न्यू दिल्ली काल्का शताब्दी स्पेशलमधल्या माझ्या सीटवर मी बसलो आणि वेळेत गाडी पकडायचा सगळा ताण विरून गेला. झुकझुक करत गाडी फलाटावरून निघाली आणि गाडीच्या चाकाप्रमाणे माझ्याभोवतीच्या सगळ्या गोष्टी आणि माझ्या मनातले विचारही एका गतीत फिरू लागले. तिचं मात्र तसं नव्हतं. गाडीने वेग घेतला तशीच तिची चुळबुळही वाढायला लागली.
सुरुवातीला आपल्या आजोबांचे विरळत चाललेले केस विंचरून झाले. कुरुक्षेत्र आलं तोपर्यंत खिडकीबाहेर सूर्यनारायण लोपले होते. आता त्या चिमुकलीचा खेळ सुरू झाला खुर्चीच्या हाताशी. एकदा खाली, एकदा वर. सूर्य मावळला आणि त्याच्याबरोबर सोनेरी प्रकाशही लोपला. आता दाटून येत असलेला अंधारच आमच्या वाट्याला होता.
या अंधाराचा तिच्या उत्साहावर मात्र कणभरही परिणाम झाला नव्हता. गडद निळा-पांढरा चट्टेरी पट्टेरी झगा घालून ती आपल्या आईच्या मांडीवर उभी होती. आपल्या लेकीला सगळं नीट दिसावं यासाठी तिच्या आईने तिला खांद्यावर उभं केलं होतं. त्या मुलीने वरती पाहिलं आणि मी देखील तिची नजर कुठकुठे चाललीये त्याचा माग घेऊ लागलो. तिच्या डोक्यावर दिव्यांची दोन बटणं होती. तिकडे आमचं दोघांचंही लक्ष गेलं. आपल्या आईच्या मांडीवर उभं राहून हात थोडा उंचावून तिने एका हाताने बटणापर्यंत पोचायचा प्रयत्न केला. आधी एका, त्यानंतर दोन्ही... युरेका!
दिव्याच्या पिवळसर प्रकाशाने तिचा चेहरा उजळून निघाला. चेहराच नाही, तिच्या डोळ्यात लपलेली सूर्यकिरणं लकाकू लागली. मग तिने दुसरं बटण दाबलं. प्रकाशाचा आणखी एक झोत आला. तिच्या डोळ्यांतून, हास्यातून आणि पिवळ्या दिव्याभोवती धरलेल्या छोट्याशा मुठीतून सगळीकडून प्रकाश ओसंडून वाहू लागला.
माझी सहप्रवासी असलेली ती आणि तिचा उजळलेला चेहरा पाहताच मी निदा फझलींच्या काही ओळी गुणगुणू लागलो,
बच्चों के छोटे हाथों को चाँद सितारे
छूने दो
दो-चार किताबें पढ कर ये भी हम जैसे हो जाएंगे