त्शेरिंग दोरजी भुटिया यांचं आयुष्य या कारागिरीत इतकं गुंतलंय की त्यांचा उदरनिर्वाह धनुष्यबाण बनवून चाललाच नाहीये हे जरा वेळाने लक्षात येतं. हा अनोखा प्रवास सांगू
पाहतोय ८३ वर्षांचा एक म्हातारबाबा, पाकयॉन्ग जिल्ह्यातील कार्थोक गावात आपल्या घरी! मागच्या ६० वर्षांपासून, त्यांचं उत्पन्न सुतारकामातून आलं आहे – तेही मुख्यतः फर्निचरच्या दुरुस्तीतून. पण त्यांच्यातील ही प्रेरणा मात्र तिरंदाजीतून आली जी अगदी खोलवर रुजलीये त्यांच्या मूळच्या सिक्कीमी संस्कृतीत! आणि याविषयी त्शेरिंग तुम्हाला पुढं सांगतीलच.
अनेक दशकं एक कुशल सुतार म्हणून काम केलं तरी त्याचा कुठे दर्प नाही. आपली ओळख ‘पाकयॉन्गचा धनुष्य बनवणारा’ म्हणूनच असावी ही त्यांची प्रामाणिक इच्छा.
“मी १०-१२ वर्षांचा होतो, तेव्हापासून मी लाकडाच्या वस्तू बनवायला सुरुवात केली. हळूहळू धनुष्य आकार घेऊ लागलं. लोकांनी ते विकत घ्यायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे हा तिरंदाज जन्माला आला,” त्शेरिंग ‘पारी’ सोबत गप्पा मारत सांगतात.
आम्हाला त्यांची काही उत्पादनं दाखवत ते सांगू लागतात, “सुरुवातीला, धनुष्य वेगळ्या पद्धतीने बनवलं जात होतं. ह्या पूर्वीच्या प्रकाराला तब्जू (नेपाळीमध्ये) म्हटलं जायचं. त्यात एकमेकांना जोडलेले, बांधलेले आणि चामड्याने झाकलेले काठीचे दोन साधे नग होते. आजकाल आम्ही जो प्रकार बनवतो, त्याला ‘बोट डिझाइन’ म्हणतात. एक धनुष्य बनवायला किमान तीन दिवस तरी लागतात. तेही तुमचे हात तरुण आणि कार्यक्षम असले तर. वयस्कर, म्हाताऱ्या हातांना थोडे दिवस जास्त,” त्शेरिंग मिश्किलपणे हसत सांगतात.
सहा दशकांपेक्षा अधिक काळापासून धनुष्यबाण बनवत असणारे त्शेरिंग, आता गंगटोकपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या गावी –कार्थोकमध्ये हे काम करतायत. कार्थोक हे बौद्ध विहारांसाठी ओळखलं जातं. हा सिक्कीममधल्या सर्वात पुरातन विहारांपैकी सहाव्या क्रमांकावरचा. रहिवासी म्हणतात, की एकेकाळी कार्थोकमध्ये धनुष्यबाण बनवणारे अनेक जण होते, पण आता केवळ त्शेरिंगच राहिले आहेत.
त्शेरिंग यांचं घर कार्थोकचं लावण्य प्रतिबिंबित करतं. कसं? जवळपास ५०० प्रकारची फुलं आणि झाडं असलेलं रंगीबेरंगी अंगण पार केल्यानंतरच तुम्ही घराच्या ओसरीत पोहोचता. त्यांच्या घरामागच्या अंगणात सुद्धा ग्रीन हाऊस आणि रोपवाटिका आहे, जिथं तुम्हाला सुमारे ८०० ऑर्किड्स, औषधी वनस्पतींव्यतिरिक्त शोभेची आणि बोन्साय झाडंसुद्धा पहायला मिळतील. हे सगळे कष्ट प्रामुख्याने त्यांचा मोठा मुलगा - सांगे त्शेरिंग भुटिया यांचे आहेत. सांगे ३९ वर्षांचे असून एक अत्यंत कुशल फळबाग तज्ज्ञ आहेत. सांगे विविध प्रकारच्या बागांची रचना करतात, रोपांची विक्री करतात – शिवाय इतरांनाही फळबागा कशा जोपासायच्या ते शिकवतात आणि कामाची सुरुवातही करून देतात.
“तर, आम्ही सहा जण इथं राहतो,” त्शेरिंग आम्हाला सांगतात. इथं कार्थोकमध्ये त्यांचं साधंसुधं घर आहे. “मी स्वतः, माझी पत्नी दावती भुटिया [वय वर्षे ६४], माझा मुलगा सांगे त्शेरिंग आणि त्याची पत्नी ताशी दोर्मा शेर्पा [वय वर्षे ३६] आणि आमची नातवंडं च्यांपा हेसल भुटिया आणि रंगसेल भुटिया.” इथं आणखी एक रहिवासी आहे: या कुटुंबाचा लाडका कुत्रा,डॉली – जो अधिक करुन तीन वर्षांच्या च्यांपासोबतच दिसतो. रंगसेल अजून दोन वर्षांचाही नाही.
त्शेरिंग यांचा दुसरा मुलगा, सोनम पालझोर भुटिया, वय वर्षे ३३ इंडिया रिझर्व्ह बटालियनमध्ये ऑफ सिक्किममध्ये आहे. तो सध्या दिल्लीत तैनात असून तिथं पत्नी आणि मुलासह राहतो. सणवार आणि सुट्यांच्या काळात सोनम त्याच्या वडिलांना भेटायला कार्थोकमध्ये येत असतो. त्शेरिंगच्या मुलांमध्ये सगळ्यात मोठी असणारी त्यांची मुलगी, त्शेरिंग ल्हामु भुटिया ४३ वर्षांची आहे, ती विवाहित आहे आणि गंगटोकमध्ये राहते. त्याच शहरात त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा सांगे ग्याम्पो राहतो. जो ३१ वर्षांचा आहे आणि सध्या पीएचडी करतोय. हे कुटुंब बौद्ध लामा समुदायातील असून सिक्कीममधील भुटिया या प्रमुख अनुसूचित जमातीचं आहे.
आम्ही त्शेरिंगचं धनुष्य हाताळण्याचा, चालवायला शिकण्याचा प्रयत्न करत असताना सांगे त्शेरिंग मैदानात येतात. गेरूसारखा पिवळसर, तपकिरी रंगाचा धनुष्य दाखवत आम्हाला म्हणतात, “बाबांनी हे माझ्यासाठी बनवलंय. मी फक्त यावरच तिरंदाजीचा सराव करत असतो." धनुष्य चालवताना अवलंबण्यात येणाऱ्या तंत्राचं प्रात्यक्षिक करताना ते त्यांचा डावा हात ताणतात.
तिरंदाजी ही सिक्कीमच्या प्रथा-परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहे आणि ती केवळ एक खेळ नाही. त्याहून अधिक काही आहे – तिरंदाजी ही एक संस्कृती सुद्धा आहे. साधारणत: सुगीनंतरच तिचं अस्तित्व जाणवू लागतं, जेव्हा लोक तुलनेनं जरा निवांत असतात. मग सगळे सण-समारंभ आणि स्पर्धांना एकत्र येतात. सिक्कीमचं विलिनीकरण भारतीय संघराज्यात होण्याआधीही हा तिरंदाजी इथला राष्ट्रीय खेळ होता.
दोन वेळा जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप पदकविजेता, दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेता आणि तीन ऑलिम्पिक्समध्ये - अथेन्स २००४, लंडन २०१२आणि टोकियो २०२१मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेला तरुणदीप राय इथलाच तर आहे. अशी कामगिरी करणारा कदाचित तो एकटाच असेल. गेल्या वर्षी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग-गोले यांनी या पद्मश्री पुरस्कार विजेत्याला सन्मानित करण्यासाठी राज्यात तरुणदीप राय धनुर्विद्या अकादमी स्थापन करण्याचंही जाहीर केलंय.
पश्चिम बंगाल, नेपाळ आणि भूतानमधील तिरंदाजीचे संघ गंगटोक आणि या राज्याच्या इतर भागांतील रॉयल पॅलेस मैदानांवर आयोजित होणाऱ्या उच्चदर्जाच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी सिक्कीमला नियमित भेट देत असतात. लक्षणीय गोष्ट म्हणजे बेअर बो धनुर्विद्येसह पारंपारिक खेळ आजही सिक्कीमी लोकांमध्येच लोकप्रिय आहेत. आधुनिक स्वरुपाच्या स्पर्धांमधल्या अतिशय किचकट तांत्रिक धनुष्यापेक्षाही लोकप्रिय.
भुटिया कुटुंब आम्हाला एक नवलाची गोष्ट सांगतं. पारंपारिक धनुष्य मिळेल अशी कुठलीही दुकानं इथे नाहीत. बाण मात्र अजूनही काही स्थानिक दुकानांमधून खरेदी करता येतात, पण धनुष्यं मात्र मिळत नाहीत. “खरेदीदारांना स्थानिक बाजारात आणि तिरंदाजांकडून आमच्याबद्दल समजतं. आणि मग ते आम्हाला घरी येऊन भेटतात. तसं हे फार मोठं ठिकाण नाही आणि आमचं घर शोधायला कुणाला फार कष्टही घ्यावे लागत नाहीत. इथं प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखतो,” असं ८० पार केलेले त्शेरिंग म्हणतात.
धनुष्य खरेदी करणारे सिक्कीमच्या वेगवेगळ्या भागांतून, शेजारच्या राज्यांमधून आणि अगदी भूतानमधूनही येतात. "ते गंगटोक आणि कार्थोकमधून किंवा त्या मार्गे येतात," असं त्शेरिंग नेपाळीत सांगतात. राज्यातील बहुतेकांप्रमाणे त्यांचं कुटुंबही हीच भाषा बोलतं.
धनुष्यं कशा तऱ्हेनं बनवली गेली, त्शेरिंग केव्हा बनवायला शिकले आणि केव्हा त्यांनी स्वतः बनवायला सुरुवात केली; याविषयी आम्ही बोलत असतानाच काहीतरी शोधत ते शांतपणे घरात जातात. साधारण तीन मिनिटांनंतर ते हसत, उत्साहात बाहेर येतात - अनेक दशकांपूर्वी त्यांनी तयार केलेल्या धनुष्यबाणांचा एक गठ्ठा घेऊन आणि हे तयार करताना ते वापरत असलेली अवजारं आणि साधनं घेऊन.
“हे सगळं मी ४० किंवा त्याहूनही अधिक वर्षांपूर्वी तयार केलं होतं. यातले काही खूप, खूप वर्षांचे आहेत. माझ्यापेक्षा थोडेच लहान,” ते हसत हसत म्हणतात. “हे बनवण्यासाठी मी कधीच कुठलंही इलेक्ट्रिक यंत्र किंवा साधन वापरलेलं नाही. ही सगळी हाताची सफाईदार कारागिरी होती.”
सांगे त्शेरिंग म्हणतात, “आम्ही सध्या वापरत असलेले बाण हे सुधारित पद्धतीचे आहेत. मला आठवतंय, की मी लहान असताना बाणाची शेपटी वेगळी बनवली जायची. पूर्वी, शेपटीला बदकाचे पंख लावलेले असायचे. आता आधुनिक बाण अधिक करून भूतानमधून येतात.” सांगे त्यांच्या हातातील बाण माझ्याकडे सोपवून यंत्राच्या सहाय्याने तयार केलेली, आधुनिक धनुष्यं आणण्यासाठी परत घरात जातात.
सांगे म्हणतात, “जे लोक आमच्याकडे हलक्या आणि स्वस्त प्रकारची धनुष्यं मागतात, त्यांना आम्ही फारसं फाइलिंग आणि पॉलिशिंग न करता एक साधासुधा धनुष्य विकतो, ४०० रुपयांना. बांबूचा वरचा भाग तकलादू असतो त्यामुळे आम्ही सहसा तो वापरत नाही. साध्या धनुष्यासाठी आम्ही असा तुकडा वापरतो. पण एक बारीक, तीन थराचा, पूर्णपणे पॉलिश केलेला धनुष्य ६००-७०० रुपयांपर्यंत जातो. असा धनुष्य बनवण्यासाठी आम्ही बांबूचा खालचा, मजबूत भाग वापरतो.”
“एक चांगला, बारीक धनुष्य बनवण्यासाठी अंदाजे १५० रुपयांचा बांबू, ६० रुपयांचा धागा किंवा तार लागते पण पॉलिशसाठी किती खर्च येतो ते काढणं कठीण आहे,” असं सांगे हसत म्हणतात.
असं का बरं?
“आम्ही पॉलिश घरीच बनवतो. बरेचदा दशैनच्या (दसरा) दरम्यान आम्ही चामडं (बकरीचं कातडं) विकत घेतो आणि पॉलिशिंगसाठी त्यातून मेण काढून घेतो. जेव्हा धनुष्य बनवण्याचं काम पूर्ण होतं, तेव्हा त्यावर पॉलिश केलं जातं. पहिला थर सुकल्यावर दुसरा थर चढवला जातो आणि तीन कोटिंग्स होईपर्यंत हे चालू राहतं. बकऱ्याच्या कातडीचा १ x १ फुटाचा तुकडा आम्हाला १५० रुपयांनापडतो,” असं सांगे सांगतात. ज्या पद्धतीनं ते पॉलिश करतात, वापरतात; त्यामुळे पॉलिशिंग प्रक्रियेची नेमकी किंमत काढणं त्यांना अवघड जातं.
“अरे हो, आणि मुख्य सामग्री म्हणजे धनुष्याचा कणा,” ते पुढं म्हणतात, “तो बांबू आम्हाला प्रति नग ३०० रुपयांना पडतो. एका मोठ्या बांबूपासून आम्ही पाच धनुष्यं सहजपणे बनवू शकतो.”
सांगे आत गेले आणि बाहेर आले ते तिरंदाजीची एक मोठी किटबॅग घेऊन. त्यातून एक मोठा आणि जड प्रकारातला धनुष्य बाहेर काढत ते म्हणाले, "हे आहे आधुनिक पद्धतीच्या धनुष्याचं डिझाइन. पण हे वापरायला आमच्या स्थानिक स्पर्धांमध्ये परवानगी नाही. याच्यासोबत सराव कुणीही करु शकतं, पण सामना खेळण्यासाठी हातानं बनवलेलं पारंपरिक धनुष्य वापरणंच बंधनकारक आहे. माझे भाऊ आणि मीही, अशा टूर्नामेंटसमध्ये बाबांनी तयार केलेल्या धनुष्यानं खेळतो. यावेळी माझ्या भावानं दिल्लीहून काही वेगळ्या प्रकारचं वुड पॉलिश आणलं आणि त्यानं त्याचं धनुष्य रंगवलं. माझं धनुष्य हे आमचे बाबा अनेक वर्षांपासून वापरत असलेल्या पारंपारिक पेंटनं पॉलिश केलेलं आहे.”
भुटिया खेदानं सांगतात, की मागील काही वर्षांत धनुष्याची विक्री कमी झाली आहे. त्यांची धनुष्यं मुख्यतः लोसूंगच्या बौद्ध उत्सवात विकली जातात. हा उत्सव म्हणजे भुटिया जमातीचं सिक्कीमी नवीन वर्ष! संपूर्ण डिसेंबर महिना हा सण साजरा केला जातो. हा सुगीनंतरचा सण आहे आणि या वेळी तिरंदाजीच्या स्पर्धाही पाहायला मिळतात. “सणाच्या निमित्ताने अनेक लोकं इथल्या बुद्धविहारात येतात आणि आमच्याकडून धनुष्य खरेदी करतात. पण अलिकडच्या वर्षांमध्ये आम्ही वर्षाला जेमतेम चार ते पाच नग विकले आहेत. कृत्रिम धनुष्यांनी आता बाजारपेठ ताब्यात घेतली आहे. यातले बहुतेक जपानी बनावटीचे आहेत. सुरुवातीच्या काळात, सुमारे सहा-सात वर्षांपूर्वीपर्यंत, मी वर्षाला सुमारे १० धनुष्य विकू शकत होतो,” असं त्शेरिंग दोरजी ‘पारी’सोबत बोलता बोलता सांगतात.
पण वर्षभरात १० धनुष्यं विकूनही त्यांना फारसं उत्पन्न मिळालं नसतं. फर्निचर बनवणं, दुरुस्त करणं आणि इतर लहान स्वरुपाच्या सुतारकामानेच खरं तर या कुटुंबाला तारून नेलं. अंदाजे १० वर्षांपूर्वी जेव्हा ते पूर्ण वेळ हाच व्यवसाय करत होते आणि कुटुंबातले एकमेव कमावते सदस्य होते, तेव्हा ते महिन्याला सरासरी १०,००० रुपये कमवत होते. पण त्यांना भुरळ पडलीये ती धनुष्याचीच. तेव्हाही आणि आताही.
भुटिया लोक हाताने जी धनुष्यं बनवतात ती एका विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून तयार केली जातात. त्या लाकडाला ‘भूतानी बांबू’ असं म्हणतात. सांगे म्हणतात, “बाबांनी बनवलेले सगळे धनुष्य हे भुतानी बांबूपासून बनवलेले आहेत. पूर्वी हे लाकूड भारतात उपलब्ध नव्हतं. काही शेतकर्यांनी या जातीचं बियाणं इथून 70 किलोमीटरवर असलेल्या पश्चिम बंगालमधल्या कॅलिमपाँगमध्ये पेरलं होतं. त्यांच्याकडून आता आम्हाला हे लाकूड मिळायला लागलंय. मी स्वतः तिथं जातो आणि एकाच वेळी दोन वर्षांसाठी लागतील एवढे बांबू विकत घेतो आणि इथं कार्थोकमधील घरी ठेवून देतो.”
त्शेरिंग म्हणतात की “तुम्हाला आधी गुरु मिळाला पाहिजे. गुरूशिवाय कुणीही काहीही करू शकत नाही. सुरुवातीला मी फक्त एक सुतार होतो. पण नंतर मी माझ्या वडिलांकडून धनुष्यबाण बनवायला शिकलो. माझे मित्र जी धनुष्यं चालवायचे, त्या धनुष्यांच्या डिझाइन्स मी पाहत असायचो आणि त्याप्रमाणं काही बनवण्याचा प्रयत्न करायचो. हळूहळू ते छान आकार घेऊ लागले. जेव्हा जेव्हा एखादं धनुष्यं विकत घेण्यासाठी कुणी मला संपर्क साधायचे, तेव्हा सगळ्यात आधी मी त्यांना ते वापरून दाखवायचो!”
एक हस्तकला म्हणून धनुष्य बनवतानाच्या, अगदी सुरुवातीच्या दिवसांबद्दल ह्या ८३ वर्षांच्या म्हातारबाबाला आताही ओढ आणि आस्था आहे. "यातून होणारी माझी कमाई सध्या नगण्य आहे – पण १० वर्षांपूर्वी बरी होती. साधारण आता एक दशक झालं असेल, माझं घर आणि हे घर, दोन्ही माझी मुलंच चालवतायत. आता मी धनुष्य बनवतोय ती काही कमाईचं साधन नाहीत. ते प्रेमाचे श्रम आहेत म्हणा ना.”
“आता बाबा फारशी धनुष्यं बनवत नाहीत, त्यांची दृष्टी क्षीण झाली आहे. पण तरीही ते थोडी तरी बनवतातच,” सांगे त्शेरिंग खेदाने म्हणतात.
"त्यांच्यानंतर ही कला कोण पुढं घेऊन जाईल, काही सांगू शकत नाही."
अनुवादः प्राजक्ता धुमाळ