पेरमुडे गावात एका मोठ्या घराच्या अंगणात नर्तकाचं कोर्डब्बू दैवात रूपांतरण पाहण्यासाठी सगळे जण एकत्र जमलेत. त्याचा नक्षीदार पोशाख, दागदागिने आणि पिवळ्याजर्द रंगवलेल्या चेहऱ्यात तो देखणा दिसतोय.
घरच्या धन्याने सोंगाड्याला प्रथेप्रमाणे आंघोळीसाठी अगत्याने तेल अर्पण केलं आणि या विधीला सुरुवात झाली. दैव रंगोटी करत असताना त्याच्या कुळातील एका सदस्याने दैवांचा उगम आणि त्यांच्या कर्तृत्वाचं वर्णन असलेल्या पड्डानांचं पठण केलं. कोर्डब्बू हा एका स्थानिक दलित समुदायाच्या संस्कृतीतीला एक नायक आहे.
गळ्यातलं, बांगड्या, मुकुट, कांस्य व चांदीचा मुखवटा आणि लाकूड, धातू, नारळाची कोवळी पानं, फुलं, शिंपले, बांबू व कापड यांपासून तयार केलेली प्रभावळ, हातात मशाल घेऊन आणि पायात कांस्याचे तोडे असा सगळा साज लेवून कोर्डब्बू दैव नाचायचा.
ही गोष्ट आहे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील साधारण दहा वर्षांपूर्वीच्या मंगलोर तालुक्यातली. मला त्या कलाकाराचं नाव आठवत नाही. पण, याच तालुक्यातील पाडूपेरार गावातील एक सोंगाड्या-कलावंत दयानंद कथालसार यांनी मला अलीकडेच सांगितलं, "दैवावर विश्वास ठेवला तर तुमची सुटका होईल..."
साधारण दहा वर्षांपूर्वीच्या त्या रात्री तो नर्तक आवेशाने, जोमाने, आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी इकडून तिकडे उड्या घेत होता. त्याने दानींना (यजमान) त्याला पाचारण का करण्यात आलं ते विचारलं. सोंगाड्याच्या कुळातील एका सदस्याने मशाल धरली आणि दैवाने त्या अग्नीत प्रतीकात्मक रित्या आपल्या हातांचं मार्जन केलं. "कधीकधी ते कोळशाच्या निखाऱ्यांवर चालतात, किंवा अग्निदिव्य करतात किंवा कापराची ज्योत 'गिळतात'. हे सगळं भीती अन् अचंब्याचं वातावरण तयार करण्यासाठी केलं जातं," कथालसार म्हणतात.
मग यजमान कुळातील एका सदस्याने त्याला शहाळं, तांदूळ, जिवंत कोंबड्या, ऊस इत्यादी अन्नपदार्थ अर्पण केले. अशा प्रयोगांत एकदा का दैव या दानामुळे 'प्रसन्न' झाला की, तो हातात पंखा घेऊन खाली बसतो आणि लोक त्याच्याकडून आशीर्वाद म्हणून कुंकू आणि पिंगारा (सुपारीची फुलं) स्वीकारतात आणि आपल्या समस्यांवर उपाय मागतात – आपल्या कुटुंबातील जमिनीचे वाद, चांगल्या पीकपाण्याची अपेक्षा, लग्नाचे योग, तब्येतीच्या तक्रारी, आणि बरंच काही. दैव भविष्यवाणी आणि उपायांच्या स्वरूपात कौल देतो. "कोल्यात [प्रयोग किंवा समारंभ] भाग घेणाऱ्या लोकांच्या समस्यांवर तोडगा काढून तो समाधान देतो," कथालसार म्हणतात.
कथालसार स्वतः डिसेंबर ते मे दरम्यान कोल्याच्या हंगामात ७५ ते १०० वेळा विधी करतात. हे विधी मुख्यतः कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यात लोकप्रिय आहेत. एका पोक्त सोंगाड्याची एकाच अंगणात एकाच कुळासाठी रात्रंदिवस २-३ प्रयोग करून मिळणाऱ्या यजमानांच्या दक्षिणा आणि इतर दानांमधून रू. १५,००० ते रू. ५०,००० एवढी कमाई होऊ शकते. अशा प्रसंगी कधीकधी वेगळे सोंगाडे, त्या त्या मुलखाशी पूर्वापार निगडीत असलेले दैव, हे विधी किंवा प्रयोग करतात.
"आधी पिज्जेरे [पणजोबा], नंतर आज्जेरे [आजोबा] यांना पहायचो, अन् नंतर मी माझ्या अम्मेरेंना [वडील] प्रयोगात साथ द्यायचो," कथालसार म्हणतात. "मी कोल्याभोवतीच वाढलोय अन् मला कायम या कलेची आवड होती. मी एका लहानशा पात्रापासून सुरुवात केली अन् मग माझ्या कुळातले सगळे दैव मी साकारू लागलो."
प्रत्येक कुळात स्वतःच्या दैवांची एक ' यादी ' असते, आणि त्यांनी केवळ यांचंच रूप साकारायचं असतं, ४४ वर्षीय कथालसार समजावून सांगतात. ते कर्नाटक तुळू साहित्य अकादमीचे अध्यक्ष असून माजी पोस्टमन आणि रेडिओ संचालक (एका भक्ती कार्यक्रमाचे) आहेत. "ही एक वंशपरंपरागत प्रथा आहे, म्हणून प्रत्येक कुळात ती तशीच राहते."
कथालसार दैव आणि भूत यांच्यात भेद करतात. काही जण या संज्ञा जरी आलटून पालटून वापरत असले तरी त्यांच्या मते ज्या रूपांचा प्रकृती शक्ती किंवा दैवी शक्तीत उगम असेल केवळ त्यांनाच दैव म्हणावं. आणि ज्या रूपांचा उगम पूर्वज किंवा प्राण्यांमध्ये होतो त्यांना दैव किंवा भूत म्हणू शकतो.
"बऱ्याच समुदायांचे स्वतःचे भूत किंवा दैव आहेत," ते सांगतात. "अगोदर भूत प्राण्यांसारखे असायचे – उदरहणार्थ, पंजुर्ली [रानडुक्कर] आणि पिलीचामुंडी [वाघ] हे काही पुरातन भूत आहेत. जुन्या शेतकऱ्याला या प्राण्यांची भीती वाटत असेल. काळानुसार तुळुव राजांकडे त्यांचे राजेंद्र भूत आले, नंतर दैवी उगमाचे जुमाडी किंवा रक्तेश्वरी [दुर्गा देवीसारखी] भूत आले."
प्रा. बी. ए. विवेक राय हे मात्र दैव आणि भूत यांच्यात भेद करत नाहीत. ते मंगळूर विद्यापीठात मानद प्राध्यापक आणि साहित्य व लोकसाहित्याचे माजी प्राध्यापक आहेत. "दोन्ही संज्ञांमध्ये काहीच फरक नाही," ते म्हणतात. "दोन्ही तुळुव संस्कृतीतील ग्रामदैवतांसाठी वापरले जातात. दोन्ही शब्द संस्कृतातून आले आहेत."
काही मान्यतांनुसार वसाहतवादी आणि उच्चवर्णीय इतिहासकारांनी ब्राह्मणेतर जाती पूजायच्या त्या देवतांचं महत्त्व कमी करण्यासाठी 'दैव' या संज्ञेला 'भूत' बनवून टाकलं. "दैव याचा अर्थ सत्य, तर भूत याचा अर्थ तुळू बोलीत 'होऊन गेलेले', 'मृत' असा होतो. दोघांची व्युत्पत्ती संस्कृतातून झाली आहे," कर्नाटक लोकसाहित्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू, के. चिन्नाप्पा गौडा म्हणतात. "आपण जर या साहित्यिक परिप्रेक्ष्यातून पड्डानचा विचार केला तर असं लक्षात येईल की, भुताचा उगम राक्षसी नाही, तर नायकी प्रवृत्तीतून झाला आहे. तर हो, ब्राह्मण, मिशनरी आणि वसाहतवाद्यांनी भूत पूजेचं महत्त्व कमी केलं."
बहुतांश तुळू समुदाय, ब्राह्मण सोडून परंपरेने कोला या विधीत सहभागी होते, प्रा. राय सांगतात. काही उगमासंबंधीच्या मिथकांमध्ये (पड्डानांमध्ये वर्णन केलेले) राजे आणि उच्चवर्णीयांशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या दलित समुदायांतील नायकांचं वर्णन आहे. पण, इतर उगम मिथक आणि कोला यांमध्ये मुसलमानांसह इतर जाती जमातींचाही समावेश आहे, प्रा. राय म्हणतात.
"१५ व्या शतकापासून भुतांचे विधी किंवा प्रयोग करण्याची संकल्पना प्रचलित असावी. १४ ते १७ व्या शतकांत तुळूनाडवर राज्य करणारे तुळुव राजे बहुतांशी जैन होते आणि त्या धर्मात भूत पूजेला मान्यता नाही. भूत पूजा करणारे लोक मुख्यतः बंत या जमीनदार समुदायांपैकी होते. त्यानंतर, जैनांकडेही पुष्कळ जमीन असल्यामुळे त्यांनीही भूत पूजा सुरू केली. १९७० च्या दशकात [कर्नाटकात १९६१ मध्ये पारित झालेला] जमीन सुधारणा कायदा लागू करण्यात आल्यावर पुष्कळ बंत आपली विस्तीर्ण जमीन गमावून बसले, तेव्हा जमीन मिळालेल्या तुळुव समुदायांनी ही परंपरा सुरू ठेवली," प्रा. राय सांगतात.
"ब्राम्हणांनी पुष्कळ हिंदू देवळांमध्ये भूत स्थापन केले, भूत देवळांचा जीर्णोद्धार करणं, दीक्षा देणं आणि भूत प्रयोगांमध्ये ब्राम्हणी प्रार्थना आणि शास्त्र रुजवणं, इत्यादींमधून ते त्यांच्या विधींमध्ये सहभागी होऊ लागले..."
कथालसार पंबद या अनुसूचित जातीचे आहेत. कोल्यातील सोंगाडे हे नेहमीच पुरुष असतात. प्रयोगाच्या सुरूवातीला कुळातील एक स्त्री गायन करते – ती पड्डानांमधून गाते (ही भाताची कापणी करताना, घरी फावल्या वेळात, सणासुदीला गायली जातात, आणि पूर्वी ताडी काढतानाही गायली जायची). "दलित समुदायातील महिला पड्डानांच्या वाङ्मयीन परंपरेच्या उद्गात्या आहेत," प्रा. गौडा म्हणतात. "पड्डानांमध्ये भूत/दैवांचा उगम, प्रसार आणि शौर्याचं विश्लेषण आहे. ही समस्त मौखिक परंपरा या कलाकार समुदायातील महिलांनी जतन करून ठेवली आहे, या भागाच्या देशी ज्ञानाचा स्रोत या महिलाच आहेत."
"माझी आई अन् आज्जी शेतात पड्डान गायच्या. पण, बायकोला हे तितकसं माहीत नाही, म्हणून मी गातो," कथालसार म्हणतात. "पूर्वी बायांना [जिथे विधी होतो त्या] देवळात अन् अंगणात जायला मनाई होती. त्या आसपासच्या भागात गोळा व्हायच्या. आजकाल त्यांना सगळीकडे जायची मुभा आहे, तरी काही ठिकाणी त्यांना सरळ भूत/दैवाच्या हातून प्रसाद घ्यायची परवानगी नाही."
कथालसारांच्या पत्नी शैलजा सरकारी शाळेत माजी शिक्षिका असून सध्या गृहिणी आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा कीर्तन इयत्ता ९ वीत आहे आणि त्याने तीन वर्षांपूर्वी आपला पहिला विधी केलाय.
पड्डान गाऊन झाल्यावर दैव/भूत तयार झाले की मुख्य प्रयोगाला सुरुवात होते. "हा लोकपरंपरेतल्या विधींवर आधारित नाट्यप्रयोग असतो, या 'विधिवत नाट्या'त साजशृंगार, कपडे, रंगभूषा, नृत्य, गायन, नृत्य दिग्दर्शन, जादुई संवाद, मंत्र, दान, आणि चंदनाचा लेप, भस्म इत्यादी पवित्र वस्तूंचं वाटप यांचा समावेश होतो," प्रा. राय सांगतात.
"या विधिवत नाटकात क्रोध आणि निषेधाचं एक अंग असतं," प्रा. गौडा म्हणतात. "देवळातील मूर्ती कशा शांत भासतात, मात्र भूत कसे कर्कश आणि आक्रमक असतात, हे लक्षात घ्या. यातून दलित समुदायाला सोसावी लागलेली कुचंबणा आणि अन्याय यांचा इतिहास परावर्तित होतो."
पोशाख आणि शृंगारांचं एकूण वजन कधी कधी तर ६०-७० किलोपर्यंत जातं. आणि नक्षीदार प्रभावळीची (अनी) उंची १० फुटांहून अधिक असू शकते. एवढा भार सांभाळून प्रयोगादरम्यान आपल्या पायांची योग्य हालचाल ते कशी करतात, हे मी विचारलं असता कथालसार यांना हसू येतं. "अम्मेरे शिकले तसं – पाहून पाहून. मी त्यांना पाहायचो अन् माझा मुलगा मला पाहून शिकेल. ही कला शिकायला कुठली शाळा नाही का कुठला गुरू नाही. केवळ पाहून नक्कल करायची. वाद्यांचा दणदणाट, ती गरमी, ते कपडे – सारं काही मिळून कलाकाराचं दैव/भूतामध्ये रूपांतर होतं."
कोर्डब्बू दैवाव्यतिरिक्त दहा वर्षांपूर्वी त्या रात्री राहू गुलीगानेही प्रयोग केला. त्याच्या प्रयोगात मुरमुरे आणि कच्चं कोंबडं खाणं हा एक भाग होता. त्याने बळी दिलेल्या कोंबड्याचं रक्तही प्यायलं. त्याने भारी पोशाख किंवा मुखवटा धारण केला नव्हता आणि फुलांचे काही हार व शरीराला थोडी रंगोटी करून तो प्रयोगाला उभा राहिला होता. प्रयोगाला मंच नसल्यामुळे तो थेट प्रेक्षकांशी संवाद साधत त्या गर्दीत फिरत होता. कधी तो संगीतकारांशी नाराज असल्याचं दिसत होतं, तर कधी 'बाधा' झाली म्हणून तो पळत सुटला, तोच प्रेक्षक त्यावर आरडाओरडा करून त्याला शांत करत होते. तो तासन् तास सलग नाचला होता.
कोला संपतो तसं दमलेला दैव/भूत हातपंखा घेऊन भूतस्थानाकडे (देऊळ) जाऊन बसतो आणि लोक त्याचे आशीर्वाद घ्यायला येतात. वनांचा रक्षक (स्थानिक दैव/भूत यांना समर्पित अशा पवित्र बागा आहेत), स्थानिक तंटे सोडवणारं एक ग्रामस्थ न्यायालय, कित्येकांच्या भावनांना वाट मोकळी करण्याचा मार्ग आणि आपल्या कथाकथनातून दलित समुदायातील विस्मृतीत गेलेल्या नायकांच्या स्मृतींना उजाळा देणारं माध्यम – सोंगाड्या आपल्या विविध भूमिका बजावत असतो आणि रात्र संथपणे सरत जाते.
अनुवादः कौशल काळू