बेस कॅम्पवर परत नवीन आशा निर्माण झाली होती, आणि चिंताही. हिरव्या गणवेशातल्या महिला आणि पुरुष सतत त्यांच्या मोबाइल फोनवर येणाऱ्या संदेशांवर, नकाशांवर आणि फोटोंवर लक्ष ठेऊन होते.
त्या दिवशी सकाळी, जवळच्याच जंगलात वाघिणीच्या मागावर असणाऱ्या गटाला
पंजाचे ताजे ठसे सापडले होते.
दुसऱ्या गटाने वाघाची अंधुकशी छबी सादर केल्याचं वन खात्याच्या
सूत्रांनी सांगितलं. पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं पानगळीच्या झुडपांचं
जंगल, अधून मधून कपाशीची रानं आणि तलाव. त्यात बसवलेल्या ९० कॅमेऱ्यांमधल्या एका
कॅमेऱ्यात वाघाची छबी पकडली गेली होती. “पट्टे तरी वाघिणीसारखे दिसतायत,” हिरवा
गणवेश घातलेला एक तरूण वन अधिकारी म्हणतो, त्याच्या आवाजातला तणाव लपत नाही. “पण
छबी स्पष्ट नाहीये,” त्याचे वरिष्ठ म्हणतात, “अजून स्पष्ट दिसायला पाहिजे.”
ही तीच असेल का? ती जवळपास आली असेल का?
गेली दोन वर्षं आपल्या दोन बछड्यांसोबत वन विभागाला हुलकावणी
देणाऱ्या या वाघिणीच्या शोधात वन संरक्षक, तिचा माग काढणारे आणि निशाणेबाज पुन्हा
एकदा जंगलात वेगवेगळ्या दिशेने आगेकूच करायला सज्ज झाले आहेत.
किमान १३ गावकरी वाघाच्या हल्ल्यात मरण पावले आहेत – सगळ्या प्रकरणात संशयाची सुई मात्र तिच्यावरच आहे.
वन्यजीव निरीक्षकाच्या आदेशानुसार या वाघिणीला ‘पकडा किंवा ठार करा’ म्हणून मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. पण यातला कोणताच पर्याय सोपा नव्हता. २८ ऑगस्ट २०१८ पासून तिचा काहीच मागमूस लागत नव्हता. कॅमेऱ्याचा बारीकसा आवाज किंवा पंजाचे ठसे दिसले की या वाघिणीचा माग काढणाऱ्या आणि तिला जेरबंद करू पाहणाऱ्या गटाच्या आशा पल्लवित व्हायच्या.
* * * * *
ऑक्टोबर महिन्यातली रविवार सकाळ होती. हिवाळ्याची थंडी अजून सुरू झालेली नाही. आम्ही जंगलाच्या एका निर्जन अशा पट्ट्यात होतो. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या लोणी आणि सराटी गावांच्या मधोमध अधिकाऱ्यांनी एक तात्पुरता तंबू उभारलेला होता. कपास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध अशा या प्रदेशातला हा त्यांचा तळ.
हा आहे राळेगाव तालुका, राष्ट्रीय महामार्ग ४३ च्या उत्तरेला, वडकी आणि उमरी गावांच्या मध्ये. इथे प्रामुख्याने गोंड आदिवासींची वस्ती आहे. यांतले बहुतेक जण कपास आणि डाळींची शेती करणारे छोटे आणि सीमांत शेतकरी आहेत.
वाघाचा माग काढणाऱ्या या चमूत २०० वन कर्मचारी आहेत – वनरक्षक,
महाराष्ट्र वन विभाग आणि वन विकास महामंडळाचे विविध अधिकारी ते जिल्हा वन अधिकारी,
वन संवर्धन प्रमुख (वन्यजीव) आणि वन्यजीव विभागाचे सर्वोच्च पदाधिकारी, मुख्य वन
संवर्धन प्रमुख (पीसीसीएफ, वन्यजीव). सगळे जण एकमेकांशी ताळमेळ साधत अहोरात्र ठाण
मांडून आहेत, वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी जीवाचं रान करत आहेत.
याच चमूमध्ये हैद्राबादच्या निशाणेबाजांची एक खास टीमदेखील आहे आणि
त्यांचा म्होरक्या म्हणजे नवाब शफात अली खान, शाही घराण्यातले ६० वर्षीय एक तरबेज
शिकारी. नवाबांच्या उपस्थितीमुळे अधिकारी आणि स्थानिक पातळीवर संवर्धनाचं काम
करणाऱ्यांमध्ये मात्र दोन गट पडले आहेत. नवाबांचा यातला हस्तक्षेप त्यांना रुचलेला
नाही. मात्र एखाद्या हिंस्त्र प्राण्याला बेशुद्ध करायचं किंवा मारायचं असेल तर
देशभरातले वन्यजीव अधिकारी नवाबांचाच सल्ला घेणं पसंत करतात.
“त्यांनी किती तरी वेळा हे काम केलं आहे,” त्यांच्या गटातले सय्यद
मोइनुद्दिन खान सांगतात. काही काळापूर्वी त्यांनी भारतातल्या ५० व्याघ्र
प्रकल्पांपैकी एक असलेल्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानाजवळ दोन माणसांची शिकार
केलेल्या एका वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केलं होतं.
सहा महिन्यांच्या काळात बिहार आणि झारखंडमध्ये १५ लोकांना पायदळी
तुडवणाऱ्या एका पिसाळलेल्या हत्तीला त्यांनी बेशुद्ध केलं आहे आणि पश्चिम
महाराष्ट्रात सात लोकांचे जीव घेणाऱ्या एका बिबट्याला गोळी घातली आहे.
पण हे जरा वेगळं आहे, डार्ट झाडणारी हिरव्या रंगाची रायफल हातात घेऊन
चष्मा घातलेले, मृदूभाषी असे नवाब सांगतात.
“वाघीण तिच्या दोन बछड्यांसोबत आहे,” शफात अली सांगतात. रविवारी सकाळी ते त्यांचा मुलगा आणि इतर सहाय्यकांसोबत या तळावर आले आहेत. “आपण काहीही करून तिला बेशुद्ध केलं पाहिजे आणि त्यानंतर तिच्या दोन बछड्यांनाही ताब्यात घेतलं पाहिजे.”
“पण करनीपेक्षा कथनी फार सोपी असते,” त्यांना या मोहिमेत मदत करण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा असगर सांगतो. ती नजरेच्या थेट टप्प्यात येणं फार अवघड आहे आणि त्यामुळे यावर तोडगा निघायला इतका वेळ लागतोय.
ती तिचा ठिकाणा पटापट बदलतीये, आठ तासाहून जास्त काळ काही ती एका
जागी थांबत नाहीये, विशेष व्याघ्र दलाचे एक सदस्य सांगतात. इथून २५० किलोमीटरवर
असणाऱ्या नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाहून महिनाभरापूर्वी त्यांना
खास करून या मोहिमेसाठी बोलवून घेण्यात आलंय.
गटातले काही जण आता अस्वस्थ झालेत. खरं तर आता चिकाटीच महत्त्वाची आहे, मात्र तीच आता संपून चाललीये.
टी१ने – किंवा गावकऱ्यांच्या भाषेत अवनीने – गेल्या दोन वर्षांत
राळेगावमध्ये १३ ते १५ जणांचा बळी घेतल्याचं मानलं जातं. ती इथेच कुठे तरी आहे, या
तालुक्याच्या हिरव्या गच्च जंगलात लपलेली आहे.
गेल्या दोन वर्षांत तिच्यामुळे ५० चौरस किमीच्या परिसरातली डझनभर
गावं भीती आणि चिंतेच्या छायेत जगत आहेत. गावकरी चिंतित आहेत, वेचणीचा हंगाम आला
तरी आपल्या कपाशीच्या रानात कापूस वेचायला जायचंही ते टाळायला लागले आहेत. “मी
गेल्या वर्षभरात माझ्या रानात पाय टाकलेला नाही,” कलाबाई शेंडे सांगतात. लोणी
गावात टी१ ने घेतलेल्या बळींमध्ये त्यांचे पती समाविष्ट आहेत.
टी१ कुणावरही हल्ला करू शकते – या तळाच्या उत्तरेला असणाऱ्या पिंपळशेंडा गावात २८ ऑगस्टला तिने एकाचा जीव घेतला. त्यानंतर तिने कुणावर हल्ला केलेला नाही. पण तिला ज्यांनी पाहिलंय त्यांच्या मते ती आक्रमक आहे आणि तिचा काहीच अंदाज बांधता येत नाही.
वन विभागाचे अधिकारी हातघाईवर आलेत. अजून एखाद्याचा जीव गेलाच तर स्थानिकांच्या संतापाचा आगडोंब उसळू शकतो. आणि दुसरीकडे व्याघ्रप्रमी आणि संवर्धन कार्यकर्ते तिला मारण्याच्या आदेशाविरोधात न्यायालयात खटले दाखल करतायत.
मुख्य वन संवर्धन प्रमुख (पीसीसीएफ, वन्यजीव), ए के मिश्रा या मोहिमेतील त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पांढरकवड्यामध्ये तळ ठोकून बसलेत. त्यांना निवृत्त व्हायला अजून चार महिने आहेत. “सर बहुधा इथेच निवृत्त होतात आता,” त्यांच्या तरूण अधिकाऱ्यांपैकी एक टोमणा मारतो.
* * * * *
ही समस्या टी१ मुळे सुरू झालेली नाही तशीच ती तिच्या मृत्यूसोबत संपणारही नाहीये, वन्यजीव कार्यकर्ते म्हणतात. खरं तर ती अजूनच बिकट होत जाणार आहे – आणि त्यावर काय तोडगा काढायचा याची आपल्या देशाला सुतराम कल्पना नाही.
“सर्वांनी एकत्र बसून आपली संवर्धनाची धोरणप्रणाली नव्याने लिहिण्याची हीच खरं तर योग्य वेळ आहे,” वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे मध्य भारत संचालक नागपूर स्थित नीतीन देसाई सांगतात. “ज्या वाघांनी आजपर्यंत सलग असा जंगलाचा पट्टा पाहिलेला नाही किंवा तसा त्यांना पहायला मिळणारही नाही अशा वाघांशी आपल्याला जुळवून घ्यायला लागणार आहे. त्यामुळे भविष्यात हे वन्यजीव अक्षरशः आपल्या आसपास घुटमळत असणार आहेत.”
देसाईंचं म्हणणं खरं आहेः टी१ च्या क्षेत्रापासून १५० किलोमीटरवर अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात बहुतेक आपल्या आईपासून दुरावलेल्या एका अगदी तरण्या वाघाने १९ ऑक्टोबर रोजी मंगळूर दस्तगीर गावातल्या एका माणसाला त्याच्याच शेतात ठार मारलं आणि तीन दिवसांनी अमरावती शहराच्या जवळ एका बाईचा जीव घेतला.
वन अधिकाऱ्यांच्या मते, हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातून, २०० किलोमीटर
अंतर, बहुतेक ठिकाणी जंगल नसणाऱ्या प्रदेशातून प्रवास करून इथपर्यंत आला असावा. एक
नवं संकट जन्माला येतंय. त्यानंतर या वाघावर लक्ष ठेऊन असणाऱ्या अधिकाऱ्यांनी
सांगितलं की आता तो मध्य प्रदेशात शिरलाय, म्हणजेच त्याने चंद्रपूरपासून ३५०
किलोमीटर प्रवास केलाय.
टी१ बहुतेक इथून ५० किलोमीटर पश्चिमेला असणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यातून इथे आली असावी – तिच्या आईच्या दोन बछड्यांपैकी ती एक, जिल्हा वन्यजीव रक्षक आणि व्याघ्रप्रेमी रमझान वीरानी सांगतात. तिच्या दोन बछड्यांचा बाप असणारा टी२ हा वाघही याच क्षेत्रात सध्या राहतोय.
“२०१४ च्या सुमारास ती इथे आली आणि इथेच तिने आपलं बस्तान बसवलं,” पांढरकवड्याच्या महाविद्यालयात व्याख्याते असणारे वीरानी सांगतात. “तेव्हापासून आम्ही तिच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत. गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच इथे वाघ आलाय.”
आजूबाजूचे गावकरीही याला दुजोरा देतात. “या भागात वाघ असल्याचं कधीही माझ्या कानावर आल्याचं मला स्मरत नाही,” सराटी गावचे ६३ वर्षीय मोहन ठेपाळे सांगतात. आता मात्र ही वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांच्या कहाण्या उदंड झाल्या आहेत.
विदर्भातल्या इतर प्रदेशांप्रमाणेच इथेही शिवारांच्या आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या मध्ये छोटी छोटी जंगलं असं चित्र आहे. उदा. नवे किंवा रुंद केलेले रस्ते, बेंबळा सिंचन प्रकल्पाचा कालवा, अशा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलांचा ऱ्हास झाला आहे.
टी१ने सर्वप्रथम जून २०१६ मध्ये बोराटी गावच्या साठीच्या सोनाबाई घोसाळेंना मारलं. तेव्हा तिची पिल्लं नव्हती. २०१७ च्या अखेरीस तिला पिल्लं झाली. ऑगस्ट २०१८ मध्ये जेव्हा तिने तीन माणसं मारली त्यानंतरच खरं तर संघर्षाची ठिणगी उडाली. २८ ऑगस्ट रोजी तिच्या हल्ल्यात मरण पावलेले पिंपळशेंडा गावचे गुराखी आणि शेतकरी असणारे ५५ वर्षीय नागोराव जुनघरे तिचे शेवटचे बळी.
तोपर्यंत मुख्य संवर्धकांनी तिला ठार मारण्याचा आदेश काढला होता. या
आदेशाला आधी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात
आलं. मात्र जर या वाघिणीला जेरबंद करण्यात यश येत नसेल तर तिला ठार करावे हा उच्च
न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला.
काही संवर्धन कार्यकर्त्यांनी त्यानंतर या वाघिणीला जीवदान द्यावं
अशी राष्ट्रपतींकडे याचना केली.
दरम्यानच्या काळात वन अधिकाऱ्यांनी शूटर शफात अली खान यांना बोलावलं
मात्र वन्यजीव संवर्धन कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर आणि केंद्रीय मंत्री मनेका
गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी माघारी पाठवण्यात आलं.
सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेशातून एका तज्ज्ञ गटाला पाचारण करण्यात आलं. हा गट त्यांच्यासोबत चार प्रशिक्षित हत्ती घेऊन आला, पाचवा हत्ती चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणला गेला.
पण या सगळ्या मोहिमेला मोठा झटका बसला. चंद्रपूरहून आणलेल्या हत्तीने
मध्यरात्री साखळदंड तोडून सुटला आणि राळेगावच्या तळापासून ३० किलोमीटरवर असणाऱ्या
चाहंद आणि पोहना गावात शिरला आणि त्याने दोन माणसांचा जीव घेतला.
आता महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूत्रं हातात घेतली, त्यांनी शफात अली खान यांना परत बोलावलं आणि काही वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना ही वाघीण जेरबंद किंवा मृत हाती लागेपर्यंत पांढरकवड्यात तळ ठोकायला सांगितलं. यात वन्यजीव विभागप्रमुख ए के मिश्रांचाही समावेश होता. यानंतर नागपूरमध्ये असणाऱ्या वनसंवर्धन कार्यकर्त्यांनी आणखी निदर्शनं केली.
नवाब अलींचा या मोहिमेत परत प्रवेश झाल्याच्या निषेधार्थ स्थानिक संवर्धन कार्यकर्ते आणि काही वन अधिकारी निषेध म्हणून
नवाब अलींनी गोल्फपटू आणि श्वानांचं प्रजनन करणारे
ज्योती रंधावा यांना हरयाणाहून त्यांच्या इटालियन केन कॉर्सो जातीच्या दोन
श्वानांसह – बहुधा वासावरून माग काढण्यासाठी - पाचारण केलं.
पॅराग्लाइडर्सचा एक चमू, ड्रोनच्या मदतीने देखरेख आणि वाघाचा माग
काढणारे अशा सगळ्यांना मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं – मात्र सगळं मुसळ
केरात. ड्रोन कॅमेऱ्यांचा आवाज मोठा होता आणि इथली भौगोलिक रचना आणि झाडीमुळे पॅराग्लाइडर्सचा
काहीही उपयोग झाला नाही.
जाळ्या, आमिषं आणि टेहळणी अशा इतरही काही कल्पना पुढे आल्या. मात्र त्याही
झिडकारण्यात आल्या.
तरीही टी१ चा मागमूसही नव्हता. गावकरी भयभीत झाले होतं. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पहिले दोन आठवडे काहीही घडलं नाही.
* * * * *
आणि मग अचानक सुगावा लागला. ती जवळच कुठे तरी होती.
१७ ऑक्टोबरला वाघिणीच्या मागावर असणारी एक टीम एकदम उत्साहात वापस आलीः तळछावणीच्या जवळच टी१ घुटमळत होती. त्यांनी सांगितलं की त्यांनी टी१ ला तळछावणीपासून ३ किलोमीटरवरच्या सराटी गावामध्ये पाहिलं. ऑगस्ट २०१७ मध्ये तिने याच गावात एका तरुण शेतकऱ्याला ठार मारलं होतं.
सगळ्या टीम कामाला लागल्या आणि तिथे थडकल्या. ती तिथेच होती. कोंडीत सापडलेल्या, संतापलेल्या वाघिणीने एका टीमवर हल्ला केला. डार्टने तिला बेशुद्ध करण्याची कल्पना निशाणेबाजांनी सोडून दिली आणि ते तळावर परत आले. तुमच्यावर एखादी वाघीण हल्ला करण्याच्या इराद्याने चाल करून येत असेल तर तुम्ही तिच्या दिशेने डार्ट मारू शकत नाही.
काहीही असो, ही चांगली बातमी आहे. तब्बल ४५ दिवस दडून बसलेली टी१ बाहेर तर आली. आता तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं. मात्र तिला जेरबंद करणं अजूनही अवघड आणि धोक्याचं होतंच.
* * * * *
“ही मोहीम अवघड आहे,” शफात अली म्हणतात. “आता तिचे बछडे छोटे नाहीयेत. वर्षभराचे हे बछडे एका वेळी सहा-सात जणांना सहज परतवून लावू शकतात.” त्यामुळे आता वाघाच्या मागावर असणाऱ्या गटाला एका वाघिणीचा नाही तर तीन वाघांचा मुकाबला करावा लागणार होता.
महाराष्ट्र वनविभागाचे अधिकारी वर्तमानपत्रांशी बोलायचं टाळत होते त्यामुळे शफात अली आणि हैद्राबादहून आलेली त्यांची टीमच या मोहिमेबद्दल थोडं-थोडं काही सांगत होती.
“खूप जास्त ढवळाढवळ चाललीये ही,” एक तरूण वनक्षेत्रपाल एका मराठी वृत्तवाहिनीबद्दल संतापून बोलत होता. शफात
अलींनी वृत्तपत्रांशी बोलावं हे त्याला पसंत पडलेलं नव्हतं.
वन अधिकाऱ्यांवर लोकांचा आणि राजकीय दबाव आहे हे मान्य आहे पण दोष
त्यांचाच आहे, पांढरकवड्याचे एक संवर्धन कार्यकर्ते सांगतात. शफात अलींनी या
मोहिमेची सूत्रं हातात घेतल्यावर त्यांनी या मोहिमेतून अंग काढून घेतलं. “त्यांनीच
सगळी परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जाऊ दिली आहे.”
तळावर लाकडी खांबाला अडकवलेल्या मोठ्या नकाशामध्ये गेल्या दोन वर्षांत टी१ चा संचार असलेलं क्षेत्र लाल रंगाने दाखवलेलं आहे.
“हे दिसतं तितकं साधं सरळ नाही,” मोहिमेवरून परतलेला एक तरूण वनरक्षक सांगतो, “हा खडतर भाग आहे. किती तरी शेतं, झाडोरा, झुडपं आणि लागवडीचे पट्टे, छोटे ओढे, तळी – मुश्किल आहे.”
ती दर आठ तासांनी तिचा ठिकाणा बदलतीये, सगळा प्रवास फक्त रात्रीच्या वेळी.
२१ ऑक्टोबर रोजी, सराटीत एक ग्रामस्थाने वाघिणीला तिच्या दोन बछड्यांसह पाहिलं. तो भीतीने घरी पळाला. तिच्या मागावर असणारा गट तिथे पोचला मात्र तोपर्यंत वाघीण आणि तिचे दोन्ही बछडे अंधारात गायब झाले होते.
संपूर्ण ऑक्टोबर महिना, अनेक गटांनी टी१ आणि तिच्या दोन्ही पिल्लांचा अगदी कसून शोध घेतला. २५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरच्या काळात दोन गावकऱ्यांचा – एक बोराटीचा आणि एक आतमुर्डी गावचा – अगदी थोडक्यात जीव वाचला होता.
दरम्यान, एका बैठकीसाठी शफात अलींना बिहारला जावं लागलं. त्यांचा मुलगा, असगर आता निशाणेबाजांच्या गटाचा म्होरक्या झाला. वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यांनी टी१ चा जीव वाचवण्यासाठी याचिका दाखल करणं थांबवलेलं नाही. प्रत्यक्ष गावात परिस्थिती तणावपूर्ण आहे. कापूस वेचणीला आलाय, मात्र अख्ख्या राळेगाव तालुक्यात शेतकरी भयभीत झाले आहेत.
२ नोव्हेंबर रोजी अनेक गावकऱ्यांनी टी१ ला बोराटीजवळ राळेगावकडे जाणाऱ्या पक्क्या डांबरी रस्त्यावर फिरताना पाहिलं. ती बछड्यांसोबत होती. टेहळणी करणारी टीम, असगर आणि त्याचे सहकारी लगेच तिथे पोचले. ३ नोव्हेंबर रोजी शनिवारी, शफात अली तळछावणीवर परत आले.
३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र वन विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार
आदल्या रात्री ११ वाजता टी१ ला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. या देशातल्या बहुधा
सर्वात जास्त दिवस चाललेल्या वाघाच्या शोधमोहिमेवर अशा रितीने पडदा पडला.
वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न जेव्हा फसला तेव्हा ती
आक्रमकरित्या टेहळणी गटाच्या दिशेने चालून आली. असगर उघड्या जीपमध्ये होता, त्याने
स्वसंरक्षणार्थ रायफलचा घोडा ओढला, आणि वाघिणीचा एका गोळीतच मृत्यू झाला असं
अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.
टी १ चा मृतदेह नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
मुख्य वन संवर्धन प्रमुख ए. के. मिश्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं
की आता ते टी१ च्या दोन बछड्यांना ताब्यात घेण्यासाठी नवी मोहीम आखत आहेत.
राळेगावच्या गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडलाय तर वन्यजीव कार्यकर्त्यांनी आता टी१ ला ज्या पद्धतीने मारण्यात आलं त्याविरोधात आणि नियमांचा भंग केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवायचं ठरवलं आहे.
एका वाघिणीचा अंत झाला. वाघ आणि माणसातला संघर्ष मात्र चांगलाच उसळला आहे.