गर्भनिरोधक वापरायचं टाळतात. दिवस गेले तर त्या गर्भपात करतात. किंवा ब्यूटीसारखं मूल होऊ देतात. संबंध जुळलेल्या पुरुषांना दुखवायचं नाही म्हणून, त्यांच्या बरोबरचं नातं जास्त काळ टिकावं म्हणून हा सगळा खटाटोप.
“इथे येणाऱ्या बहुतेक गिऱ्हाइकांकडे निरोध नसतो,” राहुल सांगतो. “मग आम्हीच [दलाल] पळत जाऊन दुकानातून घेऊन येतो. पण कधी कधी पर्मनंट गिऱ्हाइकांबरोबर या मुली काही न वापरताच संबंध ठेवतात. तेव्हा मात्र आम्ही मध्ये पडत नाही.”
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार देशभरात पुरुषांमध्ये गर्भनिरोधनाचा वापर अत्यल्प आहे. २०१५-१६ साली पुरुष नसबंदी आणि निरोधचा वापर असं एकत्रित प्रमाण सुमारे ६ टक्क्यांच्या आसपास होतं आणि ९० च्या दशकापासून ते तसंच राहिलं आहे. २०१५-१६ साली गर्भनिरोधक वापरत असल्याचं सांगणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण बिहारमध्ये २३ टक्के ते आंध्र प्रदेशात ७० टक्क्यांपर्यंत होतं.
“आम्ही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहोत,” ब्यूटी तिच्या जोडीदाराविषयी सांगते. “पण नुकतंच घरच्यांच्या दबावामुळे त्याने लग्न केलंय. माझ्या परवानगीनेच केलंय. मी हो म्हटलं. करणार तरी काय? मी काही लग्नाजोगी नाही आणि त्याने मला कधी लग्न करेन असं म्हटलंही नव्हतं. माझ्या मुलांना चांगलं आयुष्य जगता येणार असेल तर ते माझ्यासाठी पुरेसं आहे.”
“मी दर तीन महिन्यांनी तपासण्या करून येते. सरकारी दवाखान्यात जायचं मी टाळते, खाजगी क्लिनिकमध्ये जाते. दुसऱ्यांदा दिवस गेलेत असं लक्षात आल्यावर गरजेच्या सगळ्या तपासण्या (एचआयव्हीसह) मी करून आले. सगळं ठीकठाक आहे. सरकारी दवाखान्यात ते आमच्याशी वेगळं वागतात. अवमानकारक बोलतात आणि आम्हाला भेदभावाची वागणूक देतात,” ब्यूटी सांगते.
*****
दारात आलेल्या पुरुषाशी बोलायला राहुल जातो. “या महिन्याचं भाडं भरायला आणखी एका आठवड्याची मुदत द्या असं घरमालकाला विनवायला लागलं. भाडं मागायलाच तो आला होता,” परत येत राहुल सांगतो. “या जागेचं भाडं महिन्याला १५,००० रुपये आहे.” राहुल सांगतो की चतुर्भुज स्थानमधली बहुतेक घरं धंदा करणाऱ्या वयस्क स्त्रियांच्या, कधी कधी अगदी वृद्ध स्त्रियांच्याही मालकीची आहेत.
यातल्या बऱ्याच जणी आता स्वतः धंदा करत नाहीत. त्यांनी त्यांची घरं दलालांना किंवा धंदा करणाऱ्या तरुण मुलींना भाड्याने दिली आहेत. कधी कधी तर एखाद्या गटाला सुद्धा. तळमजला भाड्याने देऊन त्या पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर मुक्काम करतात. “त्यांच्यातल्या काही जणींनी आपल्याच पुढच्या पिढीकडे हा धंदा सोपवला आहे – मुली, भाच्या किंवा नाती हेच काम करतायत. त्या स्वतः अजून याच घरांमध्ये राहतायत,” राहुल सांगतो.
एनएनएसडब्ल्यू म्हणतं की धंदा करणाऱ्यांपैकी बरेच जण (स्त्री, पुरुष आणि ट्रान्स) घरूनच धंदा करतातय मोबाइल फोनद्वारे स्वतःच किंवा दलालाच्या मदतीने गिऱ्हाइकं करतात. चतुर्भुज स्थानमधे अशाच प्रकारे बरंचसं काम घरूनच सुरू आहे.
इथली सगळी घरं दिसायला एकसारखी आहेत. मुख्य दाराला लोखंडी गज आहेत आणि लाकडी पाट्या. पाट्यांवर घरमालक किंवा त्या घरातून काम करणाऱ्या प्रमुख स्त्रीचं नाव आहे. नावांपुढे त्यांचं पद आहे – उदा. नर्तकी एवं गायिका. आणि खाली त्यांच्या सादरीकरणाच्या वेळा दिलेल्या आहेत. सगळ्यात जास्त आढळणारी वेळ म्हणजे सकाळी ९ ते रात्री ९. काहीवर ‘सकाळी ११ ते रात्री ११’ असंही लिहिलेलं आढळेल आणि काहींवर ‘रात्री ११ पर्यंत’.
अगदी एकसारख्या दिसणाऱ्या घरांमध्ये प्रत्येक मजल्यावर २-३ खोल्या आहेत. ब्यूटीच्या घरी प्रत्येक खोलीत जमिनीवर एक मोठी गादी टाकलेली आहे. खोलीतली जवळपास सगळी जागाच त्या गादीने व्यापून टाकली आहे. आणि त्या गादीच्या मागच्या भिंतीवर एक मोठा आरसा लावलेला आहे. उरलेली छोटी जागा मुजऱ्यासाठी. ही खोली खास नृत्य आणि गायन सादर करणाऱ्यांसाठी. इथल्या तरुण मुली मागच्या पिढीतल्या स्त्रियांकडून मुजरा शिकतात, कधी कधी केवळ निरीक्षण करून तर कधी त्यांच्याकडून धडे घेऊन. आत एक छोटी १० बाय १२ फुटाची खोली आहे. ती आहे निजायची खोली. आणि एक छोटंसं स्वयंपाकघर.
“कधी कधी तर आमच्याकडे काही बडे बुजुर्ग लोकही आलेत जे एका मुजऱ्यासाठी ८०,००० रुपयांपर्यंत पैसे देतात,” राहुल सांगतो. “हा पैसा किंवा जो काही पैसा येईल तो तीन उस्तादांमध्ये – तबलजी, सारंगीवाला आणि पेटीवाला – नर्तकी आणि दलाल यांच्यामध्ये वाटून घेतला जातो.” पण एवढा मोठा नजराणा जो तेव्हाही विरळाच होता, आता तर केवळ स्मृतीपुरता राहिला आहे.
सध्याच्या कठीण काळात ब्यूटी पुरेशी कमाई करू शकतीये का? ‘दिवस चांगला असेल तर हो, पण खरं तर नाहीच. गेलं वर्ष आमच्यासाठी भयानक होतं. नेमाने येणारं गिऱ्हाईक देखील आता यायचं टाळतंय. आणि जे येतात ते देखील पैसे देताना हात आखडता घेतायत’
सध्याच्या कठीण काळात ब्यूटी पुरेशी कमाई करू शकतीये का?
“दिवस चांगला असेल तर हो, पण खरं तर नाहीच. हे गेलं वर्ष आमच्यासाठी फार भयानक होतं. या काळात आमच्याकडे अगदी नेमाने येणारं गिऱ्हाईक देखील आता यायचं टाळतंय. आणि जे आले ते देखील आता पैसे देताना हात आखडता घेतायत. पण काय करणार, जे मिळतंय ते घेण्यावाचून आमच्याकडे काही पर्यायच नाहीये. त्यांच्यातल्या कुणाला कोविडसुद्धा झालेला असू शकतो. पण ती जोखीम आम्हाला घ्यावीच लागते. एक समजून घ्याः या कुंटणखान्याच्या गर्दीत एकाला कुणाला जरी विषाणूची लागण झाली, तरी सगळ्यांच्याच जिवाला धोका आहे.”
भारतात करोनाची दुसरी लाट येऊन आदळली त्या आधी महिन्याला २५-३०,००० रुपयांची कमाई होत असल्याचं ब्यूटी सांगते. दुसऱ्या लाटेनंतर आलेल्या टाळेबंदीमुळे तिचं आणि तिच्यासारख्या इतर धंदा करणाऱ्यांचं जिणं मुश्कील होऊन बसलंय. विषाणूच्या भीतीचं मळभ तर आहेच.
*****
गेल्या मार्च महिन्यात केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली मात्र चतुर्भुज स्थानमधल्या स्त्रिया त्याचा लाभ घेऊ शकत नाहीयेत. या योजनेद्वारे २० कोटी गरीब महिलांना दर महिना ५०० रुपये असा निधी तीन महिन्यांसाठी जाहीर करण्यात आला होता. पण त्यासाठी त्यांच्याकडे जन धन खातं असणं बंधनकारक होतं. या कुंटणखान्यातल्या अनेकींशी मी बोलले. पण यातल्या कुणाकडेच जन धन खातं नाही. तसंही, ब्यूटी विचारतेः “मॅडम, ५०० रुपये घेऊन आम्ही काय करणार होतो?”
एनएनएसडब्ल्यू नमूद करतं की धंदा करणाऱ्यांना कुठलंही ओळखपत्र – मतदार, आधार, रेशन कार्ड किंवा जातीचा दाखला – मिळवण्यासाठी नेहमीच अडथळ्यांची शर्यत पार करायला लागते. अनेक जणी एकल आहेत आणि त्यांना मुलं आहेत. त्यांना रहिवासाचा कुठलाही पुरावा सादर करणं शक्य नसतं. किंवा जात दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रं देखील नसतात. राज्य सरकारने जाहीर केलेली रेशनची मदत सुद्धा त्यांना बहुतेक वेळा नाकारली जाते.
“जर देशाच्या राजधानीत, दिल्लीत सुद्धा लोकांना सरकार मदत करत नसेल तर खेडोपाड्यात जिथे कसलीही योजना, धोरणं एरवीदेखील उशीराच पोचतात, किंवा खरं तर पोचतच नाहीत तिथे काय हालत असेल तुम्ही कल्पना करू शकता,” नवी दिल्ली स्थित ऑल इंडिया नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स या संघटनेच्या अध्यक्ष कुसुम म्हणतात. “या टाळेबंदीत केवळ तगून राहण्यासाठी धंदा करणाऱ्या अनेक जणी एका मागोमाग एक कर्ज घेतायत.”
ब्यूटीचा पेटीचा सराव संपत आलाय. “तरुण गिऱ्हाईक असेल ना तर त्यांना मुजरा वगैरे पाहायला आवडत नाही. त्यांना आल्या आल्या थेट बेडरुममध्ये जायचं असतं. पण आम्ही त्यांना सांगतो की अगदी थोडा वेळ का होईना नाच [३० ते ६० मिनिटं] पहावाच लागेल. नाही तर आम्ही आमच्या कलावंतांचे, घरभाड्याचे पैसे तरी कुठनं देणार? अशा मुलांकडून आम्ही किमान १,००० रुपये तरी घेतो.” शरीरसंबंधांसाठीचे पैसे वेगळे असतात, ती सांगते. “ते तासाप्रमाणे ठरतं. आणि गिऱ्हाइकानुसार त्यात फरक असतो.”
सकाळचे ११.४० झालेत. ब्यूटी पेटी बाजूला सारते आणि आपल्या पिशवीतून डबा काढते. तिने आलू पराठा आणलाय. “मला औषधं घ्यायचीयेत [मल्टिव्हिटॅमिन आणि फोलिक ॲसिड] त्यामुळे आता नाश्ता करायला पाहिजे,” ती म्हणते. “मी कामावर येणार असले की माझी आई माझ्यासाठी खाणं बनवते आणि सोबत डब्यात देते.”
“आज संध्याकाळी गिऱ्हाईक येईल असं वाटतंय,” तीन महिन्यांची गरोदर ब्यूटी सांगते. “रविवारच्या संध्याकाळी एखादं श्रीमंत गिऱ्हाईक मिळणं तसं कठीणच आहे म्हणा. स्पर्धा फार वाढलीये.”
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा.
जिग्यासा मिश्रा सार्वजनिक आरोग्य आणि नागरी स्वातंत्र्यावर वार्तांकन करते ज्यासाठी तिला ठाकूर फॅमिली फौंडेशनकडून स्वतंत्र आर्थिक सहाय्य मिळाले आहे. ठाकूर फॅमिली फौंडेशनचे या वार्तांकनातील मजकूर किंवा संपादनावर नियंत्रण नाही.