आज २६ फेब्रुवारी, शैलाचा १८ वा वाढदिवस. तिच्या अंगात नवे कपडे आहेत, के.सात मोगरा माळलाय. तिच्या आईने तिची आवडती चिकन बिर्यानी के.लीये आणि तिने तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना छोटीशी पार्टीदेखील दिलीये.
शैला एका सुप्रसिद्ध नर्सिंग कॉलेज मध्ये शिकते, चेन्नईतील श्री शास्ता कॉलेज ऑफ नर्सिंग. या इंग्रजी माध्यमाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणं हे तर मोठं दिव्य होतंच. पण सर्वांनी तिला स्वीकारणं हे तर त्याहूनही जास्त अवघड होतं.
ज्या दिवशी इतर विद्यार्थ्यांना समजलं की तिचे वडील सेप्टिक टँक साफ करताना मरण पावलेत, त्यांचा पुढचा प्रश्न होता तिच्या जातीबद्दल.
“अचानक,” शैला म्हणते, “आमच्यामध्ये एक अदृश्य अशी भिंत असल्यासारखं वाटलं मला.”
२७ सप्टेंबर २०१७ रोजी कन्नन आणि त्याचे दोन साथीदार मरण पावले त्या दिवसापासून शैला आणि तिची आई या अदृश्य भिंतीला टक्कर देण्याचा प्रयत्न करतायत. तो आदि द्रविड मडिगा या अनुसूचित जातीचा एक गवंडी आणि हमाल होता. याच जातीच्या लोकांना हाताने मैला साफ करण्याची कामं दिली जातात. बोलावणं आलं की तो सेप्टिक टँक आणि गटारं साफ करायला जायचा.
“ही फार मोठी लढाई होती,” शैला सांगते. “मी आता इंग्रजी भाषा एकदम चांगली शिकणार आहे. माझ्या वडलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण तेच गेले तेव्हा हे स्वप्न पूर्ण करणं अवघड होतं. त्याऐवजी मी नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आमच्या वस्तीतल्या कुणीच हे शिक्षण घेतलेलं नाही. मी जर शिकून नर्स बनले तर ते माझ्या वडलांच्या स्मृतीसाठी असेल. माझा जातपातीवर बिलकुल विश्वास नाही आणि खरं तर जात किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव व्हायलाच नाही पाहिजे. मला अख्ख्या जगाला एकच गोष्ट सांगायचीये, माझे वडील जसे गेले तसं मरण कुणालाच येऊ नये.”
“हळू हळू मी माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणींशी एका समान पातळीवर येऊन बोलू-चालू शकले,” शैला पुढे सांगते. “आता तर त्यातल्या काही मला अभ्यासात देखील मदत करतात. मी तमिळ माध्यमातून शिकलीये, त्यामुळे माझं इंग्रजी जरा कच्चं आहे. सगळे मला सांगतात की इंग्रजीसाठी एखादी शिकवणी लाव म्हणून. पण आम्हाला नाही परवडणार, म्हणून मी माझी मीच शिकायचा प्रयत्न करतीये. नापास होणं हा पर्यायच माझ्यासाठी नाही.”
शैलाला १२ वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले याचा तिला अभिमान आहे. आपल्या वस्तीसाठी तिने हा आदर्शच घालून दिला आहे. माध्यमांनी देखील तिच्या यशाची दखल घेतली आणि त्यामुळे नर्सिंगच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळवायला तिला मदत झाली.
सगळे बारकावे बाहेर येत होते. तिची आई, चाळिशीची के. नागम्मा आश्चर्याने शैलाकडे पाहत होती कारण शैला मुळात अगदी लाजाळू होती. ती पहिल्यांदाच आपल्या मुलीला इतकं मोकळ्याने बोलताना पाहत होती.
मुलींचं भविष्य आनंदी व्हावं यासाठी जे काही शक्य आहे ते नागम्मा करत होती. तिची धाकटी मुलगी, १६ वर्षीय के. आनंदी, आता दहावीत आहे.
ज्या दिवशी नागम्माला तिच्या नवऱ्याच्या मृत्यूची बातमी कळाली तिला जबर धक्का बसला. तिच्या आई-वडलांनी तिची खूप काळजी घेतली. शैला तेव्हा आठ वर्षांची होती, आणि आनंदी फक्त सहा, तिने तर शाळाही पाहिली नव्हती तेव्हा.
“मी माझ्या नवऱ्याचा मृतदेह आंध्र प्रदेशातल्या प्रकासममधल्या आमच्या गावी पामुरूला कशी घेऊन गेले ते तर मला आठवतही नाहीये. किंवा त्याचे अंत्यसंस्कार कसे पार पडले तेही. माझ्या सासऱ्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे मला शॉक देण्यात आले, इतर उपचार करण्यात आले. तेव्हा कुठे मला काय चाललंय त्याचं भान आलं. माझा नवरा खरंच मरण पावलाय हे मान्य करायला मला दोन वर्षं लागली.”
या घटनेला आता १० वर्षं उलटलीयेत पण आजही तेव्हाच्या आठवणी सांगताना नागम्माला रडू कोसळतं. “माझ्या नातेवाइकांनी मला समजावलं की तुझ्या मुलींसाठी तुला जगावं लागेल, आणि तिथनंच माझा संघर्ष सुरू झाला. मला शेजारच्या कारखान्यात साफसफाईचं काम मिळालं, पण मला ते काम अजिबात आवडायचं नाही. माझे आई-वडील देखील सफाई कर्मचारी होते – माझे वडील सेप्टिक टँक आणि गटारं साफ करायचे, कचरा वेचायचे आणि आई झाडूकाम करायची.”
तमिळ नाडूमध्ये बहुतांश सफाई कर्मचारी आंध्र प्रदेशातले आहेत, ते तेलुगु बोलतात. तमिळ नाडूच्या अनेक भागांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी तेलुगु माध्यमाच्या शाळा आहेत.
नागम्मा आणि तिचा नवरा, दोघंही मूळचे पामुरु गावचे. “माझं लग्न १९९५ मध्ये झालं, मी १८ वर्षांची होते तेव्हा,” नागम्मा सांगते. “माझ्या जन्माच्या आधीच माझे आई-वडील चेन्नईला येऊन राहिले होते. माझ्या लग्नासाठी म्हणून आम्ही आमच्या गावी परतलो, काही वर्षं तिथे राहिलो आणि परत चेन्नईला आलो. माझ्या नवऱ्यानं बांधकामावर गवंडी म्हणून काम करायला सुरुवात केली. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी बोलावणं आलं तर तो जायचा. मला जेव्हा कळालं की तो गटारात काम करतो म्हणून, मी कडाडून विरोध केला. त्यानंतर तो असली कामं करायला जातो ते त्याने मला सांगायचंच थांबवलं. २००७ साली जेव्हा तो आणि त्याचे दोन साथीदार सेप्टिक टँकमध्ये मरण पावले, तेव्हा कुणालाही अटक झाली नाही, त्यांच्या खुनासाठी कुणालाही जबाबदार धरण्यात आलं नाही. बघा, हा देश कसा वागवतो आम्हाला, आमच्या जीवाची काही किंमत आहे का नाही? आमच्या मदतीला कुणीही आलं नाही – ना सरकार, ना कुणी अधिकारी. अखेर सफाई कर्मचारी आंदोलनाने मला माझ्या हक्कांसाठी कसं लढायचं ते शिकवलं. मी आंदोलनाच्या संपर्कात आले २०१३ मध्ये.”
एकदा स्वतःचे हक्क समजल्यानंतर नागम्मा मोकळ्याने आणि ठामपणे त्यांचं म्हणणं मांडू लागली. ज्यांचा नवरा किंवा घरातलं कुणी जवळचं माणूस सेप्टिक टँकमध्ये मरण पावलंय अशा इतर स्त्रियांना ती भेटू लागली. “आयुष्याचा जोडीदार गटारात मरण पावला अशी मी काही एकटी नाही, अशा शेकडो बाया आहेत ज्यांचं दुःख माझ्यासारखंच आहे हे जेव्हा मला कळून चुकलं तेव्हा मग माझ्या दुःखालाच मी माझी ताकद बनवायला सुरुवात केली.”
ही ताकदच नागम्माच्या कामी आली. तिने तिची साफसफाईची नोकरी सोडली, २०,००० रुपयांचं कर्ज काढलं आणि तिच्या वडलांच्या आणि सफाई कर्मचारी आंदोलनाच्या सहाय्याने तिने इंदिरा नगरमधल्या तिच्या घरापाशीच एक गृहोपयोगी वस्तूंचं दुकान थाटलं.
तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाईसाठी तिला जो संघर्ष करावा लागला त्यातून आज २१ व्या शतकातही भारतात जातीचं जे काही दाहक वास्तव आहे ते तिला पुरतं अनुभवायला मिळालं. ज्या कुणाचे जीव गटारामध्ये गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी असा २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, त्याला अनुसरून २०१६ च्या नोव्हेंबरमध्ये महानगरपालिकेने अखेर तिला नुकसान भरपाई दिली. तिने कर्जाची परतफेड केली, थोडा पैसा दुकानात गुंतवला आणि आपल्या दोन्ही मुलींच्या नावे बँकेत मुदत ठेवी काढल्या.
“माझी आई एकदम निडर बाई आहे,” आनंदी सांगते, अभिमानाने. “ती जरी निरक्षर असली तरी ती कोणत्याही अधिकाऱ्याशी आत्मविश्वासाने बोलू शकते, मग तो कितीही मोठा असो. तिने जिथे शक्य आहे तिथे तिचा अर्ज दाखल केला होता. तिला कचेरीत येताना पाहिलं की कर्मचारी लोकांना भीतीच वाटायला लागायची कारण त्यांना माहित होतं की ती कितीही तास थांबायला तयार असते आणि तिच्या हक्कांसाठी ती निरंतर भांडू शकते.”
“माझा नवरा २००७ साली वारला, आणि इतका सगळा संघर्ष केल्यानंतर, संघटनेच्या पाठिंब्यामुळे मला २०१६ सरता सरता नुकसान भरपाई मिळाली,” नागम्मा सांगते. “सर्वोच्च न्यायालयाच्या २०१४ सालच्या निकालानुसार मला त्याच वर्षी भरपाई मिळायला पाहिजे होती. पण न्याय देण्याची कोणती यंत्रणाच अस्तित्वात नाहीये. कुणालाही फिकीर नाहीये. या व्यवस्थेमुळे मलाही सफाईचं काम करायला भाग पाडलं होतं. का? मला बिलकुल मान्य नाहीये हे. मी मला आणि माझ्या लेकींना जातीविरहित आयुष्य जगता यावं म्हणून झगडतीये. बोला, तुम्ही कुणाच्या बाजूने आहात?”
अनुवादः मेधा काळे