आपल्या तीन शेळ्यांना प्रत्येकी तीन पिल्लं झालीयेत हे पाहून हुस्न आरांचा आनंद पोटात मावत नाहीये – ३० ऑक्टोबर रोजी सहा पिल्लांचा जन्म झाला आणि त्याच्या आदल्या आठवड्यात तीन पिल्लांचा. आपल्या आपण दूध पिण्याइतकी ती मोठी नाहीत त्यामुळे त्यांना पुरेसं दूध मिळावं म्हणून हुस्न आरा त्यांची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घेतायत. ही पिलं मोठी झाली की त्यांच्यापासून चांगलं उत्पन्न मिळणार हे त्या जाणून आहेत.
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातल्या बाजपट्टी तालुक्यातल्या बर्री-फुलवरिया गावी हुस्न आरा राहतात. या पंचायतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या सुमारे ७,५०० रहिवाशांपैकी बहुतेक जण गरीब आणि पोटापुरती शेती करणारे शेतकरी किंवा भूमीहीन मजूर आहेत. त्यांच्यापैकी एक आहेत हुस्न आरा.
अगदी लहान वयात त्यांचं त्यांच्या चुलत भावाबरोबर, मोहम्मद शब्बीरबरोबर लग्न झालं. पाच वर्षांपूर्वी ते हैद्राबादच्या एका चामड्याच्या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यात काम करण्यासाठी गेले, त्या आधी तेही शेतमजुरी करायचे. “ते महिन्याला ५,००० रुपये कमवतात आणि कधी कधी २,००० रुपये घरी पाठवतात. त्यांना स्वतःसाठी पैसे लागतात, त्यामुळे त्यांच्याकडून नेहमी काही पैसे येत नाहीत,” हुस्न आरा सांगतात.
गावातले अनेक बाप्ये अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये कामासाठी गेले आहेत. त्यातले बहुतेक जण कापड कारखान्यात, पिशव्या शिलाईसाठी, किंवा रस्त्यावरच्या खानावळींमध्ये स्वैपाकी किंवा मदतनीस म्हणून कामं करतायत. ते माघारी पैसा पाठवतात आणि त्यातून गावात काही बदल घडून आले आहेत. काही दशकांपूर्वी गावात केवळ ३-४ हातपंप होते, आता मात्र जवळपास प्रत्येक घरात हातपंप पहायला मिळतो. जुन्या बांबू आणि मातीच्या घरांची जागा आता सिमेंट-विटांच्या घरांनी घेतलीये. तरीही हुस्न आराप्रमाणे इतरही अनेक घरांमध्ये आजही संडास नाही. भले पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत संपूर्ण भारत ‘हागणदारीमुक्त’ करण्याची घोषणा करोत. या गावात वीज आली २००८ मध्ये आणि काँक्रीटचे रस्ते व्हायला २०१६ उजाडलं.
५६ वर्षांच्या हुस्न आरांसारख्या फुलवरियाच्या इतर मुस्लिम बायाही लहानपणापासून शेतात मजुरी करत आल्या आहेत. नऊ वर्षांपूर्वी निवर्तलेली त्यांची आई, समेलदेखील हेच काम करायची. घरची गरिबी इतकी की हुस्न आरा किंवा त्यांच्या लेकरांनी ना शाळा पाहिली ना मदरसा. बर्री फुलवरियामध्ये साक्षरतेचं प्रमाण ३८.०१ टक्के इतकं कमी आहे (जनगणना, २००१) आणि स्त्रियांमध्ये ते केवळ ३५.०९ टक्के इतकं आहे.
हुस्न आरांचे वडील, मोहम्मद झहूर आजही रोजंदारीवर काम करण्याचा प्रयत्न करतात – ते १०० वर्षांचे आहेत, ते सांगतात. वयोमानाने त्यांना आता नांगर चालवायचं किंवा टिकाव मारायचं काम जमत नाही पण ते होईल तसं रानात पेरणीचं किंवा पिकं आली की कापणीचं काम आजही करतात. “मी बटईने शेती करतो,” ते सांगतात. आजकाल शेती बेभरवशाची आणि आतबट्ट्याची झाली आहे, धान किंवा गव्हाचा काही भरोसा नाही, ते सांगतात. “शेतीच्या जुन्या पद्धती विरून चालल्या आहेत. शेतकरी आता रानानी ट्रॅक्टर चालवतात त्यामुळे रोजावरची कामं कमी झाली आहेत. आणि ज्यांना काही काम मिळतं त्यांची दिवसाला ३००-३५० रुपयांच्या वर कमाई होत नाही.”
खरं तर बर्री फुलवरियातली जमीन सुपीक आहे, पण सिंचनाच्या सोयींची वानवा आहे. खरं तर गावापासून पश्चिमेला केवळ एक किलोमीटरच्या अंतरावर अधवारा नदी वाहते पण तिला फक्त पावसाळ्यातच पाणी असतं, एरवी वर्षभर ती कोरडी असते. गेली तीन वर्षं या भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही त्यामुळे इथे दुष्काळसदृश परिस्थिती तयार झाली आहे.
हुस्न आरांना पाच लेकरं आहेत. सर्वात थोरला, मोहम्मद अली, वय ३०, आपल्याच आईच्या घरी वेगळ्या खोलीत पत्नी शाहिदा आणि दोन लेकरांसोबत राहतो. तो काही नेमाने घरी पैसे देत नाही. दुसरा मुलगा बसूनच असतो. काही वर्षांपूर्वी हुस्न आराची थोरली मुलगी लग्न करून इथून ४० किलोमीटरवर असणाऱ्या नेपाळच्या शम्सी गावी नांदायला गेली. तिसरा मुलगा आणि धाकटी १८ वर्षांची मुलगी यांची लग्नं व्हायची आहेत. हे दोघंही पेरण्या किंवा कापण्यांच्या हंगामात रोजाने कामं करतात.
अख्खं घर चालवणं हुस्न आरासाठी अवघड झालंय, साधा घरचा किराणा भरण्यासाठीदेखील त्यांना भरपूर कष्ट उपसावे लागतात. कुटुंबाच्या रेशन कार्डावर त्यांना दर महिन्याला इतर थोड्या फार वस्तूंसोबत २ रुपये किलोने १४ किलो तांदूळ आणि ३ रु. किलोने २१ किलो गहू मिळतो. “आताशा शेतात फार काही काम मिळत नाही,” त्या म्हणतात. “माझी तब्येतही आता साथ देत नाही. घरची खाणारी वाढली पण कमाई नाही. आता तर माझ्या नातवंडांनाही पोसायचंय. अजून किती काळ मलाच हे सगळं पहावं लागणार आहे, काय माहित.”
हुस्न आरांच्या सगळ्या आशा त्यांच्या पाच लेकरांवर होत्या – ती मोठी होतील, घराला हातभार लावतील आणि सुखाचे, आनंदाचे दिवस पहायला मिळतील.
आपल्या तोकड्या कमाईत भर घालण्यासाठी हुस्न आरांनी कोंबड्या आणि बकऱ्या पाळायला सुरुवात केली – त्यांच्या गावातल्या अनेक कुटुंबांचा हा कमाईचा स्रोत आहे. दर महिन्याला अंडी विकून थोडा फार पैसा हाती येतो किंवा ती घरी खायला तरी होतात. बकऱ्यांनाही दर दोन-तीन वर्षांनी पिलं होतात. ती पिलं वाढवते आणि मग जनावराच्या व्यापाऱ्यांना विकते. अर्थात तिच्या पिलांना काही इतरांसारखी किंमत मिळत नाही. “ज्याच्याकडे पैसा आहे तो जनावराला चांगला चारा खाऊ घालतो. मी आहे गरीब. मी माझ्या पिल्लांना फार काय तर गवत खायला घालणार. त्यामुळे ती अशी बारकी आहेत...” त्या म्हणतात.
चांगल्या चाऱ्यावर पोसलेले बकरे चार महिन्यात ८-१० किलोचे होतात आणि मग व्यापारी त्यांना ४,००० रुपयांपर्यंत भाव देतात. हुस्न आराकडची पिलं मात्र मोठी झाली तरी पाच किलोच्या वर भरत नाहीत आणि चार महिन्यांच्या पिलांनाही २,००० रुपयांहून जास्त भाव मिळत नाही. त्यांनी वर्षभर एखादा बकरा सांभाळला तर आजूबाजूच्या गावातल्या श्रीमंत मुस्लिम कुटुंबांकडून अशा बकऱ्याला १०,००० रुपयांपर्यंत भाव मिळतो. ईद-उल-अज़हा किंवा बक़र ईदला कुर्बानीसाठी अशा बकऱ्यांना मोठी मागणी असते.
हुस्न आरांच्या सगळ्या आशा त्यांच्या पाच लेकरांवर होत्या – ती मोठी होतील, घराला हातभार लावतील आणि सुखाचे, आनंदाचे दिवस पहायला मिळतील. ते मोठे झाले, त्यांची लेकरं सुद्धा झाली. पण हुस्न आराच्या स्वप्नातले सुखाचे, आनंदाचे दिवस मात्र अजून अवतरायचे आहेत.
अनुवादः मेधा काळे