तीरा आणि अनीता भुईया यंदाच्या खरिपात चांगलं पीक यावं यासाठी हातघाईवर आले आहेत. त्यांनी धान आणि थोडा मका पेरला आहे, आणि पिकं कापणीला आली आहेत.
यंदा चांगला माल येणं त्यांच्यासाठी आणखीच गरजेचं झालं आहे, कारण वर्षातले सहा महिने त्यांना काम देणाऱ्या वीटभट्ट्या मार्चमध्ये सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे बंद पडल्या आहेत.
"मागच्या वर्षी मी शेती करून पाहिली, पण कमी पाऊस अन् किडीमुळे पिकांचं नुकसान झालं होतं," तीरा म्हणतात. "आम्ही सहा महिने शेती करतो, पण हाती काहीच पैसा येत नाही," अनीता म्हणतात.
तीरा, वय ४५, आणि अनीता, वय ४०, महुगावांच्या दक्षिण टोकाला असलेल्या भुईया तढी नावाच्या अनुसूचित भुईया जातीच्या वस्तीमध्ये राहतात.
झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील चैनपूर तालुक्यामधील या गावातलं हे कुटुंब २०१८ पासून प्रत्येक खरीप हंगामात जमीन बटईने घेतात, जिला स्थानिक बोलीत बटिया म्हणतात. या पद्धतीत खंडकरी आणि जमिनीचे मालक उत्पादनाचा निम्मा-निम्मा खर्च करतात, आणि प्रत्येकाला पिकातला अर्धा हिस्सा मिळतो. बटईदार सहसा त्यांच्या वाट्याला येणारं बहुतेक पीक स्वतःच्या वापरासाठी ठेवतात, आणि कधीकधी थोडा भाग बाजारात विकतात.
पाच वर्षांपूर्वी हे कुटुंब पेरणीच्या दोन्ही हंगामांत शेतमजुरी करायचं. सुमारे ३० दिवसांचं काम आणि त्यासाठी रू. २५०-३०० रोजी किंवा तेवढ्या किंमतीचं धान्य मिळायचं. उरलेल्या वेळात ते भाजीच्या मळ्यात किंवा शेजारच्या गावांमध्ये आणि महुगावांहून अंदाजे १० किमी अंतरावर असलेल्या डाल्टनगंज शहरात रोजंदार म्हणून काम करायचे.
पण रोजंदारी मिळणारे दिवस वर्षागणिक कमी होऊ लागल्याने २०१८ मध्ये त्यांनी शेतीत आपलं नशीब आजमावून पाहायचं ठरवलं – आणि एका जमीन मालकाशी बटिया करार केला. "याआधी मी जमीनदारांसाठी हरवाही करायचो" म्हणजे बैलजोडी वापरून जमीन नांगरणं, आणि इतर शेतीचं काम. "पण मग नांगरणी ते कापणीपर्यंत सगळं काही ट्रॅकरच्या मदतीनेच होऊ लागलं. आता गावात एकच सडा बैल उरलाय."
त्यांच्या बटिया शेतीला आधार म्हणून तीरा आणि अनीता यांनी २०१८ पासून एका वीटभट्टीवर काम करण्यास सुरूवात केली. त्यांच्या खेड्यातले इतरही लोक नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून मे-जूनपर्यंत तिथे कामाला जातात. अनीता सांगतात, “आम्ही गेल्या वर्षी आमच्या मुलीचे लग्न केलं.” त्यांना दोन मुली आहेत; धाकटा मुलगा अविवाहित आहे, त्यांच्याबरोबर राहतो. ५ डिसेंबर २०१९ रोजी, लग्न लागल्यानंतर तीन दिवसांनी हे कुटुंब भट्टीवर कामाला गेलं. “एकदा का [लग्नाच्या खर्चासाठी घेतलेले] कर्ज फेडलं की आम्ही वर्षभर शेतात राबायला सुरुवात करू,” ती पुढे म्हणाली.
मार्च अखेरीस टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी तीरा आणि अनीता आपली मुलं सितेंदर, २४, व उपेंदर, २२, आणि भुईया तढीतील इतर गावकऱ्यांसह रोज सकाळी ट्रॅक्टरवर बसून आठ किलोमीटर दूर असलेल्या बुढीबीर गावाला जायचे. तिथे ते हिवाळ्यात फेब्रुवारीपर्यंत सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत, आणि मार्चपासून पहाटे ३:०० ते सकाळी ११:०० पर्यंत राबायचे. "घरचे सगळे एकाच ठिकाणी [वीटभट्टीवर] काम करायचे, तेवढं एक बरं होतं," अनीता म्हणतात.
वीटभट्टीवर त्यांना दर १,००० विटांमागे रू. ५०० मिळतात. यंदाच्या हंगामात त्यांना त्यांच्या गावातील एका मुकादमाकडून ऑक्टोबर २०१८ मध्ये घेतलेली रू. ३०,००० उचल परत करायला काम करावं लागलं. आपल्या मुलीच्या लग्नासाठी उसने घेतलेल्या रू. ७५,००० बिनव्याजी कर्जाच्या बदल्यात त्यांनी नोव्हेंबर २०२० पासून वीटभट्टीवर पुन्हा राबणं अपेक्षित आहे.
भट्टीवर तीरा, अनीता आणि त्यांच्या मुलांना आठवड्याला रू. १,००० भत्ता मिळतो, "त्यातून आम्ही तांदूळ, तेल, मीठ अन् भाज्या विकत घेतो," तीरा म्हणतात. "जर जास्त पैसा हवा असेल, तर आम्ही मुकादमाकडून मागून घेतो." हा आठवडी भत्ता, लहान सहान उधारी, आणि मोठी उचल असं सगळं काही मजुरांना त्यांनी भट्टीवर विटा तयार करून कमावलेल्या एकूण रकमेतून कापून घेण्यात येते – सगळ्या वीटभट्ट्यांवर अशीच पद्धत आहे.
मागील वर्षी ते जून २०१९ मध्ये परतले तेव्हा हाती रू. ५०,००० रुपये घेऊन आले होते, त्यात त्यांचं काही महिने निभावलं. पण यंदा टाळेबंदीमुळे भुईया कुटुंबाचं विटांचं काम अर्ध्यातच बंद पडलं. आणि मार्च अखेरीस त्यांना दलालाकडून केवळ रू. २,००० मिळाले होते.
तेव्हापासून भुईया कुटुंब त्यांच्या समाजातील इतर लोकांप्रमाणे उत्पन्नाचं साधन शोधत आहेत. एप्रिल, मे व जून महिन्यांत प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेच्या रूपात घरातील प्रत्येक वयस्क सदस्याला साधारण पाच किलो तांदूळ आणि एक किलो डाळीची मदत झाली. आणि त्यांच्या अंत्योदय राशन कार्डवर (अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या वर्गीकरणात "गरिबातील गरीब" लोकांसाठी) या कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्य स्वस्त किमतीत मिळतं. "हे तर माझ्या घरी दहा दिवसही पुरणार नाही," तीरा म्हणतात. ते व अनीता आणि त्यांचे दोन मुलं आणि एक मुलगी यांव्यतिरिक्त घरात त्यांच्या दोन नाती आणि तीन नातू आहेत.
त्यांचं रेशन संपू लागल्यामुळे ते महुगाव आणि आसपासच्या गावांमध्ये बारीकसारीक कामं करून, आणि उधारीवर निभावून नेतायत.
यंदाच्या खरिपात तीरा आणि अनीता यांनी दोन एकर भाडेपट्ट्यावर धान आणि थोडा मक्याच्या लागवडीसाठी बियाणं, खत आणि कीटकनाशकावर रू. ५,००० खर्च केले. "माझ्याकडे काहीच पैसा नव्हता," तीरा म्हणतात. "मी एका नातेवाईकाकडून उसने घेतलेत अन् आता माझ्या डोक्यावर पुष्कळ कर्ज होऊन बसलंय."
ज्या जमिनीवर ते शेती करतायत ती अशोक शुक्ला यांच्या मालकीची आहे. त्यांच्या मालकीची एकूण १० एकर जमीन असून त्यांना गेल्या पाच वर्षांत मुख्यतः अपुऱ्या पावसामुळे नुकसान झालंय. "आम्ही दीड ते दोन वर्षं पुरेल एवढं धान्य काढायचो," अशोक म्हणतात. "आजकाल आमची कोठी सहा महिन्यांतच रिकामी होते. मी जवळपास ५० वर्षांपासून शेती करतोय. पण मागील ५-६ वर्षांत मला लक्षात आलंय की शेतीत काहीच मतलब नाही – फक्त नुकसान आहे."
शुक्ला म्हणतात की या गावातील जमीन मालकही – पैकी बहुतांश उच्चवर्णीय – कामाच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतर करू लागले आहेत. उत्पन्न कमी होत चालल्याने ते रू. ३०० रोजीवर शेतमजूर ठेवण्यापेक्षा आपली जमीन बटिया पद्धतीने भाडेपट्ट्यावर देणं पसंत करतात. "अख्ख्या गावात तुम्हाला स्वतः शेती करणारा [उच्चवर्णीय मालक] दिसून येणार नाही," शुक्ला म्हणतात. "सगळ्यांनी आपली जमीन भुईया किंवा इतर दलितांना दिलीये." (२०११ जनगणनेनुसार महुगावांमध्ये गावाच्या एकूण २,६९८ लोकांपैकी २१ ते ३० टक्के जण अनुसूचित जातीचे आहेत.)
तरी या वर्षी पाऊस चांगला झालाय. म्हणून तीरा यांना त्यांचं बटिया उत्पन्नही जोमदार असेल, अशी आशा आहे. चांगलं उत्पन्न म्हणजे त्यांच्या दोन एकरावर २० क्विंटल धान मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. मळणीनंतर धान्य अशोक शुक्ला यांच्यासोबत वाटून घेतल्यावर त्यांच्याकडे ८०० किलो तांदूळ उरेल – तीरा यांच्या १० सदस्यांच्या कुटुंबाच्या आहारासाठी प्रामुख्याने हाच तांदूळ कामी येईल, कारण त्यांना इतर धान्य नियमितपणे मिळत नाही. "बाजारात विकता आलं असतं तर बरं झालं असतं," तीरा म्हणतात, "पण हे धान तर आम्हाला सहा महिनेही पुरणार नाही."
तीरा म्हणतात की त्यांना इतर कोणाहीपेक्षा शेती चांगली माहिती आहे, आणि अधिकाधिक जमीन मालक आपली जमीन भाड्याने द्यायला तयार असल्याने त्यांना मोठ्या जमिनीत विविध प्रकारच्या पिकं घेता येतील अशी आशा आहे.
तूर्तास ते आणि अनीता काही आठवड्यांत भरपूर माल निघेल, अशी आशा करतायत.
अनुवाद: कौशल काळू