संदीपान वाळवेंना आता अशा विनंतीत काही वावगं वाटेनासं झालं आहे. “सरणाला अग्नी देण्याआधी अंगावर ही नेसवा तेवढी,” मृत स्त्रीच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं आणि एक गर्द हिरवी साडी त्यांच्या हाती सोपवली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी ते केलंही.
महाराष्ट्राच्या उस्मानाबाद शहरातल्या स्मशानभूमीमध्ये १५ मृतदेह रांगेत ठेवलेले होते. वाळवेंना सांगितलेला देह त्यांनी शोधला. पीपीई किट घालून त्यांनी हवाबंद बॉडीबॅगवरती हातमोजे घालून होईल तितक्या नीट हिरवी साडी नेसवली. “आपल्यालाही लागण होईल अशी त्यांच्या नातेवाइकांना भीती वाटत होती,” ते सांगतात.
उस्मानाबाद नगरपरिषदेमध्ये कर्मचारी असलेले ४५ वर्षीय वाळवे मार्च २०२० मध्ये जेव्हा या महासाथीला सुरुवात झाली तेव्हापासून मृतदेहांचं दहन करत आहेत. तेव्हापासून त्यांनी किमान १०० जणांवर अंत्यसंस्कार केले असतील. ग्रामीण भागात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने जोरदार शिरकाव केला आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीपासून दिवसाला १५-२० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत येत आहेत. त्यामुळे वाळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कामाचा ताण वाढलाय आणि लोकांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली आहे.
“या विषाणूच्या भीतीमुळे नातेवाईक अंत्यसंस्काराला यायचं देखील टाळायला लागलेत,” वाळवे सांगतात. “त्यामुळे चितेला अग्नी देण्याआधी ते आम्हाला मृत व्यक्तीवर काही साधे संस्कार करायला सांगतात. काळच वाईट आहे. आजूबाजूला आपली माणसं नसताना चिता पेटतायत ते पाहून काळजाला भोकं पडतात. एकच बरंय गेलेल्यांना पत्ताच नाही त्यांना शेवटची निरोप कसा दिलाय ते.”
फक्त भीती नाही, निर्बंधांमुळे देखील नातेवाईक लांबच राहतात. कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या वाढत चालली असल्यामुळे स्मशानभूमीत केवळ एका नातेवाइकाला येण्याची परवानगी आहे. बाकीच्यांना अखेरचा निरोपही देता येत नाही. शारीरिक अंतर बाळगत एकमेकांना धीर देण्याचे वेगवेगळे मार्ग त्यांना आता शोधावे लागतायत. अनेकांना तर त्यांच्या जिवलगांचा शेवट सन्मानाने व्हावा यासाठी धडपड करावी लागतीये.
सुनील बडूरकर आपल्या वडलांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शवागारात गेले तेव्हा तो आधीच खराब व्हायला लागला होता. “दुर्गंधी सहन होत नव्हती,” ५८ वर्षीय बडूरकर सांगतात. ते उस्मानाबाद जिल्हा परिषदेतून निवृत्त झाले आहेत. “तिथे अनेक मृतदेह होते, त्यातच माझ्या वडलांचा देह होता. काही खराब व्हायला लागले होते.”
बडूरकरांचे वडील, मनोहर, वय ८१ यांना १२ एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि एका दिवसातच ते वारले. “त्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावले,” ते सांगतात. “ते गेले तेव्हा सगळ्याच यंत्रणांवर इतका ताण होता की त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करायला २४ तास गेले. जेव्हा कोविड-१९ मुळे कुणाचा मृत्यू होतो तेव्हा मृतदेह उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात नेला जातो आणि तिथे जाऊन आम्हाला ओळख पटवून घ्यावी लागते. तिथून अँब्युलन्समधून बॉडी स्मशानभूमीत पाठवली जाते.”
तिथे चिता रचून ठेवलेल्या असतात. तिथले कर्मचारी एका रांगेत १५-२० चिता असतात त्यावर मृतदेह ठेवतात. आणि त्यानंतर एकाच वेळी अग्नी दिला जातो. “असल्या मरणात कसलीच प्रतिष्ठा नाही,” बडूरकर म्हणतात.
आतापर्यंत, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अंदाजांनुसार, मार्च २०२० पासून उस्मानाबाद जिल्ह्यात १,२५० जणांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला असून ५६,००० हून अधिक जणांना आजाराची लागण झाली आहे. मराठवाड्यातला हा जिल्हा वर्षानुवर्षं पाण्याचं दुर्भिक्ष्य, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि अरिष्टांचा सामना करत आहे. प्रामुख्याने शेतीप्रधान असणाऱ्या या भागात आधीच कर्जाच्या बोज्याखाली असलेल्या लोकांना कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला आहे. वैद्यकीय उपचारांवरचा खर्च हा अधिकचा बोजा ठरतो आहे.
हॉस्पिटलमधले अधिकारी सांगतात की काही प्रसंगात घरचे लोक मृतदेह घेण्यासाठी देखील येत नाहीत आणि जास्त करून या मागे लागण होण्याचीच भीती जास्त असते. आजारी पडून खर्च वाढून कर्जाचा बोजा वाढण्याचीही भीती आहेच.
काही जण मात्र मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतायत. उस्मानाबादमधले काही मुस्लिम कार्यकर्ते गेलेल्यांचा शेवट सन्मानाने व्हावा यासाठी काम करतायत. आठ-दहा जणांच्या या गटातले ३४ वर्षीय बिलाल तांबोळी सांगतात, “आम्ही दुसऱ्या लाटेमध्ये ४० हून अधिक लोकांवर अंतिम संस्कार केले आहेत.” महासाथ सुरू झाल्यापासून १०० जणांवर. “हॉस्पिटल आम्हाला कळवतं आणि तिथून पुढचं आम्ही पाहतो. जर गेलेलं माणूस मुसलमानाचं असेल तर आम्ही त्या पद्धतीने विधी करतो. जर तो हिंदू असेल तर आम्ही हिंदू पद्धतीने संस्कार करतो. मेल्यावर पण माणसाचा मान रहावा यासाठी ही धडपड आहे.”
बिलाल यांना त्यांच्या गटाच्या कामाची जास्त प्रसिद्धी होण्याची पण काळजी वाटतीये. ते बरोबर होणार नाही असं त्यांना वाटतं. त्यांच्या या सेवाभावी कामात काय जोखीम आहे याची देखील त्यांना कल्पना आहे. “मला माझ्या घरच्यांची चिंत आहे,” बिलाल सांगतात. त्यांचं अजून लग्न व्हायचंय. “मला जर याची लागण झाली तर काहीही झालं तरी मला त्याचा खेद नाहीये. पण माझ्या घरी आई-वडील आहेत, भाऊ-बहीण आहेत. एकमेकांपासून अंतर ठेवण्याइतकं आमचं घर मोठं नाहीये. मी शक्य ती सगळी काळजी घेतो – प्रत्येक अंत्यविधीच्या आधी मनातल्या मनात प्रार्थना करतो.”
कोविडच्या काळात अंत्यविधींचं स्वरुप असं झालंय की घरच्यांना आता सगळं संपलंय याचा स्वीकार करणंच अवघड होऊन गेलंय. “घरी कुणी गेलं तर तो दुःखाचा प्रसंग असतो,” उस्मानाबादच्या वेशीवर राहणाऱ्या ३६ वर्षीय दिपाली यादव सांगतात. “तुम्ही सगळे एकत्र मिळून शोक करता, एकमेकांच्या साथीने त्यातून बाहेर येता. लोक येतात, तुम्हाला धीर देतात. त्यातून बळ येतं. आता ते सगळं कुठल्या कुठं गेलंय.”
एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात दीपालींचे सासू-सासरे २४ तासांच्या फरकाने वारले. दीपालींचं अख्खं घरच कोविडच्या कचाट्यात सापडलं होतं. “माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये होते,” त्या सांगतात. “आमची तिघं मुलं घरी विलगीकरणात होती. आणि मी दुसऱ्या खोलीत. हे सगळं खरंय असं वाटतच नव्हतं. एकीकडे, आपल्या घरातली दोन माणसं अशी एका पाठोपाठ गेली ते मनाला समजूत घालायची होती. आणि दुसरीकडे मिस्टरांची काळजी होती. घरात एका खोलीत बसून मला वेड लागायची पाळी आली होती.”
त्यांचे पती, अरविंद शेती करतात. ते म्हणतात की आई-वडलांची शेवटच्या क्षणी काळजी घेता आली नाही याची खंत त्यांना सतावते. “मी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो, तरीसुद्धा पीपीई किट घालून स्मशानात गेलो आणि त्यांच्या चिता पेटलेल्या तरी पाहून आलो,” ते म्हणतात. “किमान तितकं तरी करायला पाहिजे ना.”
४५ वर्षीय अरविंद सांगतात की आई-वडलांच्या जाण्याचं दुःख करण्यासाठी या कुटुंबाला वेळच मिळालेला नाही. “सगळं लक्ष डेड बॉडी ताब्यात घेणं, त्या स्मशानात नेणं आणि त्यानंतर अंत्यविधीचे सगळे नियम पाळणं इतकंच सुरू होतं,” ते सांगतात.
“अंत्यविधी म्हणजे फक्त सगळी व्यवस्था पाहण्यापुरतं राहिलंय आता. दुःख करायला तुमच्याकडे वेळच नाही. शोक व्यक्त करायला देखी फुरसत नाही. तुमच्या नातेवाइकाची चिता पेटली की तुम्हाला स्मशानभूमीतून जायला सांगतात कारण मागे थांबलेल्यांना आत घ्यायचं असतं.”
अरविंद यांच्या आई, आशा, वय ६७ १६ एप्रिल रोजी वारल्या. त्यांचे वडील, वसंत, वय ८० दुसऱ्या दिवशी. मनाला हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे स्मशानभूमीतल्या कर्मचाऱ्यांनी दोघांच सरण एकत्र रचलं. “त्या दिवशी माझ्या मनाला फक्त तेवढा एक दिलासा मिळाला,” ते म्हणतात. “माझे आई-वडील एकमेकांसोबत जगले आणि जाताना देखील एकमेकाबरोबर गेले. त्यांच्या आत्म्याला नक्की शांतता मिळाली असणार.”
अनुवादः मेधा काळे