घराच्या छपराच्या खालीच ते मडकं दोरीनं टांगून ठेवलेलं आहे.
बहुदा त्यात झाडपाल्याची औषधं, देवाचं सामान, किंवा कदाचित भात भरून ठेवला असेल. अंगणात डोसे करत बसलेली तरुण राजम गिरी मला त्याबद्दल सांगेल अशी आशा वाटते. पण तिचे सासरे जी. सिद्द्दीया यांचा मान ठेवायला ती त्यांच्यासमोर काहीच बोलत नाही.
राजम उसिमलाई गावात रहाते. हे गाव तामिळनाडूच्या इरोडे जिल्ह्यातल्या बारगुर या सुंदर डोंगरांमधे आहे. ती मेंढपाळांच्या कुटुंबातली आहे. ते लाल आणि पांढरी बारगुर मेंढरे पाळतात. यांचं नाव बारगुर डोंगरांवरून पडलं आहे आणि ती तामिळनाडूची स्थानिक जात आहे. मी स्थानिक पशूंच्या जमातींवर एक असाइनमेंट लिहिण्याच्या निमित्तानं बारगुरमधे जात असते. जेव्हा मी राजमला भेटायला जाते तेव्हा तिच्या घरात असतात फक्त स्त्रिया, मुलं आणि म्हातारे पुरुष.
आणि ते टांगलेलं मडकं.
सिद्धाई आणि सी. केंजन एका सुम्भाच्या खाटेवर बसले आहेत. सिद्धाई सांगतो की तो पन्नास वर्षांचा आहे. त्यावर त्याचा मित्र लगेच बोलतो "नाही, तू साठ आहेस. पन्नास नाहीस." समाजाच्या मुख्य प्रवाहात मोजलं जाणारं वय भटक्या मेंढपाळांसाठी महत्वाचं नसतं. त्या दोघांनी गळ्यात एक लिंगमचं पेंडंट घातलं आहे. म्हणजे ते लिंगायत समाजाचे आहेत. गंमत म्हणजे बारगुरमधले लिंगायत पशु पाळतात पण दूध पित नाहीत. ते शाकाहारीही आहेत. छोटी मुलं आणि म्हाताऱ्यांना फक्त दूध दिलं जातं असं मला सिवसेनापथी या बारगुर हिल कॅटल ब्रीडर्स असोसिएशनच्या प्रमुखांनी सांगितलं. ते मला उसीमलाईमधे घेऊन गेले.
राजमचे सासरे जुन्या पद्धती कटाक्षानं पाळतात. ते मला अपराधीपणे सांगतात की त्यांच्यात सोमवारी पाहुण्यांना जेवायला देत नाहीत. तसंच मी त्यांच्या घराच्या आतल्या भागात जाऊ शकत नाही - कोणत्याही दिवशी. मी तिथे गेले तर ती जागा दूषित होईल असं ते मानतात.
सिद्धाई सांगतात, “पण तुम्ही नशीबवान आहात. अंगणात लाकडाची चूल आहे.” त्यामुळे मला एक कप चहा मिळेल. चूल अगदी साधी आणि कार्यक्षम आहे. तीन दगड त्रिकोणात रचले आहेत, खाली लाकडं आणि वर भांडं ठेवलं आहे. राजम निखाऱ्यांवर लोखंडी फुंकणीनं फुंकते. लाकडं घगघगून पेटतात आणि ज्वाळा वर येतात. अल्युमिनियमच्या भांड्यातलं पाणी उकळल्यावर राजम त्यात चहा पावडर आणि साखर घालून आम्हाला गोड वरतु (काळा) चहा देते.
राजमच्या घरातल्या सर्व गोष्टी जुन्या पद्धतीच्या आहेत. भिंती मातीच्या आहेत आणि त्याला लाल आणि निळा रंग दिला आहे. लहान कोकरांना एक वेगळ्या खोलीत ठेवलं आहे. अंगणात डोश्याचं पीठ वाटायचा एक रगडा ठेवला आहे. तिथेच एक बारीक पण जड मुसळ आणि टोपल्या विणायला बांबूच्या पट्ट्या ठेवल्या आहेत.
आणि छपराच्या जरा खालीच लटकणारं ते मडकं आहे.
राजमला त्याच्याबद्दल विचारलं की तिला हसू येतं. ती घरात जाते आणि कसलीतरी म्युझिक सिस्टीम सुरु करते.
“त्या मडक्यात स्पीकर आहे. गाण्यासाठी,” ती सांगते.
एकदम एक तामिळ सिनेमातलं गाणं वाजायला लागतं. त्याचा आवाज त्या मडक्याच्या आतमधे घुमतो आणि मोठा ऐकू येतो.
माझ्याभोवती लहान मुलांचा घोळका जमा होतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं देताना सगळे एकदमच बोलतात. त्यांच्यात राजमची भाचीपण आहे . ती मला सांगते की राजमचे दीर , तिचे चित्तप्पा (तमिळमधे काका ) यांनी स्पीकर त्या मडक्यात ठेवला आहे.
“तुला नाच करायला आवडतं?” मी तिला विचारते. ती होकारार्थी मान डोलावते, पण लगेच लाजते आणि मग ती तिचं नाव किंवा तिला कोणतं गाणं आवडतं हे सुद्धा सांगत नाही.
राजमला त्याच्याबद्दल विचारलं की तिला हसू येतं. ती घरात जाते आणि कसलीतरी म्युझिक सिस्टीम सुरु करते. ‘त्या मडक्यात एक स्पीकर आहे’, ती सांगते
राजम तिच्या घरातल्या कामाकडे वळते. ती चुलीसाठी लाकडं आणायला मागीलदारी जाते. मी पण तिच्या मागोमाग जाते. एकटी असल्यावर तिची बडबड सुरु होते. ती तिच्या रोजच्या कामांबद्दल सांगते, तिचे सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंतचे कष्ट, जळण गोळा करणं, पीठ दळणं, तिचं एक मूल कसं घरातच जन्मलं आणि एक हॉस्पिटलात. “मला दोन्ही मुलीच आहेत. ही समोरची ललिता आणि ती दुसरी ज्योथिका.”
आता मला प्रश्न विचारायची तिची पाळी असते. “तुम्हाला किती मुलं आहेत? तुम्ही कुठे रहाता?” मग ती खट्याळपणे विचारते, “तुमची ‘थाली’ कुठे आहे (सोन्याचं मंगळसूत्र )?” मी सोनं वापरत नाही असं तिला सांगते. “माझं बघा.” असं सांगत ती गळ्यातली माळ हातात धरते. त्यात छोटे छोटे काळे आणि सोनेरी मणी ओवलेले आहेत. त्यात लाल, काळी आणि सोनेरी पदक आहेत, शिवाय चार सेफ्टीपिना पण. “तुमच्याकडे सोनं आहे, आणि तरी तुम्ही ते वापरत नाही?” मी तिचा फोटो काढत असताना ती विचारते आणि हसतच रहाते, हसतच रहाते. तिच्या अंगणातून मागचे सुंदर बारगुर डोंगर दिसतात.
तिच्या हसण्याचा आवाज मला त्या छपराला टांगलेल्या मडक्यातल्या संगीतापेक्षा मधुर वाटतो.
अनुवादः सोनिया वीरकर