“टिक्रीच्या सीमेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रॅक्टरची किमान ५० किलोमीटरची रांग लागलीये,” कमल ब्रार सांगतात. हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातून ते आणि त्यांच्या गावातले इतर २० शेतकरी २४ जानेवारी रोजी दोन ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉली घेऊन टिक्रीच्या सीमेवर पोचले.
सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत रेटून पारित करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर २६ नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत. हरयाणा-दिल्लीच्या सीमेवरची टिक्री सीमा हे त्यातलं एक महत्त्वाचं आंदोलन स्थळ.
याच आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी राजधानीमध्ये अभूतपूर्व असा ट्रॅक्टर मोर्चा काढायचं ठरवलं आहे.
यात भाग घेणाऱ्यांपैकी एक आहेत निर्मल सिंग. पंजाबच्या फझिलका जिल्ह्याच्या अबोहार तालुक्याच्या आपल्या वहाबवाला गावाहून चार ट्रॅक्टर घेऊन आलेल्या सिंग यांचे टिक्रीमध्ये गाड्या उभ्या करायला जागा शोधण्यातच कित्येक तास गेले. किसान मझदूर एकता युनियनतर्फे ते वहाबवालाहून २५ लोकांना सोबत घेऊन आले आहेत. “अजून खूप सारी माणसं येणार आहेत. ट्रॅक्टरची संख्या वाढतच जाणार आहे, बघाच तुम्ही,” ते म्हणतात.
“परेडच्या दिवशी प्रत्येक ट्रॅक्टरवर १० लोक असतील,” कमल ब्रार सांगतात. “हा मोर्चा शांततापूर्ण असेल आणि पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच आम्ही जाणार आहोत. अपघात झाला किंवा मोर्चाच्या दरम्यान काही बेशिस्तीचा प्रकार घडला तर काय करायचं यसंबंधी शेतकरी नेते सेवाभावी कार्यकर्त्यांनी प्रशिक्षित करत आहेत.”
ट्रॅक्टर परेड सुरू होण्याआधी सकाळी शेतकऱ्यांना लंगरमधून चहा आणि नाश्ता देण्यात येईल. मोर्चाच्या मार्गावर मात्र अन्न देण्यात येणार नाही.
मोर्चाच्या पुढ्यात शेतकरी महिला असतील आणि त्यासाठी त्यांचा सराव देखील सुरू आहे. २६ जानेवारीच्या मोर्चाआधी स्त्रियांचे काही गट टिक्रीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालवण्याचा सराव करताना दिसतायत.
सर्वात पुढे असणाऱ्या महिलांपैकी एक आहेत ६५ वर्षीय राज कौर बीबी. हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्याच्या जाखाल तालुक्यातल्या आपल्या गावाहून त्या इथे आल्या आहेत. “[जानेवारीच्या] २६ तारखेला सरकारला महिलांची ताकद काय असते ते दिसून येईल,” त्या म्हणतात.
२४ जानेवारी रोजी रात्री उशीरा भारतीय किसान युनियन (उग्राहन) च्या नेतृत्वात तब्बल २०,००० ट्रॅक्टरचा ताफा टिक्रीला पोचला. बठिंडा जिल्ह्याच्या डबवाली आणि संगरूर जिल्ह्याच्या खनौरी सीमेहून हे ट्रॅक्टर इथे आले आहेत.
आपले ट्रॅक्टर घेऊन थांबलेल्या शेतकऱ्यांमधले एक आहेत ६० वर्षीय जसकरण सिंग. ते पंजाबच्या मनसा जिल्ह्यातल्या शेर खनवाला गावाहून पाच ट्रॅक्टर भरून शेतकऱ्यांना घेऊन २७ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा इथे आले होते. “तेव्हापासून आम्ही इथे बसून आहोत, पण एकही अनुचित प्रकार झालेला नाही, चोरी नाही आणि बेशिस्त वागणं,” ते सांगतात.
तेव्हापासून ते टिक्रीचं आंदोलन स्थळ ते पंजाबच्या मनसा जिल्ह्यातलं त्यांचं गाव अशा त्यांच्या खेपा चालू आहेत. २३ जानेवारी रोजी ते १० ट्रॅक्टरवर २५ इतर शेतकऱ्यांना घेऊन इथे आले होते. “२६ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस असणार आहे जेव्हा या देशाचा अन्नदाता एवढा मोठा मोर्चा काढणार आहेत. आता ही ‘लोक-चळवळ’ बनली आहे,” ते म्हणतात.
देवरंजन रॉय टिक्रीमध्ये प्रजासत्ताक दिनाची वाट पाहतायत. चाळिशीचे या कलाकाराचा तिघांचा गट पश्चिम बंगालच्या हल्दियाहून रेल्वेने इथे गेल्या आठवड्यात पोचले आहेत. बिजू थापर या दुसऱ्या कलाकाराच्या मदतीने देवरंजन लोकांच्या मनात मानाचं स्थान असलेल्या सर छोटू राम यांच्यासारख्या ऐतिहासिक नेत्यांचे कटआउट तयार करतायत. “आम्ही शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी इथे आलो आहोत. आणि आम्ही हे कटआउट स्वतःच्या खर्चाने तयार करणार आहोत. कलेने नेहमी समाजासाठी बोललं पाहिजे,” ते म्हणतात. या कटआउटमध्ये एक आहेत बाबा राम सिंग, ज्यांनी १६ डिसेंबर रोजी कुंडलीच्या सीमेपाशी स्वतःला गोळी घातल्याचं बोललं जात आहे.
टिक्रीमध्ये आलेल्या समर्थकांमधली एक जण आहे इशिता, पश्चिम बंगालच्या हलदियामधली पदव्युत्तर शिक्षण घेणारी एक विद्यार्थी. ती ट्रॅक्टरसाठी एक बॅनर तयार करतीये ज्यात या कायद्यांचा शेतकऱ्यांवर आणि इतरांवरही कसा परिणाम होणार आहे ते दाखवण्यात आलं आहे.
५ जून २०२० रोजी वटहुकुमाद्वारे लागू करण्यात आलेले हे कायदे १४ सप्टेंबर रोजी संसदेत विधेयक म्हणून सादर झाले आणि या सरकारने त्याच महिन्याच्या २० तारखेला ते कायदे म्हणून पारित देखील केले. ते तीन कायदे करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०.
हे कायदे आणून शेती क्षेत्र बड्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी जास्तीत खुलं केलं जाईल आणि शेती आणि शेतकऱ्यांवर त्यांचा जास्त ताबा येईल असं शेतकऱ्यांचं मत आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आधार असणारी किमान हमीभाव आणि कृषी अत्पन्न बाजार समित्या आणि शासनाकडून होणारी धान्य खरेदी या सगळ्या गोष्टींना दुय्यम स्थान या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.
“मोर्चासाठी किती शेतकरी येणार याने काही फरक पडत नाही,” जसप्रीत सांगतो. तो लुधियाना जिल्ह्याच्या भैना साहिब गावाहून २१ जानेवारी रोजी टिक्री इथे आला. तो म्हणतो की त्याच्या गावातून तो एकटाच इथे आला आहे. “महत्त्वाची गोष्ट ही की हा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी प्रत्येक गावाने आणि शहराने यात आपलं योगदान दिलं पाहिजे.”
अनुवादः मेधा काळे