“हा पत्रा फार उपयोगी आहे. आजही आमचा पाडा अंधारात आहे. आणि म्हणूनच मी आज या मोर्चात सामील झाले आहे. कमीत कमी आम्हांला वीज तर द्या आता,” मंगल घाडगे, वय ४७, स्वतःच्या डोक्यावर सौर उर्जेचा छोटा पत्रा सांभाळत बोलत होत्या. त्या नाशिकमध्ये २०-२१ फेब्रुवारीला निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्च्यामध्ये सामील झाल्या होत्या. “सूर्यप्रकाश या पत्र्यावर पडतो आणि उर्जा गोळा होते. आम्ही तिचा उपयोग संध्याकाळी आमचा मोबाईल फोन किंवा आमची विजेरी चार्ज करण्यासाठी करतो. त्यामुळे आमची जरा तरी सोय होते.”

मंगलप्रमाणे (शीर्षक छायाचित्र) त्यांचे अनेक शेजारी हा सौर पत्रा वापरतात. नाशिक जिल्हयातील दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावापासून जवळजवळ अर्धा किलोमीटर दूर, अशी ही ४० घरांची वस्ती आहे. इथले सर्व रहिवासी महादेव कोळी या अनुसूचित जमातीतील आहेत. त्यांच्यातील अनेक जण वनजमिनीवर भात, नागली, आणि तुरीची शेती करतात. २०१८ मध्ये अतिशय कमी पाउस झाल्याने त्यांचं पीक एकतर जळून गेलं किंवा उतारा खूप कमी पडला.

मंगलताईंनी ही सौर उर्जेची प्लेट एक वर्षापूर्वी घेतली. “माझ्या पाड्यावरील कोणीतरी हा पत्रा विकत घेतला, तेव्हा त्याला मी माझ्यासाठी पण एक आणायला सांगितला. मग अनेकांनी हा खरेदी करायला सुरुवात केली. याची किंमत २५० रु.आहे, म्हणजे आमच्या सारख्यांचा एका दिवसाचा रोज,” त्या म्हणाल्या.

A man smiling during the march .
PHOTO • Jyoti
Two men during the march
PHOTO • Jyoti

(डावी कडे) जानू टोकरे (उजवी कडे) पवन सोनू . “आमची मुले अंधारात कसं शिकतील?”

मंगलताईंच्या घरी रिचार्ज होणारा दिवा आहे, त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा त्याच्या उजेडात अभ्यास करतो. “या पत्र्यामुळे निदान तो अभ्यास तर करू शकतोय. अंधारात तेवढाच एक आशेचा किरण,” त्या हसून म्हणतात.

शेतकऱ्यांच्या त्या मोर्चामध्ये अनेकांनी तो सौर पत्रा आपल्यासोबत घेतला होता. काहींनी तो डोक्यावर ठेवला होता, तर काहींनी हातात धरला होता. यातलेच पवन सोनू, वय २८, जानु  टोकरे, वय ३०, हे १०८ उंबरा असणाऱ्या ( जनगणना २०११ ) पायर पाड्यातून आले होते. ते देखील पाण्याची कमतरता आणि पिकं वाय गेल्याबद्दल बोलत होते.

“आमच्या १२ झोपड्या गावाच्या बाहेर आहेत. गावात वीज आहे, पण आमच्या वस्तीवर नाही. अंधारात आमची मुलं कसा अभ्यास करणार?” पवनने विचारले. “आम्हांला रेशनवर महिन्याला दोन लिटर रॉकेल मिळते. त्यातलं किती आम्ही स्वयंपाकासाठी वापरायचं आणि किती दिव्यासाठी? सरकार आम्हांला जमिनींचे पट्टेही देत नाही आणि मूलभूत सुविधासुद्धा पुरवत नाही. आमच्यावर तुटपुंज्या कमाईचा हिस्सा खर्च करून अशा वस्तू (सौर पत्रा) विकत घ्यायची आणि आमची आम्ही व्यवस्था पहायची वेळ का यावी?

अनुवादः अश्विनी बर्वे

Jyoti

جیوتی پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی ایک رپورٹر ہیں؛ وہ پہلے ’می مراٹھی‘ اور ’مہاراشٹر۱‘ جیسے نیوز چینلوں کے ساتھ کام کر چکی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Jyoti
Translator : Ashwini Barve