सगळं ठरून दहाच दिवस झाले होते. रेखाला पुरतं कळून चुकलं होतं की आता लग्न करण्याशिवाय पर्याय नाही. एखादी १५ वर्षांची मुलगी जितका म्हणून विरोध करू शकते तो तिने करून पाहिला होता. पण तिच्या आई-वडलांनी तिचं म्हणणं मनावर घेतलं नाही. “ती रडली, मला शिकायचंय म्हणाली,” तिची आई भाग्यश्री सांगते.

बीड जिल्ह्यातल्या एका गरीब खेड्यात भाग्यश्री, तिचा नवरा अमर आणि त्यांची मुलं राहतात. दोघंही तिशीत आहेत. दर वर्षी नोव्हेंबरच्या सुमारास ते पश्चिम महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात ऊसतोडीसाठी जातात. सहा महिने प्रचंड कष्ट केल्यानंतर दोघांना मिळून ८०,००० रुपये हातात येतात. मातंग या दलित समाजाच्या या कुटुंबाकडे स्वतःची जमीन नाही. ऊसतोड हाच उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे.

दर वेळी ऊसतोडीला जाताना भाग्यश्री आणि अमर रेखा आणि तिच्या धाकट्या भावंडांना (वय १२ आणि ८) त्यांच्या आजीपाशी ठेवून जायचे (आजी गेल्या मे महिन्यात वारली). गावाला लागूनच असलेल्या सरकारी शाळेत तिघं शिकत होती. पण मार्च २०२० मध्ये महासाथीमुळे शाळा बंद झाल्या आणि नववीत शिकत असलेल्या रेखाला घरी बसावं लागलं. ५०० दिवस उलटले तरी बीड जिल्ह्यातल्या शाळा आजही बंद आहेत.

“आमच्या ध्यानात आलं की शाळा काही इतक्यात सुरू व्हायच्या नाहीत,” भाग्यश्री सांगते. “शाळा सुरू होती तर शिक्षक असायचे, आजूबाजूला बाकी लेकरं असायची. गावात लगबग होती. शाळाच बंद म्हटल्यावर तिला माघारी कसं सोडून जावं. दिवस चांगले नाहीत.”

म्हणून गेल्या वर्षी जून महिन्यात भाग्यश्री आणि अमरने रेखाचं लग्न २२ वर्षीय आदित्यशी लावून दिलं. त्यांच्या गावाहून ३० किलोमीटरवर राहणारं आदित्यचं कुटुंब देखील हंगामी स्थलांतर करणारं होतं. नोव्हेंबर २०२० मध्ये ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला तेव्हा रेखा आणि आदित्य देखील पश्चिम महाराष्ट्रात तोडीला गेले – मागे राहिलं ते केवळ शाळेच्या रजिस्टरवरचं रेखाचं नाव.

महासाथीमुळे रेखासारख्या किशोरवयीन मुली आणि तिच्याहून लहान असणाऱ्या कित्येक मुलींना बळजबरी लग्न करावं लागलं आहे. युनिसेफने मार्च २०२१ मध्ये एक अहवाल प्रकाशित केला – COVID-19: A threat to progress against child marriage (कोविड-१९: बालविवाहांविरोधातील प्रयत्नांना खीळ). या दशकाच्या अखेरपर्यंत जगभरात आणखी १ कोटी मुलींना बालविवाह करावा लागण्याचा धोका असल्याचं हा अहवाल सांगतो. शाळा बंद, वाढती गरिबी, आई-वडलांचं निधन आणि कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या इतर काही परिस्थितीचा परिणाम म्हणून “लाखो मुलींची स्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे,” हा अहवाल नोंदवतो.

गेल्या १० वर्षांत बालविवाह झालेल्या तरुणींचं प्रमाण १५ टक्क्यांनी कमी झालं होतं आणि जगभरात अडीच कोटी बालविवाह रोखले गेल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांतल्या या प्रगतीला महासाथीने खीळ बसल्याचंच यातून दिसून येतं. महाराष्ट्रातही हेच चित्र आहे.

Activists and the police intercepting a child marriage in Beed
PHOTO • Courtesy: Tatwashil Kamble and Ashok Tangde

बीडमध्ये कार्यकर्ते आणि पोलिस एक बालविवाह थांबवतायत

एप्रिल २०२० ते जून २०२१ या काळात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने ७८० बालविवाह रोखले आहेत. हा आकडा वरवरचा आहे, अशोक तांगडे आणि तत्त्वशील कांबळे सांगतात

२०१५ ते २०२० या काळात महाराष्ट्रात कमी वयात होणाऱ्या लग्नांच्या संख्येत ४ टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून येतं. २०१५-१६ साली केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीच्या आकडेवारीनुसार २०-२४ वयोगटातल्या २६ टक्के स्त्रियांचं लग्न १८ वर्षं (स्त्रियांसाठी लग्नाचं कायदेशीर वय) पूर्ण होण्याआधी झालं आहे. २०१९-२० च्या सर्वेक्षणात (एनएफएचएस-५) हेच प्रमाण २२ टक्के असल्याचं दिसून येतं. याच काळात २५-२९ वयोगटातल्या केवळ १०.५ टक्के पुरुषांचं लग्न २१ वर्षं (पुरुषांसाठी लग्नाचं कायदेशीर वय) पूर्ण होण्याआधी झालं आहे.

महासाथीच्या काळात बालविवाहांचं प्रमाण वाढतंय हे दिसत असतानाही राज्य सरकारने त्याला आळा घालण्यासाठी कुठलेही प्रतिबंधक उपाय योजलेले नाहीत. ३४ वर्षीय तत्त्वशील कांबळे बीडमध्ये काम करतो. तो म्हणतो, बालकं आणि तरुणांसंबंधी सरकारचं लक्ष फक्त ऑनलाइन वर्गांवर आहे. आणि हे वर्ग किंवा असं शिक्षण केवळ स्मार्टफोन आणि इंटरनेटचा खर्च परवडणाऱ्यांच्या मुलांसाठी आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात केवळ १८.५ टक्के घरांमध्ये इंटरनेटची सुविधा असल्याचं २०१७-१८ साली झालेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातून दिसून आलं होतं. ग्रामीण महाराष्ट्रातल्या सुमारे १७ टक्के लोकांना (वय वर्ष ५ च्या पुढे) “इंटरनेट वापरण्याची क्षमता” असल्याचं यातून दिसतं. स्त्रियांमध्ये हेच प्रमाण केवळ ११ टक्के होतं.

इंटरनेटची सुविधा नसलेली बहुतेक मुलं वंचित समाजांमधली आहेत. गरिबी आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे आधीच मुलींना बालविवाह करावे लागत होते. त्यात शाळा बंद झाल्यामुळे परिस्थिती आणखीच बिघडली. बीडमध्ये हेच दिसून येतं.

२०१९-२० साली बीडमध्ये २०-२४ वयोगटातल्या ४४ टक्के स्त्रियांनी आपलं लग्न १८ वर्षं पूर्ण होण्याआधी झालं असल्याचं सांगितलं होतं (एनएफएचएस-५). शेतीवरील अरिष्ट आणि दुष्काळामुळे बहुतेक लोक कामासाठी स्थलांतर करतात, त्यातही ऊसतोडीसारखं हंगामी स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होतं हे यामागचं मुख्य कारण असल्याचं दिसून येतं.

तोडीसाठी मजूर नेणारे मुकादम नवरा-बायको अशी जोडी घेऊन जातात. एकाने ऊस तोडायचा आणि दुसऱ्याने मोळ्या बांधून ट्रॅक्टरवर लादायच्या. जोडप्याला कोयतं म्हणतात आणि त्यांची मजुरी एकत्र दिली जाते. दोन मजुरांमध्ये तंटा होऊ शकतो तो इथे होत नाही. लग्न झाल्यावर मुली नवऱ्याबरोबर तोडीला जातात. त्यामुळे पालकांना वाटतं की ती तिच्या नवऱ्याबरोबर सुरक्षित आहे आणि त्यांच्या डोक्यावरचा आर्थिक बोजाही कमी होतो.

महासाथीच्या काळात आर्थिक चणचण भासणाऱ्या पालकांनी घरी असलेल्या मुलांबद्दल दोन पर्याय निवडलेले दिसतात, तत्त्वशील सांगतो. “मुलगा असेल, तर त्याला मजुरीला पाठवायचं. आणि मुलगी असेल तर तिचं लहान वयात लग्न लावून द्यायचं.” बालकांची काळजी आणि सुरक्षेसंबंधी काम करणाऱ्या, वैधानिक दर्जा असणाऱ्या बाल कल्याण समितीचा सदस्य या नात्याने तत्त्वशीलने बीडमध्ये किती तरी बालविवाह रोखले आहेत.

Girls as young as 12 are being married off by their parents to ease the family's financial burden
PHOTO • Labani Jangi

कुटुंबावरचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी अगदी १२ वर्षांच्या मुलींची देखील लग्नं लावून देण्यात आली आहेत

बालविवाह आणि बालमजुरीला प्रतिबंध करण्यासाठी स्थापन झालेल्या बीड तालुका बाल सुरक्षा समितीचे सदस्य अशोक तांगडे यांच्या सहकार्याने तत्त्वशीलने मार्च २०२० पासून आजपर्यंत किमान १०० बालविवाह रोखले असतील. “हा आकडा आमच्यापर्यंत आलेल्या आणि आम्ही थांबवू शकलो अशा लग्नांचा आहे,” ५३ वर्षीय अशोक तांगडे सांगतात. “सर्वांच्या नजरेतून निसटून गेलेली अशी किती लग्नं लागली असतील त्याची तर गणतीच नाही.”

महासाथीच्या काळात लोकांच्या हातात पैसा नाही आणि त्याचा बालविवाह करून देण्यात मोठा हात आहे. “मुलाचे आई-वडील मोठाला हुंडा मागत नाहीयेत,” तांगडे सांगतात. लग्नाचा खर्च कमी झालाय, ते म्हणतात. “मोठ्या लग्नांना परनावगीच नाही, त्यामुळे घरच्या लोकांना बोलावून उरकून टाकता येतंय.”

त्यात महासाथीने लोकांच्या मनात 'आपण मेलो तर आपल्या पोरीकडे कोण पाहणार' अशी भीतीदेखील आहे. “बालविवाहाचं प्रमाण वाढण्यामागे असे सगळे घटक कारणीभूत आहेत. अगदी १२ वर्षांच्या मुलींची देखील लग्नं लावून देतायत,” अशोक भाऊ सांगतात.

एप्रिल २०२० ते जून २०२१ या काळात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने ७८० बालविवाह रोखले आहेत. हा आकडा फारच तोकडा आहे, तांगडे आणि कांबळे सांगतात. बीडमध्ये ४० बालविवाह रोखल्याची आकडेवारी आहे. त्यांनी स्वतः यापेक्षा जास्त लग्नं थांबवली आहेत.

पण हा तोकडा आकडासुद्धा महासाथीच्या काळात होणाऱ्या किशोरवयीन आणि लहान मुलींच्या लग्नांकडे आपलं लक्ष वेधतो आणि धोक्याची घंटाही वाजवतो. जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९ या काळात १८७ बालविवाह थांबवल्याची माहिती राज्य शासन देतं. कोविड-१९ ची साथ आल्यानंतर याच आकड्यात महिन्याला सरासरी १५० टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येतं.

अशी लग्नं थांबवायची तर माहिती देणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं हे दोघं सांगतात. “गावातल्या आशा कार्यकर्त्या आणि ग्राम सेवक आम्हाला खबर देतात,” तत्त्वशील सांगतो. “पण कसंय, ते त्याच गावात राहतात त्यामुळे त्यांनाही भीती असते. त्यांनी खबर दिल्याचं समजलं तर ज्यांच्या घरात लग्न होत होतं ते पुन्हा त्रास देतील अशी भीती असते.”

Left: A file photo of Tatwashil Kamble with a few homeless children. Right: Kamble and Ashok Tangde (right) at a Pardhi colony in Beed after distributing ration kits
PHOTO • Courtesy: Tatwashil Kamble and Ashok Tangde
Left: A file photo of Tatwashil Kamble with a few homeless children. Right: Kamble and Ashok Tangde (right) at a Pardhi colony in Beed after distributing ration kits
PHOTO • Courtesy: Tatwashil Kamble and Ashok Tangde

डावीकडेः तत्त्वशील कांबळे काही बेघर मुलांसोबत (संग्रहित फोटो). उजवीकडेः तत्त्वशील आणि अशोक तांगडे (उजवीकडे) बीडच्या एका पारधी तांड्यावर रेशनचा संच देताना

गावातली दुश्मनीसुद्धा अशा वेळी कामी येते. “कधी कधी त्या कुटुंबाच्या विरोधात असलेले लोक खबर देतात. कधी कधी लग्न ठरलेल्या मुलीवर प्रेम करणारा एखादा असेल तर तोही बातमी देतो.”

ही अशी खबर मिळणं ही तर फक्त पहिली पायरी असते. लग्न ठरवलेली कुटुंबं काय वाटेल त्या पळवाटा काढतात. कधी कधी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. “किती तरी वेळा आम्हाला धाक दपटशा केलाय, आमच्यावर हल्ला झालाय,” तत्त्वशील सांगतो. “लोकांनी आम्हाला लाच द्यायचा सुद्धा प्रयत्न केलाय. तरीही आम्ही दर वेळी पोलिसांना कळवतो. काही जण लगेच कबुली देतात. काही जण गोंधळ घातल्याशिवाय, भांडणं केल्याशिवाय ऐकत नाहीत.”

२०२० साली ऑक्टोबर महिन्यात १६ वर्षांच्या स्मिताचं लग्न होणार आहे हे लग्नाच्या अगदी आदल्या दिवशी तत्त्वशील आणि अशोक भाऊंना समजलं. त्या दिवशी ते कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. बीडहून ५० किलोमीटरवर हे गाव होतं. विधी सुरू व्हायचे होते. पण मुलीच्या वडलांनी, विठ्ठल यांनी लग्न थांबवायला साफ नकार दिला. “तो ओरडाया लागला, ‘माझी लेक आहे, तिचं काय करायचं ते मी करू शकतो’,” अशोक भाऊ सांगतात. “हा मामला किती गंभीर आहे हे समजायला जरा त्याला वेळ लागला. मग आम्ही त्याला पोलिस स्टेशनला नेलं आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.”

स्मिता फार हुशार मुलगी होती, तिचा चुलता किशोर सांगतो. “तिच्या आई-बापांनी कधी शाळा पाहिली नाही. त्यांना त्याचं महत्त्व कसं समजावं. महामारीमुळे रोजचे दोन घास कसे खायचे याचीच त्यांना चिंता होती.” विठ्ठल आणि त्याची पत्नी पूजा दोघं तिशीचे आहेत. दोघं वीटभट्टीवर मजुरीला जातात आणि चार महिन्यांची दोघांना मिळून २०,००० रुपये मजुरी मिळते. “कामंच निघेनात. स्मिता लगीन करून गेली तर खाणारं एक तोंड कमी झालं असतं,” किशोर सांगतो.

तत्त्वशील आणि अशोक भाऊंसमोरचं आव्हान म्हणजे स्मिताचं लग्न पुन्हा गपचुप लावून देत नाहीत ना त्यावर लक्ष ठेवणं. “एखाद्या मुलीचं कमी वयात लग्न ठरवत असले आणि ती शाळेत येईनाशी झाली तर शाळेतले शिक्षक आम्हाला कळवायचे. आम्ही जाऊन तपास करायचो. पण शाळाच बंद आहेत त्यामुळे काही पत्ताच लागत नाहीये.”

विठ्ठलला दर महिन्यात पोलिस स्टेशनला हजर व्हायला सांगितलंय. “आम्हाला काही त्याचा भरोसा नाहीये,” अशोक भाऊ म्हणतात. तो परत एकदा आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न करणार याची त्यांनी चिंता आहे.

Left: Ashok Tangde and Tatwashil Kamble (right) with a retired migrant worker (centre). Right: Kamble talking to students about child marriage
PHOTO • Courtesy: Tatwashil Kamble and Ashok Tangde
Left: Ashok Tangde and Tatwashil Kamble (right) with a retired migrant worker (centre). Right: Kamble talking to students about child marriage
PHOTO • Courtesy: Tatwashil Kamble and Ashok Tangde

डावीकडेः अशोक तांगडे आणि तत्त्वशील कांबळे (उजवीकडे). पूर्वी रोजगारासाठी स्थलांतर करणारे एक वयस् (मध्यभागी). उजवीकडेः तत्त्वशील बालविवाहासंबंधी मुलींशी संवाद साधतोय

लग्न थांबवल्यानंतर स्मिता तीन महिन्यांसाठी आपल्या चुलत्याकडे रहायला गेली. तो सांगतो की एरवीपेक्षा ती फारच गप्प गप्प होती. “काही बोलायची नाही, आपल्या आपल्यात रहायची. कामं करायची, पेपर वाचायचा आणि आम्हाला घरात काही काम असलं तर करू लागायची. तिला इतक्या लवकर लग्नच करायचं नव्हतं.”

स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी झालेल्या अभ्यासांमधून बालविवाहाचे दुष्परिणाम दिसून येतात. मातामृत्यूंवरही त्यांचा परिणाम होतो. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने २०११ साली झालेल्या जनगणनेच्या आधारावर एक अहवाल प्रसिद्ध केला - A Statistical Analysis of Child Marriage in India (भारतातील बालविवाहांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण). यानुसार १०-१४ वयोगटातील मुली गरोदरपणात आणि प्रसूतीच्या वेळी मरण पावण्याची शक्यता २०-२४ वयोगटातील स्त्रियांच्या तुलनेत पाच पट अधिक आहे. आई गरोदरपणात आणि आधीही कुपोषित असेल तर जन्माला येणारी बाळं देखील कुपोषित असतात.

रेखाच्या बाबतीत ती अशक्त असल्याचं कारण देऊन तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी परत पाठवलं. हे कुपोषणाचंच लक्षण आहे. “२०२१ च्या जानेवारी मध्ये, ती नवऱ्याबरोबर गेली त्याला २-३ महिने झाले नाहीत तर ती माघारी आलीये,” भाग्यश्री सांगते.

ऊस तोडणं आणि २५ किलोची मोळी डोक्यावर वाहून नेणं काही रेखाला शक्य नव्हतं. तिचं वजन आधीच कमी होतं. “तिला काही ते महनतीचं काम जमेना. नवऱ्याच्या मजुरीवर परिणाम व्हायला लागला,” भाग्यश्री सांगते. “म्हणून सासरच्यांनी लग्न मोडलं आणि तिला माघारी पाठवलंय.”

रेखा परत आल्यावर काही दिवस घरी राहिली. “पण लग्न झाल्यावर काही महिन्यांनी पोरगी माघारी आली म्हटल्यावर लोक काहीबाही विचारायला लागले. त्यामुळे ती जास्त वेळ तिच्या मावशीच्यात राहतीये,” तिची आई सांगते.

ऊसतोडीचा पुढचा हंगाम जवळ यायला लागलाय. भाग्यश्री आणि अमर परत एकदा तोडीला जायची तयारी करतायत. रेखाचं काय करायचं याचीही तयारी पुन्हा एकदा सुरू झालीये. फरक इतकाच की यावेळी तिचा विरोध नाही – परत एकदा लग्न करायला रेखा आता तयार आहे.

ओळख उघड होऊ नये म्हणून काही मुलींची आणि त्यांच्या नातेवाइकांची नावं बदलण्यात आली आहेत.

या कहाणीसाठी पुलित्झर सेंटरचे सहाय्य मिळाले आहे.

Parth M.N.

پارتھ ایم این ۲۰۱۷ کے پاری فیلو اور ایک آزاد صحافی ہیں جو مختلف نیوز ویب سائٹس کے لیے رپورٹنگ کرتے ہیں۔ انہیں کرکٹ اور سفر کرنا پسند ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Parth M.N.
Illustrations : Labani Jangi

لابنی جنگی مغربی بنگال کے ندیا ضلع سے ہیں اور سال ۲۰۲۰ سے پاری کی فیلو ہیں۔ وہ ایک ماہر پینٹر بھی ہیں، اور انہوں نے اس کی کوئی باقاعدہ تربیت نہیں حاصل کی ہے۔ وہ ’سنٹر فار اسٹڈیز اِن سوشل سائنسز‘، کولکاتا سے مزدوروں کی ہجرت کے ایشو پر پی ایچ ڈی لکھ رہی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Labani Jangi
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے