धनुष्कोडी ही एकाकी, कुणाच्या ध्यानीमनी नसलेली एक जागा आहे – दुर्गम जागा, सगळीकडे पांढरी शुभ्र रेती, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या सीमेवरचं तमिळ नाडूतलं भारताचं दक्षिणेकडचं टोक. १९१४ च्या सुमारास इंग्रजांनी एक छोटं बंदर म्हणून या गावाचा विकास केला आणि हळू हळू भाविक, पर्यटक, मच्छिमार, व्यापारी आणि इतरांच्या येण्या-जाण्याने हे गाव गजबजून गेलं.
पाच दशकानंतर, १९६४ मध्ये, २२ डिसेंबरच्या मध्यरात्री एक प्रचंड मोठं चक्रीवादळ इथे येऊन थडकलं आणि २५ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत रामनाथपुरम जिल्ह्यातल्या रामेश्वरम तालुक्यातल्या या गावात धूळधाण करून गेलं. या चक्रीवादळामुळे उठलेल्या समुद्राच्या महाकाय लाटांनी हे गाव जमीनदोस्त केलं आणि किमान १८०० लोक मारले गेले. तीस किलोमीटरच्या पांबमहून १०० प्रवाशांना घेऊन येणारी आगगाडी पाण्याखाली गेलेली होती.
वादळानंतर या जागेला, ‘भुताचं गाव’, ‘राहण्यास अयोग्य’ अशी बिरुदं चिकटली आणि त्यामुळे या गावाकडे सगळ्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालं. मात्र आजही धनुष्कोडीमध्ये राहणाऱ्या (स्थानिक पंचायतीच्या अंदाजानुसार) तब्बल ४०० मच्छिमार कुटुंबांसाठी ही ओसाड जागाच त्यांचं घर आहे. चक्रीवादळातून बचावलेले काही जण इथे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ वीज, पाणी, संडास किंवा अगदी पिण्याच्या पाण्याशिवाय राहतायत.
अनुवादः मेधा काळे