सुरुवात त्यांच्या मोपेडपासून होते. त्यांच्या छोट्याशा गावात, त्यांच्या वयाच्या बाईने गाडी चालवणं तसं नवलाचंच. “पण किती सोपं पडतं,” ५१ वर्षीय आदइकलसेल्वी म्हणतात. आणि त्या शिकल्याही पटकन. “मी आठवीत असताना भावाने मला गाडी शिकवली. सायकल यायचीच, त्यामुळे फार वेळ लागला नाही.”
ही दुचाकी नसती तर फार अवघड
झालं असतं, त्या म्हणतात. “माझा नवरा कित्येक वर्षं परदेशी होता. तो प्लंबिंगची
कामं करायचा. आधी सिंगापूर, मग दुबई आणि कतारमध्ये. माझ्या मुलींना मीच मोठं केलं
आणि शेतीही पाहिली.” एकटीने.
जे. आदइकलसेवींनी कायम शेतीच केली आहे. त्या मांडी घालून जमिनीवर बसल्या आहेत. ताठ. हात मांडीवर. दोन्ही हातात एकेक बांगडी. त्यांचा जन्मच शेतकरी कुटुंबातला. सिवगंगइ जिल्ह्यात कलयारकोइलमधला. मुडुकुलथुर तालुक्यातल्या पी. मुथुविजयपुरम वस्तीत त्या राहतात. इथून त्यांचं जन्मगाव दीड तासाच्या अंतरावर. “माझा भाऊ सिवगंगइमध्ये राहतो. तिथे चिक्कार बोअरवेल आहेत. आणि इथे? तासाला ५० रुपये देऊन मी माझं शेत भिजवतीये.” रामनादपुरममध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे.
मुली लहान होत्या तेव्हा आदइकलसेवींनी त्यांना वसतिगृहात ठेवलं. शेतातलं काम संपवून, त्यांना भेटून यायचं आणि मग घरचं सगळं बघायचं असा त्यांचा नेम होता. सध्या त्यांची सहा एकर शेती आहे. एक एकर स्वतःच्या मालकीची आणि पाच एकर खंडाने करायला घेतलेली. “भात, मिरती आणि कापूसः विकण्यासाठी. कोथिंबीर, भेंडी, वांगी, भाज्या, बारके कांदेः घरासाठी...”
घरातल्या माळ्याकडे बोट दाखवत त्या सांगतात, “भाताचे कट्टे चक्क वरती टाकते मी. म्हणजे उंदीर लागत नाही. आणि मिरची स्वयंपाकघरातल्या माळ्यावर.” असं केल्याने घरातही पसारा होत नाही. ही सगळी सोय त्यांनी स्वतःच्या मनाने करून घेतलीये, त्या ओशाळवाणं हसत मला सांगतात. वीस वर्षांपूर्वी घराचं बांधकाम सुरू असतानाच त्यांनी हे बदल करून घेतले. बाहेरच्या दारावर मदर मेरीचा पुतळा कोरायची कल्पनाही त्यांचीच. मेरी एका फुलावर उभी असलेला हा पुतळा लाकडात फार सुंदर कोरला आहे. बसायच्या खोलीत पिस्ता रंगाच्या भिंतींवर आणखी काही शोभेची फुलं, घरच्यांचे फोटो आणि येशू आणि मेरीच्या तसबिरी दिसतात.
घराची रचना सुंदर तर आहेच पण साठवणीसाठी भरपूर जागा करून घेतल्यामुळे त्या आपला शेतमाल चांगला भाव येईपर्यंत घरीच नीट ठेवू शकतात. आणि बहुतेक वेळा त्याचा फायदा होतो. भात खरेदीला सरकारने [किलोमागे] १९.४० रुपये भाव दिला आहे.
गावातला मध्यस्थ मात्र फक्त १३ रुपये देतोय. “मी दोन क्विंटल भात सरकारी केंद्रात विकला. मिरचीसुद्धा घ्यायला काय होतं?” त्या विचारतात.
मिरचीला चांगला भाव मिळत राहिला तर प्रत्येक शेतकऱ्याचंच त्या भलं आहे, त्या म्हणतात. “पाऊस जास्त झाला, शेतात पाणी साचलं तर भातासारखं मिरचीला ते मानवत नाही. या वर्षी नको तेव्हा, रोपं बारकी असताना पाऊस पडला. पण रोपं फुलोऱ्यात यायची होती तेव्हा पडायला पाहिजे तर पडला नाही.” त्या काही ‘क्लायमेट चेंज’ किंवा ‘वातावरण बदल’ हे शब्द वापरत नाहीत पण पाऊसमान बदलत चाललंय याकडेच लक्ष वेधतात. आणि बदलही कसा तर पाऊस खूप जास्त, जोरात, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या हंगामात यायला लागलाय. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे एरवीपेक्षा यंदा फक्त २० टक्के माल हाती लागलाय. “सगळं पाण्यात गेलंय.” त्या पिकवतात त्या ‘रामनाद मुंडु’ला ३०० रुपये किलो इतका भाव मिळत असूनही ही स्थिती आहे.
एक वाटा एक किंवा दोन रुपयाला जायचा तो काळ आजही त्यांच्या लक्षात आहे. आणि वांगं तर किलोला चारा आणे भावाने विकलं जात असे. “एवढंच नाही, कापूस जायचा तीन-चार रुपये किलोने. तीस वर्षांपूर्वीचं सांगतीये. आणि तरीही तुम्हाला पाच रुपये रोजाने मजूर कामाला ठेवता येत होते. आज? मजुरी २५० रुपये झालीये. पण कपाशीला किलोमागे ८० रुपयेच मिळतायत.” म्हणजे मजुरी ५० पट वाढलीये पण शेतमालाचा भाव फक्त २० पटीने. अशा वेळी शेतकऱ्याने काय करावं? आला दिवस पुढे ढकलावा, इतकंच.
आदइकलसेल्वी हे करतातच. पण त्यांच्या बोलण्यातून त्यांचा निर्धार स्पष्ट जाणवतो. “या बाजूला मिरचीचं रान आहे,” उजवीकडे हात दाखवत त्या सांगतात. “आणि तिकडे थोडी शेती आहे आणि पलिकडे थोडी.” हवेत त्यांचे हातवारे सुरू राहतात. “माझी गाडी आहे त्यामुळे जेवायला मी घरी येते. आणि माल आणायचा तर कुणा गड्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कॅरियरवर पोती टाकायची, आणि थेट घरी यायचं.” हसत हसत त्या म्हणतात. त्या बोलतात ती तमिळ तशी सवयीची आणि तशी जरा वेगळीही.
“२००५ साली मी ही गाडी विकत घेतली. तोपर्यंत गावातल्याच कुणाची तरी गाडी मागून घ्यावी लागायची.” आपली टीव्हीएस मोपेड ही फार चांगली गुंतवणूक ठरली असा त्यांचा विश्वास आहे. आता त्या गावातल्या तरुण बायांना गाडी चालवा म्हणून प्रोत्साहित करतात. “बऱ्याच जणी चालवायला पण लागल्यात,” त्या हसत हसत सांगतात. शेतात जाण्यासाठी परत गाडीवर स्वार होतात. आम्ही आमच्या गाडीने त्यांच्या मागून जायला लागतो. दोन्ही बाजूला उन्हात वाळत घातलेल्या मिरच्या. रामनादपुरममधलं हे ‘रेड कार्पेट’. एकेक गुंडु मिळगई (गोल मिरची) जेवणाची रंगत वाढवत नेणार, नक्की...
*****
“आधी हिरवी, पिकशी लाल
देखणी आणि चवीस जहाल...”
संतकवी पुरंदरदास यांच्या एका गीताचे बोल
या ओळीचा वेगळा अर्थही लावता येऊ शकेल. पण आपल्या ‘इंडियन फूड, अ हिस्टॉरिकल कम्पॅनियन’ या पुस्तकात के. टी. अचया म्हणतात की मिरचीचा सर्वात जुना संदर्भ या ओळींमध्ये सापडतो. मिरची आपल्या जेवणाचा इतका अविभाज्य भाग झाली आहे की “आपल्याकडे कधी काळी मिरची नव्हती असा विचार करणंही अवघड आहे,” ते लिहितात. “१४८० ते १५६४ असा जीवनकाल असणारे दक्षिण भारतातले थोर कवी पुरंदरदास” यांनी या रचना केल्या आहेत आणि त्यातून आपल्याला काळाचा अंदाज येतो.
गाण्यात पुढे येतं,
“गरिबांना आधार, अन्नाला रंगत वाढवी, चावल्यास जहाल इतकी, की पांडुरंग विठ्ठलाची आठवण काढणंही मुश्किल व्हावं.”
कॅप्सिकम ॲनम हे मिरचीचं शास्त्रीय नाव. सुनीता गोगटे आणि सुनील जलिहाल आपल्या ‘रोमान्सिंग द चिली’ या पुस्तकात लिहितात की मिरची ‘पोर्तुगिजांबरोबर भारतात आली. त्यांनी दक्षिण अमेरिकेतल्या चढायांमध्ये ती काबीज केली आणि भारताच्या किनाऱ्यावर आणली.’
आणि मिरची इथे आली काय, तिने मिऱ्याला चुटकीसरशी मागे टाकलं. तोवर खाणं झणझणीत करण्यासाठी तेवढा एकच मसाला आपल्याला माहित होता. पण मिरची “अख्खा देशभर पिकवता येत होती, आणि मिऱ्यापेक्षा खूप वेगवेगळ्या जाती घेणं शक्य होतं,” अचया सांगतात. आणि म्हणूनच अनेक भारतीय भाषांमध्ये मिरची हा शब्द मिऱ्यावरून आलाय. तमिळमध्ये मिरं म्हणजे मिळगु, मिरची झाली मिळगई. या दोन स्वरांनी दोन खंड आणि दोन शतकांचं अंतर मिटवून टाकलं.
हा नवा मसाला आपण अगदी आपलासा केला. आज भारत सुक्या मिरचीच्या उत्पादनात जगात अग्रेसर देशांपैकी एक असून आशिया-प्रशांत भागात अग्रणी आहे. २०२० साली भारतात १७ लाख टन मिरचीचं उत्पादन झालं. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंड आणि चीनच्या तुलनेत पाचपटीहून जास्त . भारतात , अर्थातच आंध्र प्रदेश सगळ्यात ‘जहाल’. २०२१ साली इथे ८ लाख ३६ हजार टन मिरची पिकली. त्याच वर्षी तमिळ नाडूत मात्र फक्त २५,६४८ टन मिरचीचं उत्पादन झालं. राज्याचा विचार केला तर रामनादपुरम आघाडीवर असून संपूर्ण राज्यात मिरचीच्या लागवडीखाली असलेल्या क्षेत्राचा विचार करता एक चतुर्थांश क्षेत्र (५४,२३१ हेक्टरपैकी १५,९३९) एकट्या रामनादपुरम जिल्ह्यात आहे.
मी मिरची आणि रामनादपुरमच्या मिरची शेतकऱ्यांविषयी सगळ्यात पहिल्यांदा वाचलं ते पी. साईनाथ यांच्या अजरामर अशा ‘Everybody Loves a Good Drought (दुष्काळ आवडे सर्वांना)’ या पुस्तकातल्या “The tyranny of the tharagar” या लेखामध्ये. गोष्टीची सुरुवात अशी होतेः “थरगार (दलाल) समोरच्या दोन पोत्यातल्या एकात हात घालतो आणि किलोभर मिरची काढतो. आणि हा वाटा तो चक्क एकीकडे टाकतो देतो – सामी वट्टल (पहिला डाव देवाचा).”
मग साईनाथ आपली भेट “पाऊण एकरात मिरचीची शेती करून कशी बशी गुजराण करणाऱ्या” रामस्वामीशी करून देतात. त्याला आपला माल दुसरीकडे विकताही येत नाही कारण या दलालाने त्याचा माल “पेरणीच्या आधीच विकत घेतलाय.” नव्वदीच्या सुरुवातीला दलालांची या शेतकऱ्यांवर अशी मजबूत पकड होती. या काळात देशातल्या सर्वात गरीब अशा दहा जिल्ह्यांमध्ये फिरून साईनाथ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
आणि आता, २०२२ मध्ये मी पुन्हा एकदा रामनादपुरममध्ये पोचले होते. ‘लेट देम ईट राईस’ या माझ्या लेखमालेसाठी मिरचीच्या शेतकऱ्यांची स्थिती समजून घेण्याचा माझा प्रयत्न होता.
*****
“उतारा कमी येण्याची चार
कारणं - मायिल, मुयल, माडु, माण (मोर, ससा, गाय आणि हरीण). आणि अगदी कमी किंवा
अतिवृष्टी.”
रामनादपुरमच्या
मुम्मुडीसादन इथले मिरची शेतकरी, व्ही. गोविंदराजन
रामनादपुरमच्या मिरची व्यापाऱ्याच्या दुकानात महिला आणि पुरुष सौदे सुरू होण्याची वाट पाहतायत. आपापल्या गावाहून टेम्पो किंवा बसने आलेले हे मिरची शेतकरी (डबल हॉर्स ब्रॅण्ड) पशुखाद्याच्या पोत्यांवर बसून वाट पाहतायत. पदरांनी, गमज्यांनी वारा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. भयंकर उकाडा आहे पण ते म्हणतात की किमान सावली आहे हे नशीब. त्यांच्या शेतात तीही नसते. सावलीत मिरची तगत नाही, माहितीये ना.
व्ही. गोविंदराजन, वय ६९ तीन गोणी मिरची घेऊन आले आहेत. प्रत्येक गोणीत २० किलो मिरची आहे. “यंदा उतारा चांगला नाही.” आपल्या मगसूल, उताऱ्याबद्दल बोलत असताना नाराजीने ते मान हलवत राहतात. “पण कुठलाच खर्च कमी होत नाही.” या पिकाची फार कटकट नसते, ते म्हणतात. मल्लिगई (मोगरा) सारखी मिळगईवर औषधं फवारावी लागत नाहीत.
त्यानंतर गोविंदराजन ही सगळी प्रक्रिया मला समजावून सांगतात. अगदी जमिनीच्या मशागतीपासून. सात वेळा नांगरट करावी लागते. (दोनदा खोल नांगरट आणि उन्हाळ्यात पाचदा पाळी घालायची.) त्यानंतर खतं द्यायची. म्हणजे काय, तर आठवडाभर रात्री शेतात १०० शेरडं बसवायची. त्यांच्या लेंडीचं उत्तम खत शेताला मिळतं. एका रात्रीचे २०० रुपये द्यावे लागतात. त्यानंतर ४-५ वेळा खुरपून घ्यावं लागतं. “माझ्या लेकाचा ट्रॅक्टर आहे. त्यामुळे तोच नांगरून देतो. फुकटात,” त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. “इतर लोकांना तासाला ९०० ते १,५०० रुपये भाडं द्यावं लागतं. ट्रॅक्टरच्या कामावर अवलंबून असतं.”
आम्ही बोलत होतो तेव्हा इतर काही शेतकरी तिथे गोळा झाले. लुंगी किंवा धोतरं कंबरेत खोचलेली आणि गमजे खांद्यावर किंवा डोक्याला बांधलेले. बायांच्या अंगावर नायलॉनच्या साड्या, रंगीबेरंगी, फुलांची नक्षी असणाऱ्या. केसात केशरी अबोली किंवा सुगंधी मोगरा. गोविंदराजन माझ्यासाठी चहा घेऊन येतात. कौलाच्या फटींमधून आणि सवण्यातून ऊन खाली झिरपत येतं. मिरचीचे ढिगारे उजळून टाकतं. आणि मिरच्या टपोऱ्या माणकांसारक्या लुकलुकत राहतात.
रामनादपुरमच्या कोनेरी पाड्यावरची ३५ वर्षीय ए. वासुकी आपला अनुभव सांगते. तिचा आणि खरं तर तिथल्या सगळ्याच महिला शेतकऱ्यांचा दिवस पुरुषांच्याही आधीच सुरू होतो. ती सकाळी सात वाजता बाजारात जायला निघते, त्याच्या किती तरी आधी उठून ती स्वयंपाक करते आणि शाळेत जाणाऱ्या मुलांचे डबे भरून ठेवते. तब्बल १२ तासांनंतर ती घरी परतते. आणि घरकाम पुन्हा सुरू.
यंदा सगळंच पाण्यात गेलं, ती म्हणते. “काही तरी बिनसलं आणि मिरची चांगली पोसलीच नाही. अम्बट्टम कोट्टिडुचु (सगळं फळ गळालं).” ती चाळीस किलो मिरची घेऊन आलीये. उरलेली चाळीस किलो तयार झाल्यावर नंतर घेऊन येणार. चार पैसे कमवायचे तर तिची भिस्त मनरेगाच्या कामावर आहे.
साठीला टेकलेल्या पी. पूमयिल मुम्मुडीसादनहून २० किलोमीटर प्रवास करून इथे आल्या आहेत. आणि त्यांच्यासाठी भारी गोष्ट म्हणजे सकाळी त्यांना मोफत प्रवास करता आलाय. २०२१ साली मुख्यमंत्री एम. के. स्टालिन सत्तेत आल्या आल्या त्यांनी शहरातल्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्याची सवलत सुरू केली.
पूमयिल मला त्यांचं तिकिट दाखवतात. त्यावर लिहिलेलं असतं, मागळिर (महिला), निःशुल्क तिकिट. त्यांचे ४० रुपये वाचलेत असं आम्ही बोलत असताना एक दोघं पुरुष येतात आणि कुरकुरतात की त्यांनाही मोफत प्रवास करता आला पाहिजे. सगळे जण हसतात. बाया जरा जास्तच खुशीत.
मिरचीचा उतारा का घटला याची अनेक कारणं गोविंदराजन सांगतात. मायिल, मुयाल माडु, माण, तमिळमध्ये ते जंत्रीच वाचतात. मोर, ससा, गाय आणि हरीण. “आणि अगदीच कमी किंवा अतिवृष्टी.” जेव्हा दमदार पाऊस हवा असतो, खास करून मिरची फुलोऱ्यात येण्याआधी – तेव्हा काहीच पडला नाही. “पूर्वी इतकी मिरची यायची,” छताकडे हात दाखवत ते म्हणतात, “त्या तिथपर्यंत... एक माणूस वर उभा राहून मिरची ओतायचा, तर अशी रास लागायची.”
आजकाल काय एवढेसे ढीग, फार तर गुडघ्यापर्यंत येणारे. आणि रंगही वेगवेगळे. काही अगदी गडद लाल तर काही चमकणारे. पण सगळी मिरची झणझणीत. इथे कुणी ना कुणी सतत शिंकत तरी असतं नाही तर कुठे तरी कोपऱ्यात खोकत तरी असतं. जगभरात करोनाने थैमान घातलं असलं तरी इथल्या या बाजारात खरा वैरी म्हणजे हा मिरचीचा खकाणा.
सौदेकरी एस. जोसेफ येतात. सगळे जण अगदी आतुर झाले आहेत. ते आल्या आल्या वातावरण एकदम बदलून जातं. लोक मिरचीच्या ढिगांभोवती गोळा होतात. जोसेफ यांच्याबरोबर आलेला गट मिरचीच्या ढिगांवरून चक्कर मारतो, वरती उभं राहून नीट निरखून मालाची परख करतो. त्यानंतर ते आपल्या उजव्या हातावर एक गमजा टाकतात. दुसरा एक जण – खरेदीदार सगळे पुरुषच – गमजाखाली त्यांची बोटं पकडतो आणि गुलदस्त्यातला हा सौदा पार पडतो.
बाहेरच्या माणसाला ही गुपित भाषा चक्रावून टाकते. पण गमज्याच्या खाली तळव्याला केलेला स्पर्श, बोट पकडणे किंवा बोटाने हाताला केलेल्या खुणांमधून हा माणूस समोरच्याला त्याच्या मनातला आकडा सांगत असतो. म्हणजे या मालासाठी ते काय भाव द्यायला तयार आहेत ते. जर त्यांना बोली करायची नसेल तर तर ते तळव्यावर शून्याचा आकार गिरवतात. सौदेकऱ्याच्या या कामासाठी त्याचं कमिशन मिळतं – गोणीमागे तीन रुपये. आणि व्यापारी एकूण व्यवहाराच्या ८ टक्के दलाली शेतकऱ्याकडून घेतो. हा सौदा करवून आणल्याचा मोबदला म्हणून.
एका खरेदीदाराची बोली झाली की दुसरा येतो आणि गमज्याखाली सौदेकऱ्यांच्या हातावर खुणा करून आपली बोली सांगतो. त्यानंतर पुढचा... असं करत सगळ्यांनी बोली लावली की सगळ्यात जास्त बोली जाहीर केली जाते. त्या दिवशी लाल मिरचीला आकार आणि रंगानुसार ३१० ते ३८९ रुपये किलो इतका भाव मिळाला. यो दोन्हींवरून मिरचीची गुणवत्ता ठरते.
शेतकरी मात्र फारसे खूश नाहीत. मालच इतका कमी आलाय की चांगला भाव मिळाला तरी त्यांच्या वाट्याला नुकसानच येणार आहे. “आम्हाला सगळे सांगतात की मूल्य वर्धन करा म्हणजे चार पैसे जास्त मिळतील,” गोविंदराजन म्हणतात. “मला सांगा, वेळ कुठे आहे? आम्ही मिरची दळून पुड्या भरत बसायचं का शेती करायची?” ते विचारतात.
त्यांच्या मालाचा सौदा सुरू होतो आणि त्यांच्या मनातल्या संतापाची जागा चिंता घेऊ लागते. “इथे या, इथून जास्त चांगलं कळेल,” ते मला बोलावतात. “परीक्षेच्या निकालाची वाट पाहण्यासारखं आहे की नाही हे?” ते म्हणतात. आपल्या खांद्यावरचा टॉवेल तोंडापाशी धरलेले, शरीरातला ताण स्पष्ट दिसत असलेले गोविंदराजन गमज्याखाली सुरू असलेले गुपित सौदे आतुरतेने पाहतायत. भाव जाहीर होतात आणि ते हसून सांगतात, “मला ३३५ रु. किलो भाव मिळालाय.” त्यांच्या मुलाची मिरची आकाराने थोडी मोठी आहे त्याला किलोमागे ३० रुपये जास्त भाव मिळालाय. वासुकीला ३५९ रुपये भाव मिळाला. सगळे शेतकरी आता जरा निवांत झालेत. आता पुढचं काम म्हणजे मिरचीचं वजन करायचं, पैसे घ्यायचं, चार घास पोटात टाकायचे, थोडाफार बाजार करायला आणि शेवटी घरची बस धरायची...
*****
“पूर्वी आम्ही सिनेमा
पहायला जायचो. पण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला त्याला १८ वर्षं झाली. तो होता –
थुलाथ मानमम थुल्लम.” (निश्चल हृदयसुद्धा उडी घेईल)
रामनादपुरमच्या मेलयकुडीतील
मिरची शेतकरी, एस. अंबिका
“शेत फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. जवळचा रस्ता आहे,” एस. अम्बिका सांगते. “सडकेने जायला जास्त वेळ लागतो.” साडेतीन किलोमीटर वळणावळणाचा रस्ता पार केल्यानंतर आम्ही परमकुडी तालुक्यातल्या मेलयकुडी गावात तिच्या शेतात पोचलो. लांबून रोपं अगदी तजेलदार दिसतायत – पाचूसारखी हिरवीगार पानं आणि प्रत्येक फांदीला मिरच्याच मिरच्या लगडलेल्या. काही अगदी लालबुंद, काही पिवळसर आणि काही अगदी सुंदरशा अरक्कू (किरमिजी) रेशमी साडीच्या रंगाच्या. केशरी रंगाची फुलपाखरं झाडांवर इकडे तिकडे विहार करतायत. जणू काही नारंगी मिरच्यांनाच पंख फुटले असावेत.
दहा मिनिटांतच ते सगळं सौंदर्य विरतं. सकाळचे १० सुद्धा वाजले नाहीयेत पण उन्हाचा चांगलाच चटका बसतोय. माती तडकलीये आणि घामाने डोळेही चुरचुरतायत. या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशी भेगाळलेली जमीन आम्ही पाहतोय. पावसासाठी तहानलेली असावी अशी दिसायला लागलीये रामनादपुरमची जमीन. अंबिकाच्या मिरचीच्या शेतातही काही वेगळं दृश्य नाहीये. जमीनभर नुसत्या भेगा. पण अंबिकाला काही जमीन इतकी जास्त कोरडी भासत नाही. जोडवी घातलेल्या पायाच्या बोटांनी ती माती उकरते आणि म्हणते, “बघा, ओल नाहीये तर काय?”
गेल्या कित्येक पिढ्या अंबिकाच्या कुटुंबाने शेती करूनच आपली गुजराण केली आहे. तिचं वय आहे ३८ आणि तिच्या सोबत असलेल्या जावेचं, एस. राणीचं ३३. त्यांच्या कुटुंबांची आपापली एकरभर जमीन आहे. मिरचीशिवाय त्या हादग्याचंही पीक घेतात. बकऱ्यांना याचा पाला फार आवडतो. अधून मधून भेंडी आणि वांगी देखील करतात. आता या सगळ्यात त्यांचं काम नक्कीच वाढतं, त्या सांगतात. पण जास्तीचे चार पैसे कमवायचे म्हटल्यावर...?
या बाया सकाळी आठ वाजताच शेतात येतात आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत इथेच राखण करत थांबतात. “नाही तर शेरडांच्या तोंडीच जाईल सगळं!” रोज पहाटे ४ वाजता उठायचं, घराची साफसफाई, पाणी आणायचं, स्वयंपाक करायचा. मग मुलांना उठवायचं, भांडी घासायची. डबे भरायचे. जनावरं किंवा कोंबड्यांचं दाणापाणी करायचं. त्यानंतर चालत शेतात यायचं आणि कामाला सुरुवात करायची. कधी कधी तर दुपारी घरी जाऊन जनावरांना पाणी पाजून परत यायचं. त्यानंतर परत मिरचीच्या रानात काम सुरू. रोपं नीट जोपासायची. मग परत अर्ध्या तासाच्या शॉर्ट कट रस्त्याने घरी परतायचं. वाटेत कुत्रीची पिलं तिच्या मागे पळतायत. आणि त्यांची आई किमान थोडं अंतर तरी लांब पळून जाऊ शकलीये...
अंबिकाच्या मुलाचा फोन येतो. “एन्नाड,” तिसऱ्यांदा फोन वाजल्यावर ती जरा घुश्शातच विचारते, “काय पाहिजे तुला?” त्याचं बोलणं ऐकल्यावर कपाळावर आठी येते आणि त्याला जरा रागावून ती फोन बंद करते. बाया म्हणतात, मुलांचेही घरी काही कमी नखरे नसतात. “आम्ही काहीही बनवून आलो ना, त्यांना अंडी तरी पाहिजेत, नाही तर बटाटा. त्यामुळे थोडी ही भाजी परतायची आणि थोडी ती. रविवारी मात्र त्यांना जे काही मटण खायचंय ना ते आम्ही आणतोच.”
आम्ही बोलत असताना या बाया आणि आसपासच्या शेतातल्या इतर जणी सुद्धा मिरच्या तोडायला लागल्या आहेत. त्या झपझप त्यांचं काम करतात. झाडाची फांदी उचलायची आणि पटपट मिरच्या तोडायच्या. ओंजळ भरली की रंगाच्या बादलीत टाकायच्या. पूर्वी झापाच्या करंड्या असायच्या. पण आता प्लास्टिकच्या बादल्याच वापरात आहेत. टिकतात पण भरपूर.
अंबिकाच्या घरी गच्चीवर कडक उन्हात मिरची वाळत घातलीये. ती तोडलेली मिरची हलक्या हाताने पसरवते आणि अधूनमधून खाली वर करते म्हणजे नीट वाळेल. काही मिरच्या उचलून ती त्या हातात खेळवते. “पूर्ण वाळली ना की त्याचा खुळखुळ्यासारखा आवाज येतो.” आतलं बी वाजतं. तशी वाळली की गोणीत मिरची भरतात आणि गावातल्या कमिशन एजंटकडे घेऊन जातात. किंवा मग परमकुडी किंवा रामनादपुरमच्या बाजारात. तिथे भाव थोडा जास्त मिळतो.
“कलर (शीतपेय) पिणार?” खाली स्वयंपाकघरात अंबिका मला विचारते.
जवळच्याच शेतात शेरडं आहेत, तिथे ती मला नेते. वायरच्या बाजेखाली राखण करणारी कुत्री झोपेतून उठून आमच्या अंगावर भुंकायला लागतात. जणू आम्हाला सांगतायत की इथे यायचं नाही. “माझा नवरा गावात काही कार्यक्रम असला की वाढप्याचं काम करायला जातो. तेव्हा ही कुत्रीच राखण करतात. हे काम सोडून तो शेती करतो आणि मिळेल तेव्हा मजुरी.”
लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताना ती लाजते. “आम्ही पूर्वी सिनेमा पहायला जायचो. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला त्याला १८ वर्षं झाली. थुलाथ मानमम थुल्लम.” शीर्षकाचा अर्थ असा – ‘अगदी निश्चल हृदयसुद्धा उडी घेईल’ – आम्हाला दोघींनाही हसू येतं.
*****
“मिरचीच्या सौद्यात छोट्या
शेतकऱ्यांचं १८ टक्के उत्पन्न बुडतं”
के. गांधीरासु, अध्यक्ष,
मुंडु मिरची उत्पादक संघटना, रामनादपुरम
“ज्या शेतकऱ्यांची पाच-दहा गोणी मिरची आहे, त्यांचंच उदाहरण घ्या. गावाहून बाजारसमितीत यायचं तर टेम्पोचं किंवा इतर वाहनाचं भाडं द्यायचं,” गांधीरासु म्हणतात. “तिथे व्यापारी येणार आणि भाव ठरवणार. वर आठ टक्के कमिशन घेणार. त्यानंतर वजन करताना मापात खोट असतेच, तीही व्यापाऱ्याच्या फायद्याची. एका गोणीमागे अर्धा किलो जरी वजन मारलं तरी नुकसानच आहे. किती तरी शेतकऱ्यांची हीच तक्रार असते.”
शिवाय, एका माणसाला अख्खा दिवस शेतीची कामं सोडून बाजारात घालवावा लागतो. व्यापाऱ्याकडे पैसा असला तर तो लगेच चुकता करतो. नाही तर शेतकऱ्याला परत यावं लागतं. आणि, लक्षात घ्या, बाजारात गडीमाणूस आला असला तर तो काही सोबत डबा आणत नाही. तो बाहेर खानावळीत जेवतो. या सगळ्याचा हिशोब आम्ही लावला तेव्हा आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा १८ टक्के हिस्सा या सगळ्यात जातोय.
गांधीरासु एक शेतकरी उत्पादक कंपनी चालवतात. २०१५ सालापासून रामनाड मुंडु चिली प्रॉडक्शन कंपनी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं यासाठी कार्यरत आहे. ते स्वतः कंपनीचे संचालक आणि अध्यक्ष आहेत. मुदुकुलथुरमध्ये त्यांच्या कचेरीत आम्ही त्यांना भेटलो. “उत्पन्न वाढवण्याचे मार्ग कोणते? पहिलं म्हणजे लागवडीचा खर्च कमी करा. दुसरं, उत्पादन वाढवा. आणि तिसरा घटक म्हणजे बाजारपेठेसाठी काही तरी करा. सध्या आमचं लक्ष बाजारपेठेवर आहे.” रामनादपुरम जिल्ह्यामध्ये तातडीने काही तरी करायला हवं असं त्यांना वाटतं. “इथे प्रचंड स्थलांतर आहे,” ते म्हणतात.
सरकारी आकडे त्यांच्या दाव्याला पुष्टी देतात. तमिळनाडू रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट (ग्रामीण उन्नती अभियान) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रामनादपुरम जिल्ह्याच्या सद्यस्थिती अहवालानुसार दर वर्षी या जिल्ह्यातून ३,००० ते ५,००० शेतकरी स्थलांतर करत आहेत. दलालांची दादागिरी, पाण्याचा तुटवडा, दुष्काळ, शीतगृहांची कमतरता या इतर कारणांमुळेही उत्पादन वाढवण्यात अडथळा येत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पाणी हाच सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. “कावेरी खोऱ्यातल्या किंवा तमिळ नाडूच्या पश्चिमेकडच्या भागात जाऊन पहा. काय चित्र दिसतं?” क्षणभर थांबतात आणि त्यांच्या प्रश्नाचा प्रभाव वाढतो. “विजेचे खांब. का, तर तिथे बोअरवेल आहेत.” रामनादपुरममध्ये बोअरवेल कमीच, ते म्हणतात. पावसावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू शेतीला मर्यादा असतात. सगळी भिस्त हवामानावर असते.
जिल्हा सांख्यिकी अहवालासारखी शासकीय आकडेवारी त्यांच्या म्हणण्याला दुजोराच देते. २०१८-१९ साली रामनादपुरम वीजमंडळाच्या आकडेवारीनुसार या जिल्ह्यात केवळ ९,२४८ कृषीपंप होते. राज्यातल्या १८ लाख कृषीपंपांच्या तुलनेत अगदीच किरकोळ आकडा आहे हा.
रामनादपुरमच्या समस्या काही नव्या, आजच्या समस्या नाहीयेत. एव्हरीबडी लव्ज ए गुड ड्राउट (पेंग्विन प्रकाशन, १९९६, मराठी अनुवाद- दुष्काळ आवडे सर्वांना, अक्षर प्रकाशन, २००३) या पुस्तकात पत्रकार पी. साईनाथ यांनी सुप्रसिद्ध लेखक दिवंगत मेलनमई पोन्नुस्वामी यांची मुलाखत घेतली होती. “लोकांचा समज काहीही असो, या जिल्ह्यामध्ये उत्तम शेती करण्याची क्षमता आहे. पण कुणी या विचाराने काम तरी केलं आहे का?” पुढे ते म्हणतात, “रामनाडमध्ये ८० टक्के लोकांकडे दोन एकरांपेक्षा कमी जमीन आहे. आणि त्यामुळे ती परवडणारी नाही. आणि याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सिंचनाचा अभाव.”
शेतीच्या क्षमतेबद्दल पोन्नुस्वामी अगदी खरं बोलत होते. २०१८-१९ मध्ये रामनादपुरम जिल्ह्यात ४,४२६.६४ मेट्रिक टन इतक्या मिरचीची उलाढाल झाली आणि त्याचं मूल्य रु. ३३.६ कोटी इतकं होतं. (बहुतेक सगळं सिंचन ओरपणाऱ्या भाताच्या खरेदी-विक्रीतून केवळ १५.८ कोटीची उलाढाल झाली).
शेतकरी कुटुंबात जन्मलेले, पदवीनंतरचं शिक्षण घेत असतानाही शेती करत असलेले गांधीरासु यांनी मिरचीचं मोल पुरतं जोखलं आहे. मिरचीच्या शेतीचं अर्थकारण ते समजावून सांगतात. साधारणपणे एखादा छोटा शेतकरी एकरभर रानात मिरची घेतो. तोडणीला मजूर लावले जातात, पण बाकी सगळं काम घरची मंडळी एकत्र मिळून करतात. “मुंडु मिरचीच्या लागवडीचा खर्च एकरी २५,००० ते २८,००० रुपये इतका येतो. तोडणीचा खर्च २०,००० रुपये. यात १०-१५ माणसं चार वेळा तोडीला येतात.” एक मजूर दिवसभरात एक गोणी मिरची तोडू शकते. झाडं एकदम दाटवाट असतात तेव्हा हे काम जास्त अवघड जातं.
मिरची हे सहा महिन्याचं पीक आहे. ऑक्टोबरमध्ये मिरचीची रोपं लावतात. एकूण दोन बहार येतात. पहिला थइ म्हणजे जानेवारीच्या मध्यावर सुरू होतो. आणि दुसरा चित्रइ म्हणजे चैत्रात, एप्रिलच्या मध्यावर संपतो. २०२२ साली अवकाळी पावसामुळे हे सगळं चक्र बिघडून गेलं. पहिली रोपं मरून गेली, फुलोरा उशीरा आला आणि हवं तितकं फळ धरलं नाही.
पुरवठा कमी आणि मागणी चांगली असल्याने बहुतेक वर्षी भाव बरा मिळतो. रामनादपुरम आणि परमकुडी बाजारपेठेत मिरचीला कसा बंपर भाव मिळाला याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. मार्चच्या सुरुवातीला जेव्हा मिरची बाजारात यायला सुरुवात झाली तेव्हा ४५० रु. किलो भाव मिळाला होता. अगदी ५०० रुपयांपर्यंत हा भाव जाईल अशी कुजबुज सुरू झाली होती.
गांधीरासुंच्या मते हे आकडे म्हणजे ‘त्सुनामी’ आहेत. त्यांच्या मते मुंडु मिरचीला किलोमागे १२० रुपये भाव मिळाला तरी सगळा खर्च भरून निघू शकतो. एकरी १,००० किलो मिरची निघाली तर शेतकऱ्याला ५०,००० रुपयांचा नफा होऊ शकतो. “दोन वर्षांमागे मिरचीला किलोमागे ९० ते १०० रुपये भाव मिळत होता. आज भाव खूपच वधारलाय. पण कायमच ३५० रुपये मिळणार नाहीयेत. हा अपवाद आहे.”
या जिल्ह्यात मुंडु मिरची शेतकऱ्याचं आवडतं पीक असल्याचं ते सांगतात. हे ‘खास’ वाण आहे, ते म्हणतात आणि या मिरचीचा टोमॅटोसारखा आकार कसा असतो त्याचं अगदी चपखल वर्णन करतात. “रामनाद मुंडुला चेन्नईत सांबार मिरची म्हणतात. या मिरचीची साल जाड असते त्यामुळे ती वाटून घातली तर पुळी कोळम्बुला दाटपणाही येतो. आणि चव तर अप्रतिम.”
भारतात आणि परदेशातही मुंडु मिरचीला प्रचंड मागणी आहे. इंटरनेटवरती सहज सर्च केलं तरी हे कळतं. ॲमेझॉनवर ही मिरची चक्क ७९९ रुपये किलो भावाने विकली जात होती. आणि तेही २० टक्के सवलतीच्या दरात बरं.
“यासाठी काय प्रयत्न करायचे ते आम्हाला माहित नाही,” गांधीरासु म्हणतात. “मार्केटिंग ही मोठी समस्याच आहे.” शिवाय त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीचे सगळे हजारच्या वर सदस्य काही फक्त त्यांनाच माल विकतात असं नाही. “त्यांचा सगळ्यांचा माल विकत घेता येईल इतका पैसा काही आमच्याकडे नाही.”
बरा भाव मिळेल म्हणून कंपनी थांबायला तयार असली तरी मिरची जास्त काळ टिकत नाही. साल काळी पडते आणि दळून ठेवली तर त्याला कीड लागते. रामनादपुरमहून १५ किलोमीटरवर शासकीय शीतगृहात आम्ही फेरफटका मारला तेव्हा दिसलं की मागच्या वर्षीची मिरची इथे गोण्यांमध्ये साठवून ठेवलेली होती. व्यापारी आणि उत्पादकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू होता पण शेतकरी फार काही राजी नव्हते. या गोदामात माल आणणं किंवा परत नेणं कसं काय जमेल याबाबत त्यांच्या मनात शंका होती.
शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाच्या पारंपरिक पद्धती वापरायला सल्ला देऊन पाहतीये. “या भागात पूर्वी मिरचीच्या शेतांभोवती एरंड लावला जायचा. मिरचीवर काही कीड आली तर ती आधी एरंडावर जायची. शिवाय एरंडाची झाडं उंच असल्याने त्यावर छोटे पक्षी येतात. ते देखील अळ्या खातात. जिवंत कुंपणच म्हणा ना.”
त्यांना आठवतं की त्यांची आई बांधावर आमनक्कु म्हणजे एरंड आणि अगथी म्हणजेच हादग्याची झाडं लावायची. “ती मिरचीच्या रानात कामाला गेली की आमची शेरडं देखील तिच्या मागे धावायची. एका बाजूला त्यांना बांधून ती त्यांना एरंडीचा आणि हादग्याचा पाला टाकायची. तेवढंच नाही. मिळगई म्हणजेच मिरची हे मुख्य पीक असलं तर आमनक्कु म्हणजे एरंड हे दुय्यम पीक मानावं लागेल. मिरचीचा पैसा वडलांकडे जायचा आणि एरंडीतून येणारा, आईकडे.”
एक पाय गतकाळात असणारे गांधीरासु भविष्याचा आणि विज्ञानाचाही वेध घेतात. “इथे रामनादपुरममध्ये, खास करून मुडुकुलथुरमध्ये मिरची संशोधन केंद्राची फार गरज आहे,” ते म्हणतात. “भात, केळी, वेलदोडा, हळद – सगळ्या पिकांसाठी संशोधन केंद्रं आहेत. शाळा किंवा कॉलेज असलं तरच तुम्ही तुमच्या पोरांना तिथे शिकायला पाठवणार, ना? एखादं केंद्र असेल तरच तुम्ही अडचणींचा अभ्यास कराल, त्यावर उपाय शोधाल. आणि तसंच झालं तर मिरची ‘नेक्स्ट लेव्हल’ ला जाणार.”
सध्या तरी ही कंपनी मुंडु वाणाच्या मिरचीला जीआय म्हणजेच भौगोलिक चिन्हांकन मिळावं यासाठी प्रयत्न करत आहे. “या मिरचीचे खास गुण आहेत त्याबद्दल बोलायला पाहिजे. एखादं पुस्तकच पाहिजे, नाही का?”
शेतीतल्या सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय सांगितला जातो – मूल्य वर्धन. पण या मिरचीच्या बाबतीत तो चालणार नाही असं गांधीरासुंचं मत आहे. ते म्हणतात, “प्रत्येकाकडे ५० ते ६० गोणी मिरची असते. तेवढ्या मिरचीचं ते काय करणार? अख्खी शेतकरी उत्पादक कंपनी जरी एकत्र आली तरी ते मसाला कंपन्यांशी स्पर्धा करून त्यांच्यापेक्षा स्वस्तात तिखट विकू शकणार नाहीत. मार्केटिंगवर ते करोडो रुपये खर्च करतायत.”
पण आगामी काळातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे बदलत्या वातावरणाचा, गांधीरासु म्हणतात.
“त्याचा मुकाबला आपण कसा करणार आहोत?” ते विचारतात. “तीन दिवसांपूर्वी वादळाचा इशारा होता. मार्च महिन्यात मी आजवर वादळाचा इशारा ऐकला नव्हता. जास्त पाणी साचलं तर मिरचीची रोपं मरून जातात. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनाच शक्कल लढवावी लागणार आहे.”
*****
“बायांना जेवढं लागतं
तेवढंच कर्ज त्या घेतात. शिक्षण, लग्न, बाळंतपण – अशा कारणांसाठी कर्ज हवं असेल तर
आम्ही नाकारत नाही. त्यानंतर शेतीचंच कारण असतं.”
जे. आदइकलसेल्वी, मिरची
शेतकरी आणि बचत गट प्रमुख, पी. मुथुविजयपुरम, रामनादपुरम
“झाडच हातात येईल म्हणून घाबरताय की काय?” शेजाऱ्याच्या शेतात त्यांनी मला कामाला लावलं. ते म्हणालेच होते आज कामाला माणसं कमी आहेत, थोडीफार मदत झाली तर बरंच आहे म्हणून. माझे आभार मानल्याचा त्यांना लगेचच पश्चात्ताप झाला असावा. कारण मी काहीही उपयोगाची नाही हे त्यांना क्षणातच कळून चुकलं असणार. आदइकलसेल्वी मात्र बादली घेऊन पटापट मिरची तोडतायत. तिसरं झाड सुरू आहे त्यांचं. मी माझ्या पहिल्या झाडाशेजारी बसते आणि एक गुबगुबीत मिरची तोडते. देठ चांगलंच जाड आणि चिवट आहे. घरच्या मिसळणाच्या डब्यात सुकी मिरची असते तिचं देठ कसं पटकन तुटतं तसं बिलकुल नाही. झाडाची फांदीच तुटून हातात येईल याची माझ्या मनात भीती.
काही बाया भोवती गोळा होतात. शेतमालक हताश होऊन मान डोलावतो. आदइकलसेल्वी चुचकारतात. त्यांच्या हातातली बादली भरत चाललीये. माझ्या ओंजळीत जेमतेम आठ मिरच्या. “तुम्ही सेल्वीला तुमच्यासोबत चेन्नईला घेऊन जायला पाहिजे,” शेजारी म्हणतो. “त्यांना शेतातलं काम जमतं, आणि ऑफिसातलंही.” मला मात्र कुठलंच नाही. कारण अर्थातच मला काहीही जमत नव्हतं.
आदइकलसेल्वी त्यांच्या घरी खरंच एका ऑफिसचं काम पाहतात. एका शेतकरी उत्पादक कंपनीने एक संगणक आणि एक झेरॉक्स मशीन असं छोटं ऑफिस थाटलंय. त्यांचं काम म्हणजे कागदपत्रांच्या प्रती काढायच्या आणि लोकांना त्यांच्या जमिनीच्या पट्ट्यांची माहिती काढण्यासाठी मदत करायची. “त्याच्याहून जास्त काही करायला माझ्यापाशी वेळच नाहीये. शेरडं आहेत, कोंबड्या आहेत, त्यांचं करायचं असतं...”
त्यांची आणखी एक जबाबदारी म्हणजे मगळीर मंद्रम – महिलांचा बचत गट चालवणं. त्यांच्या गावातल्या साठ बाया पाच गटांच्या सदस्य आहेत. प्रत्येक गटाच्या दोन प्रमुख आहेत. आदइकलसेल्वी या दहा प्रमुखांपैकी एक. पैसे गोळा करणं आणि वितरण हे त्यांचं एक काम. “लोक कर्ज काढतात आणि इतकं भयंकर व्याज भरतात – रेण्डु वत्ती, अन्जु वत्ती (दर साल २४ ते ६० टक्के). आमच्या बचत गटाचं व्याज मात्र एका लाखावर फक्त १,००० रुपये इतकंच असतं.” म्हणजे दर साल १२ टक्के. “आम्ही सगळी रक्कम गोळा करून एकीला देऊन टाकतो. इथे सगळेच छोटे शेतकरी आहेत, त्यांना पैशाची गरज लागतेच, नाही का?”
बायांना जेवढं लागतं तेवढंच कर्ज त्या घेतात. “शिक्षण, लग्न, बाळंतपण – अशा कारणांसाठी कर्ज हवं असेल तर आम्ही नाकारत नाही. त्यानंतर शेतीचंच कारण असतं.”
आदइकलसेल्वी यांनी एक महत्त्वाचा बदल केला आहे – तोही कर्जाच्या परतफेडीबाबत. “पूर्वी कसं होतं, तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागायची. मी त्यांना सांगितलं की आम्ही सगळ्या शेतकरी आहोत. काही महिने आमच्याकडे बिलकुल पैसा नसतो. जेव्हा माल येतो तेव्हा हातात पैसा येतो. ज्याला जसं जमेल तसे पैसे फेडू द्या. कसंय, सगळ्यांचाच विचार करायला पाहिजे ना?” समावेशक बँकिंग व्यवहार कसे असू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. स्थानिक आणि लोकांच्या जगण्याचा संवेदनशीलपणे विचार करणारी धोरणं अशी असतात.
हा बचत गट गेल्या तीस वर्षांपासून, त्यांचं लग्न व्हायच्या आधीपासून इथे सुरू आहे. त्यांच्यातर्फे गावात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आम्ही त्यांना भेटून आलो त्यानंतरच्या आठवड्यात त्यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रम ठेवला होता. “रविवारी चर्चमध्ये मास झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना केक देणार आहोत,” त्या हसून सांगतात. पाऊस पडावा म्हणून त्या प्रार्थना आयोजित करतात, पोंगल बनवतात आणि सगळ्यांना खाऊ घालतात.
आदइकलसेल्वी एकदम बिनधास्त आहेत आणि मोकळेपणी सगळ्यांशी बोलतात. त्यामुळे गावातला कुणी पुरुष जर दारूच्या नादाला लागत असेल, बायकोला त्रास देत असेल तर त्या सरळ त्याला चार बोल सुनावतात. गाडी चालवणाऱ्या, किती तरी वर्षं आपल्या शेताचं काम एकटीने पाहणाऱ्या सेल्वी गावातल्या इतर बायांसाठी त्या प्रेरणास्थानी आहेत. “तरुण मुली खूप चंट आहेत, गाड्या चालवतात, चांगल्या शिकलेल्या आहेत,” त्या म्हणतात. पण, “नोकऱ्या कुठे आहेत?” त्यांचा खडा सवाल.
आता त्यांचा नवरा गावी परत आला आहे आणि शेतात त्यांना मदत करतो. त्यामुळे जरासा वेळ रिकामा मिळतो तो त्या इतर कामांसाठी वापरतात. उदाहरणार्थ त्या कपाशीची शेती करतात, त्यासाठी त्यांची खटपट सुरू असते. “गेली दहा वर्षं मी सरकीचं बी वेगळं काढून त्याची विक्री करतीये. १०० रुपये किलो भावाने ते विकलं जातं. किती तरी लोक माझ्याकडून हे बी घेतात. कारण माझ्या बीची उगवण चांगली आहे. गेल्या वर्षी मी जवळ जवळ १५० किलो बी विकलं असेल.” त्या प्लास्टिकची एक पिशवी उघडतात आणि जादूगार कसा त्याच्या पोतडीतून ससा बाहेर काढतो तसं तीन वेगवेगळ्या पुड्यांमधलं तीन वेगवेगळ्या प्रतीचं बी मला दाखवतात. त्यांच्या अनेक भुजांमधली ही बी जतन करणारी भुजा.
मे महिन्याच्या शेवटी त्यांची मिरची काढून झाली होती. आम्ही फोनवर यंदाच्या हंगामाविषयी बोलत होतो. “भाव ३०० रुपयांपर्यंत वर गेले आणि त्यानंतर १२० रुपये किलोपर्यंत घसरले. हळूहळू कमीच होत गेले,” त्या सांगतात. एका एकरात त्यांची फक्त २०० किलो मिरची निघाली. ८ टक्के कमिशन गेलं. वर दर २० किलोमागे १ किलोची घट आली. या वर्षी त्यांचा खर्च तरी भरून निघालाय कारण भाव फार कोसळले नाहीत. पण पावसामुळे रोपांची वाट लागली आणि उताराच कमी आला.
काहीही असो, शेतकऱ्याचं काम मात्र कमी होत नाही. माल भरघोस येवो, नाही तर कमी, तोडणी करावीच लागते. माल सुकवून गोण्या भराव्याच लागतात. आदइकलसेल्वी आणि तिच्या मैत्रिणींच्या कष्टांमुळे सांबारच्या प्रत्येक घोटाची चव मात्र वाढत जाते...
रामनाड चिली प्रॉडक्शन कंपनीचे के. सिवकुमार आणि बी. सुकन्या यांनी या वार्तांकनासाठी बहुमोल मदत केली. त्यांचे आभार.
या संशोधन कार्यास अझीम प्रेमजी युनिवर्सिटीच्या २०२० सालच्या रिसर्च फंडिंग प्रोग्रामअंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.
शीर्षक छायाचित्रः पलनी कुमार
अनुवादः मेधा काळे