काही क्षणात अहमदाबादच्या हजारो ठिकाणांहून ते आकाशात झेपावतील. कुठल्याही हवाई प्रदर्शनापेक्षा हे दृश्य शतपटीने सुंदर आणि रंगीबेरंगी. या खगांचे चालक आणि मालक मात्र जमिनीवरच. त्यांच्या मालकीची उड्डाणं भरणारी ही वस्तू नक्की कुणी बनवलीये याची त्यांना सुतराम कल्पना नाही. जवळ जवळ पूर्ण वर्षभर आठ एक जणांचा गट अविरत काम करत यांची निर्मिती करतो. आणि या गटात बहुतेक सगळ्या स्त्रिया आहेत, गावाकडच्या किंवा छोट्या उपनगरांतल्या. त्यांच्या अत्यंत क्लिष्ट, नाजूक आणि कष्टाच्या कामाचा मोबदला मात्र अगदी फुटकळ आहे आणि त्या स्वतः हवेत उड्डाण करण्याची शक्यता जवळपास नाहीच.
मकर संक्रांत आलीये आणि या सणानिमित्त शहरात उडवले जाणारे रंगीबेरंगी पतंग अहमदाबादमध्येच तयार झालेत आणि गुजरातच्या आणंद जिल्ह्यातल्या खंबात तालुक्यात. आणि ते तयार करणाऱ्या बाया चुनारा या गरीब हिंदू समाजाच्या आणि मुस्लिम आहेत. पतंग उडवणाऱ्यांमध्ये हिंदूंची संख्या अधिक.
या बाया वर्षातले १० महिने पतंग बनवण्याचं काम करतात. खास करून १४ जानेवारीला आकाशात झेपावणारे पतंग त्यांच्याच हातून तयार झालेत. पण त्यांना मिळणारा मोबदला मात्र अगदीच फुटकळ. गुजरातमध्ये पतंगांचा उद्योग ६२५ कोटी रुपयांचा आहे आणि तब्बल १.२८लाख लोकांना यात रोजगार मिळतो. या उद्योगात काम करणाऱ्या दर दहांपैकी सात बाया आहेत.
“तयार होण्याआधी प्रत्येक पतंग सात जणांच्या हातून जातो,” ४० वर्षीय सबीन अब्बास नियाझ हुसैन मलिक सांगतात. खंबातमधल्या लाल महाल परिसरातल्या त्यांच्या घर आणि दुकान असलेल्या १२ बाय १० चौरस फुटी खोलीत आम्ही बसलो होतो. सुंदरशा पतंगांची फारशी माहित नसलेली बाजू ते आम्हाला उलगडून सांगत होते. त्यांच्या मागे विक्रेत्यांना पाठवण्यासाठी तयार पतंग चंदेरी कागदात बांधून तयार होते.
त्यांच्या या एका खोलीतली जवळपास सगळी जमीन रंगीबेरंगी पतंगांनी व्यापलेली होती. पतंग तयार करणारी त्यांची ही तिसरी पिढी आहे. ते दर वर्षी पतंग तयार करण्याचं कंत्राट घेतात आणि त्यांच्यासोबत काम करणारी ७० जणांची फौज मकर संक्रांतीपर्यंत मोठ्या संख्येने पतंग तयार करते. खरं तर सात नाही त्यांचे धरून आठ जणांचे हात पतंगांना लागलेले असतात असं म्हणायला हरकत नाही.
मकर संक्रांत साजरी करण्याचं कारण म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश असं मानलं जातं. भारतभरात हा सुगीचा सण आहे आणि वेगवेगळ्या भागात तो विविध प्रकारे साजरा केला जातो. आसाममध्ये माघ बिहु, बंगालमध्ये पौष पर्बो आणि तमिळ नाडूमध्ये पोंगल. गुजरातेत त्याला उत्तरायण म्हणतात कारण हिवाळ्यामध्ये सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. आजच्या घडीला उत्तरायण म्हणजे पतंगांचा सण असं समीकरण तयार झालं आहे.
आमच्या जुन्या घराच्या गच्चीवरून मी सगळ्यात पहिल्यांदा, सहा वर्ष वयात पतंग उडवला होता. आमचं घर आमच्या परिसरात, जुन्या अहमदाबाद शहरातलं सगळ्यात उंच होतं. आणि वारा जोरात असला तरी माझा पतंग हवेत झेपावण्यासाठी आणखी तीन-चार जणांची मदत लागायचीच. त्यातलेही सगळ्यात पटाईत हात असायचे माझ्या वडलांचे. पतंगाची किन्ना म्हणजेच कन्नी बांधायचं काम तेच करायचे.
दुसरे तरबेज हात होते माझ्या आईचे. ती मांजा गुंडाळलेली फिरकी धरून उभी असायची. आणि तिसरी व्यक्ती होती आमच्या शेजारच्या इमारतीतला एक निनाव माणूस जो माझा पतंग हातात धरून त्याच्या गच्चीच्या दुसऱ्या टोकाला जाऊन हवेत उडवायचा. पातळ कागदाचा हा रंगीत तुकडा हवेत झेपावेपर्यंत आणि तो खरंच उडू लागेपर्यंत तो तिथेच असायचा.
जुन्या अहमदाबादमध्ये लहानाचं मोठं होताना पतंग हा एक अविभाज्य भाग होता. आणि हे पतंग म्हणजे विविध रंगांचे, विविध आकाराचे रंगीत तुकडे जे माळ्यावरच्या संदुकींमध्ये बाहेर येण्याची वाट पाहत असायचे किंवा उत्तरायणाच्या आधी बाजारातल्या गर्दीत जाऊन विकत आणले जायचे. या पतंगांचा इतिहास काय आहे किंवा ते तयार करण्याची कला काय आहे याचा कसलाही विचार मनात यायचा नाही. वर्षातले थोडेच दिवस आकाशात झेपावणारे हे पतंग वर्षभर तयार करणाऱ्या अदृश्य कारागिरांचं आयुष्य वगैरे तर सोडाच.
या हंगामात पतंग उडवणे, त्यातली चढाओढ हा लहान मुलांचा सगळ्यात आवडता खेळ असतो. पतंग तयार करणं हा मात्र पोरखेळ नाही.
*****
“प्रत्येक काम वेगवेगळा कारागीर करतो,” सबीन मलिक सांगतात. “एक जण कागद कापतो, दुसरा पान चिकटवतो, तिसरा दोरी चिकटवतो. चौथा धड्ढो म्हणजेच पतंगाचा मधली कामटी लावतो. त्यानंतर पुढचा कारागीर कमान लावतो, आणि त्यानंतर एक जण मोर, चिपा, माथा जोडी, नीची जोडी असे पतंग टिकावा म्हणून चिकटवले जाणारे वेगवेगळे तुकडे लावतो. आणि त्यानंतर फुदडी किंवा शेपूट लावली जाते.”
मलिक माझ्यासमोर एक पतंग धरतात आणि मला समजावून सांगतात. बोटाने सगळे वेगवेगळे भाग ते मला दाखवतात. मी समजून घेण्यासाठी माझ्या वहीत साधंसं चित्र काढून घेते. या साध्याशा पतंगाचं काम मात्र वेगवेगळ्या भागात चालतं.
“शकरपूरमध्ये, इथून एक किलोमीटरवर आम्ही फक्त कडांना दोरा (गुजरातीत दोरी ) लावण्याचं काम करून घेतो,” सबीन मलिक त्यांच्या कामाची साखळी कशी काम करते ते मला सांगतात. “अकबरपूरमध्ये ते फक्त पान किंवा सांधा तयार करतात. तिथेच जवळ दाडिबामध्ये धड्ढा (पतंगाच्या कण्याची कामटी) लावला जातो. इथून तीन किलोमीटरवरच्या नागरा गावात कमान आणि मटण मार्केट भागात पट्टी काम. तिथेच शेपट्याही लावल्या जातात.”
खंबात, अहमदाबाद, नडियाड, सुरत आणि गुजरातेत इतरत्र तयार होणाऱ्या पतंगांच्याही सुरस कहाण्या आहेत.
अहमदाबादच्या मुनावर खान यांची या धंद्यातली ही चौथी पिढी आहे. पतंगाचा कागद - बल्लारपूर किंवा त्रिबेणी - मागवण्यापासून त्यांचं काम सुरू होतं. कागदाची नावं कागद तयार करणाऱ्या कंपन्यांवरून पडली आहेत. अहमदाबादची बल्लारपूर इंडस्ट्रीज आणि कोलकात्याची त्रिबेणी टिश्यूज. बांबूच्या कामट्या आसामातून मागवल्या जातात आणि कोलकात्यात त्या वेगवेगळ्या आकारात कापल्या जातात. कागदाचे ताव त्यांच्या कारखान्यात पाठवले जातात आणि त्याचे विविध आकाराचे तुकडे कापले जातात.
२० ताव एकावर एक ठेवून त्याचे कटरने पतंगासाठी लागणारे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे कापले जातात. या तुकड्यांचे गठ्ठे पुढच्या कारागिराकडे पाठवले जातात.
खंबातमध्ये ४१ वर्षीय राज पतंगवाला हेच काम करतात. “मला सगळी कामं येतात,” ते म्हणतात. बोलता बोलता हाताने पतंगांसाठी वेगवेगळ्या आकारात कागद कापण्याचं काम सुरू असतं. “पण मी एकटा खूप जास्त काम करू शकत नाही. आमच्याकडे खंबातमध्ये खूप कारागीर आहेत. काही जण मोठाले पतंग तयार करतात तर काही छोटे. आणि प्रत्येक आकारात किमान ५० प्रकारचे पतंग तुम्हाला मिळतील.”
माझ्या नवशिक्या हातांनी माझा घेंशियो (खाली शेपूट असलेला पतंग) गच्चीपासून कसाबसा तीन मीटर वर जायचा तोपर्यंत आकाशात रंगीबेरंगी पतंगांची युद्धं सुरू झालेली असायची. मोठे पंख असलेल्या शिकारी पक्ष्यांच्या आकाराचे चील पतंग, मध्यभागी एक किंवा दोन गोलाकार कागद चिकटवलेले चांदेदार आणि आडव्या किंवा तिरक्या रंगीत पट्ट्या असलेले पट्टेदार आणि इतरही अनेक प्रकारचे पतंग आकाश व्यापून टाकायचे.
पतंगाचा आकार, रंग आणि नक्षीकाम जितकं नाजूक तितकेच पतंग बनवणाऱ्यांचे हातही निष्णात. कारण अशा पतंगांचे विविध तुकडे चिकटवण्यासाठी तितकीच मेहनतही जास्त लागणार. चाळिशीच्या कौसर बानू सलीमभाई खंबातच्या अकबरपूर भागात राहतात आणि गेली तीस वर्षं त्या हेच काम करत आहेत.
पतंगाच्या वर लावले जाणारे वेगवेगळे रंगीत तुकडे कापून, चिकटवून त्या पतंगाची कलाकुसर पूर्ण करतात. “इथे हे काम करणाऱ्या आम्ही सगळ्या बायका आहोत,” तिथे काम करणाऱ्यांकडे बोट दाखवून कौसर बानू सांगतात. “पुरुष लोक वेगळी कामं करतात. फॅक्टरीत कागदाचे ताव कापणं किंवा पतंगांची विक्री.”
कौसर बानू सकाळी, दुपारी आणि अनेकदा रात्री देखील काम करतात. “बहुतेक वेळा मला १००० पतंगांचे १५० रुपये मिळतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जेव्हा पतंगांना खूपच मागणी असते तेव्हा २५० रुपये मिळू शकतात,” त्या सांगतात. “आम्ही सगळ्या घरीच काम करतो आणि स्वयंपाकाचं कामही सुरूच असतं.”
२०१३ साली सेवा (सेल्फ एम्प्लॉइड विमेन्स असोसिएशन) संघटनेने केलेल्या एका अभ्यासानुसार या उद्योगात असलेल्या २३ टक्के स्त्रियांना महिन्याला ४०० रुपयांपेक्षा कमी मोबदला मिळतो. बहुतेकींना ४०० ते ८०० रुपयांच्या मध्ये पैसे मिळतात. आणि फक्त ४ टक्के स्त्रिया महिन्याला १,२०० रुपये कमवतात.
याचा अर्थ असा की बहुतेक महिला कारागिरांना एखाद्या मोठ्या आणि डिझायनर पतंगापेक्षाही कमी मजुरी मिळते. कारण अशा पतंगांची किंमत अगदी १,००० रुपयांपर्यंत असू शकते. अगदी स्वस्तातले स्वस्त पतंग विकत घ्यायचे तरी १५० रुपयांना पाच असे घ्यावे लागतात. अगदी भारीतले पतंग घ्यायचे तर त्यांची किंमत १,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. पतंगांचे आकार, रंग किंवा प्रकार जसे तुम्हाला भुलवून टाकतात तशाच त्यांच्या किंमतीही. सगळ्यात छोटा पतंग २१.५ बाय २५ इंच आकाराचा असतो. आणि सगळ्यात मोठा यापेक्षा तिप्पट मोठा.
*****
थोडंसं अंतर उडून माझा गरीब बिचारा पतंग परत खाली आला तेव्हा तिथल्या कुणी तरी ओरडून सांगितलं, “धड्ढो मचाद!” (पतंगाची कामटी वाकव). मग मी माझ्या पिटकुल्या हातांनी पतंगाचं खालचं आणि वरचं टोक धरलं आणि मधली कामटी वाकवून पाहिली. ही कामटी लवचिक असावी लागते, पण इतकीही नाही की वाकवल्यावर तुटून जाईल.
पतंग उडवून किती तरी दशकं लोटली, आज मी खंबातच्या चुनारवादमधे २५ वर्षांच्या जयाबेनला काम करताना पाहतीये. बांबूची लवचिक कामटी पतंगाला चिकटवण्याचं काम ती करतीये. साबुदाण्याची खळ तिने घरीच केलीये. तिच्यासारख्या कारागिरांना १००० पतंगांना कामट्या चिकटवण्याचे ६५ रुपये मिळतात. ता पुढच्या कारागिराचं काम म्हणजे कमान चिकटवायची.
पण थांबा. कमान चिकटवण्याआधी तासून गुळगुळीत करावी लागते. चुनरवादच्या आशाबेन, वय ३६ गेली अनेक वर्षं बांबूच्या बारीक कामट्या तासण्याचं आणि त्यांना कमानीचा आकार देण्याचं काम करतायत. बांबूच्या कामट्यांचा गठ्ठा त्यांच्या पुढ्यात पडलाय. तर्जनीला सायकलच्या ट्यूबचं रबर गुंडाळून त्या धारदार चाकूने कामट्या तासून काढतायत. “या असल्या १००० कामट्यांचे मला ६०-६५ रुपये मिळतात,” आशाबेन सांगतात. “हे काम करताना बोटांना असले घट्टे पडतात. आणि मोठ्या कामट्या असतील तर बोटं कापून रक्तही येतं.”
आता कमानीच्या कामट्या गुळगुळीत झाल्या आहे आता त्यांना वाकवून कमानीचा आकार द्यायचाय. जमील अहमद, वय ६० यांचं अहमदाबादच्या जमालपूर भागात एक छोटंसं दुकान आहे आणि आजही ते कमानींना बाक देण्याचं काम करतात. आठ वातींचा रॉकेलचा दिवा पेटवून त्याच्या ज्योतीवरून ते मूठभर कामट्या फिरवतात. असं केल्यावर या कामट्यांवर काळ्या निशाण्या तयार होतात.
कमानी चिकटवण्यासाठी जमील एक विशेष प्रकारचा गोंद वापरतात. “पतंग तयार करत असताना तुम्हाला तीन चार वेगवेगळे गोंद वापरावे लागतात. प्रत्येक गोंद वेगळ्या पदर्थांपासून बनवला जातो आणि कमी जास्त पातळ असतो.” ते आता फिक्क्या निळ्या रंगाची खळ वापरतायत. मैदा आणि मोर थु थु म्हणून ओळखला जाणारा निळा रंग मिसळून ही खळ तयार केली जाते. हजार कमानी चिकटवल्या की त्यामागे १०० रुपये मिळतात.
पतंगाला वरच्या बाजूला असलेला दोरा (गुजरातीत याला दोरी म्हणतात) लावण्यासाठी अहमदाबादच्या जुहापुरातली ३५ वर्षीय शाहबिया वेगळ्या प्रकारची खळ वापरते. शिजवलेल्या भातापासून ती खळ तयार करते. आणि गेली कित्येक वर्षं ती हे काम करतीये. ती काम करतीये तिथे तिच्या डोक्यावर दोऱ्यांचा एक मनगटभर जाडीचा गठ्ठा लटकवलाय. त्यातला एका बारीक दोरा ती ओढून घेते. पतंगाच्या कडांमधून तो दोरा फिरवते आणि झटक्यात बोटाने पातळशी खळ त्यावर पसरवते. तिच्या बुटक्या मेजाखाली एका वाटीत लाइ (भाताची खळ) ठेवलेली असते.
“माझा नवरा घरी आला की मला हे काम करता येत नाही. मी हे असलं सगळं केलं तर त्याला राग येतो,” ती सांगते. तिच्या कामामुळे पतंगाला ताकद मिळते आणि तो हवेत भरकटत नाही. एक हजार पतंगांच्या कडांना दोरा चिकटवण्याच्या कामाचे तिला २०० ते ३०० रुपये मिळतात.
त्यानंतर इतर बाया प्रत्येक पतंगावर मधल्या कण्यावर आणि कमानीवर कागदाचे छोटे छोटे तुकडे चिकटवतात ज्यामुळे तो मजबूत होतो. या कामाचे त्यांना हजार पतंगांमागे ८५ रुपये मिळतात.
४२ वर्षांच्या फिरदौस बानूंच्या हातात पतंगांच्या शेपटाकडच्या रंगीबेरंगी झिरमिळ्यांचं इंद्रधनुष्य फडकत असतं. १०० झिरमिळ्यांचा एक गठ्ठा. अकबरपूरमध्ये फिरदौस यांचे पती रिक्षा चालवतात. त्या पूर्वी मागणीप्रमाणे पापड लाटायचं काम करायच्या. “ते फार जड काम आहे. आणि पापड वाळत घालायला आमच्याकडे गच्ची नाही. हे कामही काही फार साधं नाही, पैसेही फार मिळत नाहीत,” फिरदौस बानू सांगतात. “पण मला इतर फारसं काही येत पण नाही.”
पतंगाचा आकार, रंग आणि नक्षीकाम जितकं नाजूक तितकेच पतंग बनवणाऱ्यांचे हातही निष्णात हवेत कारण इतके सगळे वेगवेगळे तुकडे चिकटवावे लागतात
धारदार कात्रीने त्या ज्या लांबीच्या झिरमिळ्या हव्यात तशा कापून घेतात. नंतर कापलेल्या पट्ट्या त्यांच्या दोघी मुलींकडे, दिलशाद बानू, वय १७ आणि माहेरा बानू, वय १९ देतात. त्यानंतर त्या एक पट्टी घेतात आणि त्याला मध्यावरती आधीच तयार करून ठेवलेली लाइ किंवा खळ लावतात. त्यानंतर प्रत्येक जण पायाच्या बोटाला अडकवलेल्या दोऱ्यांच्या गठ्ठ्यातून एक दोरा काढते आणि त्याचं एक सैल लूप तयार करते. कागद लपेटून एक मस्त फुदडी किंवा शेपटाकडची झिरमिळ तयार करते. पतंगाचं पुढचं काम करणारा कारागीर यानंतर पतंगाला जेव्हा ही शेपटी जोडतो तेव्हा कुठे तो आकाशात झेपावण्यासाठी सज्ज होतो. या तिघी मिळून अशा हजार झिरमिळ्या तयार करतात तेव्हा त्यांना त्याचे तिघीत मिळून ७० रुपये मिळतात.
“लपेट...!!” या वेळी सगळे जण जोरात ओरडत होते. एकदम आक्रमकपणे. आकाशातून मांजा एकदम खाली आला, जड आणि लुळा पडलेला. शेजारशेजारच्या अनेक गच्च्यांवर तो पडला. खरंच, आज इतक्या वर्षांनंतरही माझा लाडका पतंग काटला गेल्याची आठवण मनात घर करून आहे.
आता मी पतंग उडवत नाही. पण या अख्ख्या आठवड्यात प्रत्येक पिढीतल्या मुलांना पतंग उडवता यावेत यासाठी इतकं सारं काम करणाऱ्या अनेकांना भेटण्याचा योग आला. त्यांचे अविरत कष्टच खरं तर मकर संक्रांतीचा सण इतका रंगीबेरंगी करून टाकतात.
या कहाणीचं वार्तांकन करण्यासाठी हाफेझा उज्जैनी , समीना मलिक आणि जाँनिसार शेख यांनी बहुमोल मदत केली . त्यांचे आभार .
शीर्षक छायाचित्रः खमरुम निसा बानू आता लोकप्रिय झालेल्या प्लास्टिकच्या पतंगाचं काम करतायत. छायाचित्रः प्रतिष्ठा पंड्या
अनुवादः मेधा काळे