“सरकारी योजनांमधून खूप लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि त्यांचं आयुष्य चांगलं चाललंय असं मी ऐकलंय,” गौरी म्हणते. “मी टीव्ही वरच्या जाहिरातीत हे पाहिलंय.”
परंतु, जाहिरातीत दावा केल्याप्रमाणे राज्य सरकाच्या योजनांमधून खरोखरच ज्याला अशी नोकरी मिळाली आहे आणि त्याचं भलं झालं आहे अशा कुणालाही गौरी वाघेला औळखत नाही, आणि तिच्यासमोर असलेले कामाचे पर्यायसुद्धा मर्यादित आहेत. १९ वर्षाची गौरी सांगते, “सरकारचा कौशल्य आधारित अभ्यासक्रम मी केला आहे आणि मला शिवणयंत्र चालवता येतं, मला [कपड्यांच्या कारखान्यात] नोकरीही मिळाली होती. पण आठ तास काम करून महिन्याला फक्त ४००० रुपयेच मिळायचे. आणि तो कारखाना मी राहते तिथून सहा कि.मी.वर होता, त्यामुळे मला मिळणारे पैसे येण्याजाण्यावर आणि खाण्यावरच संपायचे. म्हणून मग दोन महिन्यानंतर मी काम सोडून दिलं. आता,” ती हसते, “मी घरीच असते आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांचे कपडे शिवून देते. प्रत्येक कपड्यासाठी १०० रु. शिलाई घेते. पण इथे लोक वर्षाकाठी कपड्यांचे दोनच जोड शिवतात, त्यामुळे माझी जास्त काही कमाई होत नाही.”
गुजरातमधील कच्छ जिल्हयातील भूज शहरातील रामनगरी भागातील झोपडवस्तीत राहाणाऱ्या तरुण स्त्रियांशी आम्ही बोलत होतो. आमचं संभाषण लोकसभा निवडणुकीच्या भोवती फिरत होतं – इथे आज, २३ एप्रिलला मतदान आहे.
२०१४ च्या निवडणुकीत, कच्छमधल्या १५.३४ लाख नोंदणीकृत मतदारांपैकी ९.४७ लाख लोकांनी मतदान केलं होतं आणि भारतीय जनता पक्षाने राज्यातील लोकसभेच्या सर्व २६ जागा जिंकल्या होत्या. कच्छचे खासदार विनोद चोपडा यांनी, त्यांचे सर्वात निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ. दिनेश परमार यांचा २.५ लाख मतांनी पराभव केला होता. इतकंच नाही, २०१७ च्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत एकूण १८२ जागांपैकी भाजपाला मिळालेल्या ९९ जागांमध्ये भूजचा समावेश होता. काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या.





