मोहम्मद शमीम बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील खारज (दिनमानपूर) या त्यांच्या गावी आपल्या घरच्यांसाठी अफ़लातून मिठाई घेऊन जाणार आहेत. "३६ तासांच्या प्रवासात ही खराब होत नाही, आणि ही मुंबईतील सर्वांत बढिया मिठाई आहे," ते तूप आणि मावा घालून तयार केलेल्या मिठाईचे गोडवे गातात. शमीम घरी जाऊन आले त्याला ६ महिने होत आलेत आणि यंदाच्या भेटीसाठी ते बरेच आठवडे अगोदरपासून तयारी करत आहेत. त्यांच्या पत्नी सीमा खातून यांना त्यांच्याकडून "एक बम्बई स्टाईल सूट [सलवार कमीज]", एक केश तेल, एक शॅम्पू, एक फेस क्रीम अन् आणखी अशी भेट हवी आहे ज्याबद्दल बोलताना ते लाजतात.

जमिनीवर बसून शमीम चारही बाजूंनी लाकडी फळ्यांवर ताणलेल्या कापडावर भराभर प्लास्टिकची पानं आणि फुलं भरत आहेत. जरीकाम करण्यासाठी ते पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हापासून, गेली साधारण दहा वर्षं, ते मध्य मुंबईच्या माहीम येथील या कारखान्यात -  "ज्याला प्रत्येकजण अस्लमभाई का कारखाना म्हणून ओळखतात" - काम करत आहेत.

कारखान्यात एका बाजूच्या छोट्या खोलीत कप्प्यांमध्ये कपडे, पिशव्या आणि चटया ठेवल्या आहेत. जवळपास ३५ कामगार - बहुतांशी स्थलांतरित - या ४०० स्क्वेअर फूट मुख्य खोलीत एकाच वेळी जरीकाम करायला बसतात. त्यांतले बरेच याच खोलीत रात्री झोपतात. उन्हाळ्यात फक्त सीलिंगच्या पंख्याने भागत नाही, म्हणून, शमीम हसून म्हणतात, "प्रत्येकाला खोलीतल्या एकुलत्या स्टँडवरच्या पंख्याजवळ झोपावंसं वाटतं."

खरं तर सोनं किंवा चांदीच्या मिश्रधातूच्या तारा लोकरीत विणून जरीकाम करण्याची परंपरा आहे मात्र  आजकाल तांबं किंवा आणखी हलक्या प्रतीच्या मिश्रधातूंनी नाहीतर तकतकीत प्लास्टिक सारख्या वस्तूंनी सजवून पण जरी करता येते. माहीम येथील कारखान्यात कारागीर धातूची जरही भरतात, ग्राहकांनी - सामान्यतः दुकानदार आणि फॅशन डिझायनर - केलेल्या मागणीवर हे अवलंबून असतं.

आता चाळिशीत असलेल्या शमीम यांनी या छोट्या खोलीपर्यंतचा प्रवास १५ वर्षं वयापासून सुरु केला. ते एका उर्दू-माध्यमाच्या शाळेत इयत्ता ५ वी पर्यंतच शिकले होते. त्यांचे वडील मोहम्मद शफिक यांना काला आजार (वाळू माशी चावल्याने होणारा आजार) झाल्यानंतर ते जवळपास दहा वर्षं आजारी होते. तेव्हा त्यांचे आजोबा आणि एक काका त्यांचं घरदार सांभाळत होते. शमीम म्हणतात की, त्यांनी जर का जरीकामाचं काम हाती घेतलं नसतं तर तेदेखील आपल्या वडलांसारखे खाटीक झाले असते.

PHOTO • Urja
Zari workers
PHOTO • Urja

डावीकडे: मोहम्मद शमीम काम करताना. उजवीकडे: या कारखान्यात विणल्या जाणारं कापड दुकानांत आणि उच्चभ्रू फॅशन डिझायनरांकडे जातं

"मग माझ्या आईने माझ्या काकांना मला दिल्लीत, जिथे ते स्वतः टेलर होते, एखादी नोकरी लावून द्यायला विनंती केली," त्यांना आठवतं. "ही गोष्ट असेल १९९४ सालची. मी समस्तीपूर ते दिल्ली रेल्वेचा सगळा प्रवासभर रडत होतो. काकांनी मला गेल्यागेल्या मिठाई दिली; पण त्यावेळी मला घर सोडून काहीच नको होतं. जरीकाम शिकायला दुसऱ्या शहरात जाण्याआधी सगळी मुलं अशीच रडत असतात."

दिल्लीत शमीम एका रेफ्रिजरेटर कारखान्यात मदतनीस म्हणून काम करू लागले. पण, उजव्या हाताला झालेल्या एका जुन्या दुखापतीमुळे त्यांना जड वस्तू उचलणं जमत नसे. "दुखापत बरी झाली होती पण दर वेळी वजन उचललं की हात सुजून जायचा," ते जाळीदार कापडावर प्लास्टिकचे मोती भरता भरता सांगतात.

म्हणून त्यांच्या काकांनी जरीकाम करणाऱ्या त्यांच्या एका मित्राशी शमीम यांची ओळख करून दिली आणि शमीम यांना जरीकाम शिकवायला सांगितलं. दिल्लीत एक वर्ष त्यांच्या हाताखाली काम करताना शमीम यांना पगार मिळत नव्हता पण चांगलं जेवण आणि कारखान्यात झोपण्यापुरती जागा मिळायची. "पहिले तीन महिने मला सोपं हातकाम [जर शिवणं] शिकवलं. त्यात माहीर होण्यात मला एक वर्षं लागलं," त्यांना आठवतं. काही वर्षं शमीम दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जरीकाम करत होते. काळ पुढे गेला तसं त्यांच्यात इतर जरी कारागिरांएवढा वेग आणि अचूकपणा येत गेला आणि ते दिवसाला रु. ६५ कमावू लागले.

दिल्लीतील रघुबीर नगरात मुंबईला आलेल्या एका जुन्या साथीदाराने त्यांनाही मुंबईला बोलावून घेतलं, तेव्हा ते जुळवाजुळव करू लागले. २००९ मध्ये अखेर ते मुंबईत आले. त्यांना अगोदर या भव्य शहराची भीतीच वाटली, ते म्हणतात. त्यांचे नातेवाईक त्यांना बजावत की या शहरात "टपोरीगिरी" चालते, आणि बाहेरच्या माणसांनाही त्रास दिला जातो. "लोकं म्हणायचे, 'मारो बिहारी को, बंगाली को, भैय्या को'. आता परिस्थिती बदलली आहे."

Close up of hand while doing zari work.
PHOTO • Urja
Low angle shot
PHOTO • Urja

' पहिले तीन महिने त्यांनी मला सोपं हातकाम शिकवलं. मला त्यात माहीर व्हायला एक वर्ष लागलं ,' शमीम त्यांच्या जरीकामातील सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगतात

एक अनुभवी कामगार म्हणून शमीम यांना दिवसाचे रु. ५५० मिळतात. जरीकामाच्या व्यापारात, पहिल्या सहा तासांच्या कामाचे (ज्याला एकूण कामातली एक नाफ़री किंवा मजदुरी म्हणतात) कामगारांना रु. २२५ मिळतात. पुढील चार तासांचे (१० तास मिळून दोन नाफ़री बनतात) त्यांना रु. २२५ मिळतात, आणि वरचे दोन तास काम करून (१२ तासांचे मिळून अडीच नाफ़री होतात) त्यांना आणखी रु. १०० मिळतात. थोडक्यात, १२ तास काम करून जास्तीत जास्त रु. ५५० मिळतात.

शमीम यांची दरमहा कमाई रु. १२,०००-१३,००० होते. पैकी, रु. ४,०००  त्यांचा स्वतःचा खर्च. उरलेले साधारण रु.८,००० ते सीमा खातून आणि आपल्या मुलांना पाठवतात. त्यातले रु. १,००० त्या शमीम यांच्या आई-वडलांना देतात, दोघंही त्यांच्या घराजवळच राहतात.

२०१८ मध्ये, शमीम आणि सीमा यांनी प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतःचं एका खोलीचं, छोटं स्वयंपाकघर असलेलं घर घेतलं. या योजनेतून मिळणाऱ्या रु. १,२०,००० अर्थसाहाय्यापैकी रु. २०,००० दलालाने हडपले, शमीम  सांगतात. "मला माझ्या जावयाकडून रु.२०,००० चं कर्ज घ्यावं लागलं." त्यांनी निम्मं कर्ज फेडलं आहे आणि उरलेले रु. १०,००० फेडण्यासाठी ते महिन्याला रु.१,००० मागे टाकत आहेत.

लग्नाच्या वेळी शमीम २० वर्षांचे आणि सीमा १५ वर्षांच्या होत्या. त्यांचा मुलगा, मोहम्मद इरफान, वय १०, आणि मुलगी मंतासा परवीन, वय ८, बिहारमधील खानपूर तालुक्यातल्या खारज या गावी सरकारी शाळेत शिकतात. सर्वांत थोरला मुलगा, मोहम्मद इमरान, वय १६, यंदा दहावीची परीक्षा देणार आहे आणि त्याला पुढे शिकायचं नाहीये. त्याला आपल्या आजोबांसोबत खाटकाचं काम करायचंय.

शमीम यांना आपल्या मुलाने जरीकाम करायला मुंबईला यावं असं वाटत नाही. कारण, ते म्हणतात, पैसा कमी अन् मेहनत फार अशी गत आहे. "मी माझ्या धाकट्या भावालाही जरी आणि हातकामाची ओळख करून दिली, तो तर हे काम शिकला पण नाही, ना माझ्या खालाचा मुलगा [मावसभाऊ]." त्यांचा भाऊ आता गुरुग्राममध्ये एका दुकानात कामाला आहे, पार्सल गाडीवर घेऊन घरपोच नेऊन देतो, आणि त्यांचा मावसभाऊ शिलाईकडे वळला. "मला माझ्या मुलाची गत माझ्यासारखी होऊ द्यायची नाहीये, कष्टाचा डोंगर आणि अन् अपुरी कमाई," ते पुढे म्हणतात. "मला वाटतं माझ्यासोबत ही कला पण मरून जावी."

Weavers working
PHOTO • Urja
workers stay in factory.
PHOTO • Urja

माहीम येथील कारखान्यात स्वतःच्या वस्तू एका बाजूच्या खोलीत ठेवल्या असतात, ३५ कारागिरांपैकी बरेच जण याच ४०० स्क्वेअर फूट खोलीत रात्री झोपतात.

जेव्हा शमीम ३० वर्षांचे झाले तेव्हा - माहीम कारखान्यात १४ ट्यूबलाईट लावलेले असले तरी - सुईत दोरा ओवणं कठीण जायला लागलं, आणि त्यांना अंधुक दिसायला लागलं. काही वर्षं काम केल्यावर जरीकाम करणाऱ्या कामगारांची नजर कमकुवत होऊ लागते. आपल्या हातातील सुईचं टोक पुढे बसलेल्या सहकारी अब्दुलकडे करून ते गमतीने म्हणतात, "याचं लग्न होऊन एक वर्ष झालंय आणि तो चष्मा घालत नाही, त्याला माझ्यासारखं म्हातारं दिसायचं नाहीये."

शमीम आणि त्यांचे सहकारी यांना शेजारच्या एका महिलेकडून डबा मिळतो. "पण मला दिल्ली जास्त आवडतं, खराज तिथून जवळ होतं आणि जेवण जास्त चविष्ट अन् स्वस्त होतं," ते म्हणतात. सहा दिवस १२ वेळचं जेवण ४५० रुपयांना मिळतं. त्यात आठवड्यातून दोनदा सामिष, बहुतेक वेळा चिकन आणि कधीकधी म्हशीचं मटण. शमीम म्हणतात की त्यांची बायको डब्यातल्यापेक्षा चांगलं बड्याचं मटण बनवते, ते इतकं बेचव नसतं.

रविवार सुट्टीचा दिवस. त्या दिवशी कामगार बाहेर जेवतात, आणि कधीकधी शमीम माहीमच्या किनाऱ्याला हवा खायला जाऊन येतात किंवा जवळच्या बाबा मखदूम शाह दर्ग्याला जातात. काहीच आठवड्यांनंतर ते पवन एक्सप्रेसच्या खचाखच भरलेल्या जनरल डब्यात बसून खराजला (दिनमानपूर) परततील. त्यांच्या घरावरचं पत्र्याचं छत काढून त्याऐवजी सिमेंटचं छप्पर टाकायचं आहे, ज्यासाठी त्यांना महिनाभर तिथे थांबावं लागेल. "सुट्टीवर असताना माझ्या वडलांना खाटकाच्या धंद्यात मदत करणं हाच एकमेव पर्याय उरतो, त्यातून पैसाही [रु. १०० ते ४०० प्रतिदिन] येत राहतो," ते म्हणतात.

"मला नवीन काम सुरू करणं परवडायचं नाही, त्यावर पकड बसायला एखादं वर्ष जाईल. तोवर माझ्या घरचे गावी कसे दिवस काढतील?" ते विचारतात... आणि तितक्यातच शेजारच्या दर्ग्याची अझान होते आणि त्यात त्यांचा आवाज विरून जातो.

अनुवाद: कौशल काळू

Urja

اورجا، پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) کی سینئر اسسٹنٹ ایڈیٹر - ویڈیوہیں۔ بطور دستاویزی فلم ساز، وہ کاریگری، معاش اور ماحولیات کو کور کرنے میں دلچسپی لیتی ہیں۔ اورجا، پاری کی سوشل میڈیا ٹیم کے ساتھ بھی کام کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Urja
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

کے ذریعہ دیگر اسٹوریز کوشل کالو