“ही महामारी आणि टाळेबंदी दोन्हींचा आम्हाला चांगलाच फटका बसलाय, तरीदेखील कोविडचा आघात झेलणाऱ्या या शहराला उभारी देण्यासाठी आम्ही ठेका धरणार आहोत,” गदोई दास सांगतात.
बिरभूम जिल्ह्याच्या चंडीपूर गावातलं विख्यात मंदीर जिथे आले त्या तारापीठ भागात राहणारे दास ढाकी आहेत. बंगालच्या खेड्यापाड्यांमधले हे पारंपरिक आणि बहुतेक वेळा पिढीजात ढोलवादक. दर वर्षी दुर्गा पूजेच्या या काळात बंगालच्या खेड्यापाड्यांमधले ढाकी कोलकात्याच्या सियालदा रेल्वे स्थानकात गोळा होतात. आणि मग या स्थानकात एकच धमाल उडते, ढोलांचे आवाज, लोकांच्या पावलांचे नाद आणि येणाऱ्यांचे स्वर – हे सगळे आवाज स्थानकात भरून राहतात.
बानकुडा, बर्धमान, माल्दा, मुर्शिदाबाद आणि नडियाच्या वादकांचं कौशल्य सगळ्यांनाच माहित असल्यामुळे त्यांचं वादन ऐकायला गर्दी उसळते. हे सगळे वादक त्यांना वाजवायला बोलावणाऱ्या छोट्या छोट्या मंडळांच्या पूजांना हजेरी लावतात.
पण, या वर्षी? कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे इतर लोक कलावंतांप्रमाणे त्यांचीही धूळधाण उडालीये. फार मोजके ढोलवादक कोलकत्याला येऊ शकलेत – रेल्वेच सुरू नाहीयेत. मुर्शिदाबादच्या शेरपूरचे ढाकी वादू दास सांगतात की त्यांच्या गावचे आणि आसपासचे ४० जण एका छोट्या बसमध्ये कोंबून आलेत. त्यासाठी त्यांना २२,००० रुपये खर्चावे लागले. एरवी, महामारी नसताना त्यांना जितके पैसे मिळायचे त्याच्या निम्मेदेखील यंदा मिळत नाहीयेत. आणि खर्चाचं गणित जुळत नसल्याने अनेक पूजा मंडळांनी कलावंतांना न बोलावता चक्क ध्वनीमुद्रित संगीत वाजवायचं ठरवलंय – ग्रामीण भागातल्या कलाकारांसाठी हा जबर फटका आहे.
मी ज्या ज्या ढाकींच्या पथकांना भेटलो, त्यांची दुर्गामातेकडे एकच मागणी होतीः पूर्वीचे सुखाचे दिवस लवकराच लवकर परत आण.
अनुवादः मेधा काळे