ते जरा विचित्र होतं – पण दिल्लीच्या जीटी कर्नाल बायपासपाशी आमच्या डोळ्यासमोर ते घडत होतं.
एक गट ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या दिशेने आणि आतमध्ये निघाला होता – आणि दुसरा एक गट उलट्या दिशेने, दिल्लीकडून सिंघुच्या दिशेने चालला होता. ते एकमेकांच्या जवळून गेले आणि हे दृश्य म्हणजे प्रत्यक्षात काय गोंधळ उडाला होता त्याचं रुपक म्हणता येईल. दिल्लीहून परत येणारा गट त्यांच्या नेत्यांच्या आवाहनाचा मान राखत परत येत होता. त्यांच्यातले काही जण चुकून दिल्लीत शिरले होते कारण त्यांचा असा समज झाला होता की त्यांच्या नेत्यांनी दिल्ली पोलिसांनी आखून दिलेला मार्ग सोडून वेगळ्याच मार्गाने दिल्लीत प्रवेश करायचं ठरवलं होतं.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संसदेत रेटून पारित केलेल्या तीन कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांची स्वतःची प्रजासत्ताक दिनाची परेड काढण्याचा निर्णय घेतला होता. सिंघु, टिक्री, गाझीपूर, चिल्ला आणि मेवात अशा दिल्लीच्या सीमेवरच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून मोर्चा निघणार होता. राजस्थान-हरयाणाच्या सीमेवर शहाजहानपूर इथे देखील एक मोर्चा निघाला ज्यामध्ये भारताच्या राज्यांचं आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधीत्व करणारे देखावे ६० किलोमीटर अंतर पार करणार होते. अखिल भारतीय किसान सभेच्या शब्दात सांगायचं तर प्रजासत्ताक दिनाला देशाच्या नागरिकांनी सादर केलेला हा सर्वात मोठा सोहळा होता.
हा भव्य, शांततापूर्ण, शिस्तबद्ध मोर्चा आजवर कधी झाला नव्हता. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि इतर अनेकांनी आज खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आपल्या हाती घेतलं. इथेच नाही तर भारताच्या बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये असेच कार्यक्रम आणि मोर्चे काढण्यात आले.
पण, तुलनेने छोट्या एका गटाने इतक्या प्रचंड प्रमाणावर घडवून आणलेल्या अद्भुत अशा सोहळ्यापासून सगळ्यांचं लक्ष विचलित केलं आणि तुरळक पण त्रासदायक अशा, अचंबित करून टाकणाऱ्या घटनांकडे वळवलं. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनांचं नेतृत्व करणाऱ्या ३२ शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने ठरलेला मार्ग सोडून दिल्लीत शिरलेल्या या फुटीर गटाने केलेल्या हिंसेचा आणि तोडफोडीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. “शेतकऱ्यांच्या शांततामय आणि जबरदस्त आंदोलन उधळून लावण्यासाठी आखण्यात आलेला, खोलवर पाळंमुळं असणारा कट” अशा शब्दात मोर्चाने याचा निषेध व्यक्त केला आहे.
“मुख्य मोर्चा १० वाजता सुरू होणार होती,” संयुक्त किसान मोर्चाची ३२ सदस्यांपैकी एक कीर्ती किसान युनियनचे करमजीत सिंग सांगतात. “पण दीप सिधू आणि लख्खा सिदानासोबत [आणि इतरही] गेलेल्या हुल्लडबाजांनी – ज्यांच्यातले कुणीही ३२ संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य नव्हते – गोंधळ घातला. त्यांनी सकाळी ८ वाजताच बॅरिकेड तोडत दिल्लीच्या रिंगरोडच्या दिशेने जायला सुरुवात केली. आणि सोबत इतर काही जणांनाही चिथवायला लागले. हे तेच लोक होते जे लाल किल्ल्ल्यात शिरले आणि त्यांनी तिथे त्यांचा स्वतःचा झेंडा उभारला.”
त्यानंतर दिल्लीच्या सगळ्या घटनाक्रमात आपण होतो हे दीप सिधुने मान्य केलं आहे. पंजाबच्या गुरुदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांचा तो निकटवर्ती आहे.
“आमचा त्यांना अजिबात पाठिंबा नाहीये. त्यांनी जे केलं ते चूकच होतं. २६ तारखेला जे काही झालं ते परत कधीही होणार नाही आणि आधी होतं तसंच हे आंदोलन शांततमयच राहील. बॅरिकेड तोडणं किंवा लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणं याचं आम्ही कधीही समर्थन करू शकत नाही. भविष्यात अशी हुल्लडबाजी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ,” करमजीत सिंग सांगतात.
या फुटीर गटांनी त्यांची ‘रॅली’ लवकर सुरू केली, बॅरिकेड तोडले आणि त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की नेत्यांनी हा नवा कार्यक्रम आखलाय. सिंघुहून दिल्लीकडे जाणारा रस्ता आधीच ठरवलेला होता आणि त्याला पोलिसांनी मान्यताही दिली होती. पण या गटांनी दिल्लीत शिरण्यासाठी दुसरा रस्ता निवडला जो लाल किल्ल्याच्या दिशेने जात होता. त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि मग आंदोलक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. काही जण किल्ल्यात शिरले आणि भारताच्या तिरंग्याशेजारीच त्यांनी आपल्या धर्माची पताका फडकवली.
आणि याविरुद्ध मुख्य मोर्चापुढे या हुल्लडबाजांची संख्या नगण्य ठरली. एका मागून एक ट्रॅक्टर, लोकांचे जत्थे अभिमानाने तिरंगा फडकवत जात राहिले.
“आम्ही शेतकरी आहोत. आम्ही पिकं काढतो आणि तुम्हाला अन्न पुरवतो. आमचं ध्येय आहे हे तीन कृषी कायदे रद्द करून घेणं. लाल किल्ल्यात शिरून तिथे झेंडा लावायचा हा आमचा उद्देशच नव्हता. काल जे काही झालं ते चुकीचंच होतं,” पंजाबच्या मोगा जिल्ह्यातल्या शेरा शेरा गावचे ४५ वर्षीय शेतकरी बलजिंदर सांगतात.
पण ती घटना घडली आणि तेव्हापासून माध्यमांचं सगळं लक्ष या फुटीर गटाकडे आणि त्यांनी दिल्लीत जी नौटंकी केली त्याकडे वेधलं गेलं. आणि त्याचा परिणाम असा की पूर्णपणे शांततेत पार पडलेल्या मुख्य मोर्चाकडे दुर्लक्ष केलं गेलं. एकत्रितपणे संघर्ष करणाऱ्या ३२ संघटनांनी ठरवून दिलेल्या मार्गानेच मोर्चा काढला आणि तिथूनच आपापले ट्रॅक्टर नेले. त्यांच्या ट्रॅक्टरांच्या शेजारून अनेक जण चालत जात होते काही जण दुचाकींवरून तर काही सायकलींवरून.
या मोर्चातल्या शेतकऱ्यांनी जेव्हा दिल्लीच्या काही भागात प्रवेश केला, तेव्हा कुठलीही भांडणं किंवा दंगली झाल्या नाहीत. त्यांनी पार केलेल्या अनेक रस्त्यावर दिल्लीच्या रहिवाशांनी फुलांनी, फळं आणि पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यांच्यातल्याच एक होत्या, रोहिणीच्या ५० वर्षीय बबली कौर गिल ज्या चालत्या ट्रॅक्टरवरच्या शेतकऱ्यांना पाणी वाटत होत्या. त्या म्हणाल्या, “मी त्यांच्यासाठी इथे आलीये. आपल्याला लागतं ते सगळं ते आपल्याला पुरवतात. पहाटे उठल्या उठल्या मला चहा लागतो. त्यानंतर नाश्त्याला रोटी लागते. हे सगळं शेतकरीच तर पुरवतात. हे आंदोलन बघा आणि त्यांची हलाखी पण पहा. एक महिला तिच्या १२ महिन्यांच्या बाळाला घेऊन सिंघु सीमेवर बसलीये. हे ती काय करतीये? तिची जमीनच तिच्याकडे राहणार नसेल तर ती या बाळाला कसं मोठं करेल? सरकारने ताबडतोब हे कायदे रद्द करायला पाहिजेत.”
“खरं तर आज सुट्टी आहे. मी मजेत माझ्या घरच्यांसोबत घरी आराम करू शकलो असतो. पण मी आज इथे शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला इथे आलोय,” दिल्लीच्या सदर बाजारचे ३८ वर्षीय अश्फाक कुरेशी सांगतात. कुरेशींनी ‘वेलकम टू दिल्ली’ असा फलक हातात घेऊन शेतकऱ्यांचं स्वागत केलं.
सगळे ट्रॅक्टर देखणे दिसत होते. रंगीबेरंगी पताका, फिती आणि फुगे लावून ते सजवले होते. वरती भारताचा तिरंगा दिमाखात फडकत होता. शेतकरी गर्वाने आणि एकजुटीत गाणी गात होते, या तीन कायद्यांपुढे ते झुकणार नाहीत हे ठासून सांगत होते. “सरकारनला आमचं म्हणणं ऐकावं लागेल. आम्हाला नको असलेले कायदे ते आमच्यावर लादतायत. त्यांनी या आधीच स्वतःला अंबानी आणि अदानीला विकलंय,” पतियाळाचे ४८ वर्षीय मनिंदर सिंग सांगतात. ते मोर्चातल्या ट्रॅक्टरच्या शेजारून चालत चाललेत. “पण आम्ही हा लढा हरणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू.”
अनुवादः मेधा काळे