काही काळापूर्वी, शंकर अत्रामांनी एक मोठा सत्तूर, खिळे, लोखंडी जाळी, एक जुनं हेलमेट आणि तेलाचा डबा अशी सगळी सामुग्री गोळा केली. डोकं आणि चेहऱ्याच्या रक्षणासाठी त्यांनी लोखंडी जाळी असणारं एक शिरस्त्राण बनवलं. तेलाचा पत्र्याचा डबा खोलून त्यांनी धड सुरक्षित राहील असं चिलखत तयार केलं आणि सत्तूर वाकवून, रबर आणि कापडात गुंडाळून गळ्यासाठी संरक्षक पट्टा बनवला. या गळापट्टीला काही टोकदार खिळे जोडले. आणि पाठीवर एक गोल ताटली अडकवली जेणेकरून ‘चेहऱ्याचा’ भास व्हावा. “लोक मला हसतात ते मला माहित नाही का,” ते सांगतात.
अत्राम काही कोणत्या लढाईवर निघालेले नाहीत.
गावातली गुरं रानात चरायला नेताना वापरायचं हे त्यांचं चिलखत आहे. त्यांचं सारं
आयुष्य गुरं वळण्यात गेलं आहे. विदर्भाच्या कपाशीच्या क्षेत्रातील यवतमाळ
जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील बोराटी या ३०० लोकसंख्येच्या गावातले ते एकमेव
गुराखी आहेत.
* * * * *
मार्च २०१६ पासून बोराटी आणि आसपासच्या गावातली
डझनभर माणसं वाघाच्या हल्ल्यात मरण पावली आहेत, अनेक जण जखमी झालेत आणि किती तरी
गुरांचा वाघांनी फडशा पाडलाय. हा सगळा प्रदेश आतापर्यंत शेतकऱ्यांच्या
आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध होता.
एक हिंस्त्र वाघीण – टी १ किंवा स्थानिकांच्या
भाषेत अवनी – हिचा राळेगावच्या ५० चौरस किमीच्या घनदाट जंगलं, झाडोरा आणि
कपाशीच्या रानांच्या प्रदेशात वावर होता. हा सगळा पट्टा खडतर आहे आणि मध्ये मध्ये
काही लघु किंवा मध्यम सिंचन प्रकल्प आहेत.
बोराटीसह या भागातल्या १२ गावातली १३ माणसं टी १ ने मारल्याचा संशय आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या वन विभाग अधिकाऱ्यांनी तिला पकडण्यासाठी एक अत्यंत अवघड अशी मोहीम हाती घेतली. १ सप्टेंबर २०१८ रोजी या मोहिमेला सुरुवात झाली असली तरी वन विभागाचे अधिकारी फार आधीपासून टी १ ला पकडण्याच्या प्रयत्नात होते. जवळ जवळ दोन वर्षं ती त्यांना गुंगारा देत होती. दरम्यानच्या काळात लोकांचा आणि राजकीय दबाव वाढू लागला होता. त्यासोबतच लोकांची चिंता आणि अस्वस्थताही.
विदर्भामध्ये, २००८ पासून दर वर्षी ३० ते ५० जणं वाघाच्या हल्ल्यात बळी पडली आहेत. अनेक वाघही मारले गेले आहेत. स्थानिकांच्या किंवा संघटित शिकारी टोळ्यांच्या हल्ल्यात किंवा एखादा वाघ नरभक्षक झाल्याचा संशय आल्यास वन अधिकाऱ्यांकडून वाघ मारले गेले आहेत.
तब्बल २०० वनरक्षक या मोहिमेत सहभागी झाले, संपूर्ण क्षेत्रात ९० कॅमेरा सापळे लावण्यात आले, वन्यजीव विभागाचे प्रमुख आणि हैद्राबादचे निशाणेबाज वाघिणीला पकडण्यासाठी तळ ठोकून बसले.
विदर्भामध्ये, २००८ पासून दर वर्षी वाघाच्या
हल्ल्यात ३० ते ५० जणांचा जीव गेला असल्याचं महाराष्ट्राच्या वन खात्याच्या
वन्यजीव विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीतून समोर येतं. विदर्भाच्या खंडित अशा
वनक्षेत्रांमध्ये अनेक ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्या आहेत.
अनेक वाघांचाही बळी गेला आहे, स्थानिकांच्या किंवा
संघटित शिकारी टोळ्यांच्या हल्ल्यात. आणि काही वेळा वाघ नरभक्षक झाल्याचा संशय
असल्यास वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाघांना ठार केलं आहे.
टी १ सुद्धा धोकादायक झाली होती – माणसाच्या
रक्ताची चव तिने घेतली होती – आणि २ नोव्हेंबरच्या रात्री तिला ठार करण्यात आलं.
(पहा, टी १ वाघिणीच्या राज्यातः एका हत्येची चित्तरकथा)
गुराखी आणि त्याचं चिलखत
लोकांचा संताप आणि भीती वाढायला लागल्यावर
सप्टेंबर महिन्यात वन विभागाने एक काठीधारी चौकीदार कामावर नेमला जो टी १ चा वावर
असणाऱ्या जंगलात गुरं चरायला नेणाऱ्या गुराख्यांच्या सोबत जायचा. अत्राम गायी
चरायला जंगलात जातात तेव्हा त्यांच्यासोबतही हा चौकीदार असतो.
“मी स्वतः एक शेतकरीच आहे, पण एक वन अधिकारी मला नोकरी देतो म्हटला, म्हणून मी हे काम घेतलं,” पांडुरंग मेश्राम सांगतात. हातात काठी घेऊन सकाळी १० ते संध्याकाळी ६ असा अख्खा दिवस ते अत्राम आणि त्यांच्या गायी-गुरांचं ‘रक्षण’ करतात.
मेश्राम पिंपळशेंडा गावचे रहिवासी आहेत. २८ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांच्या गावाहून
चार किलोमीटरवर असलेल्या बोराटीमध्ये जंगलात गुरं चरायला घेऊन गेलेल्या गुराखी
नागोराव जुनघरेंना टी १ ने ठार केलं. त्या महिन्यात बोराटीच्या आसपासच्या तीन
गावांमध्ये अशी तीन माणसं मारली गेली होती. यानंतर गावांमध्ये दहशत निर्माण झाली
आणि जनक्षोभ उसळला. त्यामुळेच राज्य वन अधिकाऱ्यांनी या वाघिणीला जेरबंद करण्याचे
किंवा गोळ्या घालण्याचे आदेश दिले.
“ते [अत्राम] घाबरून पूर्ण वेळ झाडावर चढून बसून रहायचे,” मेश्राम सांगतात. “पण आता आम्ही एकाला दोघं असतो आणि इतर वनरक्षक देखील जंगलात सतत पहारा देतायत त्यामुळे त्यांना जरा सुरक्षित वाटतंय.”
अत्रामांना असा सुरक्षरक्षक लाभणं म्हणजे चैनच
मानायली हवी. यातला विरोधाभास पाहून लोकही हसतातः मेश्राम जमीनदार आहेत तर अत्राम
एक गरीब भूमीहीन गुराखी आहेत. अत्रामांना सुरक्षा पुरवणाऱ्या रक्षकाचा पगार रु.
९,०००, गुरं वळून अत्राम जे कमवतात त्याच्याहून किती तरी जास्त. अत्राम वैतागून
आम्हाला म्हणतात. “अजी, सरकारला सांगा ना का मलाही पगार द्या म्हणून. मला भीती
वाटून राहिली अन् तुम्ही पैसा कमवून राहिले. अन् तिथे ती वाघीण आमच्यासारख्यांचे
जीव घेऊन राहिली.”
अत्रामांचं अतरंगी चिलखत
तरीही स्वतःचं रक्षण करण्यासाठी दररोज जंगलात
जावंच लागणाऱ्या अत्रामांनी पूर्वी बांधकामावर काम करणाऱ्या आपल्या मेव्हण्याकडून
एक पिवळं हेलमेट मागून घेतलं. बाकी सगळं साहित्य त्यांनी शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून
गोळा केलंय.
इतकंच नाहीयेः त्यांच्याकडे जाड लोखंडी जाळीची ‘विजार’देखील आहे. पण ती त्यांनी जंगलात एका ठिकाणी लपवून ठेवलीये. का बरं? “मी ती घातली का पोरं हसू लागतात नं,” ते शरमून सांगतात.
वाघापासून रक्षण करण्यासाठी अत्रामांनी केलेले सगळे
उपाय एकदम डोकं लावून शोधून काढलेले आहेत. वाघाने पाठीमागून हल्ला केला तर? पायच
धरला तर? शिकार पकडतो तशी मानच जबड्यात धरली तर? किंवा पंजाने डोक्यावरच हल्ला
चढवला तर? असं झालं तर आणि तसं झालं तर!
“मी ना सगळ्या प्रसंगाचा विचार केला,” गेम थिअरीच्या भाषेत अत्राम सांगतात. “स्वतःचा जीव वाचवायचा तर मला इतकं तरी साहित्य लागेल बा. अन् नाही रक्षण झालं तरी मला सुरक्षित तरी वाटेल नं.”
वर्ष झालं त्यांनी हे चिलखत तयार केलंय आणि त्यात
अजूनही सुधारणा चालूच आहेत. या काळात त्यांची वाघाशी दोनदा गाठ पडलीये. पहिल्यांदा
२०१६ मध्ये आणि त्यानंतर मागच्या वर्षी. दर वेळी त्यांनी देवाचा धावा केला आणि पळ
काढला.
वाघाशी पहिली गाठभेट
सप्टेंबर २०१७ मध्ये एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाशी अत्रामांची गाठ पडली. तो प्रचंड मोठा वाघ त्यांच्यापासून काही मीटर अंतरावरच होता. “मी तं भीतीनं थिजूनच गेलो नं,” त्या दिवशीच्या आठवणी नाखुशीने आठवत ते सांगतात. “आमच्या गावातली लोकं सांगायची ना त्या सगळ्या गोष्टी माझ्या ध्यानात येऊ लागल्या – का वाघाला माणसाचं रक्त आवडतं, तो नरभक्षक होतो, मागून हल्ला करतो.”
अत्रामांकडे झाडावर चढण्यावाचून दुसरा पर्याय
नव्हता. ते स्वतःचा जीव मुठीत धरून किती तरी तास झाडावर बसून होते. आणि झाडाखाली
वाघाने त्यांच्या कळपातल्या एका गायीचा फडशा पाडला होता. जेव्हा त्या वाघाने त्याची
शिकार ओढून जंगलात दूरवर नेली, तेव्हा कुठे अत्राम झाडावरून खाली उतरले आणि गुरं
तशीच जंगलात सोडून शक्य तितक्या वेगात पळत गावात परतले.
“मी त्या दिवशी पळालो तसा अख्ख्या जिंदगीत पळलो नसीन जी,” आपली बायको सुलोचना आणि १८ वर्षांची दिशा आणि १५ वर्षांची वैष्णवी या आपल्या मुलींकडे नजर टाकत कसनुसं हसत अत्राम सांगतात. त्या दिवशी अत्रामांची साक्षात मृत्यूशीच गाठ पडली होती. ते सांगतात, त्या दिवशी घरी पोचल्यावर त्यांनी गोठ्याशेजारी असणाऱ्या त्यांच्या एका खोलीत स्वतःला कोंडून घेतलं आणि रात्रभर ते तिथनं बाहेर निघाले नाहीत. रात्रभर त्यांच्या शरीराला कंप सुटला होता, ते सांगतात.
“अजी, लगित मोठ्ठा होता जी,” आपल्या वऱ्हाडी बोलीत
ते सांगतात. त्यांचा आवाज मिस्किल असला तरी त्यात फुशारकी नव्हती. त्यांना भीती
वाटली का? “मंग का जी!” त्यांच्या मुली त्यांच्याकडे पाहून हसू लागल्या.
वाढता माणूस-वाघ संघर्ष
अत्रामांचं वाघापासून बचाव करू पाहणारं हे चिलखत
म्हणजे विदर्भाच्या जंगलांमधल्या वाढत्या माणूस-वाघ संघर्षाचंच एक रुप आहे.
हे सगळं अलिकडे सुरू झालंय, बोराटीचे अनुभवी
शेतकरी आणि रोजंदारीवर वनरक्षक म्हणून काम करणारे सिद्धार्थ दुधे सांगतात. शक्यता
आहे की इथे आलेले वाघ हे जवळच्या संरक्षित वनांमधून, उदा. बोराटीपासून नैऋत्येला
१०० किमीवर असणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यातून इथे भटकत आले आहेत. “इथे भीती आहे,
काळजी आहे आणि तणाव आहे,” ते म्हणतात.
यवतमाळ जिल्ह्यातल्या झुडुपांच्या आणि पानगळीच्या
जंगलांमध्ये दाट लोकसंख्येची गावं आहेत. भटकंती करणारे हे वाघ गवत खाणाऱ्या
प्राण्यांची आणि गावातल्या गुरांची शिकार करतात, अत्रामांच्या घरी बसलेले मेश्राम
सांगतात. “सध्या तरी टी १ आमच्या गावाच्या आसपास दिसलेली नाही,” ते म्हणतात. “पण
तिचा ठावठिकाणा समजला की आम्ही लक्ष ठेऊन असतो आणि गावकऱ्यांना सावध करतो.”
या सगळ्या संघर्षाच्या केंद्रस्थानी दोन
महत्त्वाच्या घडामोडी आहेत, महाराष्ट्राचे मुख्य वन संवर्धन प्रमुख, अशोक कुमार
मिश्रा सांगतात. “वाघांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांचं यश म्हणून एकीकडे वाघांची
संख्या वाढत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे संघटित शिकारीवर करडी नजर ठेवणं. दुसरीकडे
मानवी हस्तक्षेप प्रचंड आहे, म्हणजे जंगलांवर वाढतं अवलंबित्व आणि वाढती
लोकसंख्या.”
त्यात, विविध प्रकल्पांमुळे, जसं की रस्ते आणि
महामार्ग, विदर्भांची जंगलं तुकड्या-तुकड्यात विभागली जात आहेत. मिश्रा सांगतात की
वाघांचे अधिवास कमी होत चाललेत किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. त्यांचे
पूर्वापारपासून अस्तित्वात असलेले संचाराचे मार्ग खंडित झाले आहेत त्यामुळे
त्यांना भटकायला रानच राहिलेलं नाही. मग संघर्ष होणार नाही तर दुसरं काय होणार?
“हा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला नाही तर तो आणखी तीव्र होत जाईल.”
२०१६ च्या जून महिन्यात, बोराटी गावच्या वयोवृद्ध सोनाबाई घोसलेंना एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाने जंगलाजवळच्या त्यांच्या रानात ठार मारलं. गावठाणापासून ५०० मीटर अंतरावरच त्यांचं रान होतं. जळण, सरपण, गौण वनोपज आणि गुरांच्या चराईसाठी बोराटी गाव जंगलावरच अवलंबून आहे. (पहा, Tigress T1’s trail of attacks and terror )
“आम्ही तेव्हापासून भीती आणि काळजीने गुरफटलेलो
आहोत,” रमेश खन्नी सांगतात. स्थानिक भागात सामाजिक आणि राजकीय कार्य करणाऱ्या
खन्नींनी गावकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन वन अधिकारी, जिल्हाधिकारी आणि स्थानिक राजकीय
नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. “जंगली प्राणी तसंही आमच्या पिकाची नासाडी करत
होते – आणि आता हे वाघ.”
५० गायी आणि एक वाघ
गेली अनेक वर्षं अत्रामांचा दिनक्रम फारसा काही बदललेला नाही. त्यांच्या दिवसाची सुरुवात गायी धुण्यापासून होते, त्यानंतर ते गुरं चरायला गावाजवळच्या जंगलात जातात.
उन्हं कलली की ते घरी परततात, दुसऱ्या दिवशी परत
तोच दिनक्रम असतो. पूर्वी ते एका गायीमागे महिन्याला १०० रुपये घ्यायचे. “त्यांच्या
कामात किती धोका आहे पहा, मंग आम्हीच त्यांना म्हटलं का पैसे वाढवा म्हणून,”
सुलोचना सांगतात. आता गावकरी त्यांना महिन्याला एका गायीमागे १५० रुपये देतात –
वरचे पन्नास रुपये, ते सांगतात त्यांना असणाऱ्या धोक्यासाठी. “मी एका वेळी ५० गुरं
सांभाळतो,” अत्राम सांगतात. सांजेला जंगलातून ते नुकतेच घरी परत आलेले होते. “आता
हे काम केलं नाही तर आम्ही दुसरं काय काम करावं जी?”
गावकऱ्यांनी अत्रामांना आधीच सांगून ठेवलंयः “काही
धोका झाला तर आमची गुरांची काळजी करत बसू नका.” हे ऐकून त्यांच्या जीवावरचं ओझंच
कमी झालं, ते म्हणतात, पहा किती चांगल्या दिलाची आहेत सारी. “गेल्या दोन वर्षांत
वाघानी कळपातल्या किती तरी गुरांचा फडशा पाडलाय,” ते सांगतात. “गाय मेली तर दुःख
होतंच पण मी जिवंत आहे ना म्हणून चांगलं पण वाटतं.”
अत्राम शाळेची पायरीही चढलेले नाहीत. आणि
त्यांच्या पत्नीही नाहीत. पण त्यांची तिन्ही लेकरं शाळा शिकतायत. चरितार्थ
चालवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकावा लागला तरी चालेल पण आपल्या लेकरांनी
शिकावं अशी त्यांची इच्छा आहे. दिशाने जवळच्याच कॉलेजमधून नुकतंच बीएचं पहिलं वर्ष
पूर्ण केलं आहे तर वैष्णवी गेल्या वर्षी दहावी पास झालीये आणि सगळ्यात धाकटा अनोज,
आश्रम शाळेत नववीत शिकतोय.
गावातल्या अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सुलोचना महिन्याला रु. ३,००० कमवतात. “रोज सकाळी, ते सुखरुप परत येऊ देत म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते,” त्या सांगतात. “दर संध्याकाळी त्यांना धडधाकट परत आलेलं पाहिलं की मी वाघोबाचे आभार मानते.”
अनुवादः
मेधा
काळे