मंगळवारच्या पावसानं मुंबईचं शिवाजी पार्क चिखलानं भरून गेलं होतं, सगळंच निसरडं, अगदी पाऊलही ठरत नव्हतं. सखुबाई खोरे घसरून पडल्या आणि त्यांच्या पायाला इजाही झाली. तरीही बोळकं भरून हासणाऱ्या सखुबाई म्हणतात, “मी माझ्या देवाच्या पाया पडाया आलीये. मला जमतंय तोवर मी येतच राहणार. हात पाय चालू आहेत तोवर मी येणार, माझ्या डोळ्याला दिसतंय तोवर मी येतच राहणार.”
त्यांचा देव – इथे जमलेल्या जनसागरातल्या जवळ जवळ प्रत्येकाचाच देव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि सत्तरीच्या नवबौद्ध असणाऱ्या सखुबाई ६ डिसेंबरला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी जळगावच्या भुसावळमधून त्यांना अभिवादन करायला आल्या आहेत.
दर वर्षा याच दिवशी शिवाजी पार्क आणि दादरच्या चैत्यभूमीवर दलित समाजाचा प्रचंड मोठा जनसागर गोळा होतो. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेडकरांचं दहन चैत्यभूमीवर झाल्याने ते त्यांचं स्मारक मानलं जातं. विसाव्या शतकातले महान समाजसुधारक आणि सर्वच दलितांचा आवाज म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. या दिवशी मुबंईत पोचण्याकरिता त्यांचे अनुयायी रेल्वेने येतात, बस पकडतात किंवा मैल न् मैल पायी येतात. मुंबईतले, महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यातले आणि इतरही राज्यातले हे अनुयायी अनेक दिवसांचा प्रवास करून इथे पोचतात. मनात केवळ आदर, कृतज्ञता आणि निखळ प्रेम.
गेली ४२ वर्षं, लीलाबाई सैन मध्य प्रदेशातल्या जबलपूरहून ११०० किलोमीटरवरून इथे येतायत. त्या मालिशचं काम करतात. त्यांचे पती जातीने आणि व्यवसायाने न्हावी (नाई) होते. यंदा त्या एका ६० महिलांच्या गटाबरोबर पॅसेंजर गाडीने दर मजल करत आल्यायत. दर स्थानकात थांबणाऱ्या या गाडीने मुंबईला पोचायला तीन दिवस घेतले. “आम्ही मध्य रात्री २ वाजता पोचलो, मग दादर स्टेशनवरच झोपलो. आजची रात्र आम्ही या फुटपाथवरच (शिवाजी पार्कच्या बाहेर) काढू,” त्या उत्साहात सांगतात. “बाबासाहेबांशी आमचं काही तरी नातं आहे म्हणून तर आम्ही येतो. त्यांनी देशासाठी फार मोलाचं काम केलंय, जे इतर कुणालाच जमलं नाही, ते त्यांनी केलं.”
लीलाबाईंच्या महिला मंडळाने बॅगा घेऊन गप्पा मारत, हास्यविनोद करत आणि आजूबाजूची दृश्यं, आवाज टिपत फुटपाथवरच ठाण मांडलंय. हा दिवस डॉ. आबेडकरांच्या स्मृतीदिन असला तरी जमलेल्या सगळ्यांसाठी जणू तो सोहळा आहे, जगासाठी त्यांचा आवाज बनलेल्या नेत्याचं कौतुक आहे. चैत्यभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर काही मीटरच्या अंतरावर दलित कार्यकर्त्यांचे जलसे सुरू आहेत, कुठे भाषणं होतायत, कुणी पथारी टाकून मांडलेल्या स्टॉलवरच्या असंख्य वस्तू न्याहाळतायत. गौतम बुद्ध आणि आंबेडकरांचे लहानसे पुतळे, जय भीम लिहिलेल्या दिनदर्शिका, छोट्या मोठ्या वस्तू, चित्रं आणि इतरही बरंच काही. सगळीकडे निळे झेंडे, फलक आणि पोस्टर फडफडतायत. पोलिसही गर्दीला आवर घालतायत, सगळीकडे बारीक नजर ठेऊन आहेत, कुणाला काही शंका असेल तर निरसन करतायत आणि कुठे दिवसभराच्या कामानंतर थोडा विसावाही घेतायत.
शिवाजी पार्कच्या आतदेखील अनेक तंबूंमध्ये विविध स्टॉल आहेत. पण तिथे विक्रीसाठी काही नाही, तिथे लोकांना वेगवेगळ्या सेवा दिल्या जातायत – मोफत जेवण, पाणी, अगदी विम्याचे अर्ज किंवा केवळ एकमेकांप्रती बांधिलकी – यातले कित्येक स्टॉल कामगार संघटना, दलित राजकीय पक्ष किंवा युवा संघटनांचे आहेत. खाणं असलेले स्टॉल बहुधा सर्वात लोकप्रिय असावेत. अशा स्टॉलसमोर लांबच लांब रांगा लागल्यायत, पुरुष, बाया आणि मुलं. अनेकांचे अनवाणी पाय चिखलाने भरलेत. त्यांच्यातल्याच एक बेबी सुरेतळ, क्रॅक जॅक बिस्किटांचा पुडा घेण्यासाठी रांगेत थांबल्यायत. हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्याच्या शिराद शहापूर गावच्या रहिवासी. “मी हे समदं पहाया आलीये, समदी जत्रा,” आजूबाजूची गजबज दाखवत त्या सांगतात. “बाबासाहेबाबद्दल इथं ऊर कसा आनंदाने भरून येतो.”
सखुबाईदेखील क्रॅकजॅक तंबूजवळ थांबल्या आहेत. त्यांच्याकडच्या प्लास्टिकच्या लाल पिशवीत एक साडी अन् रबरी चपला. त्यातच एका स्टॉलवरच्या कार्यकर्त्यांनी दिलेली दोन केळी ठेवलीयेत. त्यांच्याजवळ फुटकी दमडी नाही. त्यांच्या घरी शेतमजुरी करणारा त्यांचा एक मुलगा आहे. त्यांचे पती चार महिन्यापूर्वी वारले. तेही शेतमजुरी करायचे. “मी एकलीच आलीये,” त्या सांगतात. “लई साल झालं, मी दर वर्षी इथं येते. इथे येऊन फार बरं वाटतं मनाला.”
इथे ६ डिसेंबरला दादर-शिवाजी पार्कला आलेल्या अनेकांकडे सखुबाईंप्रमाणे बिलकुल पैसे नाहीत किंवा असले तरी फारच थोडे. समाजाच्या फार गरीब वर्गातली ही माणसं आहेत. या सोहळ्यासाठी रेल्वेचा प्रवास मोफत आणि खाणं-पिणं स्टॉलवर मिळतंच, शांताबाई कांबळे सांगतात. चिखलानं भरलेल्या मैदानात आपल्या कुटुंबियांसोबत बसून द्रोण पत्रावळीतली डाळ चपाती हे त्यांचं जेवण. फारसं काही न बोलणाऱ्या त्यांच्या वयोवृद्ध यजमानांनी, मनोहर यांनी रात्रीच्या आणि दुसऱ्या दिवशीच्या जेवणाला पुराव्यात म्हणून गमज्यामध्ये काही चपात्या बांधून घेतल्यायत. कांबळे कुटुंब यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातल्या संबळ पिंपरी गावचं. शेतमजुरी करणाऱ्या या कुटुंबाने कालची रात्र रस्त्यातच निजून काढली. शांताबाई सांगतात, एरवी ते शिवाजी पार्कातल्या आतल्या तंबूंमध्ये आसरा घेतात पण या वर्षी पावसाने सगळा चिखल झाल्याने त्यांनी बाहेरच राहायचं ठरवलं.
आनंदा वाघमारेदेखील शेतमजुरी करतात. नांदेडच्या अंबुलगा गावाहून आपल्या १२ वर्षाच्या मुलीला घेऊन ते नंदीग्राम एक्सप्रेसने इकडे आले आहेत. आनंदा यांच्याकडे बी ए ची पदवी आहे, पण त्यांना काही नोकरी मिळू शकली नाही. “आमची स्वतःची जमीन नाही. त्यामुळे मला शेतमजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यात मला दिवसाला १००-१५० रुपये मिळतात,” ते सांगतात. “मी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी इथे आलोय. ते होते म्हणून आम्हाला इतक्या साऱ्या सवलती मिळाल्या [आनंदा नवबौद्ध आहेत, पूर्वाश्रमीचे महार]. ते खरंच लोकांचे महात्मा होते.”
शिवाजी पार्कच्या आत असणाऱ्या स्टॉलवर मात्र धंदा फार काही जोरात नाही. पावसाचा परिणाम. एम एम शेख यांच्याकडच्या दोन मोठ्या टेबलांवर पुस्तकं मांडली आहेत, बहुतेक सगळी सामाजिक किंवा जात प्रश्नांवरची. ते बीडहून आलेत. तिथेही ते पुस्तक विक्री करतात. “मी दर वर्षी येतो,” शेख सांगतात “पण आज मात्र फारसा काहीच धंदा झालेला नाही. मी आता लवकरच हे सगळं आवरेन आणि गावी परतेन.”
त्यांच्या स्टॉलच्या जवळच वैद्यकीय सेवा देणारा एक तंबू आहे. डॉ. उल्हास वाघ त्याचं सगळं काम पाहतात. ते दर वर्षी १२-१५ डॉक्टरांना घेऊन इथे येतात आणि दर दिवसाला अंदाजे ४००० लोकांची तपासणी करतात – बहुतेकांचा त्रास म्हणजे डोकेदुखी, त्वचेचे आजार आणि पोटाचे विकार. “इथे येणारा वर्ग फार गरीब आहे, खेड्यापाड्यातून, शहरी वस्त्यामधून येणारा आणि फार तुरळक आरोग्य सेवा असणारा,” ते म्हणतात. किती तरी जण केवळ अनेक दिवसांचा रिकाम्या पोटी केलेला प्रवास आणि त्यामुळे आलेला शीण हीच तक्रार घेऊन येतात.
तिथेच आजूबाजूला कुतुहलाने पाहत चालत जाणारे जिंतूर तालुक्याच्या कान्हा गावचे दोन शेतकरी होते. नीतीन, वय २८ आणि राहुल दवंडे, वय २५ हे दोघं नवबौद्ध, आपल्या तीन एकर रानात कापूस, सोयाबीन, तूर आणि उडीद घेतात. काही स्वयंसेवकांच्या ओळखीतून त्यांची एका कॉलेजमध्ये रात्रीच्या निवाऱ्याची सोय झाली आहे. “आम्ही इथे श्रद्धांजली वहायला आलोय,” नीतीन सांगतो. “आम्हाला वाटतं, जर आम्ही इथं येत राहिलो, तर आमची लेकरं पण येत राहतील आणि मग ही परंपरा अशीच चालू राहील.”
दिवस कलला तसं चैत्यभूमीच्या दिशेने जाणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. गर्दीचा अभेद्य असा जनसागर तयार झाला आहे. त्यात माग काढणं शक्य नसल्याने लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या उटी गावच्या संदीपन कांबळेने गर्दी ओसरायची वाट पहावी असं ठरवलंय. तो एका झाडाखाली निवांत डुलकी काढतोय. “मी पहिल्यांदाच इथं आलोय,” शेतमजुरी करणारा संदीपन सांगतो. “माझ्याबरोबर माझी बायको अन् लेकरंही आहेत. मी विचार केला, यंदा त्यांना ६ डिसेंबर दाखवावाच.”
तिकडे शिवाजी पार्कमध्ये शेख यांच्या पुस्तकांच्या स्टॉलजवळ एक चिमुरडी हरवलीये, आईच्या नावाने रडून रडून ती इथे तिथे फिरतीये. काही जणं घोळक्याने तिच्याभोवती जमा होतात, तिच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतात. तिला फक्त कन्नड येतं पण ती कसाबसा मोबाइल नंबर सांगते. एक तरणा ताठा पोलिस शिपाई येतो आणि सगळी परिस्थिती ताब्यात घेतो. तिची भीती, चिंता ज्या पद्धतीने हाताळली जाते ते अगदी नीट दिसून येतं – या सगळ्या अलोट गर्दीत गोंधळ गडबड नाही, बायांची छेडछाड नाही किंवा काही चुकीचंही घडत नाही. त्याच बुकस्टॉलच्या थोड्या अंतरावर अशीच एक लहानगी तंबूत आत जाते आणि फुलांचा हार घातलेल्या आंबेडकरांच्या तसबिरीसमोर हात जोडून, नतमस्तक होऊन काही क्षण उभी राहते.