अपघातात पाय गमवावा लागलेल्या २८ वर्षांच्या बिमलेश जयस्वालनी एक धाडसी निर्णय घेतला, मुंबईलगतच्या पनवेलमधल्या आपल्या भाड्याच्या घरून निघायचं आणि १२०० किलोमीटरवरच्या मध्य प्रदेशातल्या रेवा जिल्ह्यातल्या आपल्या गावी पोचायचं, तेही होंडा ॲक्टिव्हा या आपल्या दुचाकीवर. त्याच्या गाडीला जास्तीची चाकं आहेत. आपली पत्नी, २६ वर्षीय सुनीता आणि ३ वर्षांची लेक, रुबी यांना घेऊन त्याने हा प्रवास केला. “दुसरा काही पर्यायच नव्हता,” तो सांगतो.
बिमलेश पनवेलमध्ये एका कंत्राटदाराबरोबर त्याच्या हातातल्या प्रकल्पांवर काम करायचा – घरं बांधून झाली की ती साफसुफ करायची. “एका पायाने काहीही करायचं म्हटलं तर मुश्किलच आहे, पण आता जे आहे ते करायला तर लागणारच,” रेवा जिल्ह्यातल्या आपल्या होनौती गावातल्या आपल्या घरून त्याने मला फोनवर सांगितलं. या हिकमतीच्या जोरावरच त्याने हा थक्क करणारा प्रवास केला, तोही पारा कधी कधी ४० अंशाच्या वर गेला असताना. एखाद्याची जिद्द, उमेद तर यातून दिसतेच – पण सोबतच त्यांच्यासारख्या स्थलांतरित कामगारांची घरी परतण्यासाठीची धडपडही कळून येते.
कोरोना विषाणूचा पैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली आणि रोजंदारीवर काम करणारे बिमलेशसारखे लाखो कामगार गर्तेत सापडले. “आम्हाला कामच नव्हतं, त्यामुळे रोजचं खाणं कसं मिळवायचं हेही आम्हाला माहित नव्हतं,” तो सांगतो. “घरभाडं आणि विजबिल भरणं तर दूरचीच गोष्ट. फक्त चार तासांची सूचना देऊन कुणी तरी देश बंद करतं का?”
तरीही हे कुटुंब ५० दिवस पनवेलमध्ये कसं तरी राहिलं. “स्थानिक संस्था आम्हाला जेवण आणि धान्य देत होत्या,” बिमलेश सांगतो. “आम्ही कसं तरी भागवलं. प्रत्येक टप्प्यावर वाटायचं आता टाळेबंदी उठणार म्हणून. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता चौथा टप्पा सुरू होणार आहे म्हणून, तेव्हा मात्र वाटायला लागलं की हे असंच कायम चालू राहणार. मुंबई आणि आसपासच्या भागात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढायला लागलेत, त्यामुळे तिथे हिनौतीमध्ये घरच्यांनाही काळजी लागून राहिली होती.”
त्यामुळे मग त्यांनी पनवेलमधली भाड्याची खोली सोडण्याचा मध्य प्रदेशात परत जाण्याचा निर्णय घेतला. “आमचे घरमालक भल्या दिलाचे आहेत, त्यांनी २,००० रुपये भाड्यासाठी फार तगादा लावला नाही,” तो सांगतो. “आमची परवड त्यांना दिसत होती.”
परत जाण्याचा निर्णय पक्का झाला. त्यांच्याकडे तीन पर्याय होते, सुनीता सांगतेः राज्य सरकारतर्फे आयोजित श्रमिक रेल्वेची वाट पहायची हा एक पर्याय. “पण आम्हाला कधीची तारीख मिळेल याचा काहीही अंदाज किंवा शाश्वती नव्हती.” दुसरी शक्यता म्हणजे मध्य प्रदेशला जाणाऱ्या ट्रकपैकी एकात जागा मिळवणे. “पण ट्रकचालक प्रत्येकाचे ४,००० रुपये मागत होते.”
त्यामुळे मग जैस्वाल यांच्याकडे केवळ स्कूटरने जाण्याचाच पर्याय राहिला. मी १५ मे रोजी बिमलेश यांना मुंबई-नाशिक राज्यमार्गावरच्या खारेगाव टोलनाक्यावर भेटलो होतो, तेव्हा त्यांच्या १२०० किलोमीटर प्रवासातलं केवळ ४० किलोमीटर अंतर त्यांनी कापलं होतं. क्षणभर विश्रांती घ्यायला म्हणून ते रस्त्याच्या कडेला थांबले होते. स्कूटरवर पाय ठेवतो त्या जागी दोन बॅगा घुसवल्या होत्या. सुनीता देखील जरा अंग मोकळं करायला खाली उतरली होती, आणि रुबी तिच्या कुशीत खेळत होती.
बिमलेशच्या कुबड्या स्कूटरला टेकवून ठेवल्या होत्या. “२०१२ साली माझा मोटरसायकलवर गंभीर अपघात झाला होता,” तो सांगत होता. “माझा डावा पाय गेला. तेव्हापासून मी या कुबड्या वापरतोय.”
आणि त्या आधी चार वर्षं, २००८ साली डोळ्यात मोठाली स्वप्नं घेऊन मुंबईत कामाच्या शोधात आला होता – बिमलेशने बांधकामावर मजूर म्हणून काम केलं. त्या दरम्यान तो महिन्याला ५,०००-६,००० रुपये कमवत असे.
आणि मग त्याचा अपघात झाला – मोटरसायकलवर मागे बसला असताना मागून एका ट्रकने त्याला ठोकर दिली आणि त्याच्या पायाचा चेंदामेंदा झाला. ही २०१२ ची गोष्ट आहे.
तेव्हापासून तो कंत्राटदाराबरोबर घरं झाडण्याचं आणि साफ करण्याचं काम करतोय. ज्याचे त्याला महिन्याला ३००० रुपये मिळतायत. दहा वर्षांपूर्वी ते जितकं कमवत होता, त्याच्या निम्मे. सुनीता देखील टाळेबंदी लागण्याआधी घरकामगार म्हणून काम करत होती – दोघं मिळून महिन्याला ६,००० रुपये कमवत होते.
रुबीचा जन्म झाल्यानंतरही सुनीताने कामं सुरूच ठेवली होती. पण २५ मार्चपासून तिची कमाईच थांबली आहे – तिच्या मालकिणीने तिला या मधल्या काळासाठी पगार दिलेला नाही. मध्य प्रदेशला परत जाईपर्यंत हे कुटुंब एका छोट्या खोलीत राहत होतं – आणि बाहेरच्या सामायिक संडासचा वापर करत होतं – त्यासाठी महिन्याच्या भाड्याचा तिसरा हिस्सा त्यांना द्यावा लागत होता.
१५ मे रोजी आम्ही बोलत होतो. बिमलेश संधीप्रकाशात शांतपणे बसला होता. महामार्गावर कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेंपोंची वर्दळ सुरूच होती. टाळेबंदी लागू झाल्यापासून मुंबईत राहणारे लाखो स्थलांतरित कामगार बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि इतरत्र असणाऱ्या आपापल्या घरी परतू लागले आहेत, मिळेल त्या वाहनाने. मुंबई-नाशिक महामार्गाची वर्दळ या काळात खळलीच नाहीये.
आणि याच मार्गावर गंभीर अपघातही झालेत – गर्दीने खचाखच भरलेले ट्रक कलंडून स्थलांतरित कामगारांचे मृत्यू झाले आहेत. बिमलेशला या सगळ्याची जाणीव आहे. “खोटं कशाला बोलायचं? मला भीती वाटतेच,” तो म्हणाला. “पण मी रात्री १० वाजल्यानंतर स्कूटर चालवणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला. आणि घरी पोचलो ना की तुम्हाला फोन नक्की करीन.”
तर, त्याने त्याचा दुसरा शब्द मात्र नक्कीच पाळला. १९ मेच्या सकाळी माझा फोन वाजला. “सरजी, आम्ही आत्ताच घरी पोचतोय,” बिमलेशनी सांगून टाकलं. “आम्हाला पाहून माझे आई-वडील तर जवळ जवळ रडायलाच लागले. त्यांच्या नातीला पाहून खूश आहेत दोघं.”
बिमलेश म्हणाला की जे चार दिवस आणि रात्री ते फोनवर होते, तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त तीन तास झोप घेतली असेल. “मी अगदी डावीकडच्या लेनमधून, सावकाश एका गतीत माझी स्कूटर चालवत होतो,” तो म्हणतो. “रात्री २ पर्यंत प्रवास करायचा आणि पहाटे ५ वाजता परत सुरू.”
रोज रात्री एखादं मोठं झाड बघून ते थोडी झोप घेत. “सोबत अंथरुणं होती, पसरायची आणि झोपायचं,” बिमलेश सांगतो. “मला आणि माझ्या बायकोला गाढ झोप लागलीच नाही कारण सतत बाजूने चाललेल्या वाहनांचा आवाज यायचा, सोबतचं सामान होतं आणि बरोबर नेत असलेले पैसे.”
तसं पाहिलं, तर खरं तर त्यांच्या प्रवासात फारसं काहीच घडलं नाही. राज्याच्या सीमेवर या कुटुंबाला तपासणीसाठीही थांबवलं गेलं नाही.
आणि सगळ्यात लक्षणीय गोष्ट म्हणजे बिमलेशची विनागियरची दुचाकी, जी प्रामुख्याने शहरात चालवण्यासाठी आहे, ती चार दिवसांच्या अथक प्रवासात एकदाही बंद पडली नाही.
त्याने जवळ पेट्रोल आणि खाण्यापिण्यासाठी २,५०० रुपये ठेवले होते. “काही पेट्रोल पंप सुरू होते, त्यामुळे असा एखादा पंप दिसला की आम्ही टाकी पूर्ण भरून घ्यायचो,” तो म्हणाला. “आम्हाला आमच्या लेकीची काळजी होती. पण उष्मा आणि गरम हवा तिने सहन केली. आम्ही तिच्यासाठी पुरेसं खाणं सोबत घेतलं होतं आणि रस्त्यात भेटलेल्या भल्या लोकांनी तिला बिस्किटं वगैरे दिली.”
गेल्या दशकभरापासून मुंबई हेच बिमलेशचं दुसरं घर झालं होतं. टाळेबंदीपर्यंत तरी त्याला तसंच वाटत होतं. “गेल्या काही आठवड्यांपासून मला असुरक्षित वाटत होतं,” तो म्हणतो. “संकटसंयी तुम्हाला आपल्या कुटुंबासोबत असावं असं वाटतं. आपलं गणगोत जवळ असावंसं वाटतं. गावाकडे काहीच काम नव्हतं म्हणून मी मुंबईला आलो होतो. आणि आजही चित्र तेच आहे.”
हिनौतीमध्ये त्याची जमीन नाही. या कुटुंबाची कमाई रोजंदारीतून होते. “आता मजुरीच करायची तर ती जिथे हाताला नेहमी काम मिळेल अशा ठिकाणी करावी,” तो सांगतो. “सगळं काही ठीकठाक झाल्यावर मला मुंबईला परत जावंच लागेल. स्थलांतर करून येणारे बहुतेक कामगार गावाकडे काही काम मिळत नाही म्हणूनच शहरात येतात. त्यांना शहरांचं प्रेम आहे म्हणून नाही.”
अनुवादः मेधा काळे