"तुमच्या शेताची मी राखण करतो," असं देऊ कुंभाराने (वय ३०वर्षे) आपल्या काकांना सांगितलं, ती त्यांची शेवटची भेट ठरू शकली असती. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातल्या बाबरवाडी या शांत खेड्यातल्या गावकऱ्यांना खूप वेळा धसमुसळ्या आगंतुक पाहुण्यांशी सामना करावा लागतो. त्या दिवशी काकांच्या दोन एकर शेतातल्या मचाणावर झोपलेल्या देऊला मध्यरात्री २:३०च्या सुमाराला काहीतरी चाहूल लागली.
त्या मिट्ट काळोखात त्याने आपल्या फोनची विजेरी पेटवून पहिली... त्याला दिसला एक प्रचंड जंगली हत्ती! तो त्याच्याचकडे येत होता. देऊने विजेरी बंद केली आणि हत्तीने मचाणाच्या शेजारचं बुजगावणं धडक देऊन पाडलं.
"इथे जंगली हत्ती नेहमीच रात्रीचे येतात," देऊचा काका न्हानो सांगत होता, "नशीब चांगलं असलं तर फक्त आर्थिक नुकसानीवर भागतं." त्याने उजाडल्यावर पाहिलं तर ३० क्विंटल भातापैकी निम्म्याहून जास्त शेतात विखरून टाकलेलं होतं. २५ केळी उखडल्या होत्या. मिरच्या तुडवून टाकलेल्या होत्या. शेताचा नुसता उकिरडा झाला होता. हे सगळं आवरून का नाही टाकलं असं विचारलं तर न्हानो म्हणाला, "वनाधिकारी येऊन नुकसानीचा अंदाज मांडेपर्यंत याला हात लावला तर मग भरपाई विसराच."
तिल्लारी धरणाच्या बाजूलाच वसलेली बाबरवाडी हे दोडामार्ग तालुक्यातील एक दुर्गम गाव आहे, तिथली वीज आणि फोन दोन्ही बेभरवशाची. अनेक हिरव्या छटा मिरवणाऱ्या आणि वळणा-वळणाच्या वाटा असलेल्या या गावात कॉंक्रिटच्या ओबडधोबड आणि लाल चिखलाने बरबटलेल्या रस्त्यावरून पोचणं म्हणजे मोठं कष्टाचं काम. अर्थातच नुकसानीचा अंदाज नोंदवायला वनाधिकारी ताबडतोब/वेळेवर पोचत नाहीत. "वाचलेलं पीक बाजूला काढून सांभाळून ठेवायचं म्हटलं तर आम्हाला नुकसानभरपाईवर पाणी सोडावं लागतं. नाहीतर वनाधिकाऱ्यांची वाट पहायची आणि हत्ती पुन्हा येऊन नासधूस करतील ही भीतीही मनात ठेवायची," न्हानो सांगत होता. इकडे आड आणि तिकडे विहीर.
भाताचा/साळीचा भाव क्विंटलला १५०० रुपये धरला तर काही मिनिटांचा हैदोस घालून हत्तीने ३० हजार रुपयांच्या आसपास नुकसान केलं होतं. पिकासाठी लावलेले २५ हजार रुपये आणि पाच महिन्यांची मेहनत, सारंच हत्तीने धुळीला मिळवलं होतं, त्यात मिरची आणि केळीसुद्धा होत्या. एका रात्रीत न्हानोचं ७० हजार रुपयांचं नुकसान झालं. "पण नुकसानभरपाई कधीच तेवढी मिळत नाही."१९४४ ते १९९० या काळात कर्नाटकाच्या उ. कन्नड जिल्ह्यात सहा धरणे बांधली गेली आणि राज्यातील वनाच्छादित जमीन खूपच कमी झाली. "हत्तींना आनुवंशिक स्मृती असते," हत्तींच्या वर्तनाचे तज्ज्ञ आनंद शिंदे सांगत होते, "त्यांचे मार्ग ठरलेले असतात. या मार्गांवर अतिक्रमण झालं तर ते गोंधळतात आणि गावांमध्ये शिरतात."
या साऱ्याचा परिणाम असा झाला की २००४ पर्यंत २२ जंगली हत्ती महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतांत शिरू लागले. त्याआधी सिंधुदुर्गात २००२ सालापर्यंत लोकांनी जंगली हत्ती फक्त टीव्हीवरच पहिले होते. निगुतीने राखलेली भात, नारळी, काजू, केळी यांची शेती हत्तींना खुणावत होती. आजवर त्यांनी १३ माणसं मारलीत, २१ जणांना जखमी केलंय, शेतीच्या नुकसानीची ११,००० प्रकरणं नोंदवून वनखात्याला १०.५ कोटींची भरपाई द्यावी लागलीय्. राज्यात सुरु झालेल्या मानव-हत्ती संघर्षात११ हत्तंचाही बळी गेला आहे.
हत्तींना त्यांच्या मूळ प्रदेशात म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटकात हाकलून लावण्याचा प्रयोगही २००४ मध्ये केला गेला. पण मग लक्षात आलं की त्याचं मूळ स्थान शिल्लकच राहिलेलं नाही, ते अनेक तुकड्यांत विखुरलेलं आहे आणि या जंगली हत्तींसाठी ते पुरेसं नाही. वाढत्या लोकसंख्येच्या गरजेसाठी वनक्षेत्र रोजच कमी होत चाललं आहे. शिंदे म्हणतात – "वनजमीन जसजशी आक्रसत चाललीये तसतसे हत्ती आक्रमक होऊ लागलेत."
दोडामार्गापासून ७० किमी.वरील कुडाळ तालुक्यात ही भीती इतकी वाढलीये की केंद्र सरकारने फेब्रुवारी ’१७ मध्ये ६९ लाख रुपये खर्चून एक मोहीम चालवली – तालुक्यातल्या माणगाव खोऱ्यातील १६ गावांत दहशत निर्माण करणाऱ्या ३ हत्तींना पकडण्याची. चार शिक्षित, पाळीव हत्ती कर्नाटकातून आणले गेले. कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांतील २०४ वनाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले. "ही मोहीम ५ दिवस चालू होती आणि खूपच आनंद देणारी होती." कुडाळचे प्रादेशिक वनाधिकारी संजय कदम यांनी सांगितलं,
ही मोहीम १० फेब्रुवारीला सुरु झाली. पहिली दुपार हत्तींना शोधण्यात गेली. वॉकी-टॉकी नसल्यामुळे ज्यांना या हत्तींचा वावर कुठे आहे हे माहित होतं अशांची मदत घेण्यात आली. संध्याकाळपर्यंत दोघांना शोधण्यात यश आलं. त्यातला एक पळाला आणि दुसरा अंगावर धावून आला. पशुवैद्याने त्याला गुंगी येण्यासाठी डार्ट (बाण) मारला पण अशा हत्तीचा धावण्याचा वेग माणसांना आवरणारा नसतो. एका प्रशिक्षित हत्तीने त्याला पाठलाग करून थांबवलं. मग प्रशिक्षित आणि गुंगी चढलेला हत्ती यांचा एक-एक पाय एका दोराने एकमेकांना बांधून त्यांना माणगावपासून ३ किमी. अंतरावरील आंबेरी गावात असलेल्या क्राल (कुंपण घालून हत्तींसाठी तयार केलेली जागा) मध्ये आणलं. दुसरे दोन हत्तीही याच प्रकारे पुढील ५ दिवसात पकडले गेले.
लोक या हत्तींना पाहण्यासाठी आंबेरीला येतात. आधी हत्तींच्या भीतीने थरथरणाऱ्या कुडाळकरांच्या भावना आता अगदी बदलून गेल्या आहेत. सुभाष बांदेकर सांगत होते, "आमची मुलं संध्याकाळी ७ नंतर मागच्या परसात जायला देखील घाबरत असत. रात्रीची शांत झोप कशी असते हेही आम्ही विसरून गेलो होतो." बांदेकरांच्या शेतात तीनवेळा हत्तींनी धुमाकूळ घातला होता.
त्या तीन हत्तींनी बांदेकरांच्या ५० नारळी उखडून टाकल्या होत्या. घरात ठेवलेली तांदळाची पोती काढण्यासाठी त्यांनी मागल्या बाजूच्या खिडक्या आणि दारंही मोडून टाकली होती. "आम्ही कसंबसं एका खोलीत स्वत:ला बंद करून घेतलं म्हणून वाचलो. नंतर फटाके फोडले तेव्हा ते गेले." बांदेकर म्हणाले.
पण घणवले गावातल्या विजया जाधव एवढ्या नशीबवान नव्हत्या. त्यांच्या मुलांच्या समोरच एका हत्तीने त्यांना उचललं, चेचलं आणि फेकलं. आजही त्या लुळ्या होऊन बिछान्याला खिळून आहेत.कुडाळकरांवरचं भीतीचं मळभ भलेही निवळलं असेल पण वनखात्यावर मात्र योग्य नियोजनाच्या अभावाचा ठपका ठेवला गेलाय्. प्रशिक्षणाच्या काळात, फेब्रुवारीत, यातील एक हत्ती दगावला. तो ४० वर्षांचा होता, हत्तींचं सरासरी आयुष्य ८० वर्षे असतं. कदम म्हणतात की हा नैसर्गिक मृत्यू होता, "आम्ही त्याला इतर दोघांसारखंच वागवलं होतं." पण स्थानिक पत्रकार चंदू शेडगे सांगतात की, "हत्तींच्या आरोग्याविषयी जाणकार असा कुणी डॉक्टर या भागात नाही. गरज पडली तर म्हैसूरहून तो बोलवावा लागतो."
हत्ती ही धोक्यातील प्रजाती असल्यामुळे तर त्यांचं संरक्षण अधिकच महत्त्वाचं ठरतं. एका हत्तीला दिवसाला २०० किलो चारा आणि पाला इ. अन्न आणि तेवढंच पाणी लागतं. या शिवाय त्यांना चिखल/दलदल प्रिय असते. त्यांच्या त्वचेवर घर्मग्रंथी नसतात त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्यांना चिखलात डुम्बावे लागते. तापमान ४० अंशांवर पोचल्यावर त्यांच्यासाठी क्रालमध्ये पुरेशी दलदल उपलब्ध करून देणे सोपे नसते. "खरंच हत्तींची काळजी घेण्याची क्षमता आमच्याकडे आहे का हा प्रश्न आम्ही स्वत:ला विचारायला हवा. माझ्या मते, आमच्याकडे मनुष्यबळ देखील कमीच आहे," शिंदे म्हणतात.
पुण्याचे वनाधिकारी सुनील लिमये यांनी हत्तीच्या दु:खद मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत म्हटले, "आम्ही यापासून धडा शिकू आणि भविष्यात हत्तींच्या सर्व गरजा पुरवून आम्ही आमचं नाव राखू."
पण त्यानंतर लौकरच, एका शनिवारी, उरलेल्या दोन हत्तींपैकी एकाने दुपारभर चित्कार करून आंबेरी गावाची शांतता मोडली. त्याला काहीतरी होत होतं आणि तो कोसळला, त्याचे डोळे तांबारले होते. ७-८ जण कष्टाने त्याला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करू लागले. अतिशय करूण दृश्य होतं ते. तो महाकाय गजराज इतका दुबळा झाला होता की त्याचे पाय त्याचं वजन पेलू शकत नव्हते. मोठ्या दोरखंडाच्या मदतीने लोक त्याला उठवू पाहत होते पण अर्ध्यातच तो कोसळत होता. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर तो निश्चल पडून राहिला; एखाद्या हतबल योद्ध्यासारखा.
सगळीकडे गडबड गोंधळ माजला. स्थानिक पशुवैद्यांना बोलावलं, त्यांनी सलाईन चढवली. कुणी त्याला केळी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर कुणी नळी लावून त्याच्या अंगावर पाणी फवारण्याचे प्रयोग केले. बर्फही लावून पाहिला. पण दिवसभर तो काही उठला नाही आणि त्याचा जोडीदार असहाय्यपणे पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी तो उभा राहिला खरा पण ते समाधान तात्पुरतंच होतं. महिन्याभरातच, २९ मेला तो मरण पावला.
शिंद्यांच्या मते, "क्राल साठी एक पूर्णवेळ हत्तींचा तज्ञ पशुवैद्य तैनात असायला हवा." कदम मान्य करतात की जंगली हत्तींबाबत काय करायचं याविषयी अजूनही महाराष्ट्रात निश्चित रणनीती तयार झालेली नाही. "कर्नाटकला त्यांचा शेकडो वर्षांचा अनुभव आहे पण २००४ पूर्वी, महाराष्ट्रात असा काही संघर्ष उभा राहील अशी कुणाला कल्पनाही नव्हती."
हत्तींच्या प्रशिक्षणाबाबतहि आक्षेप घेतले जातात. प्रत्यक्षदर्शी म्हणतात की शिकवताना हत्तींना मारलं जातं, छळलं जातं. शिंदे म्हणतात की, "ही जुनाट पद्धती आहे. हत्तीसारख्या संवेदनशील प्राण्याला विश्वासात घेऊन शिकवायला हवं." तज्ञाचं मत आहे की या जुनाट पद्धतीमुळेच या दोन हत्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले असावेत. शिंदे म्हणतात, "जंगली हत्ती आपलं सारं आयुष्य मनस्वीपणे जगत असतात. अचानक त्याला एका छोट्याश्या जागेत बंदिस्त केलं जातं. याचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि त्यामुळे शारीरिक स्वास्थ्यावरही होतो. हत्तींना त्यांच्या नैसर्गिक ऊर्मीनुसार जगू द्यायला हवं. एखाद्या सुनिश्चित केलेल्या अभयारण्यात जर त्यांना राहू दिलं तर ते गावांमध्ये शिरणार नाहीत. शेतकरीही निश्चिंत होतील आणि वनांचंही संवर्धन होईल."
लिमये म्हणतात की महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील दांडेली-तिल्लारी गज अभयारण्य हा या संघर्षावरचा कायमचाइलाज असू शकेल. "दोन्ही सरकारे एकत्रितपणे यावर काम करू शकतील." मात्र त्यासाठी, "शेतकऱ्यांना जागरूक करणे आणि शिक्षित करणे ही लगेचची उद्दिष्टं ठेवायला हवीत," असं त्यांना वाटतं. कारण भीतीपोटी केलेलं वर्तन पाहून हत्ती अधिकच चवताळून अंगावर येतात, त्यामुळे मृत्यूही संभवतात. नुकसानभरपाईची प्रक्रिया अधिक वेगवान व्हायला हवी असंही लिमयांचं म्हणणं आहे.
डॉ. एन.व्ही.के. अश्रफ, वाईल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे प्रमुख, शेतकऱ्यांना अगदी नाविन्यपूर्ण मार्ग सुचवतात. ते म्हणतात, "हत्तींना आकर्षण वाटतं अशी पिकं शेताच्या मध्याला घ्या आणि लिंबू, मिरच्या, मधमाशीपालन अशा गोष्टी ज्या हत्तींना नावडत्या आहेत त्या शेताच्या परीघावर लावा."
अर्थात अशा सूचना, कल्पना येताच राहणार. पण माणसांच्या अतिक्रमणामुळे वनजमीन कमी होते आहे हे सत्य आहे आणि त्यावर कोणताच उपाय नाही. दोन्ही पक्ष – माणूस आणि हत्ती –एकमेकांचं भय बाळगत, त्यामुळे आपला मोकळा वावर घालवत जगणार.
सूर्य आपला दिवसभराचा प्रवास करून मावळतीकडे पोचलाय्, न्हानोच्या बायकोने घराच्या खिडक्या आणि दार बंद केलीत. मुला – सुना, नातवंड सगळ्यांना घरात येण्याचा हुकुम ती सोडते. न्हानो मात्र आपली काठी आणि विजेरी घेऊन शेतातल्या मचाणाकडे रवाना होतोय. आज राखण करण्याची त्याची पाळी आहे.
अनुवादः छाया देव