अगरतळ्यात सगळीकडे ढाक निनादतोय. ११ ऑक्टोबरला दुर्गापूजा सुरू होणार असली तरी दर वर्षीप्रमाणे सणाची तयारी मात्र कित्येक आठवडे आधीच सुरू झाली आहे. मांडव उभारले जातायत, मूर्तीकार मूर्तींची अखेरची सजावट करतायत आणि घरोघरी नव्या कपड्यांची खरेदी सुरू आहे.
गळ्यात अडकवलेल्या किंवा खाली ठेवून वाजवल्या जाणाऱ्या ढाकशिवाय मात्र दुर्गापूजेचा सोहळा अपूर्णच आहे.
ढाक वाजवणं हे फक्त सणावाराचं काम आहे. दुर्गापूजेचे लक्ष्मीपूजेपर्यंतचे पाच दिवस. यंदा लक्ष्मीपूजा २० ऑक्टोबर रोजी आहे. काही ढाकींना दिवाळीत सुद्धा वाजवण्यासाठी बोलावलं जातं. पण अगरतळ्यात किंवा त्रिपुरा राज्यातल्या इतरही ठिकाणी त्यांची खरी मागणी असते दुर्गापूजेदरम्यान.
ढाकींना पंडाल समित्या किंवा काही कुटुंबं वाजवायला बोलावतात. कधी कधी त्यांना काम देण्याआधी त्यांच्याकडून वाजवून घेतलं जातं. बहुतेक ढाकी आपल्या घरच्या जुन्या जाणत्या सदस्यांकडून शिकलेले असल्याने वादनात तरबेज असतात. “मी माझ्या थोरल्या चुलत भावाबरोबर वाजवायचो,” ४५ वर्षीय इंद्रजीत रिषीदास सांगतात. “मी आधी काशी वाजवायला लागलो (काश्याची थाळी ज्याच्यावर टिपरीने वादन करतात), त्यानंतर ढोल आणि त्यानंतर ढाक.” ते आणि इचक रिषीदास, रोहिदास आणि रविदास कुटुंबं मुची समुदायाची आहेत आणि त्रिपुरा राज्यात त्यांचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला आहे.
अगरतळ्यातल्या इतर किती तरी ढाकींप्रमाणे इंद्रजीत देखील बाकी वर्षभर सायकल रिक्षा चालवतात. कधी कधी ते लग्न किंवा इतर सण सोहळ्यांमध्ये बँडमध्ये वाजवतात – यांना इथे बँडपार्टी असं म्हटलं जातं. अधून मधून मिळणारी ही अशी काही कामं सोडता बहुतेक ढाकी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, भाजीवाले म्हणून काम करतात. काही जण आसपासच्या गावांमध्ये शेती करतात आणि वाजवायचं काम असेल तेव्हा अगरतळ्यात येतात.
रिक्षा चालवून इंद्रजीत यांची दिवसाची ५०० रुपये कमाई होते. “चार पैसे कमवायला काही तरी काम करायलाच पाहिजे. रिक्षा चालवणं तसं सोपं जातं,” तो म्हणतो. “याहून चांगलं काम मिळण्याची वाट पाहण्यात काही अर्थ नाही.” रिक्षा चालवून एका महिन्यात जेवढी कमाई होते तेवढी तर ते दुर्गापूजेच्या काळात एका आठवड्यात करतात. यंदा पंडाल समित्यांनी त्यांना १५,००० रुपये बिदागीवर वाजवायला बोलावलंय, काही जण मात्र याहून कमी पैसे देऊ करतात.
पंडाल समित्यांमध्ये ढाकींना बोलावलं जातं (अगरतळ्यात शक्यतो केवळ पुरुषच ढाकी म्हणून वादन करतात). तिथे, इंद्रजीत सांगतात, “भटजी जेव्हा सांगतील तेव्हा
आम्हाला तिथे हजर रहावं लागतं. सकाळच्या पूजेच्या वेळी ३-४ तास आणि संध्याकाळी ३-४
तास आम्ही वाजवतो.”
बँड-पार्टीचं काम मात्र कधीमधीच असतं. “आमचा साधारणपणे सहा जणांचा गट असतो, तोही लगीनसराईत. आम्ही किती दिवस बँड वाजवायचा त्याप्रमाणे पैसे घेतो. काही जण आम्हाला १-२ दिवस बोलावतात, तर काही जण ६-७ दिवस,” इंद्रजीत सांगतात. दिवसाला अख्ख्या बँडला मिळून ५,००० ते ६,००० रुपये मिळतात.
गेल्या वर्षी कोविड-१९ च्या महासाथीमुळे किती तरी जणांनी पूजेचे सोहळे रद्द केले त्यामुळे ढाकींनी रिक्षा चालवून किंवा इतर किरकोळ कामं करून आणि जी काही बचत होती त्याच्या जिवावर दिवस काढले. काही जणांना मात्र अगदी अखेरच्या क्षणी ढाक वाजवायची कामं मिळाली होती. (या कहाणीतली सगळी छायाचित्रं ऑक्टोबर २०२० मधली आहेत.)
दुर्गापूजेनंतर एक आठवड्याने लक्ष्मीपूजा असते. हा ढाकींना ‘काम’ मिळण्याचा शेवटचा दिवस. त्या दिवशी ते आपापले ढाक घेऊन एकटे किंवा जोडीने अगरतळ्याच्या रस्त्यांवर जाऊन थांबतात. हा दिवस मंगल मानला जातला असल्याने त्या दिवशी काही घरांमध्ये त्यांना मुहूर्त म्हणून ५-१० मिनिटं ढाक वाजवायला बोलावलं जातं. त्यासाठी त्यांना फुटकळ २०-५० रुपये दिले जातात. अनेक जण तर केवळ परंपरा सुरू ठेवायची म्हणून हे ढाक वाजवत असल्याचं सांगतात.