कामगार आहे मी, कुणावर भार नाही!
फक्त एक कामगार आहे मी
सहाय्यक आहे मी, असहाय्य नाही
माणूसही आहे मी
तुमचे उंच उंच इमले
आमच्या झोपड्यांच्या कलेवरावर उभारलेले
आणि तुमच्या स्वप्नघरातल्या भिंतीचे रंग
आमच्याच घामात भिजवून रेखलेले...
मी ‘राष्ट्रवादी’ आहे...
या देशाच्या विकासात माझा वाटा आहे
गारेगार हवा देणारी मेट्रो
गाड्या सुळकन नेणारे हायवे
यांचं माझ्या घामाशी, रक्ताशी नातं आहे
मी ‘आत्मनिर्भर’ही आहे...
कोपर्यावरच्या ठेल्यावर भाजी
आणि फुटपाथवर मोमोज विकणारा
तुमचं घर आणि परिसर
राहावा चकचकीत म्हणून
गुदमरवणार्या गटारात उतरणारा
मी विकतो माझं जगणं
विकतो माझा घाम
जीवतोड मेहनत करतो
जगण्यासाठी-जगवण्यासाठी
मला, आम्हाला आणि तुम्हालाही
कारण मी गरीब आहे!
तुम्ही पाहिलेच असतील
माझ्यासारखे हजारो
मार खाताना
मोडताना
उद्ध्वस्त होताना
आणि मरतानाही...
तहान भुकेने व्याकूळ होऊन
रस्त्यावर सैरावैरा धावताना...
दोन घास पोटाला देणं सोडा,
तुम्ही आमच्या पोटात लाथ घातलीत
आणि पाहिलात माझ्यातला ‘मी’ मोडताना!
खरं तर तुम्ही उदार आहात...
तुम्ही आम्हाला घरी जाऊ दिलंत
तुम्ही खूपच दयाळू आहात...
तुम्ही आम्हाला मरूही दिलंत!
काय बोलू तुमच्याबद्दल?
आम्ही म्हटलं, आम्ही जातो...
तर तुम्ही बस बंद केल्यात
आम्ही रेल्वे ट्रॅक पकडला...
तर आमच्या अंगावर रेल्वे घातल्यात
का असं केलंत?
मी गरीब आहे, म्हणून असेल कदाचित
मला ठाऊक आहे,
तळपत्या उन्हात हजारोंच्या संख्येने
डोक्यावर सामानसुमान आणि हाताशी कच्चीबच्ची घेतलेल्या
आम्हाला चालताना बघून
तुम्हाला दया आली असेल
तुम्हाला वाईट वाटलं असेल
डोळेही भरून आले असतील तुमचे
उद्याच्या चिंतेने
पण काही काळजी करू नका
मी कामगार आहे
निराधार नाही
गरीब आहे,
पण माणूसच आहे.
विश्वास ठेवा,
सगळं सुरू झालं की
मी परतणार आहे.
आलो नाही, तर तुमचा विकास कसा होईल?
शहरं कशी वाढतील?
देश बुलेट ट्रेनच्या वेगाने कसा पळेल?
अर्थात, मी येणार आहे.
मी रस्ते बांधेन
मी पूल उभे करीन
उंचउंच इमारती उ भारीन
माझ्या याच हातांनी मी
देश प्रगतीपथावर नेईन.
मी कामगार होतो
मी कामगार आहे
आणि कामगारच राहाणार आहे.
वाचनस्वरः सुधन्वा देशपांडे ‘जन नाट्य मंच’मधले अभिनेते, दिग्दर्शक आहेत. ‘लेफ्टवर्ड बुक्स’चे ते संपादक आहेत.
अनुवादः वैशाली रोडे