२० डिसेंबर. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया म्हणजेच पारीचा आज सातवा वाढदिवस. मागच्या वर्षीच्या महासाथीचा आणि टाळेबंदीचा आम्ही मुकाबला तर केलाच, पण आमचं आतापर्यंतचं सर्वोत्तम काम आम्ही याच काळात केल्याचं तुम्हाला दिसेल.

टाळेबंदीच्या अगदी पहिल्या दिवशी भारत सरकारने असं जाहीर केलं की माध्यमं, छापील आणि इलेक्ट्रॉनिक हे अत्यावश्यक सेवांमध्ये गणजे जाणार आहेत. हे चांगलंच होतं. कारण आजवर या देशातल्या लोकांना पत्रकारिता आणि पत्रकारांची इतकी गरज काही कधी भासलेली नव्हती. लोकांचं आयुष्य आणि त्यांच्या उपजीविका ज्यावर अवलंबून होत्या अशा सगळ्या गोष्टी सांगणं फार गरजेचं होतं. पण या देशातल्या बड्या माध्यम समूहांनी मात्र काय केलं? किमान दोन ते अडीच हजार पत्रकार आणि पत्रकारिता न करणाऱ्या पण माध्यमांमध्ये काम करणाऱ्या दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना या समूहांनी कामावरून चक्क काढून टाकलं.

इतक्या सगळ्या घटना आणि गोष्टी ते कसे सांगणार होते? आपल्याकडच्या काही सर्वोत्तम वार्ताहरांना कामावरून काढून टाकून? माध्यमांमध्ये काम करणाऱ्या इतर हजारो कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान ४०-६० टक्क्यांची कपात करण्यात आली. पत्रकारांच्या प्रवासावर काटेकोर निर्बंध लादले गेले. आणि तेही त्यांच्या तब्येतीची काळजी होती म्हणून नाही तर काटकसर म्हणून. त्यामुळे मग ज्या गोष्टी आपल्याला वाचायला-पहायला मिळाल्या, खास करून २५ मार्च २०२० नंतरच्या पंधरवड्यानंतर, त्या जास्त करून शहरांमध्ये किंवा मोठ्या नगरांमध्ये घडणाऱ्या होत्या.

एप्रिल २०२० नंतर पारीमध्ये काम करणाऱ्या गटात ११ जणांची भर पडली, एकालाही कामावरून कमी केलं गेलं नाही आणि एका पैशाची कपात आम्ही केली नाही. उलट, २०२० च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही आमच्यासोबत काम करणाऱ्या बहुतेकांना पदभरती दिली तसंच त्यांच्या मानधनात वाढ केली.

आमचं नियमित वार्तांकन नेहमीप्रमाणे अतिशय उत्तमरित्या सुरू होतंच पण महासाथीला सुरुवात झाली तेव्हापासून पारीवर कहाण्या, लेख, महत्वपूर्ण अहवाल आणि कागदपत्रांसह २७० वृत्तांत प्रकाशित झाले (बहुतेकांमध्ये बहुमाध्यमांचा वापर करण्यात आला होता.) आणि या सगळ्यांचा गाभा एकच होता – टाळेबंदीच्या काळातलं जिणं आणि जगणं. देशातल्या बहुतेक सर्व प्रदेशांमधून, २३ राज्यांतून हे वृत्तांत आले. स्थलांतरित कामगार ज्या गावांना परतत होते तिथूनही या कहाण्या आम्ही सादर केल्या. मिळेल त्या वाहनांनी हजारो किलोमीटर प्रवास करून आमचे वार्ताहर आणि पत्रकार देशाच्या कानाकोपऱ्यात पोचत होते. एकूण ६५ जणांनी या काळात पारीवर वार्तांकन केलं. महासाथीच्या आधीही आम्ही स्थलांतरित कामगारांविषयी बोलत-लिहीत होतोच. इतर माध्यमांसारखं आम्हाला या समूहाचा शोध २५ मार्च २०२० रोजी लागलेला नाही.

आमच्या वाचकांना माहिती आहे की पारी पत्रकारितेचा मंच आहेच पण एक जिताजागता संग्रह देखील आहे. ग्रामीण भारताबद्दलचे लेख, अहवाल, गाणी, लोकसंगीत, छायाचित्रं आणि चित्रफिती पारीवर आहेत तितक्या संख्येत तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. आणि फक्त या देशात नाही अख्ख्या जगात केवळ गावपाड्यांबद्दल इतकं सारं पारीशिवाय तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. पारीची पत्रकारिता रोजच्या माणसांच्या रोजच्या जगण्यासंबंधी आहे. या देशातल्या ८३.३ कोटी लोकांच्या स्वतःच्या आवाजात आणि स्वतःच्या अनुभवांमधून तुम्ही त्यांच्या आयुष्यांबद्दल इथे जाणून घेऊ शकता.

PHOTO • Zishaan A Latif
PHOTO • Shraddha Agarwal

महासाथ आणि टाळेबंदीच्या काळात आम्ही पारीवर आतापर्यंतचं सर्वोत्तम काम प्रकाशित केलं आहे. स्त्रियांच्या प्रजनन आरोग्याबद्दलची लेखमालिका (डावीकडे) आणि आता रद्द केलेल्या कृषी कायद्याविरोधातल्या शेतकरी आंदोलनांचं वार्तांकनही (उजवीकडे) याच काळात करण्यात आलं

पारीचा उगम झाला तेव्हापासून आजवर, गेल्या ८४ महिन्यांच्या काळात पारीला ४२ पुरस्कार मिळाले आहेत. सरासरी दर ५९ दिवसांनी एक या गतीने. त्यातले १२ पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत. टाळेबंदीच्या काळात केलेल्या वार्तांकनासाठी १६ पुरस्कार मिळाले आहेत. एप्रिल २०२० मध्ये युनायटेड स्टेट्स लायब्ररी ऑफ काँग्रेस यांनी त्यांच्या वेब संग्रहामध्ये पारीची निवड करण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलः “या संग्रहामध्ये आणि एका ऐतिहासिक दस्तावेजामध्ये तुमच्या वेबसाइटची मोलाची भर पडत आहे.”

याच काळात पारीने देशाच्या १२ राज्यांमधून स्त्रियांच्या प्रजनन अधिकारांविषयी एक लेखमाला प्रकाशित केली. ज्या राज्यात स्त्रियांच्या अधिकारांची स्थिती बिकट आहे अशा काही राज्यांचा विशेष समावेश करण्यात आला होता. सध्या सुरू असलेल्या या लेखमालेमधल्या एकूण ३७ वृत्तांपैकी ३३ लेखांचं वार्तांकन आणि प्रकाशन महासाथीच्या आणि टाळेबंदीच्या काळात झाले आहे. ग्रामीण स्त्रियांच्या स्वतःच्या अनुभवांमधून, स्वतःच्या कहाण्यांमधून प्रजनन आरोग्याच्या अधिकारांविषयी देशव्यापी स्तरावर केलेला हा पहिलाच प्रयत्न मानायला हरकत नाही.

या अतिशय कठीण काळामध्ये आमच्या वाचकांमध्ये जवळपास १५० टक्क्यांची वाढ झाली आहे. आणि इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांच्या वाचकांमध्ये २०० टक्के. विशेष म्हणजे आमच्या इन्स्टावाचकांनी ज्या लोकांच्या कहाण्या आम्ही घेऊन आलो थेट त्यांना लाखो रुपयांची मदत देखील केली आहे.

हे सगळं करत असतानाच आम्ही आता रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांविषयी २५ वार्ताहर आणि छायाचित्रकारांचे ६५ वृत्तांत प्रकाशित केले आहेत. सोबत या संबंधीची १० महत्त्वाची कागदपत्रं देखील पारीवर उपलब्ध आहेत. ‘मुख्य धारेतल्या’ माध्यमांवर तुम्हाला वाचायला मिळणार नाहीत अशा कहाण्या आम्ही गोळा केल्या, तुमच्यासाठी सादर केल्या. आणि त्या केवळ दिल्लीच्या वेशीवरच्या नव्हत्या. किमान १०-१२ राज्यांमधून झालेल्या आंदोलनाच्या वार्ता आम्ही घेऊन आलो.

या ऐतिहासिक संघर्षामध्ये सहभागी झालेले हे शेतकरी नक्की कोण होते? कुठून आले, त्यांच्या शेतीची अवस्था काय आहे, त्यांच्या मागण्या काय होत्या आणि आपलं घरदार सोडून दिल्लीच्या वेशीवर वर्षभर तळ ठोकून बसावं ही ऊर्मी त्यांच्यात कुठून आली अशा सगळ्या बाबींचा मागोवा आम्ही या कहाण्यांमधून घेतला. सरकारी ऊब घेणाऱ्या, उच्चभ्रू विचारवंतांच्या नाही, अगदी साध्यासुध्या शेतकऱ्यांच्या शब्दात आम्ही हा वेध घेतला. हे आंदोलन आजवर पाहिलेल्या सगळ्या आंदोलनांपेक्षा भव्य, शांततेच्या मार्गाने जाणारं आणि लोकशाही आंदोलन असल्याचं आम्ही पारीवर सगळ्यात पहिल्यांदा जाहीरही केलं होतं. आणि हे आंदोलनही महासाथीच्या काळातच उभं राहिलं. टिकलं.

PHOTO • Vandana Bansal

पारीवरची अनुवादाचं काम फार मोठ्या प्रमाणात केलं जातं. इथे विद्यार्थी तसंच संशोधकही आमच्या कहाण्या विविध भाषांमध्ये वाचू शकतात (डावीकडे). आपल्या पहिल्याच वर्षात पारी एज्युकेशनवर (उजवीकडे) ६३ ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी १३५ वृत्तांत प्रकाशित केले आहेत

२०१४ साली डिसेंबरमध्ये पारीची वेबसाइट इंग्रजीमध्ये सुरू करण्यात आली आणि आज आम्ही जवळपास एकाच वेळी १३ भाषांमध्ये आमचं काम प्रकाशित करत आहोत. आणि यात भर पडत जाणार हे निश्चित. आमच्या समभावावर विश्वास आहे. त्यामुळे एका भाषेत प्रकाशित झालेला मजकूर इतर १३ भाषांमध्ये मजकूर करण्याचा आमचा प्रयास असतो. भाषा हा भारताच्या गावपाड्याचा आत्मा आहे आणि म्हणूनच आमचा ठाम विश्वास आहे की प्रत्येक भारतीय भाषा तुमची स्वतःची भाषा आहे. कोण आहेत आमचे अनुवादक? यात डॉक्टर, पदार्थविज्ञानातील तज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, कवी, गृहिणी, शिक्षक, कलावंत, पत्रकार, लेखक, अभियंते, विद्यार्थी आणि प्राध्यापक असे सगळे आहेत. सर्वात ज्येष्ठ आहेत ८४ वर्षांच्या आणि सगळ्यात तरूण २२. काही जण भारताच्या बाहेर राहतात तर काही देशाच्या अगदी दुर्गम कानाकोपऱ्यात जिथे इंटरनेटही ठीकसं पोचलेलं नाही.

पारीचा वापर तुम्ही विनाशुल्क करू शकता. इथे येण्यासाठी कोणतीही नोंदणी फी नाही. किंवा कोणताही मजकूर सशुल्क नाही. आणि आमच्या वेबसाइटवर कसलीही जाहिरात नाही. तसंही आजच्या तरुणाईला जाहिरातींच्या जंजाळात लोटणाऱ्या, कृतक गरजा आणि मागणी निर्माण करणारी इतर अनेक माध्यमं आहेत. त्यात आणखी भर कशाला? आमच्य वाचकांपैकी जवळपास ६० टक्के ३४ वर्षांहून लहान आहेत आणि यातले ६० टक्के १८-२४ या वयोगटातले आहेत. आणि फक्त वाचकच नाहीत, आमचे अनेक वार्ताहर, लेखक आणि छायाचित्रकार देखील याच वयोगटातले आहेत.

पारी एज्युकेशन हा आमचा सगळ्यात नवा प्रयोग. आपल्या पहिल्या वर्षात या आमच्या प्रयोगाने आमचं एक मोठं ध्येय गाठण्याच्या दिशेने दमदार पावलं टाकली आहेतः भविष्यासाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती. तब्बल ९५ शिक्षण संस्था आणि १७ इतर संस्था पारीचा वापर पाठ्यपुस्तक म्हणून तसंच भारताच्या गावपाड्यांबद्दल अधिक जाणून घेण्याचं माध्यम म्हणून करत आहेत. यातल्या ३६ संस्था आमच्यासोबत पारीला केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रमांची रचना करत आहेत ज्याद्वारे त्यांचे विद्यार्थी वंचित समूहांसोबत जोडून घेऊन शकतील. पारी एज्युकेशनवर आतापर्यंत शेती, विरत चाललेल्या उपजीविका, लिंगभाव आणि इतरही अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी ६३ ठिकाणांहून १३५ लेख लिहिलेले आहेत. जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत पारी एज्युकेशनने १२० ऑनलाइन संवादसत्रांमध्ये भाग घेतला आहेत. यात भारतातल्या काही अग्रणी विद्यापीठांचा आणि दुर्गम भागातल्या शाळांचा तितकाच समावेश आहे.

पारीवर आम्ही गावपाड्यांबद्दल बोलताना स्मरणरंजन करत बसत नाही. खेड्याविषयीच्या अतिशय भोळ्या रम्य कल्पनाही नाहीत, किंवा इथल्या सांस्कृतिक प्रथांचं अवास्तव स्तोमही नाही. किंवा हे जगणं असंच्या असं कैद करून त्याचं प्रदर्शन मांडावं हा आमचा हेतू मुळातच नाही. पारीचा आजवरचा प्रवास या गावपाड्यांमधल्या सगळ्या गुंतागुंतींचा, इथल्या भेदभावांचा आणि विशिष्ट समूहांना वगळून त्या पायावर उभ्या राहिलेल्या रचनाचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. आज पारीमध्ये काम करणाऱ्या आम्हा सगळ्यांसाठी हा प्रवास सातत्याने खूप काही शिकवून जाणारा आहे. भारतातल्या या साधीसुध्या माणसांकडचं ज्ञान आणि कसब याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. आणि म्हणूनच आजूबाजूला घडत असलेल्या सगळ्यात कळीच्या मुद्दायांवर या माणसांचं काय म्हणणं आहे, त्यांचा अनुभव काय सांगतो त्याभोवती आम्ही त्यांच्या गोष्टी गुंफतो आणि तुम्हाला सांगतो.

PHOTO • Rahul M.
PHOTO • P. Sainath

वातावरणातल्या बदलांविषयी आमची लेखमाला (डावीकडे) या विषयाचा मागोवा साध्यासुध्या माणसांच्या रोजच्या जगण्यातून आणि अनुभवातून घेते. आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आज हयात असलेल्या काही शेवटच्या शिलेदारांविषयीही आम्ही लिहीत राहणार आहोत (उजवीकडे)

पुरस्काराने गौरवण्यात आलेली आमची वातावरण बदलांवरची मालिका साध्यासुध्या माणसांच्या रोजच्या जगण्यातून आणि अनुभवातून तयार झाली आहे. शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार, जंगलात राहणारे, समुद्री शैवाल गोळा करणाऱ्या स्त्रिया, भटके पशुपालक, मध गोळा करणारे, कीटक गोळा करणारे आणि असे अनेक लोक जे अनुभवतायत, तो बदलांचा अनुभव आमच्या कहाण्या तुमच्यासमोर मांडतायत. आणि तेही संकटात असलेल्या पर्वतीय परिसंस्था, जंगलं, समुद्र, सागरी प्रदेश, नद्यांची खोरी, प्रवाळ बेटं, वाळवंट, कोरडवाहू आणि शुष्क प्रदेशांमधून.

प्रस्थापित माध्यमांमध्ये या विषयाचं वार्तांकन बोजड, अनाकलनीय पद्धतीने केलं जातं आणि त्यामुळे वाचक त्यापासून दुरावते. परिणामी वातावरणातले बदल म्हणजे दूर कुठे तरी अंटार्क्टिकमध्ये बर्फ वितळतंय किंवा अमेझॉनच्या जंगलात वणवे लागलेत, ऑस्ट्रेलियातही वणवे पेटतायत अशा साचेबद्ध कल्पनांपुरते होऊन जातात. किंवा मग याचा संबंध केवळ आंतरराष्ट्रीय परिषदा, तिथले करार, किंवा कधीही वाचायला न मिळालेले आयपीसीसी अहवाल इतकाच राहतो. पारीचे वार्ताहर या बदलांचा मागोवा अशा काही पद्धतीने घेतात कि हे वास्तव आपल्या उंबरठ्यापर्यंत आलंय याची वाचकांना जाणीव होतेच.

आज आपण देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आणि पारीवर आजही आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, आज हयात असलेल्या शेवटच्या काही शिलेदारांच्या जीवनकहाण्या सांगतोय. फोटो, फिल्म आणि ऑडियो स्वरुपात. येत्या ५-७ वर्षांमध्ये त्या सुवर्णकाळातलं कुणीही आपल्यामध्ये नसेल. लहानग्यांना स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या खऱ्याखुऱ्या सैनिकांच्या कहाण्या त्यांच्या तोंडून ऐकायला मिळणार नाहीयेत. पारीवर आज कुणीही त्यांचं बोलणं ऐकू शकतं, त्यांना पाहू शकतं त्यांच्या स्वतःच्या शब्दात स्वातंत्र्य संग्राम नक्की काय होता हे जाणून घेता येतं.

आम्ही तसे माध्यमांच्या दुनियेत नवखेच आहोत आणि आमच्यापाशी फार मोठी गंगाजळीही नाही पण भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा फेलोशिप कार्यक्रम पारी चालवत आहे. आमचं ध्येयच आहे की भारताच्या ९५ (भौतिक आणि भौगोलिक) प्रदेशातून किमान एक फेलो निवडावा आणि त्या प्रदेशाचं आणि तिथल्या गावपाड्यांचं वार्तांकन तिने वा त्याने करावं. आजवर आमच्या फेलोंपैकी निम्म्या स्त्रिया आहेत आणि माध्यमांनी वगळलेल्या, वंचित समूहातल्या, अल्पसंख्य समाजातले अनेक फेलो आमच्यासोबत काम करत आहेत.

गेल्या सात वर्षांत आमच्याबरोबर २४० जणांनी इंटर्नशिप केली आहे. यातले ८० पारी एज्युकेशनसोबत काम करत आहेत. आमची अनोखी पत्रकारिता शिकत ते २-३ महिन्यांसाठी आमच्यासोबत काम करतात.

PHOTO • Supriti Singha

जगभरातल्या कोणत्याही भाषेत नसेल असा अनोखा संग्रह पारी जतन करत आहेः गावपाड्यातल्या स्त्रियांनी रचलेल्या आणि गायलेल्या जात्यावरच्या ओव्या (डावीकडे) तसंच आपल्या देशातल्या लोकांच्या चेहऱ्यांमधलं वैविध्य आमच्या चेहऱ्यांची दुनिया या प्रकल्पातून आम्ही नोंदवण्याचा प्रयत्न करत आहोत (उजवीकडे)

याशिवाय आमच्याकडे विविध संस्कृती, भाषा, कलाप्रकार आणि इतर अनेक तऱ्हेचे संग्रह आम्ही जतन करत आहोत. जगभरातल्या कोणत्याही भाषेत नसेल असा अनोखा संग्रह पारी जतन करत आहेः गावपाड्यातल्या स्त्रियांनी रचलेल्या आणि गायलेल्या जात्यावरच्या ओव्या. महाराष्ट्रातल्या गावपाड्यातल्या तसंच कर्नाटकातल्या काही गावातल्या स्त्रियांनी रचलेल्या आणि गायलेल्या तब्बल १,१०,००० जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह पारी जतन करत आहे. आतापर्यंत ओव्या अनुवादित करणाऱ्या गटाने ६९,००० ओव्यांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.

लोककला, संगीत, कलाकार आणि कारागीर, उन्मुक्त लेखन आणि काव्य आणि बरंच काही तुम्हाला पारीवर वाचायला मिळेल. भारताच्या विविध भागांतून गोष्टी आणि व्हिडिओंचा संग्रहदेखील पारीवर आहे. गेल्या २०-३० वर्षांमध्ये काढलेल्या कृष्णधवल छायाचित्रांचा, थोड्याथोडक्या नाही, १०,००० छायाचित्रांचा संग्रह आमच्यापाशी आहे. आणि तो कदाचित असा एकमेव संग्रह असेल. यातली बहुतेक सगळी छायाचित्रं लोक काम करत असतानाची आहेत. क्वचित कधी विरंगुळ्याचे क्षणही यात टिपले आहेत.

आमचा चेहऱ्यांची दुनिया हा प्रकल्प आमच्यासाठी फार मोलाचा आहे. आपल्या देशातलं चेहरेपट्टीतलं वैविध्य आम्ही नोंदवून ठेवतोय आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि हे चेहरे कोण्या नेत्यांचे किंवा तारेतारकांचे नाहीयेत. ते या देशाच्या साध्यासुध्या माणसांचे आहेत. आजवर या संग्रहात भारताच्या २२० जिल्ह्यातल्या ६२९ तालुक्यांमधल्या २,७५६ चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. एकूण १६४ छायाचित्रकारांनी हे चेहरे टिपले आहेत आणि यातले अनेक कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत. गेल्या सात वर्षांत पारीवर एकूण ५७६ छायाचित्रकारांचं काम आम्ही प्रकाशित केलं आहे.

आमच्या एकमेव असा ग्रंथालयात तुम्हाला पुस्तकं फक्त काही काळासाठी मिळत नाहीत. कुठल्याही शुल्काशिवाय ती तुम्हाला दिली जातात. पारीच्या ग्रंथालयात असलेले कुठलेही अहवाल, वृत्तांत, कागदपत्रं, इतरत्र उपलब्ध नसलेली पुस्तकं असं काहीही तुम्ही डाउनलोड करू शकता, छापून घेऊ शकता तेही विनाशुल्क, अर्थात योग्य ऋणनिर्देशासह. आम्ही क्रिएटिव्ह कॉमन्स ४.० नुसार काम करतो. महासाथीच्या काळात आम्ही आमच्या ग्रंथालयातला आरोग्यासंबंधीचा विभाग वाढवायला सुरुवात केली आणि आज या विभागात आरोग्यासंबंधीचे १४० अतिशय महत्त्वाचे अहवाल उपलब्ध आहेत. काही अगदी अनेक दशकांपूर्वीचे तर काही अगदी नुकते प्रसिद्ध झालेले.

पारी सरकारी किंवा कॉर्पोरेट दोन्ही प्रकारच्या नियंत्रण किंवा मालकीपासून पूर्णपणे मुक्त आहे. आणि आमच्या वेबसाइटवर कुठलीही जाहिरात नाही. याप्रकारे आम्ही स्वतंत्र पद्धतीने काम करू शकत असलो तरी त्याचा परिणाम म्हणजे आमच्याकडे तुमच्यासारख्या वाचकांकडून मिळणाऱ्या देणग्या आणि वर्गण्या सोडून दुसरा आर्थिक स्रोत नाही. आणि कितीही सरधोपट वाटलं तरी ते तेच खरंही आहे. तुम्ही हात दिला नाहीत, तर आम्ही डगमगणार हे निश्चित. खरंच. पारीला सढळ हाताने मदत करा. आपलं स्वातंत्र्य जपा. चांगल्या पत्रकारितेला एक संधी द्याच.

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے