जोबन लाल कांदबारी गावात डागडुजीची गरज असलेल्या एका कुह्लीच्या कडेने चालत लोकांना हाक मारताहेत. ते लोकांना मदत करायला बोलवत आहेत. "आपले फावडे अन् कुदळी घेऊन मला पोस्ट ऑफिसच्या मागे भेटा," ते म्हणतात. ती एक उबदार सकाळ आहे. पण त्यांना २० कामगार गोळा करणंही अवघड आहे. "३० वर्षांपूर्वी, खासकरून रब्बी अन् खरिपाचा हंगाम आला की कोहलींनी सांगावा धाडला की  ६०-८० लोकांचा ताफा एकत्र येऊन काम करायचा," ते आठवून सांगतात. कुह्ल साधारण दोन मीटर रुंद आणि दोन मीटर खोल असते, आणि ती १०० मीटर ते एखाद किमी लांब असू शकते.

५५ वर्षीय जोबन लाल कांग्रा जिल्ह्यातील पालमपूर तहसिलातल्या कांदबारी (जनगणनेत या गावाची नोंद कामलेहर म्हणून करण्यात आलीये) या सुमारे ४०० लोकांची वस्ती असलेल्या गावचे कोहली आहेत. त्यांनी स्वतः आपल्या वडलांकडून हे काम शिकून घेतलं, मात्र त्यांचे आजोबा कोहली नव्हते. "कोणी तरी हे काम सोडायचं ठरवलं, हे काही इज्जतीचं काम उरलं नाही," ते म्हणतात. "अन् माझ्या वडलांची निवड गावकऱ्यांनीच केली असेल."

परंपरेने कुह्ल गावातील कोहलीच्या अखत्यारीत येत असे, कारण त्याला स्थानिक पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थापनाचं फार ज्ञान असायचं. तो कुह्ल देवीची (एक देवी, मात्र परंपरेने कोहली नेहमी पुरुषच असतो) पूजाअर्चा करी. पूर्वी, हिमाचल प्रदेशातील बऱ्याच लोकांची समजूत होती की देवी त्यांच्या कालव्यांचा सांभाळ करते. दुष्काळात देखील कालव्यांची चांगली निगा राखली, तर देवी प्रसन्न होऊन कालव्यांना पाणी द्यायची. पूर येऊ नये म्हणून कोहली एका सुफी संताची (गावकऱ्यांना त्यांचं नाव आठवत नाही) प्रार्थना करायचा, ज्यातून कदाचित कांग्रा दरीतील एकात्मतेचं दर्शन होतं.

The serpentine mud kuhls of Himachal are now being cemented.
PHOTO • Aditi Pinto
Joban Lal sitting outside his house.
PHOTO • Aditi Pinto

डावीकडे : हिमाचल मधील नागमोडी वळणाच्या कुह्ली आता सिमेंटने भरून काढल्या जात आहेत . उजवीकडे : जोबन लाल कांदबारी गावचे कोहली , अर्थात परंपरेने कुह्लीचे अधिकारी आहेत

डोंगरदऱ्यांच्या या प्रदेशात हिमनद्यांचं वाहतं पाणी मानवनिर्मित सिंचन कालव्यांच्या एका दाट जाळ्यातून आसपासच्या गावा आणि शेतांकडे वळवण्यात येतं. या कालव्यांना पहाडी बोलीत कुह्ल  म्हणतात. येथील गावांचं विहंगम दृश्य पाहिलं तर सर्वत्र पायऱ्यांची शेती आणि नागमोडी वळणाच्या कुह्लींचं जाळं दिसून येतं.

शेतीव्यतिरिक्त इतरही बरीच कामं कुह्लींवर अवलंबून आहेत. हिमाचल मधील बऱ्याच गावांमध्ये कुह्लीच्या कडेला एका लहानशा झोपडीत पाण्यावर चालणारी चक्की बसवली असते. वाहत्या पाण्याची ऊर्जा वापरून एका चाकाच्या मदतीने वर बसवलेलं जातं फिरवण्यात येतं. "घरी दळलेल्या पिठाची चव गोड लागते, विजेच्या चक्कीवर दळलेल्या पिठासारखी जळकी नाही," गावकरी म्हणतात. कांदबारीतील ४५ वर्षीय घराती, अर्थात चक्की चालवणारे ओम प्रकाश याला दुजोरा देतात.

पूर्वी कांग्रामधील तेलाच्या घाणीसुद्धा वाहत्या पाण्याच्या जोरावर चालत असत. आता फक्त काही पिठाच्या चक्क्या शिल्लक उरल्यात. ओम प्रकाश हे कांदबारीतल्या हयात असलेल्या तीन घरातींपैकी एक आहेत. उंचावरच्या गावांमध्ये याहून जास्त घराती आहेत, ते सांगतात, पण हे काम करण्यात फारच थोड्या लोकांना रस आहे. "आज काल लोक शेतीशिवायची कामं करणं किंवा अशी कामं ज्यात फार श्रम घ्यावे लागत नाहीत ती करणं पसंत करतात."

ओम प्रकाश गेली २३ वर्षं घराती म्हणून काम करत आहेत. त्यांनी आपल्या वडलांचा वारसा पुढे नेला आणि आपल्या धाकट्या भावांकडून हा व्यवसाय शिकून घेतला. ते आपला बहुतेक वेळ घरातीत घालवतात, अंदाजे ६० कुटुंबांना सेवा पुरवतात. खासकरून हे लोक कापणीनंतरच्या महिन्यात मका, गहू आणि तांदूळ दळण्यासाठी येतात. यांतील बरेच लोक बदल्यात आपल्या धान्याचा साजेसा हिस्सा घरातीला देतात, काही थोडे पैसे देतात.

Om Prakash working at the mill
PHOTO • Aditi Pinto
Om Prakash standing outside the mill
PHOTO • Aditi Pinto

ओम प्रकाश हे कांदबारीतील घराती , अर्थात चक्की चालवणारे आहेत : "... कुह्ल कायम अशी खोदावी लागते जेणेकरून पाणी मुबलक प्रमाणात घरातीकडे वाहत राहील ."

घरात चालवणं हे चिकाटीचं काम आहे, आणि चक्की रिकामी असताना फिरणार नाही याची ओम प्रकाश यांना खात्री करून घ्यावी लागते. "जर ती रिकामी असताना फिरली तर जात्याची झीज होऊ शकते. दर पाच ते सहा वर्षांनी आम्हाला [जातं घरातीच्या घरी बनवतात] जातं बदलावं लागतं. आणि कुह्ल कायम अशी खोदावी लागते जेणेकरून  पाणी मुबलक प्रमाणात घरातीकडे वाहत राहील."

मात्र आज काल दुकानांमध्ये तयार पीठ मिळायला लागल्याने आता मोजकेच लोक धान्य दळायला  येतील, ओम प्रकाश काळजीच्या स्वरात म्हणतात. "आणि मी पाहतोय लोकं सर्रास प्लास्टिकचा कचरा कुह्लीत टाकतायत. आम्ही आमच्या कुह्लीची काळजी घेतली नाही, तर पुढच्या पिढीला त्या पाहायला पण मिळणार नाहीत..."

इंग्रजांनी कुह्लीच्या कार्यपद्धतीची नोंद घेऊन, नकाशे आणि आकृत्या काढून, तिच्याबद्दल एक ७००-पानी ग्रंथ लिहिला. त्याचं फारसी भाषेत नाव रिवाज इ अबपाशी (सिंचनाच्या प्रथा). हा प्रथम १८७४ मध्ये  लिहिण्यात आला होता, आणि त्यात १९१५ मध्ये सुधारणा करण्यात आली. एका समृद्ध आणि पुरातन मौखिक ज्ञानाऐवजी या ग्रंथात कुह्लीचं व्यवस्थापन निव्वळ एक वैज्ञानिक लेखाजोखा म्हणून आढळून येतं. अर्थात, कालवे तयार करण्यासाठी जे प्रचंड प्रमाणात काम व्हायचं, त्याची माहिती देखील या ग्रंथामुळे जतन केली गेली.

पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत, साधारणपणे १९७० च्या दशकापर्यंत, कुह्ल सामुदायिकरित्या चालवण्यात यायच्या. सिंचन पद्धतींची काळजी घेणाऱ्यांकडून पारंपरिकरित्या हे काम त्यांच्याच कुटुंबात पुढे सोपवण्यात यायचं. १९९० पासून अधिकतर पुरुष बिगर-शेती व्यवसायांच्या शोधात गाव सोडू लागले आणि कुह्लीवर जास्त प्रमाणात महिला काम करू लागल्या - याचं एक कारण म्हणजे मनरेगा, (राष्ट्रीय रोजगार हमी कायदा २००५ अन्वये) ज्यात अशा कामांसाठी रोजगार मिळू लागला. आणि कालांतराने, शासनाने आपला डोकं चालवलं आणि कुह्लींमध्ये सिमेंट भरायला सुरुवात केली.

Indira Devi sitting outside her house
PHOTO • Aditi Pinto
The different parts and wheels of the gharaat
PHOTO • Aditi Pinto
he different parts and wheels of the gharaat
PHOTO • Aditi Pinto

डावीकडे : इंदिरा देवी यांनाही इतर गावकऱ्यांप्रमाणे वाटतं की , कुह्लीचं सिमेंटीकरण करणं चांगलं नाहीये . उजवीकडे : घरातीचे चाक आणि इतर भाग .

"मातीच्या कुह्ली बऱ्या होत्या, त्यांची वाट वळवणं सोपं जायचं. सिमेंटच्या कुह्ली पाहून त्या कायम तशाच राहतील, असं वाटतंय. पण, सर्वांना ठाऊक आहे की काही वर्षांनी सिमेंट देखील वाहून जाईल," इंदिरा देवी, ४५, म्हणतात. त्या पालमपूर तहसिलातल्या ३५० लोकसंख्येच्या सपेरू गावात राहतात. त्या मनरेगावर काम करतात आणि गावातल्या इतर लोकांप्रमाणेच त्यांनाही ठाऊक आहे की कुह्लीचं सिमेंटीकरण चांगलं नाही. पण, त्या म्हणतात, "आम्हाला हे काम करायची रोजी मिळते, आणि म्हणून आम्ही असल्या कामात भाग घेतो..."

आता बऱ्याच गावांमध्ये एकट्या कोहलीऐवजी एक निवडून दिलेली, स्वायत्त कुह्ल कमेटी असते. पण, इतर गावांमध्ये सिंचन व स्वास्थ्य विभागाचं कालव्यांवर नियंत्रण असतं.

हिमाचल प्रदेश राज्य जल नीती २०१३ अन्वये "हळू हळू पूरसिंचन किंवा खुल्या कालवे सिंचन पद्धतींपासून दूर जाऊन सूक्ष्म सिंचन आणि बंद वाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा" करण्याचं लक्ष्य आहे. या धोरणामध्ये प्रत्येक घराला मीटरनुसार पेयजल पुरवठा, आणि शक्य तेवढ्या सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे ए.टी.एम. उभारण्याची तरतूद आहे.

या शासन-निर्णित योजनांमुळे कुह्ल पद्धतीचं सामुदायिक व्यवस्थापन कोलमडून पडेल काय? आणि हिमाचलमध्ये ऐकू येणारा वाहत्या पाण्याचा खळखळाट एका प्लास्टिक नलिकेत गुदमरून जाईल का? जोबन लाल आशावादी आहेत: "हिमाचल मधील कुह्लीत भरपूर प्रमाणात पाणी वाहत असतं, आणि तोवर एका कोहलीची भूमिका कायम महत्त्वाची राहील."

अनुवादः कौशल काळू

Aditi Pinto

آدیتی پِنٹو ہماچل پردیش میں رہتی ہیں، اور مترجم، مضمون نگار، محقق اور چھوٹے کسانوں و دیہی خواتین کے نیٹ ورک میں شریک کار کے طور پر کام کرتی ہیں۔ انھوں نے ماحولیات، زراعت اور سماجی امور پر مضامین لکھے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Aditi Pinto
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

کے ذریعہ دیگر اسٹوریز کوشل کالو