रंग उडालेल्या दोन मजली घराच्या वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीच्या एका कोपऱ्यात अझलन अहमद फोनशी खेळत बसलाय. त्याच्या हाताला कंप सुटलाय आणि तो त्याच्या आईला काश्मिरी भाषेत ओरडून सांगतोय, “माई, गो खबर क्या [मला काय होतंय तेच कळत नाहीये].” त्याचं डोकं दुखतंय आणि अंग ठणकतंय. त्याची आई, सकिना बेगम धावत स्वयंपाकघरातून पेलाभर पाणी घेऊन येते. अझलनच्या हाका ऐकून त्याचे वडील बशीर अहमददेखील त्याच्या खोलीत येतात आणि त्याची समजूत घालू पाहतात. अंमली पदार्थ घेणं थांबवल्यानंतर अशी काही लक्षणं दिसू शकतात असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

काही काळापासून सकिना बेगम आणि बशीर (ओळख उघड होऊ नये म्हणून सगळी नावं बदलण्यात आली आहेत) अझलनच्या खोलीला कडी लावू लागलेत. त्यांच्या घराच्या १० खिडक्या देखील नेहमी बंद असतात. त्याची खोली स्वयंपाकघराच्या जवळ आहे आणि तिथून सकिना त्याच्यावर लक्ष ठेऊ शकतात. “आपल्याच लेकराला असं कोंडून ठेवायचं म्हणजे किती त्रास होतो. पण दुसरा काहीच इलाज नाहीये,” ५२ वर्षीय सकिना बेगम सांगतात. बाहेर सोडलं तर आपला मुलगा परत अंमली पदार्थाच्या मागे लागेल अशी त्यांना भीती वाटते.

दोन वर्षं झाली, शाळा सोडलेला, बेरोजगार असणारा अझलन हेरॉइनच्या व्यसनात अडकलाय. या व्यसनाला चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली. आधी नशेसाठी बुटाचं पॉलिश, त्यानंतर वैद्यकीय वापरातले अफूवर्गीय पदार्थ आणि चरस (गांजापासून तयार केलेला घटक) आणि मग हेरॉइन.

काश्मीरच्या दक्षिणेकडच्या अनंतनागमधील चुरसू प्रदेशात राहणाऱ्या अझलनच्या कुटुंबासाठी हे व्यसन म्हणजे एक मोठा धक्का होता. “त्याने गर्द विकत घेण्यासाठी जे मिळेल ते विकलं असावं – त्याच्या आईची कानातली काय, बहिणीची अंगठी काय,” भातशेती करणारे ५५ वर्षीय बशीर सांगतात. आपल्या मुलाचं हे व्यसन बशीर यांच्या लक्षात येईपर्यंत त्याने त्यांचं एटीएम कार्ड चोरून त्यांच्या खात्यातून ५०,००० रुपये काढले देखील होते. “आमच्या घरी राहणाऱ्या पाहुण्यांनी पण अनेकदा तक्रार केली होती की त्यांचे पैसे चोरीला जातायत म्हणून,” ते सांगतात.

पण जेव्हा हेरॉइन विकत घेण्यासाठी आपल्या ३२ वर्षीय बहिणीच्या बोटातली अंगठी काढून घेताना त्यांनी अझलनला पाहिलं तेव्हा समस्या खरंच किती गंभीर आहे हे त्यांच्या लक्षात आलं. “त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी त्याला श्रीनगरच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी घेऊन गेलो. माझी माझ्या मुलावर आंधळी माया होती आणि त्याला कुणी व्यसनी, ड्रग ॲडिक्ट म्हणेल असं कधी मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं,” ते म्हणतात.

Left: A young man from the Chursoo area (where Azlan Ahmad also lives) in south Kashmir’s Anantnag district, filling an empty cigarette with charas.
PHOTO • Muzamil Bhat
Right: Smoking on the banks of river Jhelum in Srinagar
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः काश्मीरच्या दक्षिणेकडच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या (अझलन राहतो त्या) चुरसूमधला आणखी एक तरुण, रिकाम्या सिगारेटमध्ये चरस भरतोय. उजवीकडेः श्रीनगरमध्ये झेलमच्या तीरावर सिगारेटचे झुरके

हे व्यसनमुक्ती केंद्र चुरसूहून ५५ किलोमीटरवर आहे. श्रीनगरच्या कारन भागात असलेल्या श्री महाराजा हरि सिंग हॉस्पिटलच्या आवारात. अंमली पदार्थांची शिकार झालेले अझनलसारखेच अनेक जण अख्ख्या काश्मीरहून इथे मदतीसाठी येतात. ३० खाटांच्या या केंद्रात  बाह्योपचार विभाग (ओपीडी) देखील आहे. श्रीनगरमधल्या शासकीय महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस (इम्हॅन्स) तर्फे हे केंद्र चालवलं जातं.

इथला एक जण आहे उत्तर काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातला कैसर दार (नाव बदलले आहे). जीन्स आणि काळपट पिवळ्या रंगाचं जाकिट घातलेला हा १९ वर्षांचा तरुण मनोविकार तज्ज्ञांना भेटण्याची वेळ येईपर्यंत तिथल्या सुरक्षा रक्षकांबरोबर हास्यविनोद करताना दिसतोय. पण आत जाण्याची वेळ येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पार विरून जातं.

कुपवाड्याच्या शासकीय महाविद्यालयात शिकत असताना कैसरला क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला फार आवडायचं, पण त्याच्या मित्राने त्याला पहिल्यांदा चरस दिली तोपर्यंतच. अझलनसारखंच त्यानेही वेगवेगळी नशा करून पाहिली आणि अखेर त्याला हेरॉइनची सवय जडली. “मी आधी कोरेक्स (खोकल्यावरील औषध) आणि ब्राउन शुगर घ्यायचो, आणि आता हेरॉइन,” कैसर सांगतो. त्याचे वडील सरकारी प्राथमिक शाळेत आहेत आणि महिन्याला त्यांना ३५,००० रुपये पगार मिळतो. “एक डोस घेतला की मी खूश असतो. माझी सगळी दुःखं कुठे तरी गायब होतात. आणि मग मला जास्त जास्त आस लागायला लागली. फक्त दोन डोस, आणि मला व्यसन लागलं.”

संपूर्ण काशमीरमध्ये एखादी साथ यावी तसं हेरॉइनचं व्यसन पसरलं आहे असं हरिसिंग रुग्णालयातल्या व्यसनमुक्ती केंद्रातले मनोविकार तज्ज्ञ सांगतात. “अनेक घटक जबाबदार आहेत – सध्याचा संघर्ष, बेरोजगारी आहे, कुटुंबाची वीण उसवत चाललीये, शहरीकरण आणि ताणतणाव - ही काही नेहमी आढळणारी कारणं आहेत,” इम्हॅन्समध्ये प्राध्यापक असणारे डॉ. अर्शद हुसैन सांगतात.

काहींच्या मते मात्र काश्मीरमध्ये गर्दचं प्रमाण २०१६ नंतर जास्त वाढलं आहे. “२०१६ मध्ये जेव्हा हिज्बुल मुजाहिदीनच्या नेता बुऱ्हान वानी [सैन्यदलाकडून ८ जुलै २०१६ रोजी] मारला गेला तेव्हापासून हेरॉइनच्या व्यसनात प्रचंड वाढ झाली आहे. २०१६ मध्ये आम्ही ४८९ रुग्ण तपासले. २०१७ मध्ये बाह्योपचार केंद्रात ३,६२२ रुग्णांनी उपचार घेतले आहेत आणि त्यातल्या ५० टक्के जणांना हेरॉइनचं व्यसन आहे,” व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. यासिर रादर सांगतात.

A growing number of families are bringing their relatives to the 30-bed Drug De-addiction Centre at the Shri Mahraja Hari Singh Hospital in Srinagar
PHOTO • Muzamil Bhat
A growing number of families are bringing their relatives to the 30-bed Drug De-addiction Centre at the Shri Mahraja Hari Singh Hospital in Srinagar
PHOTO • Muzamil Bhat

मोठ्या संख्येने लोक आपल्या जिवलगांना श्रीनगरच्या श्री महाराजा हरी सिंग रुग्णालयातल्या ३० खाटांच्या व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन येत आहेत

हा आकडा २०१८ साली ५,११३ पर्यंत जाऊन पोचला. आणि २०१९ मध्ये नोव्हेंबर पर्यंत व्यसनमुक्ती केंद्रात ४,४१४ रुग्ण आले होते आणि यातले ९० टक्के हेरॉइनचं व्यसन लागलेले होते असं डॉ. रादर सांगतात. पण या व्यसनाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय तर, “सहज उपलब्धता, सहज उपलब्धता, सहज उपलब्धता,” ते त्रिवार सांगतात.

व्यसनाची सुरुवात मजेसाठी म्हणूनच होत असते, डॉ. हुसैन सांगतात. “त्यातून जी धुंदी येते त्यामुळे तुम्ही डोसचं प्रमाण वाढवायला सुरुवात करता. आणि मग एक दिवस तुमच्या लक्षात येतं की तुम्ही गर्दवर पूर्णपणे अवलंबून आहात. आणि मग जास्ती मात्रेत गर्द घेतल्यामुळे तुमचा मृत्यू ओढवतो किंवा इतर समस्या निर्माण होतात.” केंद्रात मनोविकार तज्ज्ञ असणारे डॉ. सलीम युसुफ म्हणतात, “व्यसनी लोकांचे मूड झपाट्याने बदलत राहतात, त्यांना चिंता किंवा नैराश्य सतावतं आणि ते त्यांच्या खोलीतच असणं पसंद करतात.”

अझलनच्या पालकांना हे चांगलंच माहित आहे. सकिना बेगम सांगतात की अझलन खूप भांडायचा. एकदा तर त्याला दवाखान्यात नेऊन हाताला टाके घालावे लागले होते कारण त्याने स्वयंपाकघरातल्या खिडकीचं तावदानच फोडलं होतं. “हा सगळा त्या गर्दचा परिणाम होता,” त्या म्हणतात.

हेरॉइनचा विविध प्रकारे गैरवापर केला जातो – शिरेमध्ये टोचून, भुकटी हुंगून, किंवा सिगेरटद्वारे धूम्रपान करून. पण सगळ्यात जास्त नशा येते ती इंजेक्शनच्या वापरातून. प्रदीर्घ काळ हेरॉइनचा वापर केला तर मेंदूच्या कार्यात बदल होतात, डॉ. रादर सांगतात. आणि ही सवय खर्चिकही आहेच – एक ग्रॅम हेरॉइनसाठी ३,००० रुपये मोजावे लागतात आणि अनेक व्यसनी व्यक्तींना दिवसातून दोन ग्रॅम हेरॉइन घ्यायची सवय जडलेली असते.

आणि मग, जेव्हा कुलगम जिल्ह्यात टॅक्सीचालक असणारा तौसिफ रझा हेरॉइनवर दिवसाला ३,००० रुपये खर्च करायला लागला तेव्हा अर्थातच त्याची दिवसाची २,००० रुपयांची कमाई कमीच पडायला लागली. तो नशा न करणाऱ्या, त्याच्यावर विश्वास असणाऱ्या मित्रांकडून पैसे उसने घ्यायला लागला. आपल्याला शस्त्रक्रियेसाठी पैसे लागणार आहेत अशा थापा मारायला लागला. आणि अशा मार्गाने मिळवलेल्या १ लाख रुपयांच्या जोरावर तो हेरॉइन टोचून घ्यायला लागला.

Patients arriving at the De-Addiction Centre’s OPD are evaluated by psychiatrists and given a drug test. The more severe cases are admitted to the hospital for medication and counselling
PHOTO • Muzamil Bhat

व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना गर्दची तपासणी करायला सांगितली जाते. जास्त गंभीर असणाऱ्या रुग्णांना औषधोपचार आणि समुपदेशनासाठी रुग्णालयात दाखल करून घेतलं जातं

तौसिफचे मित्र गर्दची नशा करायचे, म्हणून तोही करू लागला. “आपणही घेऊन पाहूया असा मी विचार केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की मला व्यसन लागतंय. जर का एखाद्या दिवशी मला गर्द मिळालं नाही तर मी माझ्या बायकोला मारहाण करायचो.” तो सांगतो. “मी तीन वर्षं हेरॉइन घेत होतो आणि माझ्या तब्येतीचं मातेरं झालं होतं. मला मळमळायचं, स्नायू भयंकर दुखायचे. माझी बायको मला हरिसिंग रुग्णालयात घेऊन आली आणि आता माझ्यावर उपचार सुरू आहेत.”

व्यसनमुक्ती केंद्राच्या ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येते आणि त्यांना चाचण्या करायला सांगितल्या जातात. गंभीर रुग्णांना उपचार आणि समुपदेशनासाठी रुग्णालयात दाखल करून घेतलं जातं. “एक आठवड्यानंतर आम्ही लक्षणं पाहतो आणि जर आम्हाला असं आढळलं की रुग्ण उपचाराला प्रतिसाद देतोय तर आम्ही त्याला घरी पाठवतो,” श्रीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मनोविकार विभागातील डॉ. इक्रा शाह सांगतात.

गर्द घ्यायचं थांबवल्यावर जी लक्षणं जाणवतात त्यावर औषधोपचार केले जातात. “तुम्ही गर्दचा वापर थांबवला की तुम्हाला प्रचंड घाम येतो, मळमळ, निद्रानाश, स्नायूंमध्ये वेदना आणि अंग ठणकण्याचा त्रास व्हायला लागतो,” डॉ. युसूफ सांगतात. अनेक रुग्ण जे गर्दच्या वापरामुळे खूप उन्मत्त झालेले असतात, त्यांना इम्हॅन्समध्ये दाखल केलं जातं, डॉ. हुसैन सांगतात.

काश्मीरमध्ये मुलीदेखील गर्दच्या विळख्यात अडकलेल्या आहेत मात्र त्यांच्यावर श्रीनगरच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचार केले जात नाहीत. “हेरॉइन किंवा इतर प्रकारचं गर्द घेणाऱ्या मुलींच्या केसेसदेखील येतात, अर्थात त्यांची संख्या थोडी आहे. आमच्याकडे त्यांच्यासाठी सुविधा नसल्यामुळे, आम्ही ओपीडीत त्यांच्यावर उपचार करतो आणि पालकांना घरीच त्यांची काळजी घ्यायला सांगतो,” डॉ. युसूफ सांगतात. अशा प्रसंगी मुलांशी कसं वागायचं यावर डॉक्टर पालकांना सल्ला देतात, गर्दचं व्यसन म्हणजे काय ते समजावून सांगतात आणि आपलं मूल औषधं वेळच्या वेळी घेतंय आणि ते एकटं-एकाकी नाही याची खातरजमा करण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जातो.

डिसेंबर २०१९ पर्यंत श्रीनगरमधलं व्यसनमुक्ती केंद्र हे काश्मीरमधलं एकमेव केंद्र होतं. इम्हॅन्सशी संबंधित ६३ कर्मचारी, ज्यात २० मनोविकार तज्ज्ञ, सहा चिकित्सक (क्लिनिकल) मानसोपचार तज्ज्ञ, २१ निवासी डॉक्टर आणि चिकित्सक मानसोपचार विषयाचे १६ संशोधक विद्यार्थी असा सगळा ताफा काम करत आहे. सरकारने या वर्षी बारामुल्ला, कथुआ आणि अनंतनाग इथे तीन नवी व्यसनमुक्ती केंद्रं सुरू केली आहेत, डॉ. हुसैन सांगतात. जिल्हा रुग्णालयातले मनोविकार तज्ज्ञ तिथल्या ओपीडीमध्ये व्यसनाधीन रुग्णांना तपासायचं काम करत आहेत.

Left: A young boy in a village on the outskirts of Srinagar using heroin.
PHOTO • Muzamil Bhat
Right: In Budgam,  a young man ingesting heroin
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः श्रीनगरच्या सीमेवरच्या गावातला एक तरुण मुलगा हेरॉइनची नशा करतोय. उजवीकडेः एक युवक हेरॉइन घेतोय

काश्मीरमधले गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी सांगतात की २०१६ नंतर नियंत्रण रेषेपलिकडून चरस, ब्राउन शुगर आणि इतर प्रकारच्या गर्दचा पुरवठा वाढला आहे. (याबद्दल कुणी अधिकृतरित्या अथवा जास्त बोलू इच्छित नाही.) त्यामुळे गर्दचे साठे पकडण्यातही वाढ झाली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या २०१८ सालच्या गुन्हे नोंदणीनुसार त्या वर्षी २२ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलंय. हेरॉइन वगळता पोलिसांनी २४८.१५ किलो चरस आणि तब्बल २० किलो ब्राउन शुगरदेखील जप्त केली आहे.

पोलिसांकडून प्रसृत करण्यात येणाऱ्या बातम्यांनुसार गांजा आणि हेरॉइनचा मुख्य स्रोत असणारी अफूची हजारो एकर शेती काश्मीरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आली आहे आणि गर्दची विक्री करणाऱ्यांना अटकेत टाकण्यात आलंय. पण प्रत्यक्षात मात्र समस्या संपलेली नाही. पुलवामा जिल्ह्यातया रोहमूमधे मेकॅनिक म्हणून काम करणारा १७ वर्षीय मुनीब इस्माईल (नाव बदललं आहे) म्हणतो, “आमच्या इथे सिगारेट मिळावी तितक्या सहज हेरॉइन मिळतं. मला त्यासाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत.” व्यसनमुक्ती केंद्रातले इतर रुग्णही दुजोरा देतात. स्थानिक रहिवासी असणाऱ्या दलालांचा सगळा कारभार तोंडी चालतो. ते तरुण मुला-मुलींना आणि स्त्रियांना सगळ्यात आधी काही झुरके फुकट मारू देतात आणि मग एकदा का त्यांना व्यसन लागलं की ते गर्द विकायला सुरुवात करतात.

उदा. दक्षिण काश्मीरच्या एका भागात व्यसनात अडकलेले लोक सरळ दलालाच्या घरी जाऊनच नशा करतात, आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर व्यसनमुक्ती केंद्रातले एक मनोविकार तज्ज्ञ सांगतात. “त्यांनी मला सांगितलंय की अगदी पोलिसांना देखील त्याचं घर माहित आहे, पण ते काहीही करत नाहीत,” ते म्हणतात. अख्ख्या खोऱ्यात अशी किती तरी घरं आहेत. (शीर्षक छायाचित्रात असाच एक व्यक्ती बडगममध्ये एका घराच्या बाहेर काही झुरके मारून आल्यानंतर फिरताना दिसतोय)

पण, श्रीनगरचे पोलिस महासंचालक, हसीब मुघल मात्र गर्दचं व्यसन ही एक वैद्यकीय समस्या असल्याच्या आपल्या मतावर ठाम आहेत. “डॉक्टरांनी त्यावर इलाज करणं गरजेचं आहे. काश्मीरमध्ये गर्दच्या विळख्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणखी व्यसनमुक्ती केंद्रं सुरू व्हायला पाहिजेत,” मला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं.

Left: A well-known ground  in downtown Srinagar where addicts come for a smoke. Right: Another spot in Srinagar where many come to seek solace in drugs
PHOTO • Muzamil Bhat
 Another spot in Srinagar where many come to seek solace in drugs
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः श्रीनगरमधलं एक प्रसिद्ध मैदान, इथे लोक नशा करण्यासाठी येतात. उजवीकडेः श्रीनगरमधलंच आणखी एक ठिकाण जिथे अनेक जण गर्दच्या नशेत हरवून जातात

जून २०१९ मध्ये राज्य सरकारने पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरसाठी व्यसनमुक्तीच्या धोरणाला अंतिम स्वरुप दिलंय. त्या आधी त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. आता टप्प्या-टप्प्याने ते लागू करण्यात येत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित आजारपणांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची नोंद घेत या धोरणात नमूद केलं आहे की, “गेल्या काही वर्षांत केलेल्या अभ्यासांमधून असं दिसून येत आहे की अंमली पदार्थांच्या वापरामध्ये काही लक्षणीय बदल घडले आहेत. व्यसन करणाऱ्या मुली-स्त्रियांच्या संख्येत वाढ, लवकर वयात गर्दचा पहिला वापर, विद्रावकांचा आणि इंजेक्शनद्वारे गर्दचा वाढता वापर तसंच गर्दशी संबंधित मृत्यूंच्या संख्येत वाढ (अतिमात्रा किंवा अपघात) असे बदल आढळतात.”

अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्याच्या कार्यात १४ शासकीय संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचं हे धोरण सांगतं. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोलिस, गुन्हे अन्वेषण विभाग, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग, आरोग्यसेवा महासंचलनालय आणि एड्स नियंत्रण संस्था तसंच व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा उल्लेख करण्यात आला आहे.

या समस्येवर उपाय शोधण्यासाठी धार्मिक कार्य करणाऱ्या संस्था आणि शाळांचा सहभाग देखील घेण्यात आला आहे. जून २०१९ मध्ये श्रीनगरमध्ये स्वच्छतागृहात एका तरुणाचा गर्दमुळे मृत्यू झाल्याची शक्यता दिसल्यानंतर उपमहासंचालक शाहिद इक्बाल चौधरी यांनी मशिदींच्या मौलवींना “व्यसनांमुळे होत असलेल्या हानी विरोधात उच्चारवात बोलण्याचं” आवाहन केलं होतं. या घटनेनंतर झालेल्या एका प्रवचनात हुरियत नेते आणि श्रीनगरच्या जामा मशिदीचे मुख्य मौलवी, मीरवैझ उमर फारुक म्हणतात की मोठ्या संख्येने तरुणाई गर्दच्या विळख्यात सापडत आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. “हातात सहज पैसा, आणि अंमली पदार्थ सहज उपलब्ध होणं, पालकांची अनभिज्ञता आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांची ढिलाई या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे,” फारुक सांगतात. “आपण सगळे एकत्र येऊनच या सगळ्या पातळ्यांवर काम करू शकतो.”

पण सध्या तरी हा ‘त्रास’ सुरूच आहे आणि अझलनसारख्या, जो आजही घरात बंदिस्त आहे, अनेक युवकांची कुटुंबं त्यांना परत मार्गावर आणण्यासाठी जिवाचं रान करत आहेत. “अझलनला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं होतं तेव्हा मी त्याच्याबरोबर तिथे अनेक आठवडे मुक्काम केलाय,” बशीर सांगतात. “आणि आता देखील, मला काम सोडून घरी येऊन अझलन बरा आहे ना ते पहावं लागतं. माझं सगळं आर्थिक आणि शारीरिक बळ आता संपलंय. अझलनच्या व्यसनाने माझा कणाच मोडून गेलाय म्हणा ना.”

अनुवादः मेधा काळे

Shafaq Shah

شفق شاہ سرینگر میں مقیم ایک آزاد صحافی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Shafaq Shah
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے