“त्यांनी सांगितलं की बाळ पोटातच गेलंय म्हणून. आम्ही तर हादरूनच गेलो. त्यानंतर त्यांनी आम्हाहा तिथून जायला सांगितलं आणि म्हणाले, जायचं तिथे जा. मग मी माझ्या सुनेला घेऊन शहरातल्या खाजगी डॉक्टरकडे जायचा निर्णय घेतला,” सुखिया देवी सांगतात. बिहारच्या वैशाली जिल्ह्याच्याच गावी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना आणि त्यांच्या सुनेला, कुसुमला कशी वागणूक मिळाली ते सांगतात.
सकाळचे १० वाजलेत. शेतमजुरी करणाऱ्या या ६२ वर्षांच्या सुखिया देवी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या रांगेत उभ्या आहेत. त्यांच्या कुशीत त्यांची अगदी ठणठणीत असलेली एक दिवसाची नात आहे.
त्यांच्या २८ वर्षांच्या सुनेला वेणा सुरू झाल्या आणि सुखिया तिला घेऊन वैशालीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या. तिथे मदतनीस होती, तिनेच त्यांना सांगितलं की बाळ पोटात गेलंय. त्या आणि कुसुम दोघी भेदरून गेल्या आणि रिक्षात बसून त्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या गावी परत आल्या (गावाचं नाव उघड न करण्याची त्यांनी विनंती केली). “आम्ही आमच्या गावी परतलो, महिला डॉक्टरकडे [स्त्रीरोग तज्ज्ञ] जायला प्रायवेट गाडी केली, बोलेरो,” सुखिया सांगतात. “भाडं किती होईल हे विचारायचं देखील मला सुचलं नाही. बाळंतपणाचीच मला एवढी काळजी लागून राहिली होती. शेजाऱ्यांच्या मदतीने मी माझ्या सुनेला गाडीत बसवलं. आणि आम्ही दवाखान्याच्या दिशेने निघालो.”
आणि जशा त्या डॉक्टरकडे जायला निघाल्या, तसं ‘गर्भातच गेलेलं’ बाळ त्या गाडीतच जन्माला आलं.
“ती तिथे त्या गाडीतच जन्माला आली,” सुखिया सांगतात. सगळं सुखरुप पार पडलं. त्यांच्याकडे एक साडी होती ती त्यांनी चादर म्हणून अंथरली, (त्यांच्यासोबत आलेल्या) गावातल्या औषधांच्या दुकानदाराने गाडीत थोडं पाणी ठेवलं होतं. “पण या सगळ्यात किती वेळ गेला...” सुखिया म्हणतात.
आणि पैसाही. अंतर थोडंच असलं तरी गाडीच्या मालकाने या कुटुंबाकडून प्रवासाचे ३,००० रुपये घेतले आणि नंतर गाडी साफ करून घेण्याचे वरचे १,००० रुपये.
पण प्राथमिक आरोग्य केंद्रात नक्की झालं तरी काय? आम्ही स्वतः तिथे गेलो होतो त्यामुळे आम्हाला माहितीये की तिथलं अल्ट्रासाउंड मशीन किंवा दुसरं कुठलंच यंत्र काम करत नव्हतं. मग त्यांनी कशाच्या आधारावर जाहीर केलं की बाळ गर्भातच गेलंय म्हणून? असं दिसतंय की फार काही विचार न करताच हे जाहीर करण्यात आलं होतं.
“आम्ही दवाखान्यात आलो ना तेव्हा बरीच रात्र झाली होती,” सुखिया सांगतात. “त्यांनी तिला प्रसव खोलीत नेलं आणि पाचच मिनिटात त्यातली एक जण बाहेर आली आणि म्हणाली की केस फारच गंभीर आहे. आम्ही खाजगी दवाखान्यात गेलं तर चांगलं, ती म्हणाली. बाळ गर्भातच गेलंय असं बाहेर येऊन मला सांगितलं ना ती दाई होती असं मला वाटतंय. रात्रीचे ११ वाजले होते त्यामुळे आमच्यासोबत आमच्या गावातली आशा कार्यकर्ती नव्हती. म्हणून मग मीच धावत घरी गेले आणि शेजारपाजाऱ्यांच्या मदतीने बोलेरो केली भाड्याने. गावातल्याच एकाची गाडी होती त्यामुळे १५ मिनिटात गाडीची सोय झाली. नाही तर काय झालं असतं भगवंतालाच ठाऊक.”
फक्त गाडीच्या भाड्यावर (आणि नंतर ती साफ करण्यासाठी) ४,००० रुपये खर्चावे लागतील असं सुखियाला बिलकुल वाटलं नव्हतं. “गाडीची सोय झाल्यावर आम्ही आमच्याच गावाजवळ राहणाऱ्या औषधांच्या दुकानदारालाही डॉक्टरकडे जाताना सोबत घेतलं. त्याने कुसुमला बाटली चढवली आणि माझी सून तिथेच [गाडीतच] बाळंत झाली. त्यानंतर आम्ही सगळे घरी परतलो.” तोपर्यंत मध्यरात्र झाली होती.
दुसऱ्याच दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात माझी सुखियांशी भेट झाली होती. बाळाला लस द्यायला आणि तिचा जन्माचा दाखला काढण्यासाठी त्या तिथे आल्या होत्या. “इथली लोकं म्हणतायत की त्यांना पैसे मिळाले नाहीत तर ते कागदपत्रं तयार करणार नाहीत,” त्या सांगतात.
थोडक्यात काय तर प्राथमिक आरोग्य केंद्रातले कर्मचारी अशा बाळाच्या जन्मदाखल्यासाठी पैसे मागत होते जे त्यांनी आदल्याच दिवशी गर्भात मृत असल्याचं सांगितलं होतं.
‘त्यांनी तिला प्रसव खोलीत नेलं आणि पाचच मिनिटात, त्यातली एक जण बाहेर आली आणि म्हणाली की केस खूप गंभीर आहे. आम्ही खाजगी हॉस्पिटलला गेलेलं बरं, ती म्हणाली’
“प्रत्येक जण पैसा मागतो. मनाला येईल तो आकडा सांगतात. मी कागद [जन्मदाखला] तयार करून घेण्यासाठी एकाला १०० रुपये दिले, तर दुसऱ्याला ३००. नंतर आणखी एका बाईला ३५० रुपये,” त्या सांगतात. “आधी, ती सिस्टर, लाल साडीतली,” जवळच उभ्या असलेल्या एएनएमकडे बोट दाखवत त्या म्हणतात, “तिने ५०० रुपये मागितले आणि म्हणाली की नाही तर काही मला कागद मिळणार नाही.” सुखियांनी मात्र दुसऱ्यांनाच पैसे दिले.
“कसंय, मला काही या कागदपत्रांविषयी जास्त काही माहित नाहीये. माझी तीन मुलं आहेत पण मी त्यांच्यासाठी असं काही करून घेतलं नव्हतं. पण आता मात्र ते म्हणतायत की हा महत्त्वाचा कागद आहे म्हणून,” सुखिया म्हणतात.
“मला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. ही सगळ्यात थोरल्याची लेक आहे. माझ्या मधल्याचं पण लग्न ठरलंय आणि लेक सगळ्यात धाकटी आहे. तिचं लग्न झालं नाहीये आणि ती माझ्या सोबतच राहते. ही तिघं अगदी लहान होती ना तेव्हा त्यांच्या वडील वारले.” पती वारले तेव्हा मुलं अगदी गुडघ्याइतकी होती असं दाखवायला त्या कमरेतून खाली वाकतात.
“माझ्या मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना खाऊ-पिऊ घालण्यासाठी मी किती तरी वर्षं दुसऱ्याच्या रानात कामं केली,” सुखिया सांगतात. आता त्यांचा मुलगा घरी पैसा पाठवतो आणि त्या त्यांची दोन नातवंडं (एक आदल्याच दिवशी जन्मलीये), गृहिणी असलेली कुसुम आणि मुलीचा सांभाळ करतात.
“माझी दोन्ही मुलं खाजगी मुकादमाच्या ‘कंपनीत’ कामाला आहेत,” त्या सांगतात. “धाकटा मुंबईत असतो आणि इलेक्ट्रिक स्विचबोर्ड बनवतो. आणि हिचा बाप [३४ वर्षांचा] कारागीर आहे, पंजाबमध्ये इमारतींच्या आत प्लास्टर ऑफ पॅरिसचं नक्षीकाम करतो. टाळेबंदीच्या काळात दोघांपैकी कुणीच घरी येऊ शकलं नाही,” सुखिया जड आवाजात सांगतात आणि उसासा टाकतात.
“पाच वर्षांपूर्वी मी माझ्या थोरल्याचं लग्न लावून दिलं. हे त्यांचं दुसरं बाळ आहे. माझा मोठा नातू आता साडेतीन वर्षांचा आहे,” कुसुमचा थोरला मुलगा प्रभातविषयी त्या सांगतात. त्याचा जन्म याच प्राथमिक आरोग्य केंद्रात झालाय. सुखिया प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उभ्या होत्या तर कुसुम प्रसूतीपश्चात सेवा कक्षात निजली होती. कुसुमच्या डाव्या अंगाची भिंत वर्षानुवर्षं मारलेल्या पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगली होती. या वॉर्डाच फोटोग्राफी पूर्ण निषिद्ध आहे. कुसुम निजली आहे त्या रिकाम्या पलंगाच्या उजव्या बाजूला अल्ट्रासाउंड मशीन आहे, जे आता कोळ्यांचं घर बनलंय. “गेल्या आठवड्यातच ते बंद पडलंय. झाडू मारणाऱ्याने ते झटकलं पण नाहीये,” कामावरची एएनएम सांगते.
गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात सोनोग्राफी करण्यासाठी पीएचसीतल्या कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यावरून कुसुम खाजगी दवाखान्यात गेली होती. पण, “नंतर जेव्हा आम्ही बाळंतपणासाठी इथे आलो तेव्हा मात्र त्यांनी आम्हाला किती त्रास दिला,” सुखिया म्हणतात. कुसुम धक्क्यातून आणि गुंगीतून अजून सावरायची असल्याने आमच्याशी बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती.
सुखियांना हत्तीरोग आहे (त्यांचा एक पाय दुसऱ्यापेक्षा दुप्पट आकाराचा आहे). त्या सांगतात, “हा कायम असाच असतो. उभं राहणं माझ्यासाठी फार कठीण असतं. मला फार चालताही येत नाही. औषध घेतलं तरच दुखायचं थांबतं. पण याच पायांनी मला सगळं काही करावं लागतं. आता मी इथे आलीये, तर माझी औषधंसुद्धा घेऊन जाते. तशीही संपायलाच आलीयेत.”
आपल्या नातीला कुशीत घेऊन त्या लंगडतच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दवा वितरण केंद्राकडे जाऊ लागतात.
शीर्षक चित्रः प्रियांका बोरार नव माध्यमांतील कलावंत असून नवनवे अर्थ आणि अभिव्यक्तीच्या शोधात ती तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग करते. काही शिकता यावं किंवा खेळ म्हणून ती विविध प्रयोग करते, संवादी माध्यमांमध्ये संचार करते आणि पारंपरिक कागद आणि लेखणीतही ती तितकीच सहज रमते.
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा
अनुवादः मेधा काळे