जीवनभाई बारिया यांना गेल्या चार वर्षांत दोनदा हृदयविकाराचे झटके येऊन गेले. पहिला झटका २०१८ मध्ये आला. तेव्हा ते घरीच होते. त्यांच्या पत्नी गाभीबेन त्यांना दवाखान्यात घेऊन गेल्या. एप्रिल, २०२२ मध्ये अरबी समुद्रात आपली ट्रॉलर चालवत असताना त्यांना छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांच्या एका साथीदाराने ट्रॉलर सांभाळली आणि दुसऱ्याने भीत-भीत त्यांना आडवं झोपवलं. ते किनाऱ्यापासून साधारण पाच तासाच्या अंतरावर होते. दोन दिवस जीवनाशी झुंज देत जीवनभाई अखेर मरण पावले.
गाभीबेन यांची भीती खरी ठरली.
पहिल्या धक्क्यानंतर जीवनभाई यांनी एका वर्षाने काम पुन्हा सुरू करायचं ठरवलं तेव्हा गाभीबेन फार उत्सुक नव्हत्या. त्यांना यातली जोखीम ठाऊक होती. आणि जीवनभाईंनाही. "मी त्यांना म्हटलं की नका जाऊ कामावर.." गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात जाफराबाद या लहानशा शहरात आपल्या झोपडीत मंद प्रकाशात बसलेल्या गाभीबेन सांगतात.
पण शहरातील इतर बहुतांश लोकांप्रमाणे ६० वर्षीय जीवनभाई यांना मासेमारी सोडून इतर कुठलं कामच माहित नव्हतं. या कामातून त्यांना वर्षाला रू. २ लाख कमाई व्हायची. "ते गेली ४० वर्षं या धंद्यात होते," गाभीबेन, वय ५५, सांगतात. "हृदयविकाराच्या झटक्यानंतर ते वर्षभर घरीच आराम करत होते. तेव्हा मी काम [इतर कोळ्यांनी आणलेले मासे खारवणे इत्यादी] करून कसंबसं घर चालवलं. त्यांना बरं वाटायला लागल्यावर ते पुन्हा कामावर जाऊ लागले."
जीवनभाई जाफराबादमधील एका मोठ्या मच्छीमाराच्या मालकीच्या ट्रॉलरवर काम करायचे. पावसाळा वगळता वर्षाचे आठ महिने त्यांच्यासारखे मच्छीमार या ट्रॉलर घेऊन १०-१५ दिवस अरबी समुद्रात जातात. दोन आठवडे पुरेल एवढं अन्नपाणी सोबत नेतात.
"अडचणीच्या वेळी काहीच सोय नसताना इतके दिवस एवढ्या लांब समुद्रात जाणं कधीच सुरक्षित नसतं," गाभीबेन म्हणतात. "फक्त मलमपट्टी करण्याचा डबा सोबत असतो. हृदयविकाराच्या रुग्णासाठी तर ते आणखी धोकादायक आहे."
गुजरात भारतातील सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेल्या राज्यांपैकी एक आहे. तब्बल १,६०० किमी लांब असलेली ही किनारपट्टी ३९ तालुके व १३ जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे. देशाच्या एकूण मत्स्य उत्पादनापैकी २० टक्के वाटा गुजरातचा आहे. मासेमारी आयुक्तालयाच्या संकेतस्थळानुसार राज्यातील सुमारे १,००० गावांमधील एकूण पाच लाख लोक मासेमारी क्षेत्रात कार्यरत आहे.
वर्षाचे चारेक महिने समुद्रात असणारे हे लोक वैद्यकीय सुविधांपासून पूर्णतः वंचित राहतात.
पहिल्या झटक्यानंतर जीवनभाई समुद्रात जायला निघाले की दरवेळी गाभीबेन यांच्या जीवाची घालमेल व्हायची. आशा, निराशा व भीती अशी आंदोलनं मनात सुरू असायची. त्या एकट्याच वरच्या पंख्याकडे टक लावून रात्र जागून काढायच्या. जीवनभाई घरी सुखरूप परतले की त्या सुटकेचा निःश्वास टाकायच्या.
पण एक दिवस ते परतलेच नाहीत.
*****
गुजरात शासनाने जर पाच वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाला दिलेला शब्द पाळला असता तर कदाचित जीवनभाईंवर ही वेळ आली नसती.
एप्रिल २०१७ मध्ये जाफराबादच्या किनाऱ्याला लागून असलेल्या शियाल बेट या बेटावरचे रहिवासी जंदुरभाई बालधिया, वय ७०, यांनी बोट अँब्युलन्ससाठीच्या मागणीसंदर्भात गुजरात उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या खटल्यात त्यांना अरविंदभाई खुमन, वय ४३, यांनी मदत केली होती. ते अहमदाबाद-स्थित सेंटर फॉर सोशल जस्टिस या वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेशी संबंधित एक वकील-कार्यकर्ते आहेत.
या याचिकेनुसार गुजरात राज्य मच्छीमार समाजाच्या "मूलभूत आणि संवैधानिक हक्कांचं उल्लंघन करतंय" आणि संविधानाच्या कलम २१ मध्ये देण्यात आलेल्या जीवनाच्या हक्कांचं उल्लमघन आहे. त्यांनी आपल्या याचिकेत वर्क इन फिशिंग कन्व्हेंशन, २००७ मध्ये नमूद केलेल्या "कार्यक्षेत्रातील सुरक्षा, स्वास्थ्य संरक्षण आणि वैद्यकीय सेवा यांच्याशी निगडित किमान तरतुदीं"चा दाखला दिला होता.
ऑगस्ट २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने राज्याकडून काही आश्वासनं मिळाल्यावर ही याचिका निकाली काढली. मनीषा लवकुमार यांनी राज्याच्या वतीने कोर्टात प्रतिपादन केलं की राज्याला "किनारी भागांत राहणाऱ्या व मच्छीमार लोकांच्या हक्कांची चांगली जाणीव आहे.”
महत्त्वाचं म्हणजे कोर्टाने आदेशात म्हटलं होतं की राज्याने १,६०० किमी लांबीच्या किनाऱ्यालगत "कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज" अशा सात बोट अँब्युलन्स विकत घेण्याचं आश्वासन दिलंय.
मात्र पाच वर्षं उलटली तरी मच्छीमार समाजाला अचानक काही आजारपण आलं तर समस्यांना सामोरं जावं लागतंय. पण सात पैकी केवळ दोन बोट अँब्युलन्स, एक ओखा आणि एक पोरबंदर येथे, सुरू आहेत.
"अजूनही बराचसे किनारी प्रदेश जोखमीचे आहेत," अरविंदभाई म्हणतात. ते जाफराबादपासून २० किमी उत्तरेला असलेल्या रजुला या छोट्या शहरात राहतात. "या वॉटर अँब्युलन्स म्हणजे स्पीड बोट आहेत ज्या ट्रॉलरएवढं अंतर अर्ध्या वेळात पार करू शकतात. आजकाल मच्छीमार किनाऱ्याजवळ मासे पकडत नसल्यामुळे अशा अँब्युलन्सची गरज वाढलीय."
जीवनभाई यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते किनाऱ्यापासून ४० सागरी मैल अर्थात ७५ किलोमीटर लांब होते. वीसेक वर्षांपूर्वी मच्छीमार क्वचितच इतक्या लांब जाऊन मासेमारी करत.
"अगोदर पाच ते आठ मैलांच्या आत त्यांना भरपूर मासे मिळायचे," गाभीबेन म्हणाल्या. "ते किनाऱ्यापासून एखाद दोन तास लांब असायचे. गेल्या काही वर्षांत आमची परिस्थिती बिकट होत गेली. आजकाल तर किनाऱ्यापासून १० ते १२ तास लांब जावं लागतं."
*****
मच्छीमार समुद्रात आतपर्यंत जाण्यामागे दोन कारणं आहेत: वाढतं किनारी प्रदूषण आणि खारफुटीत होणारी घट.
बेफाम औद्योगिक प्रदूषणामुळे जलसंपदेवर गंभीर परिणाम झालाय, असं उस्मान गनी म्हणतात. ते नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे सचिव आहेत. "त्यामुळे मासे किनाऱ्यापासून दूर पळतात आणि मच्छीमारांना समुद्रात खोलवर जावं लागतं," ते सांगतात. "ते जेवढे आत जातात, तेवढ्या अधिक प्रमाणात आपत्कालीन सुविधांची गरज भासते."
राज्य पर्यावरण अहवाल २०१३ नुसार गुजरातच्या किनारी प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये ५८ मोठे उद्योगधंदे आहेत, ज्यात रसायनं, पेट्रोलियम पदार्थ, स्टील आणि धातू, इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. शिवाय या जिल्ह्यांमध्ये एकूण ८२२ खनिज आणि ३१५६ रेती उत्खनन प्रकल्पही चालू होते. २०१३ मध्ये हा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर ह्या आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असावी, असं कार्यकर्त्यांचं मत आहे.
या अहवालानुसार राज्यातील एकूण वीजनिर्मिती प्रकल्पांपैकी ७० टक्के प्रकल्प किनारी प्रदेशातील १३ जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहेत, आणि उरलेले ३० टक्के प्रकल्प उर्वरित २० जिल्ह्यांमध्ये विखुरले आहेत.
"उद्योगधंदे बरेचदा पर्यावरणीय नियम मोडीत काढतात. सगळे प्रकल्प आपलं सांडपाणी एक तर थेट समुद्रात किंवा नद्यांमध्ये सोडतात," बडोदा-स्थित पर्यावरण कार्यकर्ते रोहित प्रजापती सांगतात. "गुजरातमध्ये प्रदूषित नद्यांची संख्या वीसहून अधिक आहे. त्यातल्या बऱ्याच नद्या पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळतात."
किनाऱ्यालगत विकासाच्या नावाखाली राज्याने खारफुटीच्या क्षेत्राचंही नुकसान केलंय, असं गानी यांना वाटतं. "खारफुटीमुळे किनाऱ्याचं संरक्षण होतं आणि माशांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा मिळते," ते म्हणतात. "पण गुजरातच्या किनाऱ्यालगत जिथेही उद्योगधंदे उभे झालेत, तिथे खारफुटीचं जंगल नष्ट करण्यात आलं. खारफुटीच्या अभावी मासे किनाऱ्याजवळ येत नाहीत."
२०२१ सालच्या भारत वनस्थिती अहवालानुसार राष्ट्रीय पातळीवर खारफुटीच्या क्षेत्रफळात २०१९ पासून १७ टक्के वाढ झाली असताना गुजरातमध्ये मात्र २ टक्के घट झालीय.
अहवालात असाही खुलासा केलाय की गुजरातच्या ३९ पैकी ३८ किनारी तालुक्यांना कमीअधिक प्रमाणात किनारीपट्टी ढासळत जाण्याचा धोका आहे. खारफुटीचं जंगल असतं तर हा धोका टळला असता.
"आपण खारफुटीचं संवर्धन करण्यात अपयशी ठरलो हे गुजरातच्या किनाऱ्यालगत समुद्र पातळीत वाढ होण्यामागचं एक कारण आहे. आता समुद्राच्या लाटा प्रदूषित पाणी किनाऱ्यावर परत घेऊन येतात," प्रजापती म्हणतात. "प्रदूषणामुळे आणि [परिणामी] खारफुटीच्या अभावी किनाऱ्या भोवतालचं पाणी प्रदूषितच राहतं."
मासेमारीसाठी किनाऱ्याहून दूर जावं लागत असल्यामुळे कोळी लोकांना आता जोरदार लाटा, प्रचंड वारे आणि अनिश्चित हवामानाचा सामना करावा लागतो. गरीब कोळ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो कारण त्यांच्या होड्या सहसा लहान असतात शिवाय प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याइतक्या मजबूत नसतात.
एप्रिल २०१६मध्ये सनाभाई शियाल यांची होडी ऐन समुद्रात तुटून पडली. जोरदार लाटेमुळे एक चीर गेली आणि होडीवर असलेल्या आठ मच्छीमारांनी अथक प्रयत्न करूनही पाणी आत शिरू लागलं. मदतीसाठी हाक मारण्यात काही अर्थ नव्हता कारण भोवती कोणीच नव्हतं. ते एकटे पडले होते.
सगळ्या मच्छीमारांनी जिवाच्या आकांताने समुद्रात उड्या मारल्या आणि होडीचे तुकडे तुकडे होऊन ती बुडाली. प्रत्येकाने मिळेल त्या लाकडाच्या ओंडक्याचा आधार घेतला. सहा जण वाचले. ६० वर्षीय सनाभाई आणि आणखी एक जण दगावला.
बचावलेले कोळी जवळपास १२ तास समुद्रात पोहत होते तेंव्हा कुठे एका ट्रॉलरने त्यांना बाहेर काढलं.
"त्यांचं शव तीन दिवसांनी सापडलं," सनाभाईंच्या पत्नी जमनाबेन, ६५, म्हणतात. त्या जाफराबादला राहतात. "स्पीड बोटने त्यांचा जीव वाचवला असता का माहीत नाही, पण निदान जगायची एक संधी तरी मिळाली असती. त्यांना बोटीत बिघाड झालाय हे कळताच त्यांनी तात्काळ मदत मागितली असती. तेंव्हा नेमकं काय घडलं असेल एवढा विचार करणंच हातात उरलंय, हे सगळ्यात वाईट आहे."
त्यांचे दोन मुलंही मच्छीमार आहेत. दिनेश, वय ३० आणि भूपद, वय ३५ विवाहित असून प्रत्येकाला दोन मुलं आहेत. सनाभाईंच्या मृत्यूनंतर दोघंही जरा चिंतित आहेत.
"दिनेश अजूनही मासे धरतो. भूपद मात्र जमेल तितकं ते टाळतो," जमनाबेन म्हणतात. "पण आम्हाला घर चालवायचं आहे अन् कमाईचा हा एकच मार्ग आहे. आमचं आयुष्यच समुद्राला वाहिलंय."
*****
मच्छीमारीच्या ट्रॉलरचे मालक ५५ वर्षीय जीवनभाई शियाल सांगतात की समुद्रात जाण्याआधी कोळी लोक मनातल्या मनात प्रार्थना करतात.
"एखाद वर्षाआधी समुद्रात गेलो असताना माझ्याकडे काम करणाऱ्या एकाच्या छातीत दुखायला लागलं," ते सांगतात. "आम्ही लगेच किनाऱ्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला." ट्रॉलर किनाऱ्याला लागेपर्यंत तो छातीवर हात दाबून होता. पाच तास त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. शियाल म्हणतात की ते पाच तास त्यांना पाच दिवसांसारखे वाटले होते. एकेक सेकंद लांबत चालला होता. मिनिटा मिनिटाने चिंता वाढत जात होती. किनाऱ्यावर पोचताच त्याला रुग्णालयात भरती केलं म्हणून तो बचावला.
त्या एका फेरीत शियाल यांना रू. ५०,००० खर्च आला कारण त्यांना एकाच दिवसात परत यावं लागलं. "एका फेरीला ४०० लिटर इंधन लागतं," ते म्हणतात. "आम्ही एकही मासा न धरता परत आलो."
शियाल यांच्या मते मासेमारीत वरचा खर्च इतका वाढलाय की तब्येत बिघडली तरी सगळे त्याकडे दुर्लक्ष करतात. "हे धोक्याचं ठरू शकतं. पण आमचं जगणंच असं आहे की फार काही पैसा मागे पडत नाही. आमची परिस्थितीच अशी आहे की आम्हाला तब्येतीकडे कानाडोळा करावाच लागतो. बोटीवर आजारी पडलो तरी आम्ही त्रास सहन करतो अन् घरी परतल्यावरच इलाज करून घेतो."
शियाल बेटच्या या रहिवाशांसाठी घरी परतल्यावरही आरोग्यसेवांची वानवाच आहे. या बेटावर जाण्यासाठी १५ मिनिटांची फेरी घ्यावी लागते; डुलत्या होडीवर चढण्या-उतरण्यात पाचेक मिनिटं जातात, ती वेगळीच.
बोट अँब्युलन्सव्यतिरिक्त बालधिया यांच्या याचिकेत शियाल बेटाच्या ५,००० हून अधिक रहिवाशांसाठी एक चालू प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) सुरू करण्याची मागणीही होती. हे सगळे पोटापाण्यासाठी मासेमारीवर अवलंबून आहेत.
याचिकेवर आदेश देताना उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की आरोग्य उपकेंद्रात आठवड्यातून पाच दिवस सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० पर्यंत जिल्ह्यातल्या व आसपासच्या आरोग्य अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येईल.
रहिवाशांच्या मते मात्र यावर प्रत्यक्षात काहीच कृती झाली नाहीये.
कानाभाई बालधिया पूर्वी मच्छीमारी करत. ते म्हणतात गुडघे तपासायला त्यांना कायम जाफराबाद किंवा राजुला इथे जावं लागतं. "इथली पीएचसी बरेचदा बंद असते," ७५ वर्षीय कानाभाई सांगतात. "कोर्टाने म्हटलंय की इथे आठवड्यातून पाच दिवस डॉक्टर असायला हवा. म्हणजे लोक शनिवार-रविवारी आजारी पडत नाहीत की काय? अर्थात आठवड्याचे बाकी पाच दिवसही इथली परिस्थिती अवघडच म्हणायची. दर वेळी डॉक्टरकडे यायचं तर मला बोटीचा प्रवास करावा लागतो.
गर्भवती महिलांची वेगळीच आणि मोठी अडचण आहे.
हंसाबेन शियाल, २८, हिला आठवा महिना लागलाय आणि गुंतागुंतीची तब्येत असल्यामुळे तिला गरोदरपणात तीनदा जाफराबादच्या रुग्णालयात जावं लागलंय. सहाव्या महिन्यात एकदा पोटात प्रचंड वेदना झाल्याचं ती सांगते. रात्रीची वेळ होती आणि फेरीची वाहतूक कधीच थांबली होती. तिने कशी तरी रात्र काढली आणि पहाटेची वाट पाहत राहिली.
पहाटे चारच्या सुमारास हंसाबेनला वेदना असह्य होऊ लागल्या. तिने एका नावाड्याला मदतीसाठी बोलावून आणलं. "पोटुशी असताना बोटीत चढणं उतरणं फारच अवघड असतं," त्या म्हणतात. "बोट कधीच स्तब्ध नसते. स्वतःचा तोल स्वतःच सांभाळावा लागतो. लहानशी चूकही तुम्हाला पाण्यात बुडवू शकते. असं वाटतं जणू काही तारेवरची कसरतच सुरू आहे."
त्या बोटीवर चढल्या तेव्हा त्यांच्या सासूबाई मंजूबेन, वय ६०, यांनी अँब्युलन्स बोलावली. "आम्हाला वाटलं अगोदर सांगून ठेवलं तर तेवढाच वेळ वाचेल," ती म्हणते. "पण त्यांनी आम्हाला जाफराबादला पोहोचल्यावर पुन्हा फोन करायला सांगितला."
५-७ मिनिटं अँब्युलन्सची वाट पाहिल्यानंतर तिला रुग्णालयात नेता आलं.
या प्रकरणानंतर हंसाबेनला भीतीच बसलीये. "मला भीती वाटते की प्रसूतीच्या वेळी मी दवाखान्यात वेळेत पोहोचणार नाही," ती म्हणते. "असं वाटतं कळा सुरू झाल्या तर मी बोटीतून पाण्यात पडेन. गावातल्या काही जणी वेळेत दवाखान्यात पोचल्या नाहीत म्हणून दगावल्या. काही जणींचं तर बाळही वाचलं नाही."
अरविंदभाई या याचिकेशी निगडित एक कार्यकर्ते-वकील आहेत. त्यांच्या मते आरोग्यसुविधांचा अभाव हे अलिकडच्या काळात शियाल बेटातून होणाऱ्या स्थलांतराचं एक प्रमुख कारण आहे. "तुम्हाला अशी किती तरी कुटुंबं भेटतील ज्यांनी आपल्या मालकीचं सारं काही विकून टाकलंय. आरोग्यसेवा नाही म्हणून किती तरी कुटुंबांवर आघात झाले आहेत. किनारी भागात रहायला गेलेले हे लोक इथून गेले ते परत कधी न येण्याचा निर्धार करूनच."
किनाऱ्यावर राहणाऱ्या गाभीबेन यांनी पण केलाय: त्यांच्या घराण्याची पुढची पिढी या परंपरागत व्यवसायातून बाहेर पडणार. जीवनभाईंच्या मृत्यूनंतर त्या इतर मच्छीमारांकडे मासळी सुकवण्याची कामं करतात. या कष्टाच्या कामाची त्यांना रू. २०० रोजी मिळते. यातली पै अन् पै त्या १४ वर्षांचा नातू रोहित याच्या पुढील शिक्षणासाठी साठवून ठेवतायत. त्यानं मोठं होऊन मच्छीमार सोडून बाकी काहीही व्हावं, अशी त्यांची इच्छा आहे.
म्हातारपणी गाभीबेन यांना एकटं सोडून रोहितला जाफराबादला जावं लागलं तरी बेहत्तर. आपलं आयुष्य कायम भीतीच्या सावटाखाली जगणारे जाफराबादेत बरेच आहेत. गाभीबेन मात्र यापुढे त्या सावटात राहणार नाहीत हे नक्की.