द्रौपदी शबर पदराच्या टोकाने डोळे पुशीत राहतात. डोळ्याचं पाणी खळतच नाही. ओडिशाच्या गुडाभेली गावात आपल्या घराबाहेर त्यांची दोन नातवंडं, तीन वर्षांचा गिरीश आणि नऊ महिन्यांचा तान्हा विराज आजीपाशी बसून शांतपणे खेळतायत. आपल्या नातीच्या, तुलसाच्या मृत्यूचा शोक करणाऱ्या ६५ वर्षांच्या द्रौपदीला घरचे बाकी लोक शांत करण्याचा प्रयत्न करतायत.
“आता ‘माझी बाळी गं’ असं कुणाला म्हणायचं सांगा?” त्या स्वतःशीच बोलत राहतात.
तुलसाचं कुटुंब शबर आदिवासी आहे. नुआपाडाच्या खरियार तालुक्यातल्या आपल्या गावी विटामातीच्या घराबाहेर चवाळ टाकून सगळे बसले आहेत. तुलसाचा अचानक मृत्यू झाला तो धक्का अजून विरलेला नाही. तिची आई पद्मिनी आणि वडील देबानंद यांना नातवंडांचं, खास करून विराजचं कसं काय होणार याची काळजी लागून राहिली आहे. विराज तर अजूनही आईच्याच दुधावर होता. “माझी सून पद्मिनी आणि मी आळीपाळीने दोघांचं सगळं करतोय,” द्रौपदी सांगतात.
या लेकरांचा बाबा, भोशिंधु इथे नाही. पाचशे किलोमीटर दूर तेलंगणाच्या पेड्डापल्ली जिल्ह्यातल्या रंगापूर गावात एका वीटभट्टीवर तो कामाला गेला आहे. २०२१ साली डिसेंबर महिन्यात तो, त्याची आई आणि तुलसाची धाकटी बहीण दिपांजली असे तिघं सहा महिन्यासाठी भट्टीवर कामाला गेले. तिथे दिवसाला त्यांना अंदाजे २०० रुपये मजुरी मिळणार होती.
२४ जानेवारी २०२२ रोजी २५ वर्षांची तुलसा शबर चानतामालमध्ये आपल्या घरी होती. गुडाभेलीपासून हे गाव २० किलोमीटरवर आहे. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक तिच्या पोटात प्रचंड वेदना व्हायला लागल्या. “मी तिला खरियारच्या तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन गेलो,” तिचे सासरे ५७ वर्षांचे दसमू शबर सांगतात. “डॉक्टरांनी सांगितलं की तिची तब्येत गंभीर आहे. नुआपाडाच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जा असं ते म्हणाले. तिथे पोचेपर्यंत तुलसानी प्राण सोडला.”
दवाखान्यात पोचण्यासाठी लांबवरचा प्रवास ओडिशातल्या आदिवासींसाठी तसा नेहमीचाच. खरियारला पोचायला २० किलोमीटर आणि नुआपाडाला जायचं तर ५० किमी. ओडिशाच्या ग्रामीण भागातल्या १३४ सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची इतकी कमतरता आहे की तब्येतीची अचानक काहीही तक्रार उद्भवली तर लोकांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणीच जावं लागतं.
ग्रामीण आरोग्य सांख्यिकी २०१९-२० नुसार ओडिशाच्या आदिवासी भागांमध्ये किमान ५३६ डॉक्टर आवश्यक आहेत. यात शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांचा समावेश आहे. पण सध्या ४६१ पदं रिक्त आहेत. त्रिस्तरीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेमध्ये सगळ्यात वरती सामुदायिक आरोग्य केंद्र असतं आणि इथल्या भागात एक सामुदायिक आरोग्य केंद्र जवळपास लाखभर लोकांना आरोग्यसेवा देत असल्याचं दिसून आलं आहे.
तुलसाच्या जाण्याने दुःखात बुडालेल्या तिच्या कुटुंबावरचा आघात अधिकच तीव्र होण्याचं कारण म्हणजे तिचा नवरा त्या वेळी तेलंगणात कामावर होता.
२७ वर्षांचा भोशिंधु आपल्या पत्नीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी येऊही शकला नाही. “मी त्याला तुलसाचं असं झाल्याचं सांगितलं. त्याने त्याच्या मालकाकडे सुटीची मागणी केली. पण मालक तयार झाला नाही,” दसमू सांगतात. पेड्डापल्लीहून त्यांना परत आणण्यासाठी मजूर नेणाऱ्या गावातल्या सरदाराला (मुकादम) विनंती केली पण तिचाही फारसा काही उपयोग झाला नाही.
*****
भोशिंधुप्रमाणेच अनेक शबर आदिवासी कामाच्या शोधात स्थलांतर करतात. कधी थोड्या दिवसांसाठी तर कधी जास्त कालावधीसाठी. कधी हंगामी. खास करून घरात एखादा मोठा खर्च निघतो तेव्हा. या जिल्ह्याचं निम्मं क्षेत्र वनांचं आहे आणि इथले आदिवासी मोह, चारोळी अशा गौण वनोपजाची विक्री करून गुजराण करत आले आहेत. पावसाच्या पाण्यावर घरी खाण्यापुरती शेती देखील ते करतात. पण वनोपज विकून फारसा पैसा हाती येत नाही आणि शेती पावसाच्या भरोशावर असल्याने दुष्काळ आणि अपुऱ्या पावसाचा पिकांवर परिणाम व्हायला लागला आहे. या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सोयी नसल्यात जमा आहेत.
“खरीप हंगाम संपला की शेतात नेहमी कामं मिळत नाहीत. मग आमची सगळी भिस्त रोजगार हमीवर असते. पण तिथे पण मजुरी इतकी उशीरा मिळते की आम्हाला दुसरीकडे कामं शोधावीच लागतात,” महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचा आपला अनुभवच दसमू सांगतात. “माझा मुलगा आणि बायको दोघंही रस्ता दुरुस्तीच्या कामावर गेले होते, पण त्या कामाची मजुरी आजपर्यंत मिळालेली नाही. ४,००० रुपये थकले आहेत,” ते सांगतात.
खरिपात देखील फारशी काही कामं मिळत नसल्याचं दसमूंचे शेजारी रबींद्र सगरिया सांगतात. “त्यामुळे या भागातली तरुण मंडळी दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात कामासाठी गावं सोडतात,” ते म्हणतात. गावातले ६० जण कामासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यातले २० अगदी तरुण आहेत, सगरिया सांगतात.
नुआपाडाच्या शबर आदिवासींमध्ये फक्त ५३ टक्के लोक साक्षर आहेत. ओडिशाच्या ग्रामीण भागात साक्षरतेचं सरासरी प्रमाण ७० टक्के इतकं आहे. थोडी फार शाळा शिकलेले लोक मुंबई गाठतात पण बाकीचे मात्र आपल्या कुटुंबासह वीटभट्ट्यांवर घाम गाळतात. रोजंदारीवर अत्यंत हलाखीच्या, अमानवी परिस्थितीत गरम भाजलेल्या विटा डोक्यावरून वाहून नेण्याचं काम दिवसाचे १२ तास सुरू असतं.
स्थानिक सरदार किंवा मुकादम सहा महिन्याच्या कामासाठी एकूण मजुरीचा थोडा हिस्सा उचल म्हणून देतात आणि अकुशल कामगारांसाठी रोजगार शोधतात. आपल्या घराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी भोशिंधुच्या कुटुंबाला पैशाची गरज होती म्हणून त्यांनी या कामासाठी जायची तयारी दाखवली.
दसमू सांगतात की प्रधाम मंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत त्यांना घर मंजूर झालं. “पण मंजूर झालेल्या १ लाख ३० हजारात घराचं बांधकाम होत नाही.” जून २०२० पर्यंत मनरेगावर काम करून मिळालेली १९,७५२ रुपये मजुरी या कुटुंबाने बचत म्हणून मागे टाकली होती. तरी देखील आणखी लाखभर पैसे लागणार होते. “आम्ही कर्ज काढलं आणि ते फेडण्यासाठी सरदाराकडून उचल घ्यावी लागली,” ते सांगतात.
२०२१ साली या कुटुंबाने आणखीही कर्ज काढलं होतं. तुलसाला गरोदरपणात खूप त्रास होत होता. ती आजारी पडली होती आणि विराज अपुऱ्या दिवसांचा जन्माला आला. जन्मानंतर पहिले तीन महिने आई आणि बाळावर नुआपाड्याचं जिल्हा रुग्णालय आणि इथून २०० किमीवर असलेलं वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च या दोन दवाखान्यांमध्ये उपचार सुरू होते.
“आम्ही आमची दीड एकर जमीन ३५,००० रुपयांना गहाण टाकली आणि तुलसाने बचत गटातून उपचारासाठी म्हणून बँकेचं ३०,००० रुपयांचं कर्ज घेतलं,” दसमू सांगतात. ही कर्जं फेडण्यासाठी या कुटुंबाने सरदाराकडून उचल घेतली आणि गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तेलंगणाच्या वीटभट्ट्यांवर जाण्याचा निर्णय घेतला.
नुआपाडा हा ओडिशातल्या सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे. या आणि राज्याच्या पश्चिम व दक्षिणेकडच्या जिल्ह्यातले लोक कामासाठी आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तमिळ नाडू आणि कर्नाटकात स्थलांतर करून जात असल्याचं भारतातील देशांतर्गत स्थलांतर या अभ्यासात म्हटलं आहे. ओडिशातून अंदाजे पाच लाख कामगार स्थलांतर करतात. यातले दोन लाख बलांगीर, नुआपाडा, कलाहांडी, बउध, सुबर्णपूर आणि बारगड जिल्ह्यातले आहेत असं एका स्थानिक सामाजिक संस्थेने गोळा केलेल्या आकडेवारीतून दिसत असल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे.
वॉटर इनिशिएटिव्ह ओडिशा या संस्थेचे संस्थापक आणि संबलपूर स्थित सुप्रसिद्ध कार्यकर्ते रंजन पांडा यांनी स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नाचा बारकाईने अभ्यास केला आहे. “या प्रदेशातल्या लोकांना जोखमींचा सामना करावा लागतोय आणि एकमेकांत गुंतलेल्या विविध गोष्टींमुळे, खास करून वातावरण बदलाच्या समस्येमुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत चाललीये,” ते म्हणतात. “नैसर्गिक संसाधनांचा सातत्याने ऱ्हास होतोय आणि स्थानिक पातळीवरच्या रोजगाराच्या योजना अपयशी ठरल्या आहेत.”
*****
“तुम्ही पाहिलं असेल तिला. इतकी देखणी होती, काय सांगू?” भरल्या डोळ्यांनी द्रौपदी म्हणतात.
मृत्यूच्या काही दिवस आधी तुलसाने (१६ ते २४ फेब्रुवारी) २०२२ च्या पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी अरदा ग्राम पंचायतीत येणारी गावं पालथी घातली होती. चानतामाल हे आदिवासी-बहुल गाव अरदा पंचायतीत येतं आणि ती समितीच्या निवडणुकीला उभी राहिली होती. आदिवासी महिलेसाठी ही जागा राखीव होती आणि या गावात शालेय शिक्षण पूर्ण केलेली ती एकमेव आदिवासी महिला होती. शिवाय ती एक बचत गटही चालवायची. “आमच्या नातेवाइकांनी तिला निवडणूक लढ म्हणून गळ घातली,” दसमू सांगतात.
द्रौपदींनी मात्र तुलसाला निवडणुकीत उभी राहू नको असा सल्ला दिला होता. “तब्येत जरा सुधारली, त्याला सहा महिने पण झाले नव्हते. त्यामुळे माझा विरोधच होता,” त्या सांगतात. “त्या निवडणुकीनेच तिचा जीव घेतला.”
स्थलांतराचा निवडणुकांवरही परिणाम होतो असं स्थानिक नेते संजय तिवारी सांगतात. ते खरियार तालुक्याच्या बारगाव ग्राम पंचायतीत सरपंचपदाचे उमेदवार होते. मतदारांची संख्या कमी होते, खास करून जे गरीब भाग आहेत, तिथे. नुआपाडा जिल्ह्यातल्या लाखभराहून जास्त लोकांना मतदान करता आलं नाही. एकट्या बारगावमधले ३०० जण मतदानाच्या दिवशी गावी नव्हते, ते सांगतात.
“आपल्या देशात मतदान हा जणू उत्सव असल्याचा आपण दावा करतो पण भोशिंधु आणि त्याच्या आईसारख्या स्थलांतरित कामगारांना आपल्या जिवलगांच्या अंत्यसंस्कारासाठी देखील परत गावी येता येत नसेल तर हा दावा पोकळच ठरतो ना,” तिवारी म्हणतात.
भोशिधुंचा शेजारी सुभाष बेहेराच्या मते कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे कामं कमीच झाली आहेत आणि त्यामुळेच त्याच्यावर गाव सोडून जाण्याची वेळ आली. “इथे जर रोजगाराच्या संधी असत्या तर तो आपल्या पत्नीला एकटीने निवडणूक लढायला सोडून असा परगावी गेलाच नसता,” तो म्हणतो.
“कुठे गेलीस गं बयो? आम्हाला सोडून अशी का निघून गेलीस?”
द्रौपदीचा विलाप तिच्या अख्ख्या समाजाचाच दुःखावेग व्यक्त करत राहतो.
*****
ता . क . – तुलसाच्या मृत्यूला आठवडा उलटल्यानंतर पत्रकार अजित पांडा यांनी या कुटुंबावर काय संकट आलं त्याबद्दल ट्वीट केलं . त्यात त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री , नुआपाडाचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त रामगुंडम यांना टॅग केलं होतं . पोलिसांनी २४ तासांच्या आत भोसिंधु आणि त्याची आई आणि मेहुणी दिपांजलीचा पत्ता हुडकून काढला आणि वीटभट्टीमालकाला त्यांना रायपूरला पाठवून द्यायला सांगितलं . मालकाचं म्हणणं होतं की दिपांजलीला इथेच राहू दे जेणेकरून बाकी खात्रीने दोघं परत येतील . पण वरून दबाव आल्यामुळे त्याने तिघांना जाऊ दिलं .
या तिघांना कामावर पाठवलेल्या सरदाराने त्यांना रायपूरमधून घेतलं आणि रेल्वेने ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यातल्या कांटाबांजी स्थानकात आणलं . चानतामालमधलं त्यांचं घर इथून २० किलोमीटरवर आहे . दसमू सांगतात की रेल्वे स्थानकात एका कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आणि त्यांनी जी उचल घेतलीये ती फेडण्यासाठी कामावर परतण्याचं त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलं .