फक्त एका रात्रीत ताईबाई घुलेंचं एक लाखाचं नुकसान झालं.
४२ वर्षीय ताईबाई आणि त्यांची मेंढरं आपल्या गावाहून नऊ किलोमीटर अंतरावर, भाळवणीच्या शिवारात होती. आणि अचानक तुफान पाऊस सुरू झाला. “संध्याकाळी पाच पासून पाऊस सुरु झाला. बारा नंतर पाऊस वाढला,” धनगर समाजाच्या ताईबाई सांगतात. रान नुकतंच नांगरलेलं होतं. शेतात चिखल झाला. मेंढ्यांचे पाय चिखलात रोवले गेले. रानातनंच बाहेरच पडता येईना. मेंढपाळांनी तशाही स्थितीत मेंढरांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला.
“अख्खा पाऊसच आम्ही अंगावर काढला. मेंढरांसोबत चिखलात बसलो,” त्या सांगतात. घटना डिसेंबर २०२१ ची. अहमदनगर जिल्ह्यातल्या भाळवणीच्या शिवारात पाऊस वेड्यासारखा बरसला.
“आम्ही जोराचा पाऊस पाहिलाय हो, पण असली नुसकानी कधी व्हायची नाही. पहिल्यांदाच घडलं हे असलं,” ताईबाई सांगतात. ढवळपुरीच्या ताईबाईंच्या आठ मेंढ्या आणि एक बकरी दगावली. “मेंढ्या वाचवायच्या एवढंच आम्हाला समजत होतं.”
१ आणि २ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी पाहिली तर सातारा जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यात सर्वात जास्त, जवळपास १०० मिमी पाऊस झाल्याचं आपल्याला दिसतं.
“या पावसात काही सुचलेच नाही. थंडीमुळे नंतरही काही मेंढरे दगावली,” ढवळपुरीचे गंगाराम सयाजी ढेबे सांगतात. “ताकदच गेली त्यांची.”
ताईबाईच्या शेजारीच ढेबे यांचा वाडा आहे. तेदेखील ढवळपुरीपासून १३ किलोमीटरवर भांडगावच्या शिवारात होते. ढेबे यांच्याकडे दोनशे मेंढरे आहेत. त्यांची १३ मेंढरे दगावली – सात मोठी मेंढरं, पाच बारकी कोकरं आणि एक शेळी. ढेबेंनी औषध इंजेक्शन देवून मेंढरे जगवण्याचा प्रयत्न केला. ५,००० रुपये खर्च आला. पण काही उपयोग झाला नाही.
ताईबाई आणि गंगाराम ढेबे धनगर आहेत. महाराष्ट्रात त्यांची नोंद भटक्या जमाती (क) या प्रवर्गात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात धनगरांची मोठी वस्ती आहे आणि याच जिल्ह्यात मेंढरांची संख्याही भरपूर मोठी आहे.
उन्हाळ्यात पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवू लागली की ताईबाईंसारखे पशुपालक कोकणात पार डहाणू, पालघरपर्यंत जातात. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असते व ते मेंढरं सहन करु शकत नाहीत. त्यामुळे त्या काळापुरते मेंढरं घेवून ते ढवळपुरीला परततात.
“एवढा पाऊस कसा झाला काही समजत नाही,” ताईबाई सांगतात. “मेघराजा आहे तो.”
तो प्रसंग सांगताना ताईबाईंचा उर भरुन आला होता. “आता आमची वस्तू गेली, म्हणजे भारीच वस्तू गेली. आमची दुसरीकडे सुविधा झाली तर हा व्यवसाय करणार नाही. फार तरास आहे आम्हाला.”
तुकाराम कोकरे यांच्या वाड्यात नव्वद मेंढरं आहेत. त्यातल्या नऊ मोठ्या मेंढ्या आणि चार बारकी कोकरं पावसात दगावली. “मोठी नुसकानी झाली.” ते सांगतात की एक मेंढी घ्यायची तर १२,००० ते १३,००० रुपये लागतात. “आमची नऊ जनावरं गेली. किती नुसकान झालं, तुमीच बघा,” चाळिशीचे तुकाराभाऊ म्हणतात.
पंचनामा केला का? “कसा करणार?” तुकाराम अगदी अजीजीने म्हणतात. “अचानक पाऊस आला. आडोसा नाही. आजूबाजूला कुणी मदतीला नाही. मेंढे वावरात बसली. चिखलात खचली. आम्ही पिलांना कागदात झाकले. पण मोठी बकरी गारठली होती. त्यांना शेकत बसलो. आमची पोरं लहान होती. या पोरांना काय मेंढरं आवरली नसती म्हणून आम्ही वाचलेल्या मेंढरांची, त्यांची काळजी घेत बसलो. त्यामुळे तक्रार करायला, पंचनामा करण्याची मागणी करायला वेळच मिळाली नाही.”
त्यांच्या अंदाजानुसार एकट्या भाळवणीत ३०० मेंढरं दगावली असतील. देशभरातल्या मेंढरांच्या संख्येत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर असून २७ लाख मेंढ्या असल्याची गणना आहे.
सातारा जिल्ह्याच्या माण, खटाव आणि दहिवडी भागात मेंढपाळांचं झालेलं नुकसान आणि सरकारची अनास्था याबद्दल फलटणचे पहिलवान शंभुराजे शेंडगे पाटील सांगतात, “जर एखाद्या कार्यालयात सुटाबुटातला माणूस गेला की तो साहेब म्हणतो, तासाभरात तुमचे काम होईल. पण मळक्या पोषाखातला आमचा धनगर माणूस गेला तर तो दोन दिवसांनी या असे सांगतो.”
“मेलेल्या मेंढ्यांचे फोटो काढणे पण जमले नाही. आमच्याकडे मोबाईल आहे पण चार्जिंगची सोय नाही. गाव किंवा वस्ती लागली तरच फोन चार्ज करता येतात,” ताईबाई सांगतात.
सध्या ताईबाई आणि त्यांची मेंढरं माळावर आहेत. दोऱ्या बांधून आडोसा तयार केलाय. जनावरं निवांत चरतायत. “यांच्या चारणीसाठी आम्हाला रानोमाळ फिरावं लागतं,” त्यांच्या कळपाकडे बोट दाखवत ताईबाई सांगतात.
ढेबे दर वर्षी आपली मेंढरे घेवून पाबळ, कन्हेरसर मार्गे देहूच्या माळाकडे जातात. त्यांचा स्थलांतराचा हा मार्ग १५ दिवसाचा आहे. मेंढपाळांचे एकच ध्येय असते की आपल्या मेंढरांना चारा कसा मिळेल. “आम्हाला काही आडोसा नाही. कोणाच्या बांधाला गेलो तर कोणी हाणतं, मारतं. मेंढ्यासाठी कोणाचाही मार खायचा,” ढेबे म्हणतात. मेंढपाळ हे स्थानिक रहीवासी नसल्याने त्यांच्या फिरस्तेपणाचा गैरफायदा घेत गावगुंड त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी “स्थानिक शेतकरी हाच आमचा आधार असतो,” ते म्हणतात.
“खरं तर मेंढपाळ हे तसे काटक आहेत. अचानक आलेल्या संकटाला ते तोंड देतात. पण १ आणि २ डिसेंबर [२०२१] ला आलेल्या पावसाने मात्र ते उद्ध्वस्त झालेत कारण त्यांची खूप मेंढरं यात दगावली आहेत,” पशुवैद्यक असणाऱ्या डॉ. नित्या घोटगे सांगतात.
त्या म्हणतात की अचानक आलेल्या संकटात एकाच वेळी किती तरी गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. “लहान लेकरं, सोबतचं सामान, किराणा, जळण, मोबाइल फोन आणि जनावरं, त्यातही पिलं किंवा बारकी जनावरं,” सगळंच धोक्यात येतं असं डॉ. नित्या म्हणतात. त्या अंतरा या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष असून ही संस्था गेली अनेक वर्षं पशुपालक आणि शेतकरी समुदायांबरोबर काम करत आहे.
वातावरणातले असे अचानक होणारे बदल, रोग, लसी आणि वेळेवर पशुवैद्यकीय मदत याबाबत पशुपालकांना माहिती मिळणं गरजेचं आहे. शिवाय पंचनामा दाखल करण्यासाठी मदत कळीचा मुद्दा आहे. “आम्हाला आशा आहे की वातावरण बदल आणि पशुधनासंबंधी धोरण तयार करत असताना सरकार या गोष्टी लक्षात घेईल,” डॉ. नित्या सांगतात.
तुकाराम कोकरे यांची सूचना आहे की ढवळपुरीमध्ये त्यांच्यासारख्या धनगरांसाठी एखादा आडोसा बांधला तर जनावरं सुरक्षित राहू शकतील. “मेंढरं कोरडी आणि सुरक्षित रहावीत असा निवारा बांधायला पाहिजे. आत गारठू नयेत,” कोकरे आपल्या अनुभवातून शिफारस करतात.
असा निवारा, धोरण प्रत्यक्षात येईपर्यंत ताईबाई, गंगाराम भाऊ आणि तुकाराम भाऊ आपले कळप घेऊन चारा, पाणी आणि निवाऱ्याच्या शोधात रानोमाळ भटकत राहणार. सरकारची किंवा पावसाची कृपा होईल अशी वाट पाहण्यापेक्षा आपल्या रस्त्याने पुढे जात रहावं यातच शहाणपण आहे असं वाटल्यास नवल ते काय?