शेजारच्या गावातल्या बायांना अखेर त्यांचा म्होरक्या रणांगणावर सापडला. आपल्या घरच्या पुरुष मंडळींचा शोध घेत घेत त्या तिथे पोचल्या होत्या. ते राहिलंच पण त्यांचा नेता उमइदुराई गंभीर जखमी झाला होता, रक्तस्राव होत होता, पण अंगात प्राण होता. त्यांनी त्याला अलगद उचललं आणि तीन मैल चालत आपल्या गावी नेलं.
थोड्याच वेळात सैनिक तिथे पोचले. ‘वॉण्टेड’ असलेल्या उमइदुराईला शोधत. या बायांनी झटकन त्याच्या अंगावर पांढरी चादर टाकली आणि त्या हमसून हमसून रडायला लागल्या, त्यांच्या रडण्याचा आवाज टिपेला पोचला आणि त्यांनी त्या सैनिकांना बातमी दिली की देवी आल्या आणि तो मरण पावला. आपल्या जिवाच्या भयाने त्या सैनिकांनी तिथून पळ काढला. तिथल्या अनेकांचे आणि उमइदुरईचे प्राण मात्र वाचले.
भारी आणि खरी गोष्ट आहे ही. तमिळ नाडूमध्ये २०० वर्षांपूर्वी घडलेली. या लढ्याच्या स्पष्ट आठवणी १९ व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या नोंदींमध्ये सापडतात. आणि आता त्याच स्मृती विख्यात लेखक चो धर्मन त्यांच्या ओघवत्या तमिळमध्ये सांगतात तेव्हा त्यातलं नाट्य आणखीच रंगतं. सध्याच्या कोविड-१९ महामारीची भय आणि भीतीच्या संदर्भातली तिची मांडणी अधिक जोरकसपणे पुढे येते. आणि त्यासोबतच आपल्याला समजतो गावांचा शतकानुशतकं सुरू असलेला विषाणू, प्लेग आणि साथींशी मुकाबल्याचा अतिशय अनमोल असा मौखिक इतिहास.
“उमइदुरई म्हणजे दैवतासमान असलेले स्वातंत्र्य सैनिक वीरपांडिय कट्टबोम्मन यांचे बंधू. कट्टबोम्मन [तमिळ नाडूच्या दक्षिणेकडच्या] पंचालमकुरिचीचे पोळिगर [प्रमुख] होते,” धर्मन सांगतात. “मूक बधिर असलेल्या उमइदुरईंना लोक म्हणायचे ऊमी आणि [ब्रिटिश म्हणायचे] डम्बी. लोकांचे ते फार लाडके होते. ईस्ट इंडिया कंपनी मात्र त्यांच्या मागावर होती कारण त्यांना या ‘नाठाळ आणि लाडक्या’ म्होरक्याचा खात्मा करायचा होता. कर्नल जेम्स वेल्शचं पुस्तक आहे, मिलिटरी रेमिनिसन्सेस (सैन्याच्या गतस्मृती), त्यात तुम्हाला हे सारं वाचायला मिळेल,” धर्मन माहिती देतात.
पंचलमकुरिचीचा ऐतिहासिक लढा १७९९ साली लढला गेला ते स्थळ थूथुकोडी जिल्ह्यातल्या कोविलपट्टी या शहरातल्या धर्मन यांच्या घरापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे. इंग्रज कर्नल वेल्शने या आठवणींमध्ये उमइदुराईची सुटका करणाऱ्या या स्त्रियांची संभावना “वाईट, डोक्याने अर्धवट जीव” अशी केली असली तरी धर्मन यांना मात्र रणांगणावरून उमइदुराईला आपल्या घरी नेणाऱ्या या स्त्रियांचं शौर्य आणि गावकऱ्यांची उपजत शहाणीव या दोन्हीचं फार कौतुक आहे. “मला सांगा,” ते म्हणतात, “त्याच्या सगळे मागावर आहेत, सैनिक लवकरच त्यांच्यापर्यंत पोचतील, त्यांची घरं उद्ध्वस्त करतील याची त्या शूर स्त्रियांना कल्पना नव्हती का?”
मी धर्मन यांना कोविलपट्टीत भेटले. नुकतंच, २०१५ साली या गावाला भौगोलिक चिन्हांकन देण्यात आलं आहे ते कादलमिट्टई, शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी. त्यांनी तेव्हा त्यांचं मत स्पष्टपणे मांडलं होतं, “ दलित लेखन असं काही नसतं. मी जन्माने दलित असेनही पण माझं लेखन असं वेगळं काढू नका.” इतक्यात आमचं फोनवर बोलणं झालं. “[टाळेबंदीमुळे] माझा दिनक्रम काही फारसा बदललेला नाही,” ते हसतात. “माझ्यासाठी एकांत हाच जगण्याचा मार्ग आहे. मी दिवसाचा पहिला अर्धा भाग लिहितो आणि दुपार कणमई (तळं) पाशी घालवतो, मासे धरत.”
“कोविडचं संकट म्हणजे ‘इडियप्पा सिक्कल’ [शेवयांचा गुंता] आहे. गरिबांचे हाल होतायत. आपण त्यांना कशी बरं मदत करायची? चक्रीवादळं आणि भूकंपाला कसं तोंड द्यायचं ते आपल्याला माहित आहे. पण या आतून जोडलेल्या जगात, जिथे तुम्ही एका दिवसात पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला पोचू शकता – आणि हा विषाणूही तसाच गेलाय – तिथे आपण डोळ्याला न दिसणाऱ्या विषाणूशी लढतोय.”
इतिहासात डोकावलं तर दिसून येतं की इथल्या गावांनी अनेक साथीच्या आजारांचा, आणि कोविड-१९ इतक्या जीवघेण्या आजारांचाही सामना केलाय. “पेरिया अम्मईचं उदाहरण घ्या. आता उच्चाटन झालेल्या देवी रोगाचं हे तमिळ नाव. देवीची बाधा झालेल्या व्यक्तीच्या त्वचेवर मोठे सुपारीएवढे फोड यायचे, अगदी पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण शरीरभर हे फोड यायचे, कधी कधी तर डोळ्यावरसुद्धा. हा रोग माणसाला सहज आंधळं करायचा, अपंगत्व आणायचा आणि जीवही घ्यायचा. त्यामुळे त्याच्या साध्या उल्लेखाने देखील इंग्रज सैनिकांचं धाबं दणाणलं, त्यात काही आश्चर्याचं कारण नाही. कॉलरा आणि प्लेग हेही असेच भयंकर आजार होते, जे मोठ्या प्रमाणावर प्राणघातक होते.
“या तिन्ही रोगांना [देवी, कॉलरा आणि प्लेग] ‘ओट्टुवर-ओट्टी नोइ’ म्हणत – स्पर्श, संपर्क आणि दूषित पाण्यातून पसरणारे संसर्गजन्य रोग. आपल्या पूर्वजांकडे लशी नव्हत्या, ना औषधं. त्यांच्याकडे केवळ एकच उपाय होता – कडुनिंब, एक जालीम जंतुनाशक. लिंबाचा कोवळा पाला वाटून सगळ्या फोडांना त्याचा लेप लावला जायचा. देवी आलेला माणूस असा सगळा हिरवा गार दिसायचा मग.”
६६ वर्षांच्या धर्मन यांनी लहानपणी, त्यांच्या गावी, कोविलपट्टीहून १० किलोमीटरवर असलेल्या त्यांच्या जन्मगावी उरुलईकुडीमध्ये देवी पाहिल्या होत्या. त्यांनी त्यांच्या लघुकथा आणि कादंबऱ्यांमध्ये या – करिसल भूमी - कोरडवाहू भागाबद्दल, तिथल्या निसर्गाबद्दल भरभरून लिहिलंय. त्यांच्या लिखाणासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत, त्यांचं नावही झालंय. २०१९ साली त्यांच्या सूल या (त्यांच्या जन्मगावी घडणाऱ्या पर्यावरणविषयक) कादंबरीला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
देवी इतक्या सर्रास आढळायच्या आणि इतक्या जणांचे जीव घ्यायच्या कि त्यांचं वर्णन करणारी एक विशिष्ट भाषा तयार झाली होती, धर्मन सांगतात. “देवी येऊन एखाद्याचा मृत्यू झाला तर म्हटलं जायचं, ‘थाई कूटिकिट्टा’ – म्हणजे देवी घेऊन गेल्या. कुणाला काही कळू नये म्हणून आणि आडून सांगण्याची सभ्य रीत पडली होती. आजार किती पसरलाय हे सांगण्यासाठी वेगवेगळे शब्द होतेः ‘अम्मई वंदिरुक्कु,’ देवी आल्या, म्हणजे एक –दोन रुग्ण आढळलेत, ‘अम्मई विलयदुथु’, म्हणजे आजार पसरलाय आणि वस्तीतल्या अनेक घरांना त्याची बाधा झालीये.”
सध्याच्या कोविड-१९ च्या वर्गीकरणामध्ये आणि यात साधर्म्य दिसतं, समूह-संसर्ग आणि प्रतिबंधित क्षेत्र, इत्यादी. अजूनही असेच काही शब्दप्रयोग होते, ‘अम्मा एरंगित्ता’ आणि ‘तन्नी ऊथियाचु’, ज्याचा शब्दशः अर्थ होतो, देवी गेल्या आणि पाणी पडलं. इंग्रजीत बोजड आणि शब्दबंबाळ वाटले तरी याचा मूळ अर्थ असा की संसर्ग संपला. (आपल्या सध्याच्या काळात विलगीकरण आणि अलगीकरण संपल्यासारखं.)
“देवी पूर्ण गेल्यावरच रोग्याला तीनदा अंघोळ घातली जायची आणि त्यानंतर तो किंवा ती इतरांना भेटू शकायची. सध्या करोना विषाणूबाबत आपण जे काही करतोय ते फार काही वेगळं नाहीये,” ते म्हणतात, “पण सध्या, त्याशिवायही बरंच काही होतंय – आणि त्यातलं किती तरी माध्यमांमुळे फोफावलंय – मुख्यतः त्यातली अतिरंजितता आणि भीती.”
“जुनाट आजारांमध्ये रोग्याला वेगळं काढलं जायचं आणि त्याचं सोवळं फार कडक असायचं. संसर्ग झालेली व्यक्ती ज्या घरात असायची त्याच्या दाराला कडुनिंबाची डहाळी टांगली जायची त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्याला कळायचं की इथे कुणी तरी आजारी आहे. आणि साथ खूप पसरायची तेव्हा लिंबाच्या डहाळ्यांचं तोरण केलं जायचं आणि गावाच्या वेशीला टांगलं जायचं. गावात येणाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना या गावात आजार बळावलाय ते त्यातून समजायचं. वेशीवरची खूण बघून ते तिथूनच माघारी फिरायचे.”
त्या काळी, लोक स्वयंपूर्ण होते ते एक बरं होतं, धर्मन म्हणतात. “सगळ्यांकडे दही-दूध असायचं. आणि कमी पडलंच, तर शेजारचं कुणी तरी थोडंसं तुमच्या दारात ठेवून जायचं, ते नुसतं उचलून घेतलं की झालं. बहुतेक जण शेतकरी होते, घरात माळवं असायचं, भात आणि कडधान्यं असायची. दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडकं, पडवळ – रानातून घेऊन यायचं. तसंही व्यवहार पैशात होत नसत – बहुतेक देवाणघेवाण वस्तूंमध्येच व्हायची. तुमच्यापाशी सुक्या लाल मिरची नसेल तर धणे द्यायचे आणि मिरची घ्यायची.”
धर्मन सांगतात देवी उन्हाळ्यात यायच्या, असह्य अशा उकाड्यात रोग पसरायचा. कॉलरा आणि प्लेग पावसाळ्यात पसरायचे. आणि सगळे जीवघेणे होते. “माझा आजा मला तेव्हाच्या गोष्टी सांगायचा. कुणी तरी अशा संसर्गाने मेलेल्या माणसाचं दफन करून गावी यायचा – आणि तिथे पोचल्यावर समजायचं, आणखी दोघांनी प्राण सोडलाय. त्यांचं सगळं करायला ते नकारच देऊ शकत नसत, कसंय पाड्यावर राहणारे सगळेच एकमेकांचे गणगोत असतात. त्यामुळे मग कसलंही संरक्षण नसताना, ते मृतदेह घेऊन परत दफनभूमीकडे निघायचे.”
सध्या जे काही ऐकायला येतंय – कोविड-१९ भोवती असलेला ठपका, आरोग्य कर्मचाऱ्यांना भाड्याच्या घरांमधून हाकलून लावणं, कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह स्वीकारायला नातेवाइकांनी नकार देणं आणि लोकांनी या आजाराने मरण पावलेल्यांना जवळपास दफन करू द्यायला लोकांनी नकार देण्यापर्यंत – हे मात्र नक्कीच काही तरी वेगळं आहे. धर्मन सांगतात, त्यांच्या जिल्ह्यातल्या एका माणसाने मुंबईहून परतलेल्या आपल्या भावाला घर सोडून जायला सांगितलं. का? मुंबईमध्ये आजाराचं प्रमाण वाढत होतं आणि या इथे राहणाऱ्या भावाला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता.
“आपल्या मूल्यांचा, माणुसकीचा हा ऱ्हास नाहीये का?” धर्मन सवाल करतात. “आपल्याच भूतकाळाशी तुलना कराः स्वतःच्या जीवाची काळजी करून त्या शूर बाया उमईदुराईला तिथेच टाकून आल्या का धीटपणे त्यांनी त्याचा जीव वाचवला?”
पुढे, कर्नल वेल्श लिहितात त्यानुसार उमईदुराईंच्या “ नशिबी मरण होतंच ” आणि त्यांच्याच नाही तर त्यांच्या भावाच्या कट्टबोम्मन यांच्याही. दोघांनाही इंग्रजांनी १७९९ साली फासावर चढवलं.
एकमेकांशी असणारी बांधिलकी आटलीच आहे, धर्मन म्हणतात. पण तितकंच नाही, आपली प्रतिकारशक्तीदेखील राहिलेली नाही. आणि हे सगळं आपल्या खानपानाच्या बदललेल्या सवयींमुळे. आपल्या ताटातून तृणधान्यं गायब झाली याबद्दल ते हळहळ व्यक्त करतात आणि डॉक्टरही त्यांच्याबाबत आग्रही असल्याचं सांगतात. “आपण इथेच पिकणारं अन्न का खात नाहीयोत? पारंपरिक, देशी पिकांना कमी पाणी लागतं, दोन-तीन चांगले पाऊस झाले तरी ती बिनघोर वाढतात.
“मला विचाराल, तर पेरू सगळ्यात मस्त आहे. तो उष्ण हवेतही वाढतो आणि माझ्या जमिनीतलं पीक आहे ते. मग असं असताना, मला दूर, डोंगरात, थंड हवेच्या प्रदेशात पिकणारं आणि माझ्यापर्यंत येण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागणारं सफरचंदच कशाला हवंय?”
त्यांची आजी, सीनीअम्मल तर त्यांच्याही एक पाऊल पुढे होती. कोविलपट्टीहून ते जेव्हा जेव्हा आपल्या उरुलईकुडीतल्या घरी जायचे, तेव्हा त्यांनी जर सोबत पाण्याची बाटली आणली असेल तर ती त्यांना रागवायची. “ते पाणी ती मला फेकून द्यायला लावायची, का तर ते ‘मृत’ असतं म्हणून. आणि मग आमच्या विहिरीचं पाणी प्यायचा तिचा आदेश यायचा!”
कोविड-१९ यायच्या आधी धर्मन यांनी केवळ एकदाच कर्फ्यू अनुभवलाय. १९९५ साली जातीय दंगे झाले तेव्हा आठ दिवसांचा कर्फ्यू लावला होता – घराच्या बाहेर पडलं तर अटक व्हायची शक्यता होती.
त्या अत्यंत तणावपूर्ण काळात धर्मन यांना एक जण भेटली, त्यांच्या एका लघुकथेची नायिकाः वेणा सुरू झालेली एक गरोदर स्त्री. धर्मन आणि त्याचं कुटुंब तिला भर रात्री एका दवाखान्यात घेऊन जातं. त्यानंतर डॉक्टरांना लागणारं साहित्य शोधत धर्मन यांना गावभर हिंडावं लागलं होतं.
“तितकंच नाहीये. त्या सगळ्या घटनेतला सगळ्यात रंजक भाग हा की ती बाई आणि मी ज्या जातींमध्ये संघर्ष पेटला होता त्या जातींचे. बाळाचा जन्म झाला आणि त्या जोडप्याने मला तिचं नाव ठेवायची विनंती केली. मी तिचं नाव कला देवी ठेवलं [तेव्हा सुरू असलेल्या हिंसक दंगलीच्या म्हणजेच कलावरमच्या संदर्भात].” ‘मी त्या गोष्टीची सुरुवात कशी केली माहितीये?’ ते विचारतात. “किती तरी दशकं जे माझे मित्र होते ते आज माझे शत्रू झालेत आणि जे सगळे वैरी होते ते मित्र, आणि हे सगळं एका क्षणात घडून गेलं...”
परिचयाचं वाटतंय? दंगे, कोविड-१९ आणि स्थलांतरितांचे परत निघालेले लोंढे या सगळ्याच्या आजच्या काळात, वाटायला हवं कदाचित.
अनुवादः मेधा काळे